‘बाप रे ! ५२ किलो?’ जोशीकाकू जवळजवळ किंचाळल्याच. मला कळेना, काय झालं ते. ‘अहो, १७ किलोनं कमी झालंय यांचं वजन!’ घाबरलेल्या स्वरात त्यांनी माहिती पुरवली.
‘किती दिवसांत १७ किलो कमी झालं? एक-दोन महिन्यांत नाही ना?,’  मी विचारलं.
‘नाही. पण तरी पाच-सहा महिन्यांत झालंय. अहो, यांची शुगर लवकर कमीlok12च होत नाही. त्यामुळे यांच्या खाण्यापिण्यावर खूप र्निबध आले आहेत. पोटात काही गेलं नाही तर वजन कमी होणारच ना? मग अशक्तपणा येतो,’ काकू काकुळतीला येऊन म्हणाल्या- ‘आणि हे बघा, हे असे थरथरतात.’
काकांचा तोल जातोय असं वाटून मी त्वरेनं उठले. ‘आधी तुम्ही बसून घ्या, मग सांगा. मी सगळं ऐकून घेते तुमचं..’ त्यांना आधार देत मी म्हटलं.
खुर्चीवर बसत जोशीकाका म्हणाले, ‘तुम्ही माझ्याशी इतकं गोड बोलू नका हो. (काकूंकडे बघत) मला सवय नाही त्याची. नाही तर त्यानं पण माझी शुगर वाढायची.’ इतक्या विपरीत परिस्थितीतही काकांची विनोदबुद्धी जागृत होती.
‘हॉ! सवय नाही म्हणे. मग माझ्या नुसत्या बोलण्यानंच तुमची शुगर नॉर्मल का नाही येत?,’ काकू फणकारल्या.
‘तणावामुळे! फार घाबरून घाबरून जगावं लागतं मला. शिवाय कडू चवीची सवय झालीय आता मला. गेल्या तीन वर्षांपासून कारल्याचा आणि कडूनिंबाचा रस घेतोय ना मी रोज!’ काकांचा आणखी एक सीमापार फटका.
‘दुपारी, रात्री कुणाचं लक्ष नसताना चोरून फ्रीजमधलं आईस्क्रीम, चॉकलेट, केक खाता ते सांगा की!’ जोशी काका-काकूंच्या या शाब्दिक बॅडमिंटनच्या खेळात मला हस्तक्षेप करावाच लागला.
त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं, की काकांच्या आजाराची कहाणी थोडय़ाफार फरकानं घरोघरीच आढळते. रक्तातली वाढलेली साखर, ती तशीच राहिली की कमी होणारं वजन, वजनाच्या ढळत्या काटय़ाला वेग देणारं अतिरेकी कडू औषधांचं सेवन, अशक्तपणा, कधी कधी त्याच्या जोडीला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशी आणखी एखादी समस्या, त्यामुळे खाण्यावर आलेले र्निबध, औषधांचा ससेमिरा आणि तरी इन्सुलिनचं वाढत जाणारं प्रमाण..  दुष्टचक्र चालूच.
डायबिटीस, प्रमेह, मधुमेह हे सध्या एकाच अर्थानं वापरले जाणारे शब्द. (शास्त्रात त्यांचे अर्थ भिन्न आहेत. सगळ्यांच्या सोयीसाठी आपण त्याला ‘गोड आजार’ म्हणू या.) तर हा गोड आजार शरीरात एकाएकी निर्माण होत नाही. रुग्णाला तो कळतो, त्याच्या किमान दहा वर्षे आधी त्याची बीजं शरीरात रुजायला सुरुवात झालेली असते. हातापायांची आग, त्वचेला येणारा चिकटपणा, दातांच्या वाढत्या समस्या, घामाचं वाढलेलं प्रमाण, रात्री झोपेतून उठायला लावणारा मूत्रावेग अशा लक्षणांद्वारे तो पूर्वसूचनाही देत असतो. त्याचवेळी त्याकडे लक्ष दिलं गेलं तर पुढे परिस्थिती नियंत्रणात राहू शकते.
साखर/ गूळयुक्त गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दही, दुधाच्या मिठाया, आईस्क्रीम, कॅडबरी हे या आजाराचे शत्रू खरेच; पण या गोड आजाराला ‘गोड आहार’ हे एकच कारण आहे असं नाही. पूर्वीच्या काळीही हा आजार होता आणि त्याला ‘श्रीमंतांचा आजार’ म्हटलं जायचं. अधिक संपत्तीबरोबर येणारं ऐषारामी जीवन हे त्याचं कारण आहे. शहरांत अशा कष्टविरहित जीवनाचं प्रमाण जास्त आहे. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयंपाक, झाडलोट, पाणी भरणं, कपडे धुणं, भांडी घासणं, अंथरूण घालणं आणि काढणं, चालणं.. सगळे कष्ट बंद झाले आहेत. निरोगी राहण्यासाठी दिवसाकाठी प्रत्येक व्यक्तीनं दहा हजार पावलं चालणं अपेक्षित आहे. ही पावलं मोजण्याचं एक छोटं यंत्र आज उपलब्ध आहे. शहरात रोज एक-दीड तास चालायला जाणाऱ्या व्यक्तींनी हे यंत्र दिवसभर लावून ठेवलं तरी त्यांची दहा हजार पावलं पूर्ण होत नाहीत. गावाकडे घराच्या बाहेरही न पडणाऱ्या एखाद्या आजीबाईंची दिवसभराची पावलं मात्र १२ हजारांपर्यंतही जाऊ  शकतात. घराची झाडलोट, सारवणं, गुरांची कामं, यंत्रांचा आणि नोकरांचा अभाव यामुळे त्यांना सहजपणे पुरेसे आणि आवश्यक कष्ट होतात. (जे आपल्याला जास्त आणि अनावश्यक वाटतात.) शहरातल्या या सुखी जीवनातच गोड आजाराची बीजं दडलेली आहेत.
याशिवाय अतिरेकी ताणतणाव, दिवसा झोप आणि रात्री जागरण (या दोहोंना मिळून ‘निद्राविपर्यय’ असं म्हणतात.) या चुकाही आपल्याला भोवतात. (3 ्र्िर३ २३८’ी दुपारी जेवल्यानंतर झोपल्यास स्र्ंल्लू१ीं२ मधील बीटा पेशींवर दाब पडून त्या अकार्यक्षम होतात आणि त्याचं इन्शुलिन स्त्रवणाचं काम मंदावतं, असा आता शोधही लागलाय.) अर्थात आजार होऊ  नये, कुटुंबात तो बीजदोष असेल तर आजाराचं स्वरूप मृदू राहावं यासाठी आपल्या दिनचर्येत तरुणपणीच बदल करायला हवेत. रक्तात साखर दिसल्यावर कामाला लागणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे.
‘माझ्या दंताजीरावांनी निवृत्ती घेतली आहे. चावता येत नाही. खाऊ  शकतो आणि आवडतो असा भात बंद केलाय. सगळी रसद तोडून लढा म्हणताहेत. तरी मी लढणार हं. पण खायचं काय?’ जोशीकाकांचा प्रातिनिधिक प्रश्न.
गोड आजारात खाण्याचं भरपूर वैविध्य ठेवता येतं. उदा. गोड रुग्णांनी धान्य जुनी वापरावीत. तीही धुऊन, वाळवून, भाजून मग दळावी. अशा पिठांची वेगवेगळी ूे्रुल्लं३्रल्ल२ करून आणि त्यात चवीला कांदा, कोथिंबीर, धणे, जिरे, भाज्या, ताक घालून त्यांच्या भाकऱ्या, थालीपीठ, धिरडी, क्वचित डोसे असे विविध पदार्थ बनवता येतात.
भाजलेल्या तांदळाचा भात झाकण न ठेवता पातेल्यात शिजवला तर चालतो. तूप-जिऱ्याच्या फोडणीवर तांदूळ परतून, त्यात गरम पाणी घालून, झाकण न ठेवता शिजवलेले विविध पुलावही चविष्ट, चावायला सोपे आणि पोटभर होतात.
साळीच्या, ज्वारीच्या, राजगिऱ्याच्या लाह्य़ांचा चिवडा किंवा लाहीपीठ ताकात कालवून खाणं हा एक वेगळा स्वादानंद आहे. याच लाह्यांमध्ये कांदा, कोथिंबीर, जिरेपूड, मीठ, आवळ्याचा कीस किंवा रस, मुगाचा भाजून चुरलेला पापड  घालून केलेली भेळ रुग्णाला मनानं तरुण बनवते.
तूप-जिरे-हिरवी मिरची यांत वरीचे तांदूळ व गरम पाणी घालून झाकण न ठेवता शिजवावे. शेवटी चवीपुरतं मीठ, ताक किंवा कोकम आगळ आणि थोडं दाण्याचं कूट घालून एक वाफ द्यावी. असा लज्जतदार पदार्थ  खाऊन कोण तृप्त होणार नाही?
डाळींब, संत्री, मोसंबी, पपई, अननस अशी आंबट-गोड फळं न्याहारीच्या वेळी घेतली तर जेवण आणि जीवन दोहोंतली चव वाढेल.
मांसाहार या आजारात जितका टाळता येईल तितका चांगला. खायचाच असेल तर पाण्यात राहणारे प्राणी खाऊ नयेत. (कारण या आजारात शरीरातील जल महाभूताचं पचन आणि संतुलन बिघडलेलं असतं.)
संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण हा या रुग्णांनी आग्रहाचा विषय ठेवावा. तरच ते नीट पचून साखरेच्या रूपात शरीरात न साठता ऊर्जेत रूपांतरित होऊन शरीराकडून उपयोगात आणलं जाईल.
कडू पदार्थ वैद्यांच्या सल्ल्याने खावेत. दीर्घकाळ खाऊ नयेत. गोड आजारात शास्त्रानं वापरायला सांगितलेलं आणि आपण दुर्लक्षित केलेलं एक गुणी धान्य म्हणजे यव किंवा सातू. सांप्रत याचा वापर जास्तकरून यज्ञामध्ये समिधा म्हणून केला जातो. वैद्यांनी हे खाण्याचा सल्ला दिला तर ‘बेचव’ म्हणून टाळलं जातं. (यवापेक्षा अधिक बेचव आणि तद्दन निरुपयोगी ओट, सोयाबीन मात्र मिटक्या मारत आणि फाजील प्रतिष्ठेनं खाल्ले जातात.) यव भाजून (चण्याच्या भट्टीत भाजून घेतल्यास उत्तम!) त्याचं पीठ करून ठेवावं. नेहमीच्या कणकेत किंवा भाकरीच्या पिठात हे समभाग मिसळून पोळ्या वा भाक ऱ्या कराव्या. यवाच्या पिठाची स्वतंत्र भाकरीही करता येते. मधुमेही रुग्णांसाठी ही भाकरी म्हणजे वरदान असल्यानं आठवडय़ातून दोन वेळा खायला काहीच हरकत नाही. शरीराचं फाजील पोषण न करता, साखर न वाढवता तृप्ती देणारं असं दुसरं धान्य या भूतलावर नाही.
आहार आणि व्यायाम यांच्या मदतीनं कमीत कमी औषधांवर जगता येणं, ही प्रमेहाच्या चिकित्सेतील यशस्वीता आहे. तेव्हा ‘शुभस्य शीघ्रम्’!     

Story img Loader