अनेक मधुर आवाजांनी मराठी भावगीतांची गंगा वाहती ठेवली. पुष्कळ आवाज गाते झाले. प्रत्येकाचा स्वत:चा असा वेगळा आवाज होता. वेगळा आवाज आला की वेगळा लगाव आलाच. कविता ऐकवण्याची चळवळ सुरू होते, यातच भावगीताची बीजे रुजली आहेत. बा. भ. बोरकर यांचे म्हणणे होते- ‘कविता धडय़ासारखी वाचून काय दाखवता? जरा गाऊन दाखवा की!’ होय, भावगीतासाठी हे शुभसूचक चिन्ह होते. रविकिरण मंडळाची स्थापना व त्यातील कवींचे कविता गायन रसिकांनी दाद देत स्वीकारले. काळाबरोबर भावगीत अधिक प्रवाही झाले, तेही इभ्रत राखूनच! भावगीत हे जनसंगीत आहे. प्रत्येकाला भावगीताशी नाते राखवेसे, सांगावेसे वाटते.. अगदी घरोबा असल्यासारखे! शास्त्रीय गायनाच्या मैफलीजिंकणारे अनेक गायक भावगीत गाऊ लागले. भावगीताने त्यांच्या मैफिलीत स्थान मिळविले. ती भावगीतेसुद्धा श्रोत्यांना आवडू लागली. सर्वाना उत्तम काव्य व शास्त्रशुद्ध गायन म्हणजे जणू ‘गोफ दुहेरी विणलासे’ असा आनंद मिळू लागला. गवयाने गायलेले विस्ताराचे स्वातंत्र्य घेतलेले भावगीत, शब्दांच्या आधारे स्वराकृती स्पष्ट करणारे भावगीत, तीन ते साडेतीन मिनिटांचे ‘बांधलेले’ भावगीत अशा विविध प्रकारे हा बाज प्रस्थापित झाला. लक्ष्मीबाई जाधव, गंगूबाई हनगल, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, द. वि. पलुस्कर, राम मराठे, वसंतराव देशपांडे या सर्वानी भावगीत आपलेसे केले. याच मालिकेतले महत्त्वाचे नाव म्हणजे गायिका हिराबाई बडोदेकर. ‘उपवनी गात कोकिळा’ या हिराबाईंनी गायलेल्या भावगीताशी श्रोत्यांचे अधिक सख्य होते.
‘उपवनी गात कोकिळा
ऋतुराजा जीवाचा दिसला तीज।
रसिकराज तीज दिसला
जीव जीवा सापडला
खुलत चंद्र पाहुनिया कमला जणु।’
दादरा तालातील ‘मिश्र मांड’ रागातील हे भावगीत. कल्याण थाटातील शुद्ध स्वरांचा हा राग या गीतामध्ये मिश्र स्वरूपात आला आहे. कधी ‘यमन’ अंगाने दिसतो, कधी म, ध, नी हे स्वर शुद्ध तर कधी कोमलसुद्धा दिसतात. ‘उलट सुलट स्वरसमूह’ अशा पद्धतीनेसुद्धा गायला जातो. बऱ्याच नाटय़पदांमध्ये ‘मांड’ हा राग दिसतो. म्यूझिक पीसने सुरू होणाऱ्या या गीतात तालाबरहुकूम घेतलेल्या छोटय़ा ताना, मोठय़ा दमसासच्या ताना व आलाप याची बरसात आहे. हे सर्व गाताना शब्द व आशय याला कुठेही धक्का नाही. या हिराबाई बडोदेकर यांच्या गीतात किंवा गायनात अशक्य हा शब्द नाही. त्यामुळे शास्त्रीय बाजाने भरलेले हे भावगीत रसिकांच्या आवडीचे झाले. हिराबाई आपल्या मैफलीत हे गीत गाऊ लागल्या. भावगीताला त्या शास्त्रीय पेहराव चढवायच्या. ‘उपवनी’ हे गीत त्या अर्धा-पाऊण तास सहजतेने गायच्या. त्यामुळे उपवनातून आलेली कोकिळा गायनात सर्वस्व पणाला लावून पंचम स्वर लावते आहे हा अनुभव अनेकांनी घेतला.
गीतकार वसंत शांताराम देसाई १९२५ या वर्षी हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘पुन्हा गाते’ असे त्याच म्हणाल्या. तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. याच देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात.. या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. १९३७ मध्ये ओडियन कंपनीने ही ध्वनिमुद्रिका बाजारात आणली. शब्द वसंत शांताराम देसाई यांचे व मास्तर दिनकरांची मदत घेऊन चालही त्यांनीच केली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाटय़पदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत गायची व त्यामुळे मुलगी पसंत व्हायची!’
२१ डिसेंबर १९२१ या दिवशी पं. पलुस्कर यांच्या आग्रहाखातर हिराबाईंनी गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर जवळजवळ तीन पिढय़ांसाठी त्या गात राहिल्या. आपल्या गायनाच्या कार्यक्रमाला तिकीट लावून सादरीकरण करणाऱ्या हिराबाई या पहिल्या गायिका असे म्हणता येईल. तसेच सरस्वती राणे या आपल्या भगिनीसमवेत शास्त्रीय गायनाची जुगलबंदी सादर करणाऱ्या हिराबाई या पहिल्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. त्या काळात हिराबाईंनी ठरवले, की शांतपणे बैठकीवर बसून, हातवारे न करता, शिस्तीने सादर केलेले गाणे ऐकायची श्रोत्यांना सवय लावायची व स्त्रियांच्या शालीन गान-मैफलीचा पायंडा पाडायचा. भारतीय संगीताला मिळालेली ही मोठी देणगी आहे.
ह. रा. महाजनी यांनी १६ मे १९६६ च्या ‘लोकसत्ता’त हिराबाईंच्या गायकीबद्दल म्हटले आहे- ‘हिराबाईंचे गायन ऐकले की भरजरी शालू नेसलेली, हातात पूजापात्र व डोईवर पदर घेतलेली, नाकात नथ घातलेली आणि तुळशीबागेतील रामदर्शनाला लगबगीने निघालेली एक कुलशीलवती समोर उभी राहते. त्यांनी गायकीला जे घरंदाज वळण लावले, त्यामुळे स्त्रिया बैठकीत गायिका म्हणून गाजत आहेत. त्या काळाची आपण कल्पना करू शकलो, तर हिराबाईंचे ऋण किती मोठे आहे याची यथार्थ कल्पना येऊ शकेल. स्त्री गायिकांच्या मैफलीचा पाया हिराबाईंनी घातला हे लक्षात ठेवले पाहिजे.’
‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत लोकप्रिय झाल्यानंतर वसंत देसाई यांनी हिराबाईंसाठी आणखी भावपदे लिहिली. कोलंबिया कंपनीने ध्वनिमुद्रिका काढल्या. अख्तरीबाईंच्या एका भैरवीच्या चालीवर ‘धन्य जन्म जाहला’ हे गीत आले. त्यानंतरच्या काळात हिराबाईंसाठी मो. ग. रांगणेकर, ना. सी. फडके, स. अ. शुक्ल यांनी पदे लिहिली. या गीतांबरोबर ‘विनवित शबरी रघुराया’ आणि जी. के. दातार यांचे ‘नंदलाला नाच रे’ या ध्वनिमुद्रिका आल्या. या दोन्ही रचना गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केल्या. लेखक राजाराम हुमणे यांनी बाबूजींना जेव्हा या दोन्ही गीतांची आठवण करून दिली तेव्हा बाबूजी म्हणाले, ‘या गीतांच्या स्वररचना करायच्या आणि त्या हिराबाईंना सांगायच्या या कल्पनेनेच शहारून आले, मनावर दडपण आले, संकोच वाटू लागला. कारण हिराबाई आणि बालगंधर्व यांना मी मनोमनी गुरू केले होते. मोहोळातून मध ठिबकावा असे हिराबाईंचे गायन मी कानात साठवले. हिराबाई म्हणाल्या, ‘तुम्ही मला चाल शिकवा, त्याबरहुकूम मी म्हणेन.’ हिराबाईंच्या या बोलण्यामुळे माझी भीती दूर झाली. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून त्या शिकल्या ही फार मोठी गोष्ट आहे.’
हिराबाईंची मैफल ऐकल्यानंतर रसिक म्हणायचे- ‘चंपूताईंनी ‘उपवनी गात कोकिळा’ काय म्हटलंय?’ तेवढय़ात एखादा नवा रसिक ‘चंपूताई कोण?’ असा प्रश्न विचारीत असे. हिराबाईंना त्यांची भावंडं ‘चंपूताई’ म्हणत.
त्या वेळचा मुंबैकर म्हणत असे- ‘हिराबाईंच्या गाण्याबद्दल बोलूच नका हो..’ हॉटेलातल्या कपात ब्रून मस्का बुडवत तो पुढे सांगे, ‘मी सांगतो ऐका.. इराण्याचा चहा आणि हिराबाईंचं गाणं.. आकाश कोसळलं तरी यांची क्वालिटी सेम टु सेम.. काय समजलेत?’
‘तार षड्ज’ हा हिराबाईंच्या गळ्यातला हुकमी एक्का असे. हिराबाईंचे कर्तृत्व उत्तमरीत्या ग्रंथबद्ध करणारे लेखक राजाराम हुमणे अर्पणपत्रिकेत लिहितात – ‘हिराबाईंच्या अविस्मरणीय आणि अद्वितीय तार षड्जाला..’
वरचा ‘सा’ का म्हणतात ते आता मला समजले.
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com