भावगीत गायनाच्या दृष्टीने तो काळ खूप वेगळा होता. विशेषकरून स्त्रियांसाठी. त्याकाळी स्त्रीभावनेची अनेक गाणी पुरुष गायकच गात असत. आणि सगळे पुरुष गायक ती गाणी उत्तमरीत्या गात. त्यांचे भावपूर्ण गायन श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत असे. सोपे शब्द, उत्तम चाल आणि मधुर गायन यामुळे ती गाणी पुन:पुन्हा गाण्याची मैफलीत मागणी होत असे. गायन क्षेत्रात पुरुषी वर्चस्व असलेल्या अशा काळात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींनी गायन किंवा गायनात कारकीर्द करणे हे तसे तेव्हा कठीणच होते. तशात नुसते गायन शिकणे वेगळे आणि मोठमोठय़ा मैफलींत गाणे सादर करणे त्याहून वेगळे. गायनविद्या शिकणे आणि त्यासाठी गुरुदक्षिणा अदा करणे हे त्या काळात अनाठायी खर्चाचे काम समजले जाई. घरखर्चाच्या पलीकडे असा अनाठायी खर्च करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नसे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मैफलीत गाण्यासाठी अनुभव आणि सराव हवा. त्याकरता आधी आपल्याकडे गोड गळा आणि उत्तम गाणे सादर करण्याची क्षमता आहे हे स्वत:ला कळणे आवश्यक असते. गायन शिकायला सुरुवात करणे आणि मग त्यात आपला ठसा उमटवून त्याच क्षेत्रात गायक म्हणून कारकीर्द करणे ही आणखीन वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी योग्य वयात उत्तम गुरू लाभणे, त्यायोगे आपल्या गाण्याला योग्य ती दिशा लाभणे, गाण्याचा कसून रियाज करणे, शिकलेले गाणे आत्मसात होणे, शास्त्रकाटय़ाच्या कसोटीला ते उतरणे, गायनातील तंत्र-मंत्राचा अभ्यास अशा अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होतो. आजच्या काळातली लोकप्रिय संज्ञा- ‘गॉडफादर मिळणे’ ही त्याकाळी तरी अज्ञातच होती. त्यामुळे तुमच्यात गायक म्हणून तयार होण्याची क्षमता असेल तर त्या गाण्याचे इंद्रधनुष्य नक्की होईल, अशी खात्री असण्याचा तो काळ होता. अशा काळात भावगीताच्या दुनियेत मूळच्या विदर्भातील- वध्र्याच्या एका गायिकेने प्रवेश केला आणि आपल्या सुमधुर स्वरात पुढील काही वर्षे उत्तमोत्तम गाणी गायली आणि संगीतप्रेमींना अपार आनंद दिला. ही गायिका म्हणजे.. मालती पांडे-बर्वे.
छोटा पडदा आणि चित्रवाहिन्यांवरील गाण्याच्या स्पर्धाचा तो काळ नसूनसुद्धा आपल्या गायनामुळे मालती पांडे यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा आकाशवाणी मुंबई केंद्रावर सुगम गायनाचा पहिला कार्यक्रम झाला. ही गोष्टच खूप काही सांगून जाते.
गायक-संगीतकार गजानन वाटवे यांनी कवी श्रीनिवास खारकर यांचे एक अंगाईगीत स्वरबद्ध केले आणि गायिका मालती पांडे यांच्याकडून प्रथम ते गाऊन घेतले. त्यानंतरच्या काळात मग अशी बरीच अंगाईगीते आली. वेगवेगळ्या संगीतकारांनी व गायक-गायिकांनी ती गायली. पण मालती पांडे यांनी गायलेल्या या पहिल्या अंगाईगीताचे महत्त्व विसरून चालणार नाही..
‘कुणीही पाय नका वाजवू
पाय नका वाजवू
चाहूल देऊन नका कुणी गं
चिमण्याला जागवू।
नकोस चंद्रा येऊ पुढती
थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी
चाळ नको नादवू।
पुष्करिणीतून गडे हळूहळू
जललहरी तू नको झुळुझुळु
नकोस वाऱ्या फुलवेलींना
फुंकरीने डोलवू।
नकोस मैने तोल सावरू
नकोस कपिले अशी हंबरू
यक्षपऱ्यांनो स्वप्नी नाचून
नीज नको चाळवू।
जगावेगळा छंद तयाचा
पाळण्यातही खेळायाचा
राजी नसता अखेर थकुनी
पंख मिटे पाखरू।’
चिमण्या बाळाला नुकतीच झोप लागते आहे. त्याची झोपमोड होऊ नये यासाठी या गीतामध्ये हे नका करू किंवा ते नका करू, हे अतिशय गोड शब्दांत सांगितले आहे. या गाण्यात गोड शब्द व सुमधुर चाल यांचा संगम झालेला आहे. ‘नका करू’ हे सांगण्यात विनंती आहे, आर्जव आहे. त्यामुळे बाळाची नीज चाळवली जाईल. पाय व चाहूल या शब्दांमधले नाते सांगणारा भाव गाण्याच्या ओळींत आहे. चंद्राचे चाळ, जललहरीचे झुळझुळणे, वाऱ्याची फुंकर, मैनेचे तोल सावरणे, कपिलेचे हंबरणे, यक्षपऱ्यांचे नाचणे या प्रतिमा काव्यात हळुवारपणे आल्या आहेत. बाळाच्या झोपेशी या सर्व गोष्टींचे नाते आहे हे विसरू नका, असा संदेश देणारे हे गीत. हा संदेशदेखील कळीचे फूल होण्यासारखा अलवार उलगडला गेला आहे. हे अंगाईगीत गाऊन बघण्यापूवीं गाणाऱ्याला ‘ऊ’काराचा अधिक रियाज करावा लागेल. वाजवू, जागवू, नादवू, हळूहळू, झुळुझुळु, डोलवू, सावरू, हंबरू, चाळवू हे शब्द गद्यात असो वा पद्यात; आपल्या जिवणीचा चंबू योग्य प्रमाणात होतोय ना, ही काळजी गायकाला घ्यावीच लागेल. शिवाय मायक्रोफोनमधून हे शब्द बाहेर योग्य प्रकारे जातील ना, हा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे. कवीचे शब्द आणि संगीतकाराची स्वरयोजना उत्तम प्रकारे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गायिकेकडून नेहमीच हा विचार प्राथम्याने होणे गरजेचे असते. या अंगाईगीतामुळे एक उत्तम गाणे श्रोत्यांना मिळाले याचे श्रेय गीतकार- संगीतकार आणि गायिका अशा तिघांनाही जाते.
आरंभीचा म्युझिकचा मोठा ‘पीस’ श्रोत्याला गाण्यात हलकेच नेऊन सोडतो. मोजक्याच वाद्यांचा वापर आणि मधले ‘फिलर्स’ यामुळे या गीतातील भाव अधिकच उत्कट होतो. गाणे शांतपणे ऐकावे अशी श्रोत्यांची मन:स्थिती निर्माण होते. त्यामुळे नकळत हे गाणे ऐकताना व त्याचा आनंद घेताना गाणे पूर्ण होईपर्यंत ‘कुणीही पाय नका वाजवू’ असे म्हणावेसे वाटते. गाण्यातील बाळाची झोप आणि गाणे ऐकतानाची आपली तल्लीनता या दोन्हींना धक्का लागू नये असे मनापासून वाटते.
या गीताचे संगीतकार गजानन वाटवे एके ठिकाणी लिहितात- ‘‘त्या काळात नाटकांना संगीत देण्याच्या खटाटोपात मी फारसा पडलो नाही. फक्त ‘घराबाहेर’ या नाटकाचे मी संगीत केले आणि कुमार साहित्य मंडळाच्या एका हिंदी नाटकासाठी चाली केल्या. या चाली मालती पांडे यांनीच म्हटल्या. त्यानंतर अल्पावधीतच माझ्या चाली कोलंबिया कंपनीने ध्वनिमुद्रित केल्या. त्यातली एक कविता म्हणजे ‘कुणीही पाय नका वाजवू’ व दुसरी कविता ‘ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची’! या ध्वनिमुद्रिकेमुळे मालतीबाईंचे खूप नाव झाले. पाश्र्वगायिका म्हणून चाचणीसाठी मालतीबाई प्रभात कंपनीत आल्या होत्या. त्यावेळी मी सुधीर फडके यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम करीत असे. तिथेही मालतीबाईंनी माझी हिंदी नाटकातील चाल म्हटली. भैरवी रागामधील ठुमरीसारखी ही चाल त्यांच्या कंठातून ऐकल्यावर साहेबमामा फत्तेलाल लगेच म्हणाले, ‘वाटवे, आज एक रत्न तुम्ही आम्हाला दिलंत. असा आवाज आम्ही प्रथमच ऐकला.’’
शास्त्रीय गायक पं. पद्माकर बर्वे यांच्याशी मालतीबाईंचा विवाह झाला. मालतीबाईंना शास्त्रीय गायनाची तालीम त्रिवेदी मास्तर, भास्करराव घोडके, विलायत हुसेन खाँ, भोलानाथजी घट्ट, पद्माकर बर्वे, जगन्नाथबुवा पुरोहित, हिराबाई बडोदेकर, विनायकबुवा पटवर्धन या गुरूंकडे मिळाली. पं. पद्माकर बर्वे यांच्या सहाशे बंदिशी आजही उपलब्ध आहेत. मालती पांडे यांनी काही कवींच्या रचना स्वत: स्वरबद्ध केल्या. त्यांची स्नुषा ख्यातनाम कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्याही काही कवितांना त्यांनी चाली दिल्या आहेत. सुधीर मोघे, सुधांशु , अरुणा ढेरे, संत एकनाथ यांच्या रचनाही त्यांनी स्वरबद्ध केल्या आहेत. त्यांचे चिरंजीव राजीव बर्वे हे उत्तम गायक असून, दोन्ही नाती- प्रियांका व प्रांजली आज गायन क्षेत्रात सर्वाना परिचित आहेत. त्यांच्या घराण्याचे गाणे श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ‘शब्द सूर बरवे’ शीर्षकाचा मंचीय संगीताविष्कारही सादर होतो. प्रियांका आपल्या मैफलीत सांगते- ‘‘मी आजीकडे पहिले गाणे शिकले. कारण मी लहान असताना माझ्यासाठी आजी ‘कुणीही पाय नका वाजवू’ ही अंगाई म्हणत असे.’’ राजीव व संगीता बर्वे आवर्जून सांगतात, ‘‘नव्या पिढीला ही भावगीते समजणे आवश्यक आहे.’’
मालती पांडे यांनी आपल्या कारकीर्दीत गजानन वाटवे, सुधीर फडके, राम फाटक, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, मधुकर पाठक या संगीताकारांकडे सुगम गायन केले. मालतीबाईंची असंख्य भावगीते आपल्या मनात रुंजी घालत असतात. त्यांची ‘कशी ही लाज गडे मुलखाची’, ‘कशी मी सांगू वडिलांपुढे’, ‘कशी रे तुला भेटू’, ‘लपविलास तू हिरवा चाफा’ ही गीते लगेच आठवतात. ‘ते कसे ग ते कसे’, ‘अंगणात खेळे राजा’ ही गाणीसुद्धा पाठोपाठ आठवतात. यापैकी ‘अंगणात खेळे राजा’ या गीताची चाल स्वत: मालतीबाईंची व संगीत संयोजन दत्ता डावजेकर यांचे आहे, हा एक आगळा योग होता. ‘माझ्या संगीतजीवनाची वाटचाल’ हे मालतीबाईंचे आत्मकथन वाचकांसमोर आले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर फडके लिहितात.. मधुर आवाज, संगीताची जाण, लवचीक गळा, भाव जाणून तो स्वरातून प्रकट करणे या गुणांमुळे या गायिकेने सुगम गायनात मानाचं स्थान मिळविले. त्यांच्या गाण्यातले मराठी उच्चार जसे हवेत तसेच येत असत. गाण्याची चाल पटकन् आत्मसात करण्याची त्यांची हातोटी होती. एका युगप्रवर्तक संगीतकार-गायकाची मालतीबाईंना अशी भरभरून दाद मिळाली, ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
हेडफोन लावून जरी तुम्ही मालतीबाईंचे गाणे ऐकायला सुरुवात केलीत तरी आसपासच्या मंडळींना तुम्ही सांगाल..
‘कुणीही पाय नका वाजवू..’
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com