सुजाता राणे
गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ हा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा दुसरा काव्यसंग्रह होय. डॉ. नाडकर्णी यांनी या कविता सुरुवातीला समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्या होत्या. वाचकांकडून या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी त्यांनी या कवितांवर आधारित निरूपणही केले. ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या पुस्तकाचे स्वरूप एकीकडे गौतम बुद्ध यांच्या विचार परंपरेचे, तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवणे आणि दुसरीकडे यातल्या प्रत्येक कवितेचे साध्या, सोप्या शब्दांत केलेले निरूपण असे आहे. पुस्तकाच्या या दुपेडी रचनेमुळे वाचकांना तत्त्वज्ञानासारखा विषय अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून दाखवणे लेखकाला शक्य झाले आहे. उदाहरणार्थ- ‘बुद्ध म्हणे मी ती विचाराची धार/ जाळे ऐहिकाचे तोडी आरपार/ नको विसंबूस तरी माझ्यावर/ दीप हो स्वत:च तोड अंध:कार’ या काव्यपंक्तींचे विवेचन करताना पाली साहित्यातील ‘अत्त दीप भव’ या प्रसिद्ध वचनाचा मूळ अर्थ ‘स्वत:च स्वत:चे बेट हो’ असा आहे. ‘स्वत:च स्वत:चा दीपक हो’ हा अर्थ गैरसमजुतीने रूढ झाला आहे. बौद्ध साहित्यात ‘द्वीप’ हे सुरक्षित व अढळ स्थानाचे तसेच स्वावलंबित्वाचे प्रतीक आहे, हे स्पष्टीकरण बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मूळ अर्थाजवळ नेते. कर्म, आत्मज्ञान, करुणा, संघभाव, धर्म, शून्यवाद इ. संकल्पनांचा बौद्ध विचार परंपरेच्या अनुषंगाने आढावा घेताना गीता, वेदान्त, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान इ.तील या संकल्पनांचा तसेच शंकराचार्य, ज्ञानेश्वर, विवेकानंद, रमण महर्षी, विनोबा यांसारख्या विचारवंतांनी त्यावर केलेल्या भाष्याचा लेखकाने जागोजागी चपखल वापर केला आहे. लेखकाच्या या ज्ञानपरंपरांच्या दीर्घकालीन अभ्यासामुळे या लेखनाची व्याप्तीही विस्तृत होते. उदाहरणार्थ- ‘प्रत्येक अपूर्णा स्वीकारतो संघ / पौर्णिमेचे चित्र, रेखतो मनात/ होशी तू प्रकाश, देसी तो जगास/ संघ आणि धम्म एक होय..’ तत्त्वज्ञान विचार समजून घेत असताना सहज स्फुरलेल्या या ओळी आहेत. बौद्ध विचार परंपरेच्या अनुषंगाने ‘संघ’ म्हणजे समान उद्दिष्ट असणाऱ्या मानवांचा समुदाय.. ज्यांना अनित्याकडून नित्याकडे जायचे आहे. ‘धम्म’ म्हणजे मध्यम मार्ग जगणाऱ्या माणसांचा संच. शंकराचार्याची ‘लोकसंग्रहधर्म’ व्याख्या ‘ज्ञानाने सैरावैरा होऊन आंधळेपणाने अविवेकी वागणाऱ्या लोकांना शहाणे करून सुस्थितीमध्ये एकत्र ठेवणे व आत्मोन्नतीच्या मार्गाला लावणे’ ही होय. समकक्ष संकल्पनांचा असा दोन विचार परंपरांमधील अर्थ लेखक वाचकांसमोर ठेवतो.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मानसशास्त्र या क्षेत्रातील अनुभवाची आणि अभ्यासाची जोडही या लेखनामागे आहे. एका व्यासंगी व्यक्तिमत्त्वाची त्याचा अभ्यासविषय सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची कळकळ ही या लेखनामागची प्रमुख प्रेरणा असल्याचे जाणवते. ‘विपश्यना’ या ध्यानपद्धतीमध्ये संवेदनांकडे पाहण्यावर भर आहे. ‘अवलोकन’ स्पष्ट करण्यासाठी‘ढग-वादळांच्या, पल्याड अंबर/ रात-दिवसाचा अनंत हा खेळ/ कधी वीज वाजे, कधी सप्तरंग/ आकाशासाठी हे फक्त येणे-जाणे’ अशा सहज ओळी ते रचून जातात.
‘करावा कुणाचा गुस्सा, क्रोध, राग/ दुजे ऐसे नाही बुमरँग’ यासारख्या कवितेच्या ओळी अगदी आधुनिक भाषाशैलीच्या साहाय्याने सुभाषितवजा विचार चटकन् मनावर बिंबवून जातात. त्यांचे ‘गौतम बुद्धांना जगातील पहिले कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट म्हणता येईल’ यासारखे विधान बौद्ध तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्यातील सुसंवादी नाते अधोरेखित करते. डा. अल्बर्ट एलिस यांच्या विवेकनिष्ठ वर्तणूक पद्धतीचे संदर्भही आवश्यक तेथे दिले आहेत. आधुनिक मानसशास्त्रातील संकल्पनांचे मूळ इंग्रजी शब्दांतच जसे ‘self-defeating behaviour’ किंवा आत्मसंवाद ‘self-talk’ इ. पर्यायी शब्द जागोजागी दिल्यामुळे पुस्तकात तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांची उत्तम सांगड घालता आली आहे. निर्वाणासाठी पाली भाषेतील निब्बान, इंग्रजीत ‘blowing out’ किंवा ‘Extinction’- मराठीत ‘हव्यासांची इतिश्री होणे’ असे विविध भाषांतील पर्यायी शब्द देऊन ती संकल्पना अधिकाधिक सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अभंगासारख्या नेमका आशय वाचकांच्या मनाला भिडवणाऱ्या कविता व त्यांचे गोळीबंद भाषेतील निरूपण मुळातून वाचण्यासारखे आहे. दीर्घ व्यासंगानंतर मनात झिरपलेल्या तत्त्वचिंतनाच्या अभंग स्वरूपातील या अभिव्यक्तीचा समारोप ‘एकांडय़ालासुद्धा, सापडू दे बुद्ध/ ईशावास्य, भिनू दे श्वासात/ उपासना धर्म, जगातले सारे/ जावो मिसळोनी, मानवधर्मी ’ अशा पसायदानरूपी ओळी असणाऱ्या कवितेने होतो.
पुस्तकाला चंद्रमोहन कुलकर्णी यांचे समर्पक मुखपृष्ठ आहे. आतील भूषण तुळपुळे यांची बुद्धांची कृष्णधवल चित्रे आत्मशोधापासून निर्वाणावस्थेपर्यंतचा प्रवास दर्शवणारी आणि पुस्तकाच्या आशयाला अधिक उठावदार करणारी आहेत. ‘वर्तमान क्षणात जगण्याचा’ मंत्र देणाऱ्या बौद्धविचाराकडे एका क्रियाशील मानसोपचारतज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी वाचकांना या पुस्तकामुळे मिळाली आहे.
‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’- डॉ. आनंद नाडकर्णी, मनोविकास प्रकाशन, पाने- २३२, किंमत- २५० रुपये.
sujatarane31may@gmail.com