रघुनंदन गोखले

जगात कोणीही खेळाडू प्रत्येक डाव जिंकत नाही – अगदी आनंद किंवा कार्लसन का असेना. त्यामुळे आयुष्यात पुढे येणाऱ्या संकटांना, अपयशांना कसं तोंड द्यावं याचं बाळकडूच आंतरशालेय बुद्धिबळ सामने तुम्हाला देतात. मात्र त्यासाठी समंजस पालक आणि प्रशिक्षक असणं जरुरी असतं, हा सुसान पोल्गार हिचा सल्ला बुद्धिबळपटूंच्याच नाही तर इतर खेळांतील खेळाडूंच्या पालकांसाठी उपयुक्त ठरणारा..

balmaifal story about profit and loss
बालमैफल: नफा तोटा
loksatta balmaifal article
सुखाचे हॅशटॅग: सावकाश, पण हमखास!
Loksatta lokrang Corporate politics Saripat Novel Colors and Chemicals Limited
कॉर्पोरेट राजकारणाचे ताणेबाणे
Loksatta lokrang engrossing mystery tale
गुंतवणारी गूढरम्य आदिकथा…
Loksatta lokrang A disturbing story in the medical field
वैद्याकीय क्षेत्रातली अस्वस्थ करणारी कहाणी
Loksatta lokrang Documentary and Film Festival Director film
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :  गोष्ट सांगण्यास उत्सुक…
ratan tata
द कम्प्लीट मॅन…
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
interesting story for children in marathi
बालमैफल: कंटाळलेला कावळा

अनेक वेळा जगज्जेती राहिलेली सुसान पोल्गार ‘६४ घरांच्या गोष्टी’च्या वाचकांना काही नवीन नाही. लहानपणापासून शाळेत न जाता घरीच अभ्यास करणारी सुसान बाकी सगळा वेळ बुद्धिबळ आणि विविध भाषा शिकण्यात घालवत असे. अनेक अडचणींना तोंड देऊन आयुष्यात अपेक्षित यश मिळवल्यानंतर सुसाननं अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत जाऊन तिथं तिनं स्वत:ची प्रशिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे तिनं अनेक चांगले उपक्रम राबवून बुद्धिबळाचा प्रसार करण्याचं काम सुरूच ठेवलं.

कुशाग्र बुद्धिमत्तेच्या सुसाननं बुद्धिबळ खेळाडूंच्या पालकांना मार्गदर्शनपर सल्ले दिले आहेत. हा उपदेश निव्वळ बुद्धिबळ नव्हे, तर इतर खेळांतील खेळाडूंच्या पालकांना (आणि शाळेच्या अभ्यासातही) उपयोगी पडेल असा आहे. त्यापुढे जाऊन मी तर असं म्हणेन की, सर्वच पालकांनी हा सल्ला अमलात आणावा- तुमची मुलं खेळाडू असोत वा नसोत. चला, आपण सुसान काय म्हणते ते पाहू (तिच्या उपदेशाच्या ताजमहालाला मी आपली वीट लावून थोडे पुढे नेलेले आहे.)

१) स्वत:वर नियंत्रण ठेवा..

आपलं मूल हरल्यावर (आणि कधी कधी मूर्खासारखं खेळून) पालकांना दु:ख होणं आणि राग येणंही स्वाभाविक आहे. तरीही त्यांच्यावर ओरडणं किंवा त्यांना धपाटे घालणं हा काही त्यावर उपाय नव्हे; उलट तो अपाय ठरण्याची शक्यता आहे. कारण मुले  खेळायलाच घाबरतील किंवा खेळाकडे पाठ फिरवतील.

यावर उपाय म्हणजे त्यांना शांतपणे त्यांच्या चुका समजावून सांगणं. यासाठी हवं तर त्यांच्या प्रशिक्षकांची मदत घ्यावी. खेळामध्ये हार-जीत चालणारच! त्यामुळे मनातून फार मोठय़ा अपेक्षा धरू नका. यावर भगवद्गीता काय सांगते? आपण आपलं काम चोख करत जावं; फळाची अपेक्षा धरू नये. याचं कारण म्हणजे यश हे तुमच्या कामाच्या आणि प्रतिभेच्या प्रमाणात मिळतं.

२) मन खंबीर ठेवा, मुलांना उत्तेजन द्या..

काल आपला पाल्य जिंकला म्हणजे आज तो जिंकेलच असे धरून चालू नका. तो जिंकला तर चांगलेच आहे; त्याला बक्षीस द्या, शाबासकी द्या; पण जर तो हरला तर त्याला तुमच्या पाठिंब्याची खरी गरज आहे हे लक्षात ठेवा. खूप वेळा मुलांना असं वाटतं की, आपण हरलो तर आपले पालक आपल्यावर प्रेम करणार नाहीत. त्यांचा हा गैरसमज दूर करा आणि त्यांना जास्त प्रेम द्या. शाळेत चाचणी परीक्षेतही आपला पाल्य एखाद्या क्रमांकानं घसरला म्हणून त्याच्यावर निर्बंध टाकणारे पालक आपण नेहमीच पाहतो.

३) स्पर्धेच्या दरम्यान दूरचं स्वप्न दाखवू नका..

बहुतेक सर्व मुलांना फार वेळ चित्त एकाग्र करता येत नाही. त्यासाठी स्पर्धेच्या काळात त्यांच्याशी फक्त पुढल्या डावाविषयी बोला. एका वेळी एक डाव या सूत्रानं चाला आणि बघाच कसा तुमचा पाल्य प्रगती करतो ते. आघाडीवर असणाऱ्या खेळाडूला आता उरलेल्या तीन डावांत कसं खेळलं पाहिजे याचं मार्गदर्शन आज करणं चुकीचं आहे. येणारा पुढचा डाव यापलीकडे आपला संवाद जाऊ देऊ नका.

४) रेटिंग हा फक्त एक आकडा आहे..

अनेक पालक आणि प्रशिक्षक रेटिंगला अति महत्त्व देतात. सुरुवातीला तर रेटिंगला काहीही महत्त्व नसतं. उदाहरणार्थ – माझी शिष्या इवाना फुर्तादो हिनं रेटिंग मिळवण्याआधी सर्व रेटेड खेळाडूंना हरवून जागतिक ८ वर्षांखालील मुलींची स्पर्धा जिंकलेली होती. आघाडीच्या खेळाडूंचीपण ही अवस्था असते. ग्रँडमास्टर गुकेशनं कोविडच्या काळात घरीच प्रगती करून भारतातील खेळाडूंमध्ये ५० पासून अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं होतं. त्यामुळे पालकांनो, तुम्ही रेटिंगकडे कमी लक्ष द्या आणि तुमच्या पाल्याच्या प्रगतीकडे जास्त लक्ष द्या! अनेक पालक आपल्या पाल्याला त्यांच्या प्रतिस्पर्ध्याविषयी त्याच्या रेटिंगकडे बघून चुकीची कल्पना करून देतात. मी एकदा एका पालकांना असं बोलताना ऐकलं आहे की, त्यांचा पाल्य प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी रेटेड असल्यामुळे त्यांच्या पाल्यानं काहीही करून बरोबरी साधली की त्याचं रेटिंग वाढणार आहे. त्यामुळे त्यानं धोका न पत्करता खेळावं. मी सहज तपासलं की, या दोन प्रतिस्पर्ध्याचे रेटिंग किती असावे? उपदेश करणाऱ्या पालकांचा मुलगा होता ११०० रेटेड आणि प्रतिस्पर्धी होता १२००! म्हणजे अगदी नवखे होते दोघेही खेळाडू. सहज म्हणून मी त्या पटावर नजर टाकली तर त्या खेळाडूनं जिंकत असतानाही चक्क बरोबरीचा प्रस्ताव प्रतिस्पर्ध्यासमोर ठेवला आणि बरोबरी घेतल्यावर पालकांकडून शाबासकीही मिळवली.

सुसान पोल्गारनं पुढचा उपदेश केला आहे तो बुद्धिबळ खेळाडूंच्या पालकांना; परंतु त्यामधील बुद्धिबळाची मूलतत्त्वे बदलून ती बाकी खेळांना लावली तरी चालतील, कारण त्या सर्वाच्या मागची कल्पना आहे की खेळाचा सुरुवातीपासून नीट अभ्यास करा.

५) बुद्धिबळाचा गाभा विसरू नका..

आपल्या मुलांना बुद्धिबळाचे पायाभूत नियम न विसरण्याची सवय लावा.

अ) पटाच्या मध्यभागावर ताबा ठेवा.

ब) स्वत:ची मोहरी पटापट बाहेर काढा.

क) शक्य तितक्या आधी आपला राजा किल्ल्यात सुरक्षित ठेवा.

ड) आपली मोहरी शक्य तितकी एकमेकांच्या जोरात ठेवा.

इ) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – खेळाची मजा लुटा! जिंकलात तर विजेत्यासारखे नम्र राहा आणि हरला तर खिलाडूवृत्तीने वागा.

६) सांडलेल्या दुधासाठी रडू नका..

झाले गेले विसरून जा. गेल्या फेरीत हरला असेल तुमचा पाल्य; पण त्यावर सारखं सारखं बोलून त्याचं रूपांतर विजयात होणार नाही. त्यामुळे पटकन त्याचे विश्लेषण करा; पण फार वेळ त्यावर घालवू नका. कारण त्याचा तोटा असा होईल की, तुमचा पाल्य सारखा त्याचाच विचार करत राहील आणि पुढची फेरीही हरेल. याविरुद्ध त्या बालकाला चांगल्या मन:स्थितीत आणा, हलके विनोद करा आणि त्या पराभवाला तुम्ही किंमत देत नाही असे दाखवा. त्यामुळे तो पुढचा डाव जिंकू शकेल. मला एकदा एक फार सुंदर प्रसंग पाहायला मिळाला होता. एका अग्रमानांकित खेळाडूला आंतरशालेय स्पर्धेच्या मधल्या फेरीत हार पत्करावी लागली आणि तो रडत रडत बाहेर आला. मी बघत होतो तर त्या मुलाची आई आली आणि म्हणाली, ‘‘कसा हरलास?’’

मुलानं काही तरी कारण सांगितलं, त्याबरोबर ती आई म्हणाली, ‘‘चल, तुला खूप दिवसांपासून इथलं आइस्क्रीम खायचं होतं ना? आपण खाऊन येऊ.’’ धन्य ती माता! तिनं लगेच त्या मुलाला आपलं दु:ख विसरायला लावलं.

७) वेळेचा सदुपयोग करा..

तुम्हाला डाव खेळण्यासाठी भरपूर वेळ दिलेला असतो. त्यामुळे पटापट खेळू नका. त्यामुळे तुम्ही घोडचूक करून हरण्याची शक्यता जास्त असते. प्रत्येक खेळीला योग्य न्याय द्या. विचार करणे योग्य असेल तिथे जरूर विचार करा. मी तुम्हाला वरती इवाना फुर्ताडोचं उदाहरण दिलं आहे. इवानाच्या लागोपाठ दोन जागतिक ८ वर्षांखालील मुलींची अजिंक्यपदे मिळवण्याच्या यशामागे तिच्या सुंदर खेळापेक्षाही तिचा संथ गतीचा खेळ जास्त कारणीभूत होता असं मला वाटतं. ८ वर्षांखालील मुलांना संयम कमीच असतो. इवाना अनेक वेळा शांतपणे विचार करत असायची आणि तिचे प्रतिस्पर्धी मात्र उठून उभं राहून वाट बघत असायचे की कधी एकदा ही खेळते आणि आपण आपली चाल करतो. काही काही वेळा तर त्यांचे अर्ध लक्ष शेजारच्या पटावर किंवा खिडकीबाहेर काय चाललंय याकडे असायचं. अशा वेळी आपल्या डावावर पूर्णपणे लक्ष देणारी इवाना न जिंकती तरच नवल.

लहान मुलं, विशेषत: त्यांना विजय दिसू लागला की भयंकर अस्वस्थ होतात आणि त्यांना कधी एकदा आपण जिंकून बाहेर जाऊन विजय साजरा करतो असं होतं. अशा वेळी त्यांचे धूर्त प्रतिस्पर्धी प्रत्येक खेळीला वेळ लावून छोटे छोटे सापळे लावत असतात. विजयासाठी अधीर झालेला खेळाडू अलगद या जाळय़ात सापडतो.

८) आपली सगळी ऊर्जा बुद्धिबळासाठी ठेवा..

स्पर्धेच्या दोन फेऱ्यांमधला वेळ मुलांच्या दृष्टीनं मजेचा असतो. आपले मित्र भेटलेले असतात. मग पकडापकडी, धावाधावी असे खेळ सुरू न झाले तरच नवल. मुलांना त्यांच्या मित्रांमध्ये मिसळू द्यावं; पण ते फार दमून जात नाहीत ना याकडे लक्ष द्यावं. कारण याचा परिणाम त्यांच्या खेळावर होतो. शरीर आणि मन यांच्या ऊर्जेची सांगड बिघडली की डोकं चालत नाही, पटावर झोप येते आणि त्याचा परिणाम खेळावर होतो.

सुसान पुढे म्हणते की, मुलांना आयुष्यात मेहनत, चिकाटी याशिवाय पर्याय नाही, हे बुद्धिबळाच्या माध्यमातून सांगता येईल. जगात कोणीही खेळाडू प्रत्येक डाव जिंकत नाही – अगदी आनंद किंवा कार्लसन का असेना! त्यामुळे आयुष्यात पुढे येणाऱ्या संकटांना, अपयशांना कसं तोंड द्यावं याचं बाळकडूच आंतरशालेय बुद्धिबळ सामने तुम्हाला देतात. मात्र त्यासाठी समंजस पालक आणि प्रशिक्षक असणं जरुरी असतं. मेहनत केली की (किंवा तरच) विजय मिळतो याची जाण येणं आवश्यक असतं.

एखादी फेरी खेळाडू जिंकला की तो त्याच धुंदीत असतो आणि पुढल्या फेरीत मार खातो. त्यामुळे पुढली फेरी सुरू होण्याआधी त्यानं जमिनीवर येणं महत्त्वाचं असतं. तीच गोष्ट हरलेल्या खेळाडूची! गेल्या लेखात ग्रँडमास्टर अरोनियननं तरुण योनासला अखेरच्या फेरीआधी केलेला उपदेश तुम्हाला आठवत असेल. अरोनियन लागोपाठ ४ डाव हरलेल्या योनासला म्हणाला होता- ‘‘प्रत्येक डाव वेगळा असतो. त्याचा मागच्या डावाशी काहीही संबंध नसतो.’’ योनासनं आपल्या कर्णधाराचा सल्ला अमलात आणला आणि त्रिवेणी संघाला जिंकून दिले. बुद्धिबळ (किंवा कोणताही खेळ) तुम्हाला जीत किंवा हार यापासून स्थितप्रज्ञ होणं शिकवतात.

सुसान पोल्गारनं केलेला उपदेश हा सर्वंकष आहे. नुसते बुद्धिबळ खेळाडूंच्याच नव्हे तर इतर पालकांनाही त्याचा फायदा आपल्या पाल्याला योग्य पद्धतीनं वाढविण्यासाठी होईल.

gokhale.chess@gmail.com