स्वानंद किरकिरे
कुमारजींचे संस्कार नकळतपणे माझ्या मेंदूत भिनले होते अन् ते आजतागायत जिथं जातो तिथं त्यांच्या असण्याची जाणीव करून देतात. त्यांनी दिलेली सौंदर्यदृष्टी हीच सगळ्यात मोठी देणगी आमच्या आयुष्याला लाभली. ही पुण्याई नाही तर आणखी काय?

१२ जानेवारी १९९२… इन्दौरमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. आमच्या गणेश कॉलनीच्या लहानशा घरात सकाळची कामं सुरू होती. केरवारे, टुल्लूचा पंप लावून पहिल्या मजल्यावर पाणी भरणं, सगळ्यांचा स्वयंपाक उरकून आई-बाबांची ऑफिसला जायची तयारी वगैरे… तेव्हाच शेजाऱ्यांची हाक आली, ‘‘देवासहून फोन आहे.’’ तेव्हा आमच्याकडे फोनसुद्धा नव्हता. बाबा फोन घेऊन परत आले, त्यांची शुद्ध हरपली होती- ‘‘कुमारजी गेले.’’

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख

आई-बाबा, श्रद्धा हातातली सगळी कामं तशीच टाकून अगदी गॅससुद्धा न बंद करता तडक देवासला निघाले होते. कुमारजी आमच्या घराचं दैवत होतं. घर बंद करून निघायची जबाबदारी माझ्यावर होती. मी सगळी आवराआवर केली अन् माझी स्कूटर घेऊन देवासला निघालो. माझा मित्र संतोष रेगेदेखील माझ्याबरोबर निघाला होता. इन्दौरपासून देवासचं अंतर ३६-३७ किलोमीटर असावं. थंडीनं हात आणि चेहरा बर्फासारखा गार पडला होता, पण लवकरात लवकर देवासला पोहोचणं भाग होतं. नुसतं दु:खच नव्हतं, पण कुमारजींच्या पत्नी ताई (वसुंधराताई) अन् पिंनुताई (कलापिनी) घरी दोघीच होत्या. भुवनेश लहान होता.

आणखी वाचा-प्रगल्भ महाराष्ट्राच्या आठवणी

देवासला ‘भानुकूल’ (कुमारजींचं घर) समोर पोहोचलो. लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. देवासची दर्दी मंडळी, माध्यमांचे प्रतिनिधी आले होते. कुमारजींचा इन्दौरी- देवासचा परिवार खूप मोठा. राहुल बारपुते, गुरुजी चिंचाळकर वगैरे मंडळी येऊ लागली होती. देवासमध्ये कुमारजींचे खूप आप्त होते. ते सगळे शेवटच्या दर्शनासाठी हजर होते. सरकारी लोक, कलेक्टर, एस.पी., पोलीस आदी बंदोबस्तासाठी होते. मी आत शिरलो. अंगणात देवासच्या शीलनाथ धुनी संस्थानाची भजन गाणारी मंडळी बाहेर बसून ‘हम पंछी परदेसी बाबा आणि देस रा नाही कोय’सारखी कबीराची भजनं गायला लागली होती. एका बाजूला कुमारजींचा पार्थिव देह आणि दुसऱ्या बाजूला पिंनुताई आपलं दु:ख बाजूला सारून पुढल्या भीषण वास्तवाला सामोरं जाण्यासाठी खंबीरपणे उभी होती. देशातला खूप मोठा कलावंत आज देह सोडून गेला होता. गावोगावी, देशोदेशीची मंडळी येणार, मंत्री, पुढारी येणार… कुमार गंधर्वांचं जगणं भव्य होतं, तसंच त्यांचं जाणंही… कुमारजींनी तिला पूर्ण प्रशिक्षण दिलं होतं. मी, श्रद्धा, संतोष आम्ही लगेच तिच्या मदतीला गेलो. मी ‘भानुकूल’मध्ये पहिल्यांदा कधी आलो याची मला अशी ठळक आठवण नव्हती; पण दर शनिवारी आई-बाबांचा हात धरून आम्ही तिथं जायचो. दोन दिवस बाबा कुमार गंधर्वांकडे गाणं शिकायचे आणि आई वसूताईंकडे. मग रविवारी रात्री आम्ही परत इन्दौरला परतायचो. हा शिरस्ता वर्षानुवर्षं चालला.

देवास संस्थानात एक छोटीशी टेकडी- ज्यावर चामुंडामातेची दोन मंदिरं अन् त्या टेकडीच्या पायथ्याशी भानुकूल हा बंगला- अनेक सुंदर झाडं-झुडपांच्या आत दडलेला… भानुकूलमध्ये शिरलं की मन प्रसन्न होऊन जायचं. त्या काळी कळायचं नाही, पण ती वास्तूच तशी होती. आत शिरल्याबरोबर आंबा, जांभूळ, बांबू, कडुलिंब, पारिजात, जाई-जुई, बकुळी, फुलांची-फळांची अनेक झाडं, खूप लहान-मोठ्या वेगवेगळ्या वनस्पती बंगल्याबाहेर लावल्या होत्या. बाहेर एक नळ होता, त्यावर हातपाय धुऊन आम्ही आत जायचो. कुमारजींची खोली गेटपासून दिसायची अन् तिच्या खिडकीला छोटीशी, पण अत्यंत सुरेल अशी घंटी बांधलेली होती. मी ती घंटी हळूच वाजवायचो. भानुकूलमध्ये शिरलं की एखाद्या मंदिरात शिरल्यासारखं वाटायचं. भानुकूलची दुसरी आठवण म्हणजे तिथं सतत स्वरात जुळलेल्या तंबोऱ्यांचा स्वर घुमतोय असं वाटायचं. कुमारजी तंबोऱ्यांच्या सुरेलपणाविषयी अतिशय आग्रही होते, हे बऱ्याच संगीतप्रेमी लोकांना माहीत आहे! ते म्हणत की, ‘तंबोरे माझा कॅनव्हास आहे, अन् मी त्यावर स्वरांनी चित्रं काढतो.’ भानुकूलची प्रत्येक गोष्टच सुरात होती. ते तेव्हा नाही कळलं, पण त्या वास्तूत माझ्यावर स्वरांचे जे संस्कार झाले, ते आजतागायत माझ्या कामी येत आहेत.

आणखी वाचा-चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

मी गाणं शिकलो नाही. खरं तर गाण्याच्या तीर्थस्थळावर सहजपणे जाऊनही मी असं का केलं नाही, त्याला उत्तरही कुमारजींनीच दिलं होतं. त्यांनी माझ्या वडिलांना स्पष्ट सांगितलं होतं की, मुलांना जबरदस्ती काहीही करायला सांगायचं नाही. त्यांना टांगा चालवायचा असला तरी फक्त हे शिकवायचं की, टांगा सर्वोत्तम कसा चालवायचा. लहानपणी देवासला गेलो की कधी कधी कुमारजींचा लाडका टांगा घराबाहेर आलेला दिसायचा. याचा अर्थ असा असायचा की आज आम्हाला सहल घडणार… कुमारजी आम्हा सगळ्यांना टांग्यात बसवून मग निघत आणि शीलनाथ धुनी किंवा आणखीन कुठे तरी वेगळीकडे भटकंती चाले. टांगेवाल्याच्या बऱ्या-वाईटाची ते चौकशी करत. घोड्याचीही करत. देवासच्या संथ रस्त्यांवर घोड्याच्या गळ्यात घातलेल्या घुंगराच्या आवाजात मध्यलयीत चाललेला तो टांगा… जीवनाच्या प्रत्येक समेवर कुमारजींची ‘वाह वाह’… अशी दाद अजून माझ्या कानात घुमते आहे.

कुमारजी ‘वाह वाह’ करत आयुष्य जगले. अंगणात कुठल्या पक्ष्याचा आवाज आला की ‘वाह’. घरात साध्या आमटीला छान फोडणी पडण्याचा आवाज आला की ‘वाह’. देवासच्या माताजीच्या मंदिरात लागलेल्या लाऊड स्पीकरच्या गोंगाटात एखादं सुरेल भजन ऐकू आलं की ‘वाह’. कुठे दुखलं-खुपलं तरी ‘वाह’! बरं पुन्हा नवा पक्षी आला की तो कुठला पक्षी आहे, तो कधी येतो, कुठून येतो ही सगळी माहितीही तेच द्यायचे. जे करतील त्याचा सखोल अभ्यास कारायचाच! खूप प्रवास असायचा. गावोगावचे कार्यक्रम असायचे. तिथून परत आले की दोन-तीन तरी नव्या पाककृती शिकून आलेले असायचे. एक तर सगळंच आवडायचं, पण त्यातही जे नवं असेल त्याची पाककृती लिहून घ्यायचे, मग लगेच ती घरात करूनही पाहायचे. त्यानंतर पुन्हा एखादा नवा पदार्थ घरात बनणार असला की आम्हा किरकिरे कुटुंबीयांना इन्दौरमध्ये बोलावणं यायचं. ते आलं की आम्ही तडक देवासच्या दिशेने कूच करायचो. कधी कधी दुपारी अंगणात चूल जमवून जेवणाचा बेत असायचा. घरात लावलेल्या बांबूच्या कळीत एक विशिष्ट प्रकारचा तांदूळ- जो १०-१२ वर्षातून एकदा होतो, त्याचा भात खायला आम्ही खास देवासला गेलो होतो.

एखाद्या कुंडीत अनेक वर्षांनी एका रात्रीसाठी फुलणारं ‘ब्रह्मकमळ’ पाहायला आम्ही देवासला गेल्याचं मला आठवतंय! भानुकूलमध्ये होणाऱ्या पाककृतींबद्दल कलापिनी ताईचा एक सुंदर लेख आहे, तो वाचकांनी आवर्जून मिळवून अनुभवा. पुढे मी मोठा झाल्यावर मला थोडी आणखी जबाबदारीची कामं मिळायला लागली. त्यातलं एक म्हणजे, सगळे बाहेर गेलेले असताना भानुकूल सांभाळणं… तेव्हा माझ्या लक्षात आलं की, कुमारजींना लोकांना जोडण्याची कला इतकी आपसूक अवगत होती की जो भानुकूलमध्ये येईल तो कुमारजींच्या प्रेमात पडायचा! घरात काम करणारी इशरतबाई, श्री काका पुजारी, माळीबाबा, स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या गीताबाई, घरासमोर राहणारा आणि इंजिनीअर असणारा अब्दुलभाई… असे अनेक लोक आपलंच घर असल्यासारखे येऊन काम करून जात. या सगळ्यांकडे कुमारजींचे अनेक अनुभव असत.

आणखी वाचा-कुमारजींचा सांगीतिक विचार

असाच देवासमध्ये एकटा राहत असताना मला कुमारजींचं ‘अनूपरागविलास’ हे पुस्तक सापडलं अन् ते मी वाचलं. त्यात कुमारजींनी स्वत: लिहिलेल्या अन् चालीत बांधलेल्या अनेक बंदिशी होत्या. लोकांनी त्या मैफिलीत गायन रूपात ऐकल्याही होत्या, पण मी त्या पुस्तकात कविता म्हणून, साहित्य म्हणून वाचायला सुरुवात केली. त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की, कुमारजी नुसते संगीतज्ज्ञ नव्हते, तर उत्कृष्ट कवीही होते. भारतीय अभिजात संगीतात गायल्या जाणाऱ्या बंदिशींना त्यांनी सास-ननदियाच्या कचाट्यातून मुक्त केलं होतं आणि अतिशय आधुनिक अशी आजच्या जगण्याशी संबंध असणारी कविता बंदिश रूपात संगीतात सादर केली होती. भानुकूलच्या आवारात जो फिरलाय त्याला ‘चमेली फुली चंपा’ ही बंदिश साकार होताना अनेक वेळेला दिसलीच असेल. एखाद्या रेल्वेच्या प्रवासात कुलीबरोबर झालेला संवाद ‘लदा ले लाद’सारख्या बंदिशीतून दिसून येईल. एका लहान मुलीचं आपल्या भावाला ‘पतंग उडवून दे’ सांगणारं काव्य अन् त्या भावाचं तिला चिडवणं किंवा संगीतसाधना करत असताना आपल्या लहान मुलाला ‘श्री’ रागाच्या स्वरांतून केलेली विनवणी ‘कच्छू लाला रे कारण दे’ हे रागदारी संगीतात यापूर्वी कधी कुणीच केलं नव्हतं.

मग ज्या बंदिशींनी माझं खरं लक्ष वेधलं त्या म्हणजे त्यांनी आपल्या संगीत साधनेवर केलेल्या बंदिशी. ‘पीयरवा आओ तुम हम मिल लय सूर कि महिमा गायें’. प्रिये, चल आपण एकत्र येऊन लयसुरांची साधना करू? यापेक्षा सुंदर प्रेमगीत मी तर कधी ऐकलं नाही. ‘‘अनत जानू न जानू, पर भेद कछु जानू सो परवीन नाही रे’ ही बंदिश अनंतातून प्रावीण्य मिळवणाऱ्या एका कलावंताच्या ध्यासाची बंदिश आहे. असा कलावंत ज्याला कल्पना आहे की, ज्ञान अनंत आहे आणि आपण त्या अनंताचा भेद अजूनही ओळखू शकलो नाही. कुमार गंधर्वांसारख्या दैवी प्रतिभा असलेल्या संगीतकाराला असं वाटत असेल, तर मग आपल्यासारख्या पामरांना किती प्रवास करावा लागणार आहे, याची कल्पना करावी.

आई म्हणायची, कुमारजी कधी मी असं गायलो तसं गायलो म्हणून आपली तारीफ कधीच करत नसत, ते म्हणत, ‘‘आज काय सुरेख जागा पकडली.’’ किंवा ‘‘आज सुरांनी काय छान गंमत घडवली.’’ आपला मोठेपणा न मिरवणं हे खरं मोठेपण!

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

कुमारजींचं बंदिशीत वापरलेलं टोपणनाव ‘शोक’ असं होतं. शोक या शब्दाचा अर्थ दु:ख. कुमारजींचा सगळाच प्रवास दु:खाने भरलेला होता. एक भयानक आजारपण, पहिल्या पत्नीचा अकाली मृत्यू… पण ते जीवनाचं सौंदर्य बघायला कधी चुकले नाहीत.भारताच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून कुमारजींच्या मृत्यूची बातमी पहिल्या पानावर छापून आली होती. त्यांच्याबद्दल सुंदर मोठमोठे लेख प्रसिद्ध झाले होते. मी ते लेख वाचत असताना जाणवायला लागलं की, ते हयात असताना त्यांच्याकडून मी काही शिकलोच नाही.

पण तेही शंभर टक्के खरं नव्हतं. कुमारजींचे संस्कार नकळतपणे माझ्या मेंदूत भिनले होते अन् ते आजतागायत मी जिथं जातो तिथं त्यांच्या असण्याची जाणीव करून देतात. त्यांनी दिलेली सौंदर्यदृष्टी हीच सगळ्यात मोठी देणगी आमच्या आयुष्याला लाभली. ही पुण्याई नाही तर आणखी काय? लहानपणी माझ्या अस्वस्थपणाविषयी ते खूप गमतीने बोलत. मी कुठेही बसलो की ती चादर चुरगळायची. कुमारजी म्हणत, ‘‘याच्या बुडाला काटे आहेत.’’ मी या क्षणी हा लेख लिहिताना ज्या खुर्चीवर बसलो आहे त्या उशीची खोळसुद्धा चुरगळलेली आहे अन् त्यांचे ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत.

कुमारजी ५० वर्षांचे झाले तेव्हा मी त्यांच्या घरी होतो, कुमारजींच्या ६० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात स्वयंसेवकाच्या रूपात… अन् उद्या कुमार गंधर्वांची जन्मशताब्दी… म्हणून या बुडाला काटे असणाऱ्या मुलाची इवलीशी आदरांजली… त्यांच्या सुरांच्या भाषेत सांगायचं तर ‘गुरुजी ने दियो अमर नाम, गुरु तो सारिखा कोई नाही, अनंत भरा है भांडार कमी जा में है नाही.’
swanandkirkire04@gmail.com

Story img Loader