परवाचे ते पनामा प्रकरण पाहा. शेजारच्या तात्यांना तर तो देश आहे हेच माहीत नव्हते. त्यांना तो एनिमासारखा वैद्यकीय उपचार वाटला. अखेरीस त्यांचेच खरे ठरले! तो उपचारच निघाला; करातून कर सोडवण्याची करामत करण्याचा! सरकार ‘‘करा’ग्रे वसते लक्ष्मी’ म्हणत असते, तर ही मंडळी ‘करामुळे (तिची होते) सरस्वती’ म्हणत असतात. सरस्वती गरीब, पण बुद्धिमान. खरे तर ह्य मंडळींकडील ‘सरस्वती’ त्यांच्या लक्ष्मीला वाचवते, हेच खरे! आम्हाला खरंच ह्य़ा अभ्यासू लोकांचे कौतुक आहे. प्रत्येक कष्ट करणारा जर कौतुकास पात्र असेल, तर कष्ट चुकवण्यासाठी कष्ट करणाराही कौतुकास पात्रच म्हटला पाहिजे! पांढऱ्यावर काळे करून मोठी हुशारी दाखवणारे विद्वान ठरणार असतील, तर पांढऱ्याचे काळे व काळ्याचे पांढरे करणारेही हुशारच म्हटले पाहिजेत. काही तज्ज्ञ तर त्याही पुढे जाऊन होत्याचे नव्हतेही करून दाखवतात म्हणे.
आम्हा पांढरपेशांना हे सर्व जादूचे प्रयोगच वाटतात. लहानपणी जादूचे प्रयोग व जादूगार ह्यंविषयी मोठे आकर्षण असायचे. टोपीतून ससा व इतर वस्तू काढणारा जादूगार आम्हास ह्य सृष्टीचाच कर्ता वाटायचा. देव- देव म्हणजे अजून काय वेगळे असणार, असे आमच्या बालमनास वाटायचे. काळ पुढे सरकत गेला तशी जादूगारांची समाजमनावरची जादू कमी होत गेली. मुख्य कारण म्हणजे- साध्या नगरसेवकांपासून खासदार-मंत्र्यांपर्यंत अनेक लोक ह्य़ा व्यवसायात उतरले व ह्य़ा उद्योगाची भरभराट झाली. ही मंडळी टोपीतून काही काढण्यापेक्षा गायब करण्याकडे वळली. एक-दोन रुपयांची नाणीच काय, काही स्कॉलर लोक तर विहिरी व धरणे गायब करू लागली आणि आमच्या वेळचे जादूगार लोक फक्त क्लासेसपुरते उरले.
आपल्या महाराष्ट्रात एक ‘राष्ट्रदिवा’ नावाची एनजीओ आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी असे दिवे लावले की उभ्या महाराष्ट्राचे डोळे पांढरे झाले, काही दिसेना. सध्या ऑपरेशन चालू आहे. पाहू या- रुग्ण वाचतो की मोतिबिंदू. ‘राष्ट्रदिवा’ संस्थेचा एक कार्यकर्ता आमच्याकडे आला होता. सध्या आमचे समविचारी सरकार असल्याने बऱ्याचजणांना वाटते की ते आम्हीच चालवतो. पण तसे नाही. सरकार आपोआपच आमच्यासारखे चालत आहे.
तर तो कार्यकर्ता ‘काही होऊ शकेल का?’ ते विचारायला आला होता. त्यावेळी त्याने संस्थेची बाजू हिरीरीने मांडली. स्वत:च्या नेत्यांच्या संपत्तीविषयी त्या संपत्तीइतकेच भरभरून बोलला. आम्ही धर्माभिमानी लोक आहोत हे जाणून, संपत्ती म्हणजे मिथ्या व माया आहे हे त्याने सांगितले. आम्ही आध्यात्मिक असल्याने आम्हाला ते लगेच पटले. त्यामुळे ‘संपत्ती कोणाकडे का राहिना; काय फरक पडतो?’ हा प्रश्नही पटला. शिवाय, जितकी संपत्ती जास्त, तितक्या कटकटी अधिक. तिची राखण करा, स्वत:ची सुरक्षा वाढवा, संपत्ती मोजण्यासाठी, हिशोबासाठी माणसे नेमा.. हे सर्व गरीब माणसे कसे करणार?! त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती नसलेलीच बरी, हे म्हणणे अगदीच अर्थशास्त्रीय आहे! आपल्या नेत्यांनी अजिबात जास्त दौलत कमावली नसून उलट त्यांच्या संपत्तीची वाढ देशात सर्वात कमी असेल, हे त्याने अर्थशास्त्रानेच पटवले.
उदाहरणार्थ, एक गरीब शेतकरी मरायचा विचार करीत होता. पण शेवटचा प्रयत्न म्हणून कुठे मजुरी मिळते का, ते पाहू लागला. एके ठिकाणी मिळाली. दिवसाची शंभर रुपये. म्हणजे त्या दिवशी सकाळी ज्या माणसाकडे शून्य रुपये होते त्याच्याकडे दिवसअखेर शंभर रुपये आले. किती वाढ झाली उत्पन्नात? शंभरपट! पण त्याच्याविरुद्ध कोणी कारवाई करत नाही. बिचारे आमचे राजकीय पुढारीच सापडतात! त्यांनी जरा दहा कोटीचे शंभर कोटी केले की आपले पोट दुखते. बरं, हे किरकोळ दहापट उत्पन्न वाढायला पाच वर्षे लागतात. त्या बिलंदर शेतमजुरासारखे एका दिवसात शंभरपट वाढलेले नसतात. एवढी वाढ होऊनही तो शेतकरी पुढे आत्महत्या करतो हे केवळ विधिलिखित; दुसरे काही नाही. हे स्पष्ट दिसत असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाची सहानुभूती! आणि ज्यांच्या उत्पन्नात नाममात्र दहापट वाढ, ते बिचारे राष्ट्रदिवे दोषी?
तो राष्ट्रदिवा खरंच अर्थशास्त्रीय सत्य सांगत होता. प्रत्येक गरीब हा केवळ त्या रात्रीपुरता गरीब असतो. परत पुढच्या दिवशी त्याचे उत्पन्न पन्नास किंवा शंभरपट वाढलेले दिसून येते. पण पुढाऱ्यांचे उत्पन्न एका दिवसात एवढे टक्के कधीच वाढत नाही. ठीक आहे, ते दिवसाला कदाचित एक कोटी कमावत असतील. पण आधीपासूनच त्यांच्याकडे असलेल्या एक हजार कोटींच्या मालमत्तेच्या तुलनेत ती रक्कम एक टक्काही होत नाही! आणि ती संपत्ती कमावताना त्यांच्या मनात फक्त आणि फक्त शाहू, फुले, आंबेडकरच असतात हे सांगायला तो कार्यकर्ता विसरला नाही. त्या शेतकऱ्यांच्या मनात काय असते? तर फक्त पुढच्या जेवणाची चिंता. अशी दूरदृष्टीहीन माणसे देश पुढे कसा नेणार, तुम्हीच सांगा!
राष्ट्रदिवा- एक लागणे
परवाचे ते पनामा प्रकरण पाहा. शेजारच्या तात्यांना तर तो देश आहे हेच माहीत नव्हते.
Written by परेश मोकाशी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2016 at 01:35 IST
मराठीतील सर्व सुदाम्याचे ऑरगॅनिक पोहे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokrang article by paresh mokashi