सुनील गावस्करांनी जे क्षेत्र निवडलं त्यात उत्कृष्टता सिद्ध केली, हे पाहून कुणी म्हणेल की ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसले असते तर पुढे कॅबिनेट सचिव झाले असते, किंवा वित्तीय बँकिंग क्षेत्रातले गावस्कर हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरच झाले असते. संस्मरणीय शास्त्रशुद्ध खेळी देणारे ‘लिटिल मास्टर’ गावस्कर हे आजन्म क्रिकेट शिकत राहिले आणि जगाला आपल्या कर्तृत्वाचे धडे देत राहिले. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एका अर्थतज्ज्ञाने दिलेला खास शब्दऐवज…

देशाच्या वाटचालीत एखादा टप्पा सर्वांचंच मनोबळ प्रचंड वाढवणारा ठरतो. समष्टीमनाची जाणीवजागृती होते, सामूहिक आत्मविश्वास दुणावतो. कदाचित आज असं म्हणणं जुनाट, कालविपर्यस्त वाटेल- कारण आज आपण जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करतो आहोत, सॉफ्टवेअर क्षेत्रात तर पुढे आहोतच पण चंद्रावर आपण यान पोहोचवलं आहे, ऑलिम्पिक पदकं मिळवली आहेत, ऑस्करला भारतीयांची दाखल घ्यावी लागली आहे आणि विश्वचषक तर अनेक जिंकलेत… ते किती वर्षांच्या फरकानं एवढाच मुद्दा. अशा वेळी मनोबल एखाददुसरा विजयानं वाढतं की काय खरंच? पण हा प्रश्न ज्यांना साहजिकपणे पडेल अशा विशीतल्या तरुणांना सांगायला हवं की तो टप्पा ५० वर्षांपूर्वी खरोखरच आला होता. सन १९७१. वसाहतवादी, क्रूर सत्तेकडून भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतरची पहिली दशकं आदर्शवादानं भारलेली होती, धर्मेन्द्रचा ‘सत्यकाम’ गाजला होता… हे सारं ओसरत असतानाच दोन युद्धांच्या जखमा झेलाव्या लागल्या, दुष्काळ सोसावा लागला, राजकीय सुंदोपसुंदीकडे अवाक पाहावं लागतंय तोच अचानक बँक राष्ट्रीयीकरणासारख्या बातमीनं धाबे दणाणले… अशा काळातल्या चरफडीला वाट देणाऱ्या ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चनचा उदय (जंजीर- १९७३) तोवर झाला नव्हता. हा असा मधला काळ. सर्वार्थानं ‘कसोटीचा काळ’! अशा काळात २१ वर्षांच्या, दादरमध्ये राहाणाऱ्या आणि सेंट झेवियर्स कॉलेजात शिकलेल्या तरुणानं अख्ख्या भारताचं लक्ष वेधलं, क्रिकेटप्रेमींना तर मंत्रमुग्ध केलं. १९७१ च्या मार्चमधली त्याची खेळी आणि त्यानंतरची त्याची क्रिकेट कारकीर्द ही इतक्या जिव्हाळ्याचा विषय ठरली की, लाखो चाहत्यांना त्याची वेस्ट इंडीज कसोटीत ‘एकंदर ७७४ धावा’ त्यानं कुठे- किती- चौकार षटकारांसह केल्या, याची जंत्री कधीही मंत्रासारखी घडाघडा तोंडपाठ असते.

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक

आणखी वाचा-ज्याचा-त्याचा पाऊस.. : निळया ताडपत्रीचा दृष्टांत

सुनील गावस्कर हा काही तितकासा ‘अँग्री यंग मॅन’ नव्हता. उलट विज्ञानवादीच म्हणावा इतका तर्कानं चालणारा, अमर्याद एकाग्रता साधणारा आणि शास्त्रशुद्ध पद्धतशीरपणे खेळणारा. त्या वेळी क्रिकेटचे दादा असलेल्या वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीचा मारा हाणून पाडणारा गावस्कर हा, त्या कॅरेबियन बेटांवर भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या पहिल्यावहिल्या विजयाचा निर्विवाद शिल्पकार होता. त्याआधी त्या बेटांच्या दौऱ्यात भारताचा ‘०-०५’ असा निक्काल वेस्ट इंडीजनं लावला होता. ‘क्रिकेटचा देव’ या उपाधीनंच ओळखले जाणारे ‘सर’ गारफील्ड सोबर्स मैदानावर असूनही आणि विंडीजच्या फास्ट बोलर्सचा तो सुवर्णकाळ असूनही गावस्कर चमकला. गावस्करचे सीमापार चौकार थेट पाहाण्यासाठी मुंबईत टीव्हीसुद्धा आलेला नव्हता, तेव्हाच्या काळात त्या चौकारांमुळे आणि त्या विजयामुळे सर्वच भारतीयांनी ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली… आपण कुणाही बलवानाशी दोन हात करू शकतो, असा विश्वास या विजयानं दिला. त्याच वर्षीच्या डिसेंबरात, अमेरिकी युद्धनौका बंगालच्या उपसागरात असताना सॅम माणेकशॉ यांच्या कर्तृत्वामुळे आपण खऱ्याखुऱ्या लढाईतसुद्धा विजयी झालो- अवघ्या १५ दिवसांत एक देश स्वतंत्र झाला… ही आणखी एक लक्ष्मणरेषा होती… आत्मविश्वासाबरोबरच आत्मभान देणारी. आणखीही लक्ष्मणरेषा आपण ओलांडल्या आहेत, पोखरणची पहिली अणुचाचणी १९७४ ची, पण जगातले बडे देश निर्बंध लादण्यासाठी टपलेले असतानाही १९९८ मध्ये दुसरी चाचणी अणुस्फोट, हादेखील लक्ष्मणरेषा ओलांडून जगाच्या मैदानात ताठ मानेनं चालण्याचा टप्पा होता. या साऱ्याची सुरुवात सुनील गावस्कर यांनी केली, तीही पन्नास वर्षांपूर्वी.

पंचाहत्तरीचे गावस्कर हे नायकपदाला पोहोचलेले, जिवंतपणी दंतकथा बनलेले आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभर- विशेषत: क्रिकेटच्या जगात- त्यांचे चाहते आहेत. वेस्ट इंडीजमधले चाहते तर आजतागायत लट्टू आहेत, त्याच्यासाठी गाणी लिहिली गेली आहेत, असं हे नायकपद. लेखक वसंत नाईक यांनी गावस्कर यांना ‘क्रिकेटचे नेपोलियन’ ठरवताना, नेपोलियनसारखा जिथे हवा तिथे विजय- तोही अत्यंत लीलया वाटावा असा- मिळवण्याच्या हातोटीचं वर्णन केलं आहे… अर्थात गावस्करांचं ‘वॉटर्लू’ जगाच्या पाठीवर कुठेही नाही… ज्या ज्या क्षेत्रात ते आले तिथं त्यांनी यशच मिळवलं. मग ते प्रत्यक्ष क्रिकेट खेळणं असो, सनी डेज किंवा आयडॉल्स ही पुस्तकं असोत, नभोवाणी- चित्रवाणीचं क्षेत्र असो, व्यवसाय असो की स्तंभलेखन असो. जिथं गावस्कर असतील तिथं नजर गावस्करांवरच ठरते आणि त्यांची विजयी खेळी दिसते.

आणखी वाचा-दगाबाज ऋतूला पत्र…

खेळाडू म्हणून गावस्करांची कारकीर्द जितकी उज्ज्वल होती तितकी संघनायक गावस्करांची कामगिरी प्रभावी नाही, असा एक टीकेचा मुद्दा हमखास निघतो. तसा मुद्दा काढणंच अतार्किक आहे. कारण तुलनाच करायची तर कॅप्टन म्हणून सोबर्स आणि बोथम यांच्यासारख्या महान खेळाडूंनी कितीदा विजय मिळवून दिले आणि कितीदा नाही, याच्याशी हवी. उलट संघनायक असणं हा अतिरिक्त कार्यभारच ठरला असेल आणि म्हणून उत्कृष्ट फलंदाजी जरा आक्रसली असेल की काय असाही वाद घालता येईल, पण तिथे तर विक्रमांच्या नोंदी दिसतात. एकंदरीत, गावस्करांनी जे क्षेत्र निवडलं त्यात उत्कृष्टता सिद्ध केली, हे पाहून कुणी म्हणेल की ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसले असते तर पुढे कॅबिनेट सचिव झाले असते, किंवा वित्तीय- बँकिंग क्षेत्रातले सुनील गावस्कर हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरच झाले असते. या जर-तरच्या गोष्टी, पण लेखक म्हणूनही गावस्करांना त्यांच्या पुस्तकांनी यश दिलंय. यात आत्मपर लिखाण आहे, तसंच इतरांबद्दलही आहे.

खरं तर वादबीद बादच व्हावेत, इतक्या तपशिलानं आणि इतक्या स्पष्टपणानं गावस्करांच्या व्यक्तित्वाचे सर्व पैलू सर्वांच्या समोर येत गेलेले आहेत. उदाहरणार्थ क्रिकेटमधल्या बाबूशाहीचा त्यांना असलेला तिटकारा. अधिकाऱ्यांबद्दल त्यांना असलेला अविश्वास आणि त्यातून उडालेले खटके. क्रिकेटचं नियंत्रण या कधीही मैदानात न उतरलेल्या बाबूंच्या हातात, तेव्हा (किंवा कधीही) असणं हेच एकतर अनाकलनीय. त्यातही तेव्हा तर, निवड मंडळाच्याही सुरस कथा नित्यनेमानं ऐकू येत आणि यातल्या सुरसपणाचा त्रास गावस्करांनाही भोगावा लागला होता. पण १९७१ ते १९८७ ही जी सतरा वर्षं ते खेळत होते, तो भारतीय क्रिकेटमधला एक देदीप्यमान म्हणावा असा कालखंड ठरला. त्यांची अगदी शेवटची खेळी आठवते… सामना पाकिस्तानशी, गावस्कर ९६ धावांवर बाद- तरीही खेळी स्मरणीय. शास्त्रशुद्धच. ‘लिटिल मास्टर’ गावस्कर हे आजन्म क्रिकेट शिकत राहिल्याचं ज्यांना जाणवलं, त्यांना स्वत:चाच त्या क्षणाचा विस्मयचकितपणाही लक्षात राहिला असेल.

आणखी वाचा-आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल

वेस्ट इंडिजमध्ये त्यांचं आगमन झालं, तेच वेगवान गोलंदाजीला खेळण्याचा अनुभव तसा तोकडाच असताना. कारण तेव्हा भारताकडे द्रुतगती गोलंदाजांचा दुष्काळच होता. मात्र फिरकीवर वाढलेल्या या खेळाडूनं राक्षसी माऱ्याला नमविण्याचं तंत्र आत्मसात केलं. सत्तरच्या दशकात मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, अॅण्डी रॉबर्ट्स आणि जोएल गार्नर या विंडीजच्या भीषण चौकडीलाच नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली, जेफ थॉम्सन यांच्या गोलंदाजीलाही गावस्कर यांनी थोपवलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आग ओकणाऱ्या या माऱ्यासमोर हेल्मेट न वापरता क्रिकेटमधील सारे विक्रम मोडीत काढले. जगातील सर्वात भयकारक गोलंदाजांच्या आक्रमणासमोर गावस्कर यांची खेळी ब्रॅडमन यांच्याप्रमाणे झंझावाती नव्हती, तर त्यात कौशल्य, तंत्रशुद्धता, अचूकता आणि अजिंक्य वृत्ती झळकत होती. भेदक वेगवान माऱ्याला थकवून नंतर फिरकी गोलंदाजीला अचूक उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यात होती. हे सगळं अगदी पद्धतशीरपणे राबवून, दीर्घ पल्ल्याची जातिवंत खेळी ते उभारत. प्रत्येक वेळी याची पुनरावृत्ती आणि सातत्य दिसे. आत्ताच्या फटाकड्या आणि चेंडूबडव्या ट्वेंटी-२० क्रिकेटच्या युगात त्यांची ही शैली कितपत योग्य वाटली असती, असा प्रश्न पडावा.

गावस्कर यांची विलक्षण विजयी कारकीर्द आणि क्रिकेटमधील पराक्रम इतका उच्चकोटीचा की, हा माणूस जरा उर्मट असला, अहंमन्य असला तरी हरकत नाही, असं कुणालाही वाटावं… पण तसंही नाही. साधेपणा आणि विनम्र वागण्यातून त्यांनी हे साध्य केलं. कसोटीमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केल्यानंतर ‘‘केवळ हजार धावांवर देखील मी आनंदीच झालो असतो. पण यात नऊ हजारांची भर आहे.’’ असं त्यांनी म्हटलं होतं!

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : नामशेष पैलूंच्या जतनासाठी…

त्यांच्याबद्दलच्या कौतुकाचे अनेक किस्से, अनेकांना आठवतीलच. पण त्या सगळ्यातून त्यांचा जो गुणसमुच्चय दिसून येतो तो आणखीच खास. खेळपट्टीवर तसंच वैयक्तिक आयुष्यात विनय आणि विनोदप्रियता, धाडस आणि ध्येय, सतत पुढे जाण्यासाठी नेमका नेम साधणारे असूनही कुटुंबवत्सल अशी गावस्करांची छबी त्यांच्याबद्दल ऐकून, वाचून- त्यांना खेळताना/ बोलताना पाहून जी होत जाते ती कधी पुसली जात नाही. १९८१ साली मेलबर्नमधल्या सामन्यात त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मॅच ऑस्ट्रेलियाच्या ‘खिशात’ जाण्याची वेळ आली होती. आपण पायचीत नसूनसुद्धा पंचांनी चुकीचा निर्णय दिला, यावर गावस्कर ठाम राहिले आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या चेतन चौहान यांना घेऊन मैदान सोडून निघाले. ही त्यांची केवळ एक ताठर भूमिका नव्हती, तर डेनिस लिली यांच्या अर्वाच्य भाषेला ठोस उत्तर देणारा स्वाभिमानी बाणाही त्यामागे होता. याला मुंबईचा ‘खडूस’पणा म्हणेल कुणी, पण हेच गावस्कर परमोच्च कोटीची क्षमाशीलताही दाखवू शकतात, हे कुणीही नाकारू शकत नाही. प्रेक्षकांच्या वाईट वर्तवणुकीमुळे कोलकाता येथे कधीच कसोटी क्रिकेट न खेळण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय कधीच विसरता येणारा नाही. त्यांच्या या कृतीला अपरिपक्व, स्वार्थी आणि खेळाडू म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला अशोभनीय वगैरे ठरवण्यासाठी अनेकजण सरसावले होते. पण ते मात्र या निर्णयावर ठाम राहिले आणि त्याचा त्यांना कधीही पश्चात्ताप झाला नाही. अर्थात वाद हा त्यांच्या पाचवीला पुजला असला तरी चाहत्यांचा राग आणि प्रेम यांच्यातला समतोल बहुधा आपोआपच साधला गेल्यामुळे, गावस्करांना स्थितप्रज्ञ वगैरे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नसावेत. साक्षात डॉन ब्रॅडमन यांनी गावस्कर यांना क्रिकेटला लाभलेला मौल्यवान अलंकार ठरवलं, ते उगाच नाही.

गावस्कर यांचं औदार्य आणि निराधार, वंचितांसाठी कायम सक्रिय राहण्याच्या वृत्तीची आठवण करून देणं महत्त्वाचं. १९९२ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीनंतरचा तणाव शांत करण्यासाठी निधड्या छातीनं ते रस्त्यावर उतरले होते, हे कुणीही विसरू शकत नाही. क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही ते किती धाडसी आहेत, त्याचे जगासमोर उदाहरण ठेवणारी अशी ती कृती होती.

‘लिट्लि मास्टर’ना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.. त्यांचा ‘अमृतकाळ’देखील अनेकांना प्रेरणा देत राहो!

ajit.ranade@gmail.com