भावगीताच्या प्रवासात दिवस मावळला, रात्र झाली अन् चहूकडे अंधार पसरला असे कधी झालेच नाही. अंधारात भावगीताची वाट हरवली असा क्षण आलाच नाही. रात्र झाली, पण या प्रवासातील प्रत्येक रात्र ही पौर्णिमेची रात्र ठरली! गीतकार-संगीतकार आणि गायक-गायिका यांचे योगदान कायम लख्ख प्रकाश देणारे ठरले. त्या प्रकाशात नवनव्या वाटा सापडल्या. पाऊल पुढे जाता जाता वाट निर्माण झाली. भावगीत गाण्यासाठी सुयोग्य, सुमधुर आवाज मिळत गेले. शब्दप्रधान गायकी सांभाळणारे स्वर मिळाले. संगीत नाटक आणि त्यातील पदे हा विषय त्या वेळी आघाडीवर होताच. नाटय़पद गायनाचा बाज ज्यांच्या गळ्यात आहे अशांच्या आवाजातील पदे व नाटके दोन्ही लोकप्रिय झाली. अशा धाटणीच्या, शैलीच्या काही आवाजांचे भावगीत प्रवासात योगदान मिळाले आणि रसिकांनी अक्षरश: त्यांना उचलून धरले. रियाजी आवाज, त्यातील पुरेपूर गोडवा आणि शब्दांचे स्पष्ट तरीही मधुर उच्चार या गोष्टी रसिकांना आवडल्या.
यांतील एक प्रमुख नाव म्हणजे- गायक रामदास कामत. संगीत नाटकांतील भूमिकांमधून व नाटय़पदांच्या ध्वनिमुद्रिकांमधून गाजलेला हा आवाज भावगीते, चित्रगीते, लोकसंगीत यांतूनही ऐकायला मिळाला अन् रसिकांनी हा आवाज आपलासा केला. त्या आवाजाची बलस्थाने भावगीतातील संगीतकारांनी नेमकी हेरली व काही खास गीतांसाठी गायक रामदास कामत यांनाच बोलाविले. येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने कामतांचे एक अतिशय लोकप्रिय गीत आठवले आणि चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. रामदास कामत यांनी अतिशय बहारदार असे गायलेले हे गीत म्हणजे-‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा..’. हे गीत लिहिलेय संतसाहित्याचे गाढे अभ्यासक वामन देशपांडे यांनी आणि संगीतबद्ध केले आहे श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी.‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा..’ हे गीत वामनराव देशपांडे यांनी १९७१ च्या फेब्रुवारीत लिहिले. त्याची ध्वनिमुद्रिका १९७४ साली बाजारात आली. मधल्या काळात खळेसाहेबांनी वामनरावांना सांगितले, ‘मला तुकाराम महाराजांचे २५ अभंग निवडून द्या.’ त्यातल्या निवडक अभंगांना संगीतकार खळे यांनी स्वरबद्ध केले. या चाली ऐकण्यासाठी त्यांनी वामनरावांना घरी बोलावले. हार्मोनियमच्या साथीने त्या अभंगांच्या चाली ऐकता ऐकता वामनरावांनी खळेसाहेबांना सलाम केला. हे तुकयाचे अभंग ऐकवताना खळेसाहेबांच्या कंठातून अचानक शब्द आले.. आकाशी फुलला चांदण्यांचा मळा..! वामनरावांचे हे गीत त्यांनी स्वरबद्ध करून ठेवले होते; इतकेच की, गीत संगीतकाराच्या हाती दिल्यानंतर तीन वर्षांनी त्याची चाल ऐकायला मिळाली. गीत स्वरबद्ध झाले व ते ध्वनिमुद्रिकेत घेणार या कल्पनेने वामनरावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या गीतांची वेगळी ध्वनिमुद्रिका करण्याचे ठरले. वामनरावांनी लिहिलेल्या गीताला कंपनीच्या ई.पी. रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले गेले. त्या रेकॉर्डमध्ये ‘आकाशी फुलला..’ या वामनरावांनी लिहिलेल्या गीताबरोबरच ‘तेजाचा पसारा..’ हे कृ. वि. दातारांचे गीत आणि ‘उद्याचा संसार’ या नाटकातील गीतही समाविष्ट होते. ही गीते रेकॉर्ड करून ताबडतोब कलकत्त्याला कंपनीकडे पाठवायची ठरली. दिवाळी सणाच्या निमित्ताने मार्केटमध्ये ही नवीन रेकॉर्ड यायची होती. ‘अभंग तुकयाचे’ ही रेकॉर्ड येणार असे कळले तेव्हा वामनराव खळेसाहेबांना म्हणाले, ‘पहिली एल.पी. रेकॉर्ड मला विकत द्या.’ त्यावेळी एल.पी. रेकॉर्डची किंमत रु. १६ इतकी होती! गिरगावातील प्रेरणा इमारतीत खळेसाहेबांनी वामनरावांच्या घरी ‘फिएस्टा’ प्लेअरवर ती रेकॉर्ड ऐकली. त्या उत्तम चाली ऐकताना ‘खळेसाहेब तुकाराम या विषयात ‘मेल्ट’ झाले होते’ अशी आठवण वामनराव सांगतात. ‘माझे ‘आकाशी फुलला..’ हे गीत खळे यांनी स्वरबद्ध केले याहून भाग्य कोणते!,’ असे वामनराव नेहमी सांगतात.
‘आकाशी फुलला। चांदण्याचा मळा।
बाग तो आगळा। चंद्रम्याचा।।
घेऊनिया संगे। लाटांचे संगीत।
सागर नाचतो। किनाऱ्याशी।।
सुगंध लेऊन। उभी जाईजुई।
देवा ही पुण्याई। तुझीच रे।।’
संगीतकाराचे कसब व प्रतिभा पाहा! पहिलाच शब्द ‘आकाशी’ हा स्वरबद्ध करताना आ-का-शी ही तीन अक्षरे व खालून वर जाणारे तीन स्वर दिसतात. ते स्वर वर जाणारे असे आरोही दिसतात, कारण ते स्वर आपल्याला जमिनीवरून आकाशाकडे नेतात. दुसरा शब्द ‘फुलला’ ही स्वररचना पाहा. एका शब्दासाठी सहा ते सात स्वरांचा तो पुंजका ‘फुलला’ ही क्रिया दाखवतो. तो चांदण्यांचा मळा म्हणजे आगळा ‘बाग’ आहे, असे कवी सांगतात. तो कुणाचा हे सांगताना आलेला ‘चंद्रम्याचा’ हा शब्द थेट संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांशी नाते सांगणारा आहे. ‘चंद्रम्याचा’ या शब्दाबद्दल वामनरावांना सलाम आहे! हा शब्द स्वरबद्ध होताना त्यातील ‘चा’ या अक्षरावर दहा ते अकरा स्वरांची लोभस अशी सांगीतिक जागा दिसते. पहिल्या अंतऱ्यात ‘लाटांचे संगीत’ असा मनोहारी शब्दरूप आले आहे. लाट लांबून येते म्हणून त्या शब्दाच्या चालीत ‘लाट’ दीर्घ केली आहे. लाटांचा फेस म्हणजे सागराचे शुभ्र नृत्य आहे. प्रत्येक जण तो फेस गोळा करण्याचा प्रयत्न करतो. पण तो हाताशी लागत नाही. लाट ही समुद्राची निर्मिती आहे. फेसाळणाऱ्या लाटांचा चंद्रम्याशी संबंध आहे. पौर्णिमेच्या रात्रीचा समुद्र जो पाहील त्याला हे कळेल. ते पाहणे म्हणजे चांदण्या रात्री ताजमहाल पाहण्यासारखे आहे. कधीतरी पौर्णिमेला सागरतीरी जा, वाळूवर पाठ टेका आणि चंद्रम्याकडे पाहा. तो फुललेला चांदण्यांचा मळा पाहताना आपली नजर एका जागेवर राहणारच नाही. मन आनंदविभोर होते.. गाण्याच्या दुसऱ्या अंतऱ्यातील ‘जाईजुई’ ही फक्त फुले नसून दोन मुले आहेत. संसार फुलला म्हणून आकाशी चांदण्यांचा मळा फुलला, असे कवींचे म्हणणे आहे. मन हे सर्वार्थाने शांत असेल तर ही देवाची पुण्याई समजेल. कवीच्या मनातील भावना संगीतकाराने अचूक हेरली आणि समर्थ कंठातून ती चाल आपल्याला ऐकायला मिळाली.
१९६५ साली संगीतकार यशवंत देव यांनी वामन देशपांडेंचे एक गीत स्वरबद्ध केले. ते गीत होते-
‘पावसाळी गारा। थंडीसंगे वारा।
वेचण्यात सारा। जन्म गेला।।
सात स्वराकार। ब्रह्म निराकार।
लागता गांधार। चैतन्याचा।।’
१९६९ साली वामनरावांनी खळेसाहेबांकडे एक युगुल गीत लिहून दिले-
‘तो : दवभरल्या पहाटेस शपथ तुला मीच दिली
ती : होय सख्या आठवते मज उमलती कळी’
१९६६ साली वामनरावांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर दीर्घ कविता लिहिली होती. ‘ज्या करांनी देशाला सावरले ते सावरकर गेले’ असे त्या कवितेचे शब्द आहेत. त्या पुढील काळात ‘नवाकाळ’मध्ये प्रत्येक रविवारी त्यांनी कविता लिहिली. त्यांना वयाच्या दहाव्या वर्षांपासून नोकरी करावी लागली. घरची आर्थिक स्थिती बेताची होती. पेपर टाकण्याचे काम वामनरावांनी लहानपणी केले. बाइंडिंगची कामे केली. अकरावीपर्यंत आंग्रेवाडीतल्या हिंद विद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर ‘जन्मभूमी’मध्ये दिवसाला पाच रुपये पगारावर प्रूफ रीडरची नोकरी केली. १९७१ साली महिंद्र कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप केली. त्यानंतरच्या काळात मुंबईतील जे. जे. रुग्णालयात लीव्ह व्हेकन्सी जॉब केला. पुढे मुंबईतील रिझव्र्ह बँक ऑफ इंडियामध्ये एकोणीस वर्षे नोकरी केली. त्यांच्या साहित्य सेवेबद्दल किती सांगू असे होते. ‘ज्ञानेश्वरी’ हा त्यांचा ध्यास आहे. वामनरावांचे उमेदीचे वय असताना आकाशवाणीने ‘भावसरगम’ हा कार्यक्रम सुरू केला. ‘हा कार्यक्रम म्हणजे माझ्या आयुष्यातील आनंदोत्सव आहे,’ असे ते सांगतात. पुढील काळात संगीतकार उदय चितळे यांनी वामनरावांची चौदा गीते स्वरबद्ध केली. तब्बल १२५ कविता, श्रीगजानन महाराजांवरील २७ अभंग, १०८ पुस्तके, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, दासबोध, सार्थ अमृतानुभव, आध्यात्मिक प्रवचनांचे ३७६ पानांचे प्रकाशित झालेले १० खंड, चार लघुकादंबऱ्या, १२५ कथा, ५५० पुस्तकांची समीक्षा, ३०० प्रस्तावना, मानपत्रलेखन, पीएच.डी.चे प्रबंध तपासणे.. हे गीतकार वामन देशपांडे यांचे साहित्यकार्य थक्क करणारे आहे. पक्षी उडतो ती त्याची दिशा असा वामनरावांचा साहित्यप्रवास आहे. डोंबिवली मुक्कामी असलेल्या वामनरावांचा दिवस कवितांनी उजाडतो आणि कवितांनी मावळतो.
‘आकाशी फुलला..’ या गीताचे गायक रामदास कामत हे मूळचे गोव्यातील सांखळी गावचे. घरात सर्वच गाणारी मंडळी. मोठे बंधू पं. उपेंद्र कामत यांच्याकडे त्यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. नाटय़संगीत गायनाची तालीम पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडे मिळाली. त्यांच्या मराठी बोलण्यावर कोंकणी भाषेची छाप आहे. पुढील काळात ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांच्याकडे उत्तम मराठी बोलण्याचे मार्गदर्शन मिळाले. कामत यांनी आधी ए. जी. ऑफिस व त्यानंतर एअर इंडियामधील नोकरी सांभाळून संगीत नाटकांत भूमिका केल्या. नाटकांचे दौरे केले. १९५६ साली ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकात साधूची भूमिका केली. १९५८ मध्ये ‘सं. शारदा’ या नाटकात ‘कोदंड’ ही भूमिका वठवली. १९६४ सालचे ‘मत्स्यगंधा’, तर १९६६ मधील ‘ययाति आणि देवयानी’ ही त्यांची नाटके तुफान गाजली. ‘मत्स्यगंधा’ हे नाटक सर्वदृष्टय़ा सुपरहिट झाले. संगीतकार पं. अभिषेकीबुवा गाण्यांच्या तालमीला सकाळी सहा वाजता गिरगाव खेतवाडीमध्ये केशरबाई बांदोडकर (ख्यातनाम चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांची आई) यांच्या घरी बोलवायचे. सकाळी नऊपर्यंत तालीम करून रामदासजी ऑफिसला जायचे व सायंकाळी सहानंतर नाटकाच्या तालमीसाठी पुन्हा साहित्य संघात जायचे.
एच.एम.व्ही. कंपनीसाठी काही भावगीतेही कामत यांना गायला मिळाली. ते प्रत्येक गीत श्रोत्यांना आवडले. ‘आकाशी फुलला चांदण्याचा मळा..’ या गीताच्या ध्वनिमुद्रणात तबला साथ अण्णा जोशी व व्हायोलिन साथ प्रभाकर जोग यांची, तर ऑर्गनवर प्रभाकर पेडणेकर होते. रामदास कामत सांगतात : ‘खळे यांची चाल नेहमीच वेगळ्या प्रकारची.. थोडी आड, सरळ नसणारी व पकडायला कठीण अशी असते. त्यांची गाण्याची चाल हे सर्वागसुंदर संगीत असते.’ आजही कामत नव्याने येणाऱ्या ‘मत्स्यगंधा’ नाटकातील गायकांना संगीत मार्गदर्शन करत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच गीतकार वामन देशपांडे यांनी एक कविता लिहिली- ‘कोजागिरीची रात होती, चांदण्यांची साथ होती, अद्याप नाही विसरले..’
‘आकाशी फुलला..’ या गीताच्या त्रयीबद्दल मनापासून म्हणावेसे वाटते- ‘ते सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतु।।’
विनायक जोशी
vinayakpjoshi@yahoo.com