परवाचे ते पनामा प्रकरण पाहा. शेजारच्या तात्यांना तर तो देश आहे हेच माहीत नव्हते. त्यांना तो एनिमासारखा वैद्यकीय उपचार वाटला. अखेरीस त्यांचेच खरे ठरले! तो उपचारच निघाला; करातून कर सोडवण्याची करामत करण्याचा! सरकार ‘‘करा’ग्रे वसते लक्ष्मी’ म्हणत असते, तर ही मंडळी ‘करामुळे (तिची होते) सरस्वती’ म्हणत असतात. सरस्वती गरीब, पण बुद्धिमान. खरे तर ह्य मंडळींकडील ‘सरस्वती’ त्यांच्या लक्ष्मीला वाचवते, हेच खरे! आम्हाला खरंच ह्य़ा अभ्यासू लोकांचे कौतुक आहे. प्रत्येक कष्ट करणारा जर कौतुकास पात्र असेल, तर कष्ट चुकवण्यासाठी कष्ट करणाराही कौतुकास पात्रच म्हटला पाहिजे! पांढऱ्यावर काळे करून मोठी हुशारी दाखवणारे विद्वान ठरणार असतील, तर पांढऱ्याचे काळे व काळ्याचे पांढरे करणारेही हुशारच म्हटले पाहिजेत. काही तज्ज्ञ तर त्याही पुढे जाऊन होत्याचे नव्हतेही करून दाखवतात म्हणे.
आम्हा पांढरपेशांना हे सर्व जादूचे प्रयोगच वाटतात. लहानपणी जादूचे प्रयोग व जादूगार ह्यंविषयी मोठे आकर्षण असायचे. टोपीतून ससा व इतर वस्तू काढणारा जादूगार आम्हास ह्य सृष्टीचाच कर्ता वाटायचा. देव- देव म्हणजे अजून काय वेगळे असणार, असे आमच्या बालमनास वाटायचे. काळ पुढे सरकत गेला तशी जादूगारांची समाजमनावरची जादू कमी होत गेली. मुख्य कारण म्हणजे- साध्या नगरसेवकांपासून खासदार-मंत्र्यांपर्यंत अनेक लोक ह्य़ा व्यवसायात उतरले व ह्य़ा उद्योगाची भरभराट झाली. ही मंडळी टोपीतून काही काढण्यापेक्षा गायब करण्याकडे वळली. एक-दोन रुपयांची नाणीच काय, काही स्कॉलर लोक तर विहिरी व धरणे गायब करू लागली आणि आमच्या वेळचे जादूगार लोक फक्त क्लासेसपुरते उरले.
आपल्या महाराष्ट्रात एक ‘राष्ट्रदिवा’ नावाची एनजीओ आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी असे दिवे लावले की उभ्या महाराष्ट्राचे डोळे पांढरे झाले, काही दिसेना. सध्या ऑपरेशन चालू आहे. पाहू या- रुग्ण वाचतो की मोतिबिंदू. ‘राष्ट्रदिवा’ संस्थेचा एक कार्यकर्ता आमच्याकडे आला होता. सध्या आमचे समविचारी सरकार असल्याने बऱ्याचजणांना वाटते की ते आम्हीच चालवतो. पण तसे नाही. सरकार आपोआपच आमच्यासारखे चालत आहे.
तर तो कार्यकर्ता ‘काही होऊ शकेल का?’ ते विचारायला आला होता. त्यावेळी त्याने संस्थेची बाजू हिरीरीने मांडली. स्वत:च्या नेत्यांच्या संपत्तीविषयी त्या संपत्तीइतकेच भरभरून बोलला. आम्ही धर्माभिमानी लोक आहोत हे जाणून, संपत्ती म्हणजे मिथ्या व माया आहे हे त्याने सांगितले. आम्ही आध्यात्मिक असल्याने आम्हाला ते लगेच पटले. त्यामुळे ‘संपत्ती कोणाकडे का राहिना; काय फरक पडतो?’ हा प्रश्नही पटला. शिवाय, जितकी संपत्ती जास्त, तितक्या कटकटी अधिक. तिची राखण करा, स्वत:ची सुरक्षा वाढवा, संपत्ती मोजण्यासाठी, हिशोबासाठी माणसे नेमा.. हे सर्व गरीब माणसे कसे करणार?! त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती नसलेलीच बरी, हे म्हणणे अगदीच अर्थशास्त्रीय आहे! आपल्या नेत्यांनी अजिबात जास्त दौलत कमावली नसून उलट त्यांच्या संपत्तीची वाढ देशात सर्वात कमी असेल, हे त्याने अर्थशास्त्रानेच पटवले.
उदाहरणार्थ, एक गरीब शेतकरी मरायचा विचार करीत होता. पण शेवटचा प्रयत्न म्हणून कुठे मजुरी मिळते का, ते पाहू लागला. एके ठिकाणी मिळाली. दिवसाची शंभर रुपये. म्हणजे त्या दिवशी सकाळी ज्या माणसाकडे शून्य रुपये होते त्याच्याकडे दिवसअखेर शंभर रुपये आले. किती वाढ झाली उत्पन्नात? शंभरपट! पण त्याच्याविरुद्ध कोणी कारवाई करत नाही. बिचारे आमचे राजकीय पुढारीच सापडतात! त्यांनी जरा दहा कोटीचे शंभर कोटी केले की आपले पोट दुखते. बरं, हे किरकोळ दहापट उत्पन्न वाढायला पाच वर्षे लागतात. त्या बिलंदर शेतमजुरासारखे एका दिवसात शंभरपट वाढलेले नसतात. एवढी वाढ होऊनही तो शेतकरी पुढे आत्महत्या करतो हे केवळ विधिलिखित; दुसरे काही नाही. हे स्पष्ट दिसत असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाची सहानुभूती! आणि ज्यांच्या उत्पन्नात नाममात्र दहापट वाढ, ते बिचारे राष्ट्रदिवे दोषी?
तो राष्ट्रदिवा खरंच अर्थशास्त्रीय सत्य सांगत होता. प्रत्येक गरीब हा केवळ त्या रात्रीपुरता गरीब असतो. परत पुढच्या दिवशी त्याचे उत्पन्न पन्नास किंवा शंभरपट वाढलेले दिसून येते. पण पुढाऱ्यांचे उत्पन्न एका दिवसात एवढे टक्के कधीच वाढत नाही. ठीक आहे, ते दिवसाला कदाचित एक कोटी कमावत असतील. पण आधीपासूनच त्यांच्याकडे असलेल्या एक हजार कोटींच्या मालमत्तेच्या तुलनेत ती रक्कम एक टक्काही होत नाही! आणि ती संपत्ती कमावताना त्यांच्या मनात फक्त आणि फक्त शाहू, फुले, आंबेडकरच असतात हे सांगायला तो कार्यकर्ता विसरला नाही. त्या शेतकऱ्यांच्या मनात काय असते? तर फक्त पुढच्या जेवणाची चिंता. अशी दूरदृष्टीहीन माणसे देश पुढे कसा नेणार, तुम्हीच सांगा!

इतक्या अल्प उत्पन्नवाढीनंतरही पुढारी देशासाठी काय करीत नाही?
महात्मा फुलेंचा शिक्षणाचा संदेश सर्वदूर पोचवण्यासाठी ते स्वत:ची मुले शिक्षणासाठी परदेशी पाठवतात; स्वत:च्या भावनिक हानीची पर्वा न करता! छत्रपती शाहूंना जशी देशाची प्रगती व्हावी असे वाटत होते, ती साध्य करण्यासाठी युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलियाचे अभ्यासदौरे काढतात; विमाने पडण्याची पर्वा न करता! आंबेडकरांना अपेक्षित समता यावी म्हणून परदेशी आलिशान गाडय़ा स्वदेशाच्या रस्त्यांवर चालवतात. भारतीय गरीबांना त्या पाहता याव्यात म्हणून मुद्दाम पदरमोड करून विकत घेतात! जागतिक मंदी संपावी म्हणून अत्यंत नाइलाजाने काहीजण परदेशात फिरायला जातात. आता कोणाला वाटेल, की किती ही जम्मत! पण तो विमानाचा पंधरा तास प्रवास, ते तपासणीच्या रांगेत एक-एक तास उभं राहणं, तिकडची थंडी, तिच्यावर मात करण्यासाठी घ्यावे लागणारे अत्यंत कडू औषध.. अशा अनेक अडचणींना तोंड देणे ही मौज नव्हे!
आणि हे सर्व करताना मनात शाहू-फुले-आंबेडकर! इतके सगळे करायचे आणि वर लोकांच्या तिरस्काराचे धनी व्हायचे; हा कुठला न्याय? हा प्रष्ण विचारताना राष्ट्रदिवा संघटनेचा कार्यकर्ता पाणावला. ह्यवर कुणीतरी असंवेदनशील मनुष्याने ‘ह्य सगळ्याला पैसा कुठून येतो?’ हा प्रष्ण विचारलाच. ह्यवर ‘जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ’च्या चालीवर तो कार्यकर्ता आक्रंदू लागला.
रामही (थेट रामच!) आलिशान रथातून हिंडत असे. पुढे तर त्याने स्वत:चे प्रायव्हेट पुष्पकजेट घेतले, ते चालते? त्याच्या वंशजांनी तक्षशीला वसवली म्हणजे बिचाऱ्या अफगाणिस्तानवर हल्ला केला. म्हणजेच असहिष्णुता दाखवत मुस्लीम बांधवांना मारीले! आम्ही त्या राष्ट्रदिव्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, की त्याकाळी मुस्लीम नव्हते व अफगाणिस्तानही. तर त्याने त्यावर जोरदार आक्षेप घेतला. मुस्लीम नसते तर राम इतकी र्वष राज्यावर राहिलाच कसा, हा बिनतोड मुद्दा काढला! त्याचेही बरोबर आहे. अल्पसंख्याक पाठीशी नसताना इतकी र्वष राज्य करण्याची कल्पनाच त्याला करवली नाही!
आजच्या सत्तांधतेला कुंती जबाबदार, असेही तो ठासून म्हणाला. आम्ही आठवू लागलो की, ही कोण बुवा अज्ञात काँग्रेसी? तर ती पांडवांची माता निघाली! तीही माद्रीसारखी सती गेली असती तर ती पाच मुले कुठेतरी जंगलात ऋषीमुनी झाली असती. इस्टेटीचा वाद चिघळला नसता. कॅपिटॅलिस्ट प्रकारचे महाभारत युद्ध झाले नसते व आजच्या भारत देशात हे सत्तेचे खूळ रुजले नसते! आजकाल आपल्यावर शेकतंय असं वाटलं की लगेच ते राष्ट्रदिवे पुराणातल्या गोष्टी घुसळतात. प्राचीन लोकांना दोष दिला की अर्वाचीन लोक अलगद सुटतात, हे सगळ्यांच्याच खूप सोयीचे झाले आहे. प्राचीन लोक मेलेले असल्याने त्यांची बदनामी झाली तर फरक पडत नाही. शिवाय पुरोगामी खिडकीवर लगेच आधारकार्ड मिळते, ते वेगळेच!
मग त्याने संस्थानिकांना हात घातला. कालपरवापर्यंत ते सर्व राजे जनतेला लुटून खजिने भरायचे व ऐटीत राहायचे. पण ते सतत राजे राहिले. त्यांच्यावर नाही कुणी खटले भरले! उलट, त्यांना नंतर भरपाई मिळाली! मग आजच्या नेत्यांच्या भुजांमध्ये थोडे द्रव्यबळ आले तर एवढे काय वाकडे झाले?
आम्ही सयाजी, अहिल्याबाई ह्य़ा राजे-राण्यांची आठवण करून दिली, तर ‘त्यांनी चुकीचे पायंडे पाडले’ असे काहीसे तो पुटपुटला. मुळात राजाचे काम सिंहासनावर नीट मागे टेकून बसणे! ते करावे. उगीच चुकीच्या सवयी लावू नयेत. आपणही आपल्या मुलांचे लाड करणे टाळतो ना? हवे ते सर्व दिले तर ती उद्धट होतात, माजतात, हे कौटुंबिक सत्य राजकारणालासुद्धा लागू आहे. जनतेला लागेल ते सर्व पुरवायला ती काही कुक्कुले बाळ नसते. थोडे कष्ट, अडचणी पाहिजेतच. नाहीतर दिलेल्याची किंमत राहत नाही. जनता ऐदी बनते. आम्हीही जर उद्या जनतेच्या परीक्षेत नापास झालो तर हे सांत्वन वापरता येईल!
जनतेच्या पैशांवर कोण परदेशी फिरतंय, लाखो-करोडोंच्या सरकारी गाडय़ा विकत घेतंय, शंभर कोटींच्या रस्ते-पुलांसाठी हजार कोटींची बिले लावतंय- ह्यवर जनता मतदान करत नाही, हे आमच्यासाठी खूप आशावादी चित्र आहे. जात, धर्म हेच आपले मुख्य मुद्दे आहेत. त्यामुळे जनता आलटून-पालटून आपल्यालाच निवडून देत राहील असे त्याने सांगितल्यावर आमचा जीव भांडय़ात पडला. त्याने आम्हाला त्यांच्या बर्थ-डे केकचा तुकडाही दिला. स्वत:ही खाल्ला. पण तो बकाणा भरताना त्याच्या मनात सतत फुले-आंबेडकर-शाहूच होते ह्यची आम्हास खात्री आहे!
lokrang@expressindia.com

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
political parties in uttar pradesh hail sc judgement on bulldozer action
‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Paaru
अहिल्यादेवीचा जीव धोक्यात? बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला