वर माडीवर रायवळ आंब्यांची ‘आडी’ घातलेली असायची नि सगळ्या घरभर घमघमाट घमघमत राहायचा.. आमच्या आईची आई- जिला आम्ही ‘वैनी आजी’ म्हणायचो- ती फणसाच्या भाजीत काय घालायची देव जाणो; पण आता इतक्या वर्षांनीही मे महिन्यातल्या त्या आजोळच्या दिवसांची नुस्ती आठवण झाली तरी माझी लाळ टपकत राहते.. आणि आणखी एक गंमत म्हणजे- आजही कधी कुठे काजूच्या झाडावर लटकणारे लाल-पिवळे बोंडू नजरेला पडले तरी माझा हात नकळत झट्टदिशी चड्डीकडे जातो नि मी खात्री करून घेतो.. आयला, आपल्या कुल्ल्यांना ‘हुमले’ तर चावत नाहीय्त ना!
कधी एकदा परीक्षा संपते, सुट्टय़ा लागतात नि आम्ही फोंडय़ाहून मडुऱ्याला जातो असं व्हायचं. मे महिन्याच्या सगळ्या दिवसांची मज्जा फक्त ‘मडुरा’ या तीन अक्षरांत होती. गोव्याच्या सीमेला भेटायला जाणारं सावंतवाडी तालुक्यातलं हे छोटंसं हिरवंगार गाव. आईचं माहेर. फोंडय़ाहून आम्ही आणि पुण्याहून मावस भावंडं, मामेभाऊ-बहिणी असे सगळे मडुऱ्यात थडकल्यावर आमची ‘भयंकर सुंदर धुमशाना’ चालायची.
७०-७५ इसवी सनाच्या दरम्यान छोटय़ा खेडेगावामध्ये जो कुणी मराठी शाळेचा हेडमास्तर असायचा, तोच अॅटोमेटिकली सब-पोस्टमास्तर असायचा. असा डबल रोल करणारे आमचे नाना आजोबा भारी कडक होते. नातवंडांचे सगळे लाड पुरवायचा मक्ता होता आमच्या आजीकडे. आणि आम्हाला शिस्त लावण्याचं काम होतं आजोबांकडे. त्यांचा एकमेव मैतर म्हणजे सायार किरीस्तांव. तो फक्त लंगोटीवर हिंडायचा. त्याच्या कमरेला आकडीचा पट्टा नि आकडीत धारदार कोयता असायचा. सायार उंच होता. अवघ्या तीन ढेंगात तो उंच माडाच्या शेंडय़ाशी जायचा. नारळ ढकलून घालायचा. मग पडवीत बसून फुर्र्र फुर्र्र आवाज करीत चहा प्यायचा नि आजोबांकडे हक्कानं विडी मागायचा. तो विडीचा धूर काढण्यात रंगलेला असताना मामेभाऊ संजू त्याच्या अध्र्या उघडय़ा कुल्ल्यांवर हळूच चापटय़ा मारायचा. आम्ही सगळी पोरं खिदळत राहायचो नि सायारसुद्धा स्वत: त्या हसण्या-खिदळण्यात सामील व्हायचा. कधी कधी संजू त्याच्या कुल्ल्यावर चापट मारायला नि आजोबा बाहेर पडवीत यायला एकच गाठ पडायची. मग आजोबा ओरडायचे, ‘संजू, हे रे काय भेंच्योदऽऽ सायाराच्या कुल्ल्याना हात लावतोस..?’
सगळं ‘महाभारत’ क्रमश: मावशीकडून ऐकलं ते अशा मे महिन्याच्या सुटय़ांमध्येच. संध्याकाळ झाली, की भाताच्या कोंडय़ानं काचा पुसायच्या नि कंदील उजळवायचे. एक कंदील पडवीत असायचा. मधे नलूमावशी अन् भोवतीनं आम्ही सगळी आऽऽ वासून. गोष्ट ही वाचायची नसते, तर सांगायची आणि ऐकायची असते, हे मी मावशीकडून शिकलो. आजोळघरच्या पडवीत मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात कौरव-पांडव जिवंत होऊन एकमेकांवर तुटून पडताहेत.. सर्वत्र खणखणाट नि दणदणाट चाललाय.. कल्पना करा- काय होईल त्या मे महिन्याचं!
उन्हाचा कडाका असायचा. अंगाची खूपच काहिली व्हायला लागली की आम्ही नदीत डुंबायला जायचो. नदीच्या दोन्ही काठांवर उंबर, हेळे आणि जांभळाच्या झाडांची सावली. थंडगार पाण्यात तासन् तास आम्ही पडून राहायचो. भान हरपून. पण मग दूरवरून आजोबांची हाक कानी यायची नि सगळी पोरं ओल्या चड्डय़ांनिशी घराकडे धूम पळत सुटायची.
पण ही मडुऱ्याची मजा दरवर्षी मिळायचीच असं नाही. अधूनमधून एखाद्या मे महिन्यात फोंडय़ातच थांबावं लागायचं. फोंडय़ातला मे महिना हे एक और प्रकरण असायचं. सगळ्यात विशेष कार्यक्रम असायचा तो म्हणजे घरात किमान पिण्याचं तरी पाणी भरून ठेवणं. त्यावेळी नळबिळ नव्हते. गावात विहिरी होत्या त्या बहुतेक आटलेल्या. आम्ही जिथं राहायचो त्या ठिकाणापासून थोडी दूर जी विहीर होती, तिच्यात रात्री १२ पासून पहाटे चापर्यंत जे काही पाणी जमायचं ते विहिरीत खोल उतरून छोटय़ा वाटीनं मी किंवा भाऊ कळशीत थेंब थेंब जमा करायचो. एक लहान कळशी भरायला तास- दीड तास लागायचा. पण बाहेर अंधुकही उजेड नसताना पहाट होण्याच्या आधी डुचमळता कंदील हलवत आम्ही विहिरीवर पोचायचो. सगळीकडं चिडीचूप असताना विहिरीतल्या त्या लहानशा झऱ्यातून झुळूक झुळूक येणाऱ्या पाण्याचा तो अगदी आतला आवाज अजूनही माझ्या कानात आहे. पुढे मग मोठेपणी रेडिओत लागल्यावर कधीतरी गांधीजींच्या भाषणाची ध्वनिमुद्रिका ऐकली, तेव्हा मला तो जुना झरा आपल्याशी अगदी आतलं काहीतरी निर्मळ, शुभ्र बोलतो आहे असा भास होत राहिला..
फोंडय़ात मे महिन्याच्या सुट्टीत मुंबैहून गॉगल लावलेले चाकरमानी हमखास उतरायचेच. जणू काय आपण राजेश खन्नाच- असा प्रत्येकाचा थाट. खाली बेलबॉटम. वर रंगीत बुशशर्ट, नाहीतर टी-शर्ट. पायात ‘श्ॉन्डल’ आणि मनगटावर घडय़ाळ. गळ्यात एखादी सोन्याची चेन असली तर मग विचारायलाच नको. ‘ह्य़ॅऽऽ’ करून सगळ्या दुनियेला फाटय़ावर मारायचे. काल-परवापर्यंत गावात लेंगा-बनियन घालून फिरणारा म्हादग्या किंवा रोंग्या मुंबैला जाऊन पॅन्ट घालून गावात आला की म्हादेवराव किंवा रघुनाथभाई व्हायचा. मग एकदम स्टायलच बदलून जायची त्याची. डोळ्यावर गॉगल, ओठात ब्रिस्टॉल सिगरेट नि मानेला झटके देत झुलपं उडवत चाकरमान्याचं भाषण सुरू व्हायचं- ‘अरे, बंबय है भाई बंबय.. तुम नय समझेगा. साला सब कुछ अल्लग यार. हेमामालिनी म्हायती हाय ना तुला? तिका जो भय्या दूद घालता ना, तो माजो दोस्त आसा. तो मेरेकू शूटिंगबिटिंग देखने के वास्ते कोन पन अडवत नाय. डायरेक एन्ट्री. दाराशिंग पन माज्या वळकीचा हाय. एकदा मला शेक्यान्ड दिला तेनी, म्हाय्त हाय? काय रे मायझयाची ती पकड! पन मी काय डरतो काय? ह्य़ॅऽऽ अर,े मुंबैमदे जो डर गया, वो हार गया समझो. दगडी चाळ म्हाय्त हाय काय तुला? नाय म्हाईत? च्यायला, (पान १ वरून) आपल्याशी कोन पन पंगा नाय घेऊ शकत. मी नुस्ता डॉडीला बोल्लो ना, की अमका-तमका मला नडतोय, तर दुसऱ्या दिवशी तेची हाडं पण दिसनार नाय.. शीबीआयने शोदली तरी..’
हे सगळं निमूट गप्प राहून, चाकरमान्याच्या खर्चानं पुढय़ात आलेली गरम भजी खात नि चाय पीत ऐकत राहायचं. त्याला मधे प्रश्न नाही विचारायचा. डोळे विस्फारून, भारावल्यासारखा चेहरा करून, ‘आयला, काय सांगतंस काय!’ किंवा ‘कमाल हा बुवा म्हादेवराव तुजी!’ अशी प्रशस्तिपत्रे देत वेगवेगळ्या चाकरमान्यांकडून फुकटची चाय-भजी खाणे, संपूर्ण मे महिन्यात एकदाही घरी जेवायला न जाता चाकरमान्यांच्या खर्चानं कोंबडय़ा खाणे- या कलेत पांडय़ा आणि बाळ्या वाकबगार होते. एखाद्या मुंबैकराकडे जास्तच पैसे खुळखुळत असले तर अधूनमधून त्याला ‘टिपीन’ करायला आग्रह करायचा. ‘टिपीन’ म्हणजे कोंबडीच्या आधी इंग्लिश बाटली हवीच. काय एकेक नग होते आमच्या गावात! चाकरमान्यांना चढ चढ चढवायचे नि त्याच्याकडून सगळं फुकट खाऊनपिऊन झाल्यावर, त्याचे खिसे रिकामे झाल्यावर त्याला टाळायला लागायचे. का? तर त्याची रजा संपून तो मुंबईला परत जाताना यांच्याकडे ‘उताराला पैसे’ मागेल म्हणून! गावातल्या वाण्याकडे घडय़ाळबिडय़ाळ गहाण ठेवून मग चाकरमानी परतीच्या तिकिटाची- म्हणजे उताराची सोय करायचे. ते दृष्टीआड झाले की मग पांडय़ा-बाळ्या यांच्यातला संवाद सुरू व्हायचा :
‘काय मायझये ह्य़े चाकरमानी समाजतत् काय रे स्वताक? काय तो मेलो म्हादगो..?
: अरे म्हादग्याच्ये वळकी नि म्हशीच्ये बुळकी एकसमान.
: तुका काय वाटता- दगडी चाळीत ह्य़ेची वळख आसात?
: छॅऽऽ! डॅडीबिडीची बातच सोड.. अरे, ह्य़ेका डॅडीचो कुत्रो पन वळकुचो नाय.
एका मे महिन्यात पांडय़ा-बाळ्या या जोडीनं महादेवबरोबर पैज लावली, की झेंगटीच्या रानात जायचं आणि बांदेकराच्या हद्दीतल्या झाडांवरचे आंबे चोरून आणायचे. जो जास्तीत जास्त आंबे पकडला न जाता चोरून आणील त्याला बाकीच्या दोघांनी शंभर-शंभर रुपये द्यायचे. म्हादेवराव चढले घोडय़ावर नि मग आंब्याच्या झाडावर. मस्त पिकलेली लंटुलं बघून तिथंच फांदीवर बसून एकेक आंबा मन लावून चोखत राहिले. राखणदार आला तेव्हा पांडय़ा नि बाळ्या उडय़ा टाकून पळून गेले. सापडला म्हाद्या. त्याला आंबा पिळतात तसा राखणदारानं पिळला. नि मग हाय-हुय करत म्हाद्या परतला तेव्हा ते दोघे दात विचकत समोर उभे! ‘अरेरे म्हादेवा, काय ह्य़ा झाला तुजा! बांदेकराच्या राखण्यान् प्रत्यक्ष तुका हात लावायचो म्हंजे काय? डॅडीक ह्य़ा कळला तर तेका केवडय़ाक पडात..?’
गावात मे महिनाभर पापड, लोणची नि मसाल्यांचा वास परिमळत राहायचा. आम्हा पोरांना पापडाच्या कच्च्या लाद्या खायला मिळायच्या म्हणून अगदी आनंदानं आम्ही पापड राखायचं काम अंगावर घ्यायचो. उन्हात डाळी पसरायची. तिच्या चार कोपऱ्यांवर चार मोठे धोंडे ठेवायचे. मग पांढरं पातळ किंवा जुनं धोतर पसरून त्यावर लाटलेले पापड सुकत घालायचे. दिवसभर कडक उन्हात पापड वाळले की ते हलक्या हातानं डब्यात भरून ठेवायचे.. अशी कामं डोळ्यात तेल घालून करायला लागायची. या बदल्यात घरच्या पैशांनी रीतसर तिकीट काढून एक सिनेमा टुरिंग टॉकीजमध्ये बघायला मिळायचा. शेजारीपाजारीसुद्धा आम्हाला पापडराखणीच्या कामाला बोलावलं जायचं.. एवढं आम्ही भावंडांनी ह्य़ा धंद्यात नाव कमावलेलं होतं. संकेश्वरी मिर्ची व्हायनात कुटून घरगुती मसाला तयार करून ठेवणे- हा एक भयंकर प्रकार असायचा. त्या मसाल्याचा उग्र वास घुसमटवून टाकायचा..
मडुरा असो की फोंडा- जाम मजा यायची उन्हाळ्यात. ती काही थंड हवेची ठिकाणं नव्हती, की कुठली फेमस शहरं. साधीच गावं होती ती. आणि ते त्यावेळचे मे महिन्याचे दिवसही तसे साधेच होते. टुरीझम-बिरीझमसाठी गावात कुणाकडे पैसा नव्हता. त्यावेळी टीव्ही नव्हते की मोबाइल. कसली सीरियल नव्हती की आयपीएल. गावात हॉल नव्हता की मॉल. तरी पण खूप मज्जा होती. सगळी उन्हाळी सुट्टी ‘एन्जॉय’ हा शब्द माहीत नसतानाही धमाल करत भोगण्याएवढी उमेद होती. मे महिन्यात गावात आंब्याचे टाळ लावलेल्या मांडवात लग्नं व्हायची. पंगती उठायच्या-बसायच्या. आग्रह केला जायचा. आणि ‘कृपया, आहेर आणू नये!’ असं खोटं खोटं लिहिलेलं खरं मानून लग्नघरी फुकट जेऊन यायची शहरी पद्धत तिथं रूढ झाली नव्हती. पाच रुपये का असेना, पण आम्ही आहेर न्यायचो आणि पानावर पुन: पुन्हा जिलेबीही मागून घ्यायचो.तो त्यावेळचा उन्हाळाही खरा होता आणि पावसाळाही!नंतर मग हळूहळू उन्हाळ्यात पाऊस पडायचे अवकाळी दिवस आले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा