इसपार तो तेरा साथ रहा
.. क्या होगा सखि उसपार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इसपार तो मेरी धडकन को
तेरी सांसो के गीत मिले
खामोश अंधेरी रातों मे
आंखो के अनबुझ दीप मिले
.. क्या होगा सखि उसपार?

इसपार तो भूले भटके को
इक आंचल की पतवार मिली
तल्खी की कडी तनहाई मे
जुल्फों की घनेरी छांव मिली
.. क्या होगा सखि उसपार?

मरना भी सुहाना हो जाये
वो प्यार भरी सौगात मिली
इसपार तो तेरे होने से
जिंदा रहने की प्यास मिली
.. क्या होगा सखि उसपार?

आधीच्या आयुष्यात ध्यानीमनी नसताना आणि तशी चाहूलही नसताना, या सर्वार्थाने ‘मऱ्हाटी’ असलेल्या कवीच्या नावावर जमा झालेली ही पहिलीवहिली हिंदी कविता! स्वत: कवीलाही हा एक आनंद आणि आश्चर्याचा धक्का होता. अर्थात या घटनेमागेही एक कार्यकारण मालिका होतीच. कवी आणि त्याचे कलाकार मित्र या सर्वाचेच ते चित्रपट क्षेत्रातील उमेदवारीचे दिवस होते. पटकथालेखक प्रदीप दीक्षित, छायाचित्रकार देबू देवधर, एकांकिका लेखक सुहास तांबे आणि नुकताच चित्रपट गीतकार म्हणून नावारूपाला येत असलेला कवी सुधीर मोघे हे चौघे वांद्रय़ाच्या साहित्य सहवासमध्ये लेखक-दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांच्या फ्लॅटवर भाडेकरू म्हणून एकत्र राहत होते. दिग्दर्शक बाबा माजगावकर, फिल्म-एडिटर जावेद सय्यद ही दोस्त कंपनीही तिथे येऊन-जाऊन असायची.
थोडक्यात चित्रपटनिर्मितीला आवश्यक असलेली ती एक नव्या उमेदीची टीमच होती. कथा, पटकथा, गीत, संवाद, संगीत, छायाचित्रण, संकलन आणि दिग्दर्शनही.. साहजिकच हे सर्वजण मिळून एका हिंदी चित्रपटाच्या निर्मितीचं स्वप्न पाहत होते. प्रभाकर पेंढारकर यांच्या ‘अरे संसार संसार’ या नितांत सुंदर लघुकादंबरीवर आधारित असलेल्या त्या चित्रपटाचं शीर्षक होतं- प्रिय सुधा.
‘अरे संसार संसार’ ही १९५० च्या दशकातली वरवर पाहता कौटुंबिक वळणाची; पण आतून एक उत्कट प्रेमकथा आहे. तशी इतर कुठलीही बाह्य़ साम्यस्थळं नसतानाही मला ती कादंबरी वाचताना, एरिक सेगल यांच्या ‘लव्ह स्टोरी’ या उत्कट, सुंदर लघुकादंबरीची आणि त्यावरील नितांत रमणीय चित्रपटाचीही आठवण व्हायची. थोडक्यात त्या प्रेमकथेत आम्ही सारेच जी. ए. कुलकर्णीच्या भाषेत सांगायचं तर ‘आतडे गुंतवून’ बसलो होतो. खरं पाहिलं तर मी आणि सुहास तांबे वगळता उरलेले सर्वजण फिल्म इन्स्टिटय़ूटचे उच्च गुणांकित पदवीधर होते. चित्रपटनिर्मितीचं अधिकृत शिक्षण घेतलेले.. पण तरीही माझ्या सुप्त गुणांवर त्या मित्रांचा माझ्यापेक्षाही अधिक विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी ‘प्रिय सुधा’चा हिंदी गीतलेखक आणि संगीत-दिग्दर्शक म्हणून माझी नियुक्ती निश्चित करून टाकली होती. संगीतकार म्हणून माझ्या मनात कसलाही संदेह नव्हता. एक थीम- म्युझिक म्हणून तेव्हा ‘डॉ. झिव्हेगो’च्या ‘लारा टय़ून’ने मी पुरता पछाडलेलो होतो. त्यामुळे या प्रेमकथेचं सूत्र म्हणून मी एक स्वरावली बांधली होती. अतिशय साधी, पण मनस्वी. कथानकाच्या वळणावळणावर विविध वाद्य योजनेतून आणि विविध लयबंधातून वेगवेगळी भाववृत्ती व्यक्त करू शकणारी. मध्ये ३०-३५ वर्षे उलटून गेल्यावरही अगदी आताआतापर्यंत; सहज विषय निघाला तरी देबू देवधर ती टय़ून आख्खी गाऊन दाखवायचा, पण हिंदूी कवी म्हणून मात्र मी स्वत:ला गृहीत धरायला तेव्हाही मुळीच तयार नव्हतो. त्यामुळे चित्रपटातील मोजक्या एक-दोन प्रसंगांसाठी हिंदी साहित्यविश्वातून चांगल्या कविता निवडून त्यांना स्वरबद्ध करायचं, हे मी मनाशी नक्की केलं होतं आणि त्यासाठी जुनं-नवं, हिंदी-उर्दू काव्यविश्व धुंडाळत होतो. पण कथानकाला सुयोग्य काही मिळेल असं दिसेना. त्या प्रवासात हरिवंशराय बच्चनजींच्या एका ओळीनं मात्र माझं लक्ष्य वेधलं.. ‘इस पार प्रिये मधु है, तुम हो.. उसपार न जाने क्या होगा..’ दोन प्रेमी जीवाचं सहज अनपेक्षित जवळ येणं आणि तितक्याच अतक्र्यपणे कायमच्या ताटातुटीला असहाय्यपणे सामोरं जाणं हे तर ‘प्रिय सुधा’ या कथेचं आत्मसूत्रच होतं.. त्यामुळे त्या मंथनातूनच एके दिवशी अंत:करणातून शब्द उमटले. ‘इसपार तो तेरा साथ रहा, क्या होगा सखि उसपार?’ आणि मग पाहता पाहता संपूर्ण कविताच सामोरी आली, सोबत अर्थमधूर स्वररचनाही. आज उणीपुरी तीन दशकं ते शब्द आणि सूर अमूर्तच आहेत. पण स्वत:च्या आणि माझ्या निकटवर्तीय व्यक्तींच्या स्मरणात ते आजही तितकेच सतेज आणि टवटवीत आहेत.. तो चित्रपट कल्पनेतच राहिला..
पण त्यावेळी या कवितेच्या निमित्ताने अनाहूतपणे जाग्या झालेल्या आत्मविश्वासाच्या आधारावरच पुढे एक तपानंतर १९८७ साली स्मिता पाटील, नाना पाटेकर, गिरीश कर्नाड यांच्या अभिनयातून साकार झालेल्या ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचा गीतकार आणि संगीतकार म्हणून माझं नाव चित्रपटगृहाच्या जिवंत काळोखातून रूपेरी पडद्यावरील प्रकाशात उजळून निघालं. इथेही पुन्हा कथा-पटकथालेखक विजय कुवळेकर आणि दिग्दर्शक चंद्रकांत जोशी या मित्रांच्या विश्वासावरच हा अलभ्य लाभ मला झाला.
ये शाम के रंगीन साये
.. कही खो न जाये

ऊदी ऊदी घटा झिलमिलाती हुई
भीनी खुशबू हवा से छलकती हुई
एक जादू सुनहली-सी छायी नई
.. महकी फिजाये..

हाँ, इसी शाम में हम को सबकुछ मिला
एक किनारा मिला, एक घर भी मिला
अधखिला मन खिला.. राज उस का खुला
.. कैसे छिपाये..

ये हंसी शाम जीवन मे आबाद हो
जिंदगी प्यार का गीत-संवाद हो
ना गिला हो, न शिकवा, न फरियाद हो
.. बस ये दुवाये..

शामरावजी कांबळे यांचं प्रतिभाशाली वाद्यवृंद-संयोजन, प्रभाकर जोगांचं अप्रतिम संचालन आणि ज्योत्स्ना हर्डीकर हा नवा ताजा स्वर यांनी ही कविता प्रवाहित झाली होती. मागच्या वर्षी मित्र कुमार नवाथेसोबत रेडिओ सिलोनला प्रदीर्घ भेट दिली. तिथली निवेदिका ज्योती परमारनं माझं नाव ऐकताच ‘सूत्रधार’ चित्रपटातील गाण्याची देखणी एल.पी. रेकॉर्डसमोर हजर केली आणि त्यातलं ‘ये शाम के रंगीन साये’ आम्ही आवडीनं लावतो, म्हणून आवर्जून सांगितलं. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष प्रक्षेपित करताना ऐकवलं तेव्हा मला एका खोल ध्यासाचं वर्तुळ पूर्ण व्हावं, तसं वाटलं. ‘प्रिय सुधा’च्या वेळी लिहिलेली आणखी एक कविता ‘सूत्रधार’च्या एका प्रसंगात चपखल बसली. ‘हंसते हंसते उम्र तबा हो जाती है, बनते बनते बात बिगडती जाती है’ .. त्यातल्या ‘परछाई से आंखमिचौली होती है’ किंवा ‘प्यासी रहकर प्यास कफन मे सोती है’ या ओळी ऐकून चित्रा फडकेंनी दिलेली साधीसुधी दाद तेव्हा कवीला खूप सुखावून गेली. ‘एक मराठी कवी स्वत:च्या मनातल्या मराठी विचारांचा हिंदी अनुवाद करतोय असं वाटत नाहीये..’
हिंदी कवी किंवा गीतकार म्हणून प्रसिद्ध होण्याची महत्त्वाकांक्षा वगैरे मुळातच नव्हती आणि नाही. त्यामुळे यानंतर तसा पाठपुरावा करायचा प्रश्नच नव्हता. पण तरीही हा सिलसिला पुढेही चालूच राहिला, ‘जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये’ या ब्रीदाला जागून. आनंद मोडकसाठी एक कविता लिहिली होती- ‘जाग रहा ये मन मे कैसा गीतभरा पैगाम.. इक बरखा के नाम.’ ईश्वरी शक्तीचं अस्तित्व, श्रद्धा-अश्रद्धा यावर मनात अखंड मंथन नकळत चालूच असतं. पण कधी कधी अचानक त्यातलं काही बाहेर उमटतं.. ‘ये बात बता सकता है इक तूही, तू है या नही?’ हा खटय़ाळ प्रश्न त्यातूनच आला. आनंद मोडक आणि नंदू भेंडे यांच्यासाठी एक पॉप गाणं म्हणून. (शांत पॉपम..?) ‘तुफान ने दर्या घेरा है, कशतीही मौत का डेरा है, कोई तो नाखुदा होगा कही?’ ही अतूट श्रद्धा जशी त्यात आहे, तसे एक अनोखे चॅलेंजही.. ‘कोई तो इशारा होगा, जो दिलका सहारा होगा, तू भी जो नही तो; और सही..’
श्रीधर फडक्यांच्या स्वरांचा वेध घेत आलेली एक काव्यपंक्ती खूप बोलकी आहे..
‘ऐसा तराना’
मीठा सुहाना..
जग हो दिवाना, खो जाये
.. मन गाये, हम दोहराए..’
जे भाग्यवान असतात, त्यांचं मन अखंड गातच असतं. अधूनमधून बाहेर प्रकट होतात ते केवळ प्रतिध्वनी. त्यांना कसलं भाषेचं बंधन? पृथ्वीच्या पाठीवरच्या ज्या कुठल्या बोलीशी, भाषेशी कवीचा सहज संवाद होण्याचा योग येईल, त्यामध्ये ते तरंग आपसूक उमटतील- कविता म्हणून.. गाणी म्हणून.. त्यात कसलाही दैवी चमत्कार वगैरे नाही. चमत्कार असेलच तर ते आहे आपलं ‘अखंड गाणारं मन आणि त्यावरचे अनाहूत निर्मोही तरंग.. कवीच्या ‘शब्दधून’ मधली एक छोटीशी कणिकाही हीच साक्ष देते..
शब्दांचे वेष अनेक
शब्दांचे देश अनेक
शब्दांच्या कवचाआड
.. शब्दांचे स्पंदन एक

मराठीतील सर्व कविता - सखी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir moghe writes on marathi poem
Show comments