हा एक प्रसंग… कधी काळी मध्य प्रदेशातील कुठल्याशा शहरातला. क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये लहान पोरं त्यांच्या पाऊण उंचीएवढी बॅट घेऊन सराव करत होती. जवळच त्यांचे ‘कोचसाब’ उभे होते. आडव्या-तिडव्या बॅटने काही फटके पोरांनी मारल्यावर कोचसाब कावले. ‘अबे सीधे बॅट से खेलों. स्ट्रेट ड्राइव्ह ट्राय करों. सुनील गावस्करने ये शॉट खेलके ३४ सेंच्युरी बनायी…’
सुनील गावस्कर हे त्या कोचसाहेबांचे ‘कोचिंग मॅन्युअल’! तसं मानणारे ते अर्थातच एकांडे प्रशिक्षक नव्हते. तेव्हाही आणि आताही. कदाचित त्या स्ट्रेट बॅटचे कवित्व सध्याच्या मारधाड युगात कमी झाल्यासारखे वाटू शकेल. पण संपलेले नाही. तंत्रसज्ज असल्याशिवाय क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये – पण विशेषत: फलंदाजीमध्ये वर्चस्व प्रस्थापित करता येत नाही. सध्या फरक इतकाच, की ‘फ्रँचायझी’ संस्कृतीमध्ये पब्लिकला आवडणारे फलंदाजकेंद्री क्रिकेट घडवून आणण्यासाठी फलंदाजांस अनुकूल परिस्थिती आणि नियम बनवले जाताहेत. गोलंदाजांस कृत्रिमरीत्या दीनवाणे बनवले जात आहे. मात्र हे युग अवतरण्याच्या कितीतरी आधीच्या काळात गावस्कर मैदानात खेळण्यासाठी उतरले आणि उसंत न घेता झळकू लागले. १९७१ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्या वर्षी प्रथम वेस्ट इंडिज आणि नंतर इंग्लंड अशा दोन देशांमध्ये भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकून दाखवली. त्या पहिल्या मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या, जो विक्रम आज पन्नासहून अधिक वर्षे लोटली, तरी अबाधित आहे. पदार्पणाच्या मालिकेत तितक्या किंवा त्याच्या जवळपासही धावा आजतागायत कोणाला बनवता आलेल्या नाहीत.
आणखी वाचा-ज्याचा-त्याचा पाऊस.. : निळया ताडपत्रीचा दृष्टांत
गावस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवतरले त्याच्या काही काळ आधी नि काही काळ नंतर क्रिकेटमध्ये ‘जंगलराज’ होते. न झाकल्या जाणाऱ्या नि म्हणून उसळीस अनुकूल खेळपट्ट्या होत्या, रानटी वेगाने चेंडू फेकले जायचे. फलंदाजांना घाबरवण्याची संस्कृती होती. खेळपट्टीवर नांगर टाकून उभे राहताना जीव आणि इभ्रत यांच्या बचावास प्राधान्य होते. धावा, जय-विजय वगैरे बाबी नंतर. गावस्करांसारख्या सलामीवीरासाठी हे आव्हान अधिकच खडतर. १९६०चा उत्तरार्ध, १९७० आणि १९८०… गावस्कर यांचे पदार्पण १९७१मधले आणि ते निवृत्त झाले १९८७मध्ये. या अत्यंत आव्हानात्मक काळात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा आणि ३०हून अधिक शतके अशी नवी विक्रमशिखरे त्यांनी उभी केली. तेही सलामीला फलंदाजीस येऊन आणि ५० हून धावांची सरासरी राखून. दोन्ही स्वतंत्र आव्हाने ठरतात. त्यांच्याहून अधिक शतके नि धावा पुढे अर्ध्या डझनाहून अधिक फलंदाजांनी बनवल्या. परंतु गावस्करांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘एव्हरेस्ट सर करणारे पहिलेच लोकांच्या लक्षात राहतात…’ या शब्दांमध्ये दिसून येतो तो अभिमान. नि:संदिग्ध आणि निर्विष. वेस्ट इंडिजचे विख्यात फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे एकदा विचारले गेले, की सर्वोत्तम फलंदाज कोण? ‘सुनील गावस्कर…’ उत्तर चटकन आले. कारण? ‘अहो आमच्याविरुद्ध १३ शतके ठोकली! जितकी अनेकांच्या (त्या काळात) कारकीर्दीत बनत नाहीत. यापेक्षा वेगळा पुरावा कोणता हवा!’…
गावस्करांचे पदार्पण झाले तो काळ मोठा रम्य होता. न्यूझीलंडविरुद्ध जरा अलीकडे त्यांनी मालिका जिंकली होती. पण त्यापलीकडे परदेशी मैदानांवर नाव घेण्यासारखे कर्तृत्व नव्हतेच. अपेक्षाही नव्हती. प्राधान्याने इंग्लिश आणि काही ऑस्ट्रेलियन क्रिकेट लेखकांच्या नजरेतून भारतीय क्रिकेटपटू म्हणजे ‘कुशल कारागीर’! बोटांमध्ये जादू होती. मनगटी फटक्यांमध्ये नजाकत होती. एखादाच उत्तम क्षेत्ररक्षक निपजायचा, त्यास ‘वाघ’ वगैरे संबोधले जायचे. क्रिकेट खेळण्यापेक्षा मैदानावर आनंद लुटण्यासाठी आणि इतरांना देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू उतरायचे, या स्वरूपाचा वर्णनात्मक साचा त्यावेळच्या माध्यमांनी बनवून ठेवला होता. जिंकणे वगैरे प्राधान्यक्रमात कुठे नव्हतेच. अगदी अलीकडे एका इंग्लिश लेखकाने त्यावेळच्या भारतीय क्रिकेटपटूंचे वर्णन ‘फेदरिको फेलिनीच्या सिनेमातील देखणे नायक’ असे केले होते. देखणे होतेच ते सगळे जण.. पतौडी, अब्बास अली बेग, फारुख इंजिनीयर, जयसिंहा, सलिम दुराणी, पॉली उम्रीगर. हे वर्णन ‘एखादा देश गरीब आहे, पण नितांत सुंदर हो…’ या छापाचे. त्यात निव्वळ कौतुक, पण प्रतिष्ठा नाही. चिकित्सा नाही. गांभीर्य नाही. गावस्कर आले आणि भारत जिंकू लागला. गावस्कर आले आणि भारतीय क्रिकेटची, क्रिकेटच्या परिप्रेक्ष्यात दखल घेण्यास त्यांनी गोऱ्या माध्यमांना भाग पाडले.
आणखी वाचा-अस्वस्थ करणारा संघर्ष
भारतीय क्रिकेटविषयी गांभीर्याने लिहिण्यास त्यांनी भाग पाडले. गारफील्ड सोबर्स, क्लाइव्ह लॉइड, इयन चॅपेल, टोनी ग्रेग, इम्रान खान, झहीर अब्बास, डेनिस लिली, व्हिव्हियन रिचर्ड्स, इयन बोथम, जावेद मियाँदाद या समकालीन रथी-महारथींचा आदर संपादला. त्यांच्यातलेच नव्हे, तर अनेक बाबतींत गावस्कर त्यांच्यापेक्षाही सरस ठरले. गावस्कर आले आणि प्रतिष्ठा मिळू लागली. त्यावेळी सर्वाधिक खडतर म्हणवले जाणारे तीन संघ – वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आणि यांच्या देशात सुनील गावस्कर उभे राहिले. ‘डेटा मायनिंग’ करून सारे काही ठरवले जाण्याच्या सध्याच्या युगात या डेटाकडे जाणकारांनी पाहावेच – वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सामन्यांत ६५.४५, पाकिस्तानविरुद्ध २४ सामन्यांमध्ये ५६.४५ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० सामन्यांमध्ये ५१.६६ अशी फलंदाजी सरासरी. पुन्हा या तिन्ही देशांमध्ये खेळताना त्यांची फलंदाजी सरासरी भारतातील सरासरीपेक्षा अधिक होती! ‘टायगर्स इन देयर ओन बॅकयार्ड, बट…’ या हिणवणुकीला खणखणीत उत्तर.
सारा सरळ बॅटीचा प्रताप. जोडीला एकाग्रता, असीम धाडस आणि… अपमान गिळण्याची क्षमता. नैराश्याचे क्षण कमी नव्हते. कधी ५० षटकांत ३६ धावा, कधी ४२ धावांत सर्वबाद… इंग्लंडविरुद्ध त्यांची बॅट त्यांच्या गुणवत्तेला साजेशी तळपली नाही. पहिल्या विश्वचषक रास्त विजयाचे श्रेय कपिलदेव यांना मिळाले, त्यावेळीही त्या अविस्मरणीय स्पर्धेत गावस्कर फार चमकले नव्हते. ती घटना भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने पुढचे पाऊल होते. पण त्यासाठी, त्यापूर्वी पहिल्या पावलाचा ‘इन्शुरन्स’ गावस्कर वर्षानुवर्षे पुरवत होते, याचे विस्मरण अनेकांना होते. भारतीयांना नसेल किंवा असेल, परंतु भारताच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच गावस्करांची ‘विकेट’ सर्वाधिक अमूल्य होती.
आणखी वाचा-कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लेखणीतून उलगडलेलं ‘पोलीसमन’
निवृत्तीनंतर सरळ बॅटीची जागा सरळ वाणीने घेतली. खेळपट्टीवरील अभिमान कॉमेट्री बॉक्समध्ये दिसू लागला. तेथे बसून त्यांनी सर्वाधिक तर्ककठोर चिकित्सा भारतीयांचीच केली आणि करत आहेत. पण त्याचबरोबरीने, भारतीय क्रिकेटविषयी पूर्वग्रहदूषित, वेडेवाकडे काही बरळले गेल्यास त्यास तिथल्या तिथे, सर्वांचा आब-प्रतिष्ठा राखून प्रत्युत्तर देण्यासही ते कधी चुकले नाहीत. सुनील गावस्करांची प्रतिभा आणि प्रतिमा ठाऊक असलेले बहुतेक कधी त्या वाकड्या वाटेने गेलेच नाहीत. ‘क्रिकेट जगतातले कारागीर’ ते ‘क्रिकेट जगताचे मायबाप’ या संक्रमणाचे ते प्रमुख सहभागी आणि साक्षीदार. रंगीत पोशाखाच्या इव्हेंटी क्रिकेटपेक्षाही पांढऱ्या पोशाखातील क्रिकेटवर अंमळ अधिक प्रेम असलेले रोमँटिक. २२ यार्डांची खेळपट्टी इंग्लंडमधील असो वा कांगा क्रिकेटमधली असो, गावस्कर भेटीस येणार म्हणजे येणार. कमेंट्री बॉक्सपेक्षा मैदानातील हिरवळीवर प्रेम अधिक. त्यामुळे आता खेळाडू म्हणून नाही, तरी विशेषज्ञ चिकित्सेसाठी गावस्कर उतरणार म्हणजे उतरणार. त्या खेळपट्टीवर आजही, एखाद्याने उत्तम स्ट्रेट ड्राइव्ह लगावलाच, तर कौतुकाचे चार शब्द अधिक निघणार. त्या फटक्यानेच ३४ सेंच्युरी लगावल्या ना! सारा सरळ बॅटीचा खेळ!
siddharth.khandekar@expressindia.com