‘अजून त्या झुडपांच्या मागे..’ हे शब्द उच्चारताच गायक-संगीतकार दशरथ पुजारी आणि कवी वसंत बापट हे ओळखायला क्षणाचाही विलंब लागत नाही. श्रोत्यांच्या मनात ठसलेले हे सदाबहार भावगीत आहे. कवीचे उत्तम शब्द व त्याला साजेशी चाल व गायन हे सारे जमून आले की त्या गाण्याला प्रदीर्घ आयुष्य लाभते. गायक-संगीतकार दशरथ पुजारी यांची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. असंख्य गायक-गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत. त्यापैकी ‘अजून त्या..’ हे गाणे लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारे ठरले. वसंत बापट यांची मूळ कविता ‘अजून’ या शीर्षकाची आहे. त्या कवितेत चार अंतरे असून त्यातील तीन अंतरे रेकॉर्डसाठी स्वरबद्ध झाले आहेत.
‘अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते।
तसे पहाया तुला मला गं
अजून दवबिन्दू थरथरतो
अर्ध्यामुध्र्या कानगुजास्तव
अजून ताठर चंपक झुरतो।
पाठ आठवून तुझी बिलोरी
अजून हिरवळ हिरमुसलेली
चुंबायाला तुझी पावले
फुलपाखरे आसुसलेली।
अजून गुंगीमधे मोगरा
त्या तसल्या केसांच्या वासे
अजून त्या पात्यात लव्हाळी
होतच असते अपुले हासे।
अजून फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतामधले गरळ झोकुनी
अजून वारा बरळत आहे।’
सदाफुली, शेवंती, चंपक, मोगरा या फुलांना कवीने मानवी स्वभावक्रियांमधून सजीव केले आहे. सदाफुली हसते, शेवंती लजवंती होते, चंपक झुरतो अन् मोगरा गुंगीमध्ये आहे. दुसऱ्या अंतऱ्यात ‘अजून गुंगीमधे मोगरा’ हे सांगताना आकारातील मोहक आलापाची जागा आहे. तिसऱ्या अंतऱ्यामध्ये ‘फिक्कट’ या शब्दाचा उच्चार लक्षवेधी आहे. त्याच अंतऱ्यात ‘तरळत, गरळ, बरळत’ हे शब्द उत्तम चालीत व भावनेच्या ओघात आले आहेत. एकूणच गायक-संगीतकार दशरथ पुजारी यांनी तालाची सूक्ष्म समज लक्षात घेऊन हे गाणे अत्यंत सुरेल गायले आहे. गाण्याच्या सुरुवातीला अॅडलिब सतार व अॅडलिब शब्द दिसतात. ‘सदाफुली दोघांना’ या शब्दापासून ताल सुरू होतो. तबला, ढोलक अशा एकत्र वादनातल्या ‘केरवा’ तालात हे गीत बांधलेय. पहिल्या अंतऱ्याआधीचा सतारीचा पीस खास ‘पुजारी शैली’तला.. तालाशी खेळणारा आहे. त्यापुढे बासरीचा पीस आहे. ‘अजून त्या’ या शब्दाशी तालाचे थांबणे ‘बिट्वीन द लाइन्स’ आहे. गाण्यातले म्युझिक शब्दांशी व चालीशी एकजीव झाले आहे.
दशरथ पुजारींचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी बडोद्यातील राजवाडय़ात झाला. पुजारी घराणे मूळचे तंजावरचे. त्यामुळे घरात तमिळ भाषा बोलली जायची. ही सर्व मंडळी पुढील काळात महाराष्ट्रात स्थायिक झाली. दशरथ पुजारींचे वडील आयुर्वेदाचार्य होते. ते उत्तम मल्ल म्हणूनही नावाजलेले होते. त्यांनी मुलांवर व्यायामाचे संस्कार केले. दशरथ पुजारी हे कुस्ती पहेलवान होते. पण संगीतशारदेची उपासना करायची हे त्यांनी आधीपासून ठरवले होते. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यांचे वास्तव्य गिरगावमधील खेतवाडीत होते. सात वर्षे मुंबईतील वास्तव्यानंतर त्यांना अचानक मुंबई सोडून बार्शीला जावे लागले. वडील आयुर्वेदाचार्य असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी ते दौरे करत. बार्शीला त्यांचे बरेच रुग्ण होते. त्यामुळे मुंबईतील त्यावेळचे दंग्याचे वातावरण सोडून पुजारी कुटुंब बार्शीला गेले. तेथे घराजवळच भातंब्रेकर कुटुंब राहत होते. भातंब्रेकरांच्या पत्नीला आयुर्वेदाचार्य पुजारींच्या औषधाने गुण आला. त्यांनी दशरथ पुजारींच्या आईला सांगितलं, ‘माझे यजमान मोठे गायक आहेत. तुमच्या मुलांपैकी कोणाला त्यांच्याकडे गाणे शिकायला पाठवा.’ अन् दुसऱ्या दिवसापासून दशरथ पुजारींना गोपाळराव भातंब्रेकर यांची गायनाची तालीम सुरू झाली. भातंब्रेकर गुरुजी नेहमी तंबोऱ्यावर गायला शिकवायचे. बार्शीला एका हॉटेलमध्ये त्यावेळच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांनी गायलेल्या ‘उपवनी गात कोकिळा..’ या भावगीताची रेकॉर्ड लावत असत. जुन्या ग्रामोफोनच्या कण्र्यातून रस्त्यावरही ते गाणे स्पष्टपणे ऐकायला मिळे. ते गाणे वारंवार ऐकून पुजारींच्या मनात ठसले. गुरुजींनी त्यांना गायन व हार्मोनियमवादन शिकवले. कुशल पेटीवादनासाठीचे तंत्र व मंत्र सांगितले. दशरथ पुजारी चौदा वर्षांचे असताना गुरुजी भातंब्रेकरांचे निधन झाले. नंतरच्या काळात पुजारी कुटुंब पुन्हा मुंबईला आले. पुजारींना मुंबईत वेगवेगळ्या गुरूंकडे गायनाचे धडे मिळाले. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे तीन वर्षे तालीम मिळाली. दिनकर केळकर यांनी त्यांना नाटय़पदे शिकवली. गायनाची संधी मिळावी म्हणून ते एच. एम. व्ही. कंपनीत गेले. तेथील अधिकाऱ्यांना त्यांनी ख्याल ऐकवला. पण ते म्हणाले, ‘तुम्ही छान गाता, पण तुम्ही प्रसिद्ध गायक नाही. तुम्ही आधी बाहेरून प्रसिद्ध व्हा आणि मग आमच्याकडे या.’ गायक जी. एन. जोशींनी गाणी कंपोज करण्याचा सल्ला दिला. नाना साठे व बाळ साठे यांनी पुजारींना सुगम गीत स्वरबद्ध करण्याचा मंत्र दिला. नाना साठेंनी दोन कविता लिहून दिल्या. पुजारींनी लगेच चाल बांधली. योगायोगाने त्याच वेळी गायिका प्रमोदिनी देसाई यांची भेट झाली. त्यांना चाली शिकवल्या. दुसऱ्या दिवशी कोलंबिया रेकॉर्ड कंपनीमध्ये गायिका प्रमोदिनी देसाई यांच्या स्वरात ही दोन गीते ध्वनिमुद्रित झाली. पहिले गीत होते- ‘हास रे मधु, हास ना..’ आणि दुसरे- ‘श्रीरामा घनश्यामा, आलास कधी परतुनी..’ तिथून पुजारींच्या संगीत दिग्दर्शन पर्वास सुरुवात झाली.
पुढे मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात त्यांनी दोन लावण्या रेकॉर्ड केल्या. ‘राया माझ्या मनाची हौस पुरवा’ ही एक आणि ‘माझ्या पदराचा वंगाळ वारा, नको लागूस नादाला पोरा’ ही दुसरी लावणी. एच. एम. व्ही.चे रूपजी आणि वसंतराव कामेरकर यांनी पुजारींना खूप मदत केली. पुढील काळात गायिका माणिक वर्मा यांनी पुजारींचे एक गीत गायले. ‘त्या सावळ्या तनूचे..’ हे ते गीत. हे गीत बरीच वर्षे आधी आत्माराम सावंतलिखित ‘मुलगी’ या नाटकासाठी स्वरबद्ध केले होते. कवी म. पां. भावे यांचे ‘गीत कृष्णायन’ पुजारींनी स्वरबद्ध केले. त्यातील ‘कृष्णा, पुरे ना थट्टा किती ही..’ ही गवळण प्रचंड लोकप्रिय झाली.
गायिका सुमन कल्याणपूर यांनी पुजारींकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास गाणी गायली. पुजारी सांगत असत, ‘सुमनताईंचे हे सहकार्य म्हणजे माझ्या संगीत कारकीर्दीतला सुवर्णकाळ म्हणावा लागेल.’ युगप्रवर्तक भावगीतगायक गजानन वाटवे यांनीसुद्धा पुजारींकडे गीते गायली. मधुकर जोशी, योगेश्वर अभ्यंकर, मंगेश पाडगांवकर, सुरेश भट, रमेश अणावकर, रा. ना. पवार, सुधांशु, प्रवीण दवणे, बजरंग सरोदे, शांताराम नांदगावकर, मधुकर आरकडे, वर्षां तळवेलकर अशा अनेक गीतकारांची शेकडो गीते पुजारींनी स्वरबद्ध केली.
कलावंताची ओळख त्याच्या कलाकृतीमधून होते. कवी वसंत बापट यांनी तर एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर काम केले. कवी, लेखक, प्राध्यापक, कलावंत, शाहीर, स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग अशा सर्व क्षेत्रांत हा कलाकार बहरत गेला. त्यांचे मूळ नाव- विश्वनाथ वामन बापट. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळच्या त्यांच्या कविता ‘वसंत बापट’ या नावाने प्रसिद्ध झाल्या. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे..’ हे व्रत त्यांनी स्वत:ही घेतले. १९४८ ते १९७४ या काळातील त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात ते संस्कृत व मराठी या विषयांचे प्राध्यापक होते. पुढील काळात पुण्यात ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादकपद त्यांनी भूषविले. कवी विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर यांच्यासह काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट या माध्यमांतूनही त्यांनी आपल्या प्रतिभेला फुलवले. श्रेष्ठ गायक भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ या गायन मैफलीचे निवेदनही बापट यांनी केले. मराठी कविता देश-विदेशांत पोचवणाऱ्यांमध्ये वसंत बापट यांचे नाव घ्यावे लागते. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. गुजराती साहित्य संमेलनात त्यांनी चक्क गुजरातीतून भाषण केले होते. त्यांच्या साहित्याचे इतर भाषांतूनही अनुवाद झाले आहेत. अमेरिकास्थित कलाकार मीना नेरुरकर यांना त्यांनी ‘सुंदरा मनामधे भरली..’ हे संगीत नृत्यनाटय़ लिहून दिले. अमेरिकेच्या कलाकार चमूने त्याचे भारतात शेकडो हाऊसफुल्ल प्रयोग केले. ‘अजून त्या झुडुपांच्या मागे..’ ही वसंत बापटांची कविता ‘सेतू’ या काव्यसंग्रहात आहे.
संगीतकार दशरथ पुजारी डोंबिवली येथे राहायला आल्यानंतर त्यांना डोंबिवलीकरांचे भरभरून प्रेम मिळाले. मला त्यांच्याकडे दहा वर्षे गायन शिकायला मिळाले. ते नेहमी सांगायचे : ‘‘अजून त्या झुडुपांच्या मागे..’ हे शब्दच माझ्या नावाशी जोडले गेलेत. जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या जीवनाच्या झुडुपांमधील आठवणींची सदाफुली माझ्याशी सतत हसत असते. प्रपंचातील शेवंती लजवंती होते, तर संगीतातला मोगरा धुंदीत फुललेला व बहरलेला दिसतो; कारण हे गाणे म्हणजे माझे ओळखपत्र आहे!’
विनायक जोशी
vinayakpjoshi@yahoo.com