मराठी भावगीतांच्या दुनियेत विलक्षण वेगळी झेप असणारे काही कलाकार आले. ती झेप आपल्या नजरेत मावत नाही. यामध्ये एका गायक-संगीतकाराच्या बुद्धिप्रधान कामगिरीकडे पाहिले असता आनंद, आश्चर्य, अलौकिक हे सारे भाव एकत्र आल्यावाचून राहात नाहीत. चाली बांधताना त्यांचा नेहमी वेगळा प्रयत्न दिसतो. त्या प्रयत्नात प्रगल्भता असते. त्यांनी भावगीत गायनाच्या मैफलीसुद्धा केल्या, आजही करत आहेत. मैफलीत ते क्षणभर शांतपणे विचार करू लागले, की आपल्याला आनंद देणारे ‘हटके’ असे काही ऐकायला मिळणार याची खात्री असते. प्रत्यक्ष मैफलीत ते गातात तेव्हा सगळे सूर त्यांना खुणावतात व त्यांच्याशी संवाद करतात असे जाणवते. श्रोत्यांना एका दिव्यदृष्टीचा साक्षात्कार अनुभवायला मिळतो. ते अभंग गातात तेव्हा संगीताची बैठक ही क्षणांत अध्यात्माची चौकट होते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यासारखे वाटते! त्यांच्या स्वररचनेत वेगाने उसळणारे सूर ऐकले, की स्वरांचे आगळ्या रंगाचे आकर्षक फुलपाखरू मनसोक्त उडते आहे.. ते चिमटीत पकडू म्हटले तरी हाताला लागत नाही, पण हवेहवेसे मात्र वाटते, अशी स्थिती होते. गाता गळा कसा असावा तर यांच्या गायनासारखा असावा, हे सतत वाटत राहते. भावगीताच्या प्रवासात अनेक वाटा, दिशा दिसल्या; पण ही वाट वेगळीच ठरली. ही वाटसुद्धा आहे आणि सागराची लाटसुद्धा आहे. या लाटेतील स्वरांचे उसळणे आपले मन भावविभोर करते. या गायक-संगीतकाराच्या प्रतिभेला जे जे सुचले ते सुरुवातीला श्रोत्यांना समजले नाही, आकलन झाले नाही. पण ज्या क्षणी त्यातील सांगीतिक ताकद लक्षात आली त्या क्षणी प्रत्येक स्वररचना हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, हेसुद्धा ध्यानात आले. हा उगवलेला सूर्य ‘स्वरभावा’चा वेगळा प्रकाश घेऊन आला. त्या प्रकाशाने प्रत्येकाचे अंतर्मन लख्ख उजळले. शब्दप्रधान गायकीतील निर्गुण अवस्था भेटली. भावगीत श्रोत्यांच्या हृदयात नेणारे हे गायक-संगीतकार म्हणजे- भावगंधर्व पं. हृदयनाथ दीनानाथ मंगेशकर!
वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी त्यांनी संगीतबद्ध केलेले गाणे-
‘चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले।
वाहती आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुंजाची झळाळी तार पदरा गुंफिले।
गुंतविले जीव हे मंजीर की पायीं तुझ्या
जे तुझ्या तालावरी बोलावरी नादावले।
गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहु दे मेघाविना सौंदर्य तुझे मोकळे।’
कवी राजा बढे यांचे शब्द, श्रेष्ठ गायिका आशा भोसले यांचा स्वर आणि पं. हृदयनाथांचे संगीत यांमुळे एक अजर-अमर-अविनाशी असे गीत जन्माला आले. गायिका आशा भोसले यांनी पं. हृदयनाथांकडे गायलेले हे पहिले गीत आहे. ‘हंसध्वनी’ या रागाच्या सुरावटीतील हे गीत म्हणजे विलक्षण ताकदीची स्वररचना आहे. मुखडा हा सात मात्रांच्या रूपक तालात बांधलाय. अंतऱ्यापूर्वीची संतुरची सुरावट द्रुत तीन तालात आणि अंतऱ्यासाठी केरवा तालातील वेगळा पॅटर्न.. हे सारे थक्क करणारे आहे. संगीतकाराच्या प्रतिभेला ‘सलाम’ केलाच पाहिजे. या चालीत काही सुगम, काही शास्त्रीय अशा जागा दिसतात. संपूर्ण शास्त्रीय किंवा नाटय़पदाकडे ही चाल झुकते की काय असे वाटते तोच किंवा त्या क्षणी गाण्यात ‘भावगीतपण’ कायम राखलेले दिसते.
‘चांदणे शिंपीत जाशी..’ ही कवी राजा बढे यांची कल्पना अफाट आहे. त्यासाठी त्यांना दाद द्यायलाच हवी. ‘चांदणे, ताराफुले, आकाशगंगा, तेज:पुंजाची झळाळी, निळावंती’ हे शब्द मन प्रसन्न करणारे आहेत. ‘ताराफुले’ या शब्दाच्या उच्चारातील शेवट करताना छोटय़ा तानेची जागा दिसते. ती अवरोही तान आहे आणि या गीतातील ती आकर्षणाची जागा आहे. गायनात मुखडय़ाकडे घेऊन येणारी ती जागा म्हणजे डोळे दिपवून टाकणारे स्वरांचे चांदणे आहे. ‘गुंतविले जीव हे मंजीर की..’ यामध्ये ‘मंजीर’ हा वेगळा शब्द दिसतो. यात ‘त्याग भावनेतील तुळसमंजिरीचा मोहोर’ की संस्कृत शब्दाच्या अर्थाप्रमाणे ‘पायात बांधलेला वाळा’ अशा संमिश्र भावनेमध्ये राहाणे आपल्याला आवडते. ‘पायी तुझ्या..’ या शब्दावरून तो ‘वाळा’ असावा असेही मनोमन वाटते. यातील प्रत्येक शब्द आणि चालीतले स्वर या गोष्टींची मोहिनी आपल्या मनावर आहे. गाणे निर्माण करणाऱ्या त्रयीची प्रतिभा हे त्यामागील ठोस कारण आहे.
इतक्या लहान वयात पं. हृदयनाथांना ही चाल सुचणे हे प्रतिभेचं देणं आहे. ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी संगीतकार नौशाद यांनी मास्टर रतन या बालकलाकाराच्या तोंडी असलेले भजन हे हृदयनाथांकडून गाऊन घेतले होते. हृदयनाथांनी पुढे ‘सुरेल बाल कला केंद्र’ असा एक वाद्यवृंद सुरू केला. पुढील काळात शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खाँ यांचे गंडाबंध शागीर्द होण्याचे भाग्य त्यांना लाभले. हृदयनाथांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी, चित्रतपस्वी भालजी पेंढारकरनिर्मित ‘आकाशगंगा’ या चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली. नंतरच्या काळात त्यांनी अभिजात कवितेला अशा चाली दिल्या, की भावगीतात संगीताचे एक वेगळे दालनच सुरू झाले. त्यांच्या चाली सुरुवातीला ऐकणाऱ्याला एक धक्का देतात. काही वेगळे ऐकायला मिळाले हे जाणवते. त्याच चाली हळूहळू मनात झिरपतात आणि मनाची इतकी पकड घेतात, की आपण त्यातून बाहेर येऊच शकत नाही. प्रयोगशीलतेमध्ये एक प्रकारचे साहस असते; पण त्यामागे सांगीतिक ज्ञान-अभ्यास आहे, कष्ट आहेत आणि जिद्दही आहे. कवितेमधील संगीताला हुडकून काढण्याची क्षमता हे वरदान पं. हृदयनाथांना लाभले. कारण साहित्य-संगीताचा अभ्यास असलेला हा झरा ‘मूळचाची खरा’ आहे.
पं. हृदयनाथांच्या संगीतरचना यशस्वीरीत्या गाणे म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करण्यासारखे आहे! ‘दिल और दिमाग के बीचोबीच गला है’ हे त्याक्षणी उमजते. त्यांच्या गीतांमध्ये अनेक बाजांचे संगीत आले आहे. परंतु त्यांचे कोणतेही गाणे ऐकलेत तरी त्यावर त्यांची स्वत:ची अशी ठोस मुद्रा दिसतेच. सर्व वयोगटांतील श्रोता त्यांच्या गाण्याचा चाहता आहे. जे संगीतकार पट्टीचे गायक आहेत अशांपैकी पं. हृदयनाथ हेही एक. ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या..’ किंवा ‘चांदण्यात फिरताना..’ या गीतांमध्ये शब्दांना चालीत बांधताना केलेला कॉर्ड्सचा उपयोग स्तिमित करणारा आहे. ही संगीतकाराची प्रतिभा आहे. त्यांची चाल गाणे ही गाणाऱ्यासाठी परीक्षा असते. गायकाला किंवा गायिकेला सावधपणेच गावे लागते. श्रोत्यांनाही गाफील राहून चालत नाही. कारण चालीतले आनंदाचे धक्के हे आनंद शतगुणित करणारे आहेत. पं. हृदयनाथांच्या संगीताला चिंतनाची जोड असल्याने त्यात विचारांची खोली दिसते. स्वत: बांधलेल्या चाली ते स्वत: केवळ गातात असे नाही, तर ते त्या चाली ‘जगतात’ हेच खरे आहे. जगत्गुरू श्री शंकराचार्य विद्याशंकर भारती, करवीरपीठ, कोल्हापूर यांनी पं. हृदयनाथांना ‘भावगंधर्व’ या उपाधीने सन्मानित केले.
ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास, गालीब-मोमीन-मीर-दाग या ऊर्दू कवींच्या रचनांचा अभ्यास, रामायण-महाभारताची पारायणे, छ. शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर ही प्रेरणादैवते, ‘चला वाही देस’ निमित्ताने मीरा च्रित्राचा अभ्यास, ‘तरुण आहे..’ या गीतातली मंद्र सप्तकातल्या पंचमापासून तार सप्तकाच्या पंचमापर्यंतची झेप, ‘राहिले दूर घर..’ या शब्दाआधी सुचलेला ‘जिवलगा’ हा एक शब्द.. हा सारा पं. हृदयनाथांचा व्यासंग म्हणजे एक दैवी शक्ती आहे, असे वाटते.
‘चांदणे शिंपीत जाशी..’ या गीताचे गीतकार राजा बढे यांच्याबद्दल सध्या दादर-मुंबई मुक्कामी असलेले त्यांचे बंधू बबनराव बढे भरभरून आठवणी सांगतात.. पूर्ण नाव- राजा निळकंठ बढे. १ फेब्रुवारी १९१२ रोजी त्यांचा नागपुरात जन्म झाला. प्राथमिक शिक्षण मध्यप्रदेशात, तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. पुण्याला ‘सकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. ‘बागेश्वरी’ मासिकात संपादक मंडळात काम केले. साप्ताहिक ‘सावधान’मध्ये लेखन केले. पुढील काळात ‘रामराज्य’ या चित्रपटाची गाणी लिहिली. हिंदुत्वनिष्ठ असल्याने डॉ. मुंजे आणि तात्याराव सावरकरांकडे राजाभाऊंचा वैचारिक कल असे. त्यांनी देशभक्तीपर कविता लिहिल्या, भावगीते लिहिली. पुढील काळात मुंबई आकाशवाणीवर सात वर्षे नोकरी केली. ‘संगीतिका’ हा प्रकार नभोवाणीकडून प्रथम सादर होण्याचा मानही राजाभाऊंकडे जातो.
पं. हृदयनाथांनी कवी भा. रा. तांबे यांची ‘कशी काळनागिणी’ ही कविता स्वरबद्ध केली. तांबे यांच्या मूळ गीताच्या संहितेत ‘सखे गं’ हा शब्द नाही. ‘सखे गं’ हा शब्द राजा बढे यांनी दिला आहे.
२६ ऑक्टोबर १९३७ हा भावगंधर्व पं. हृदयनाथांचा जन्मदिवस. येत्या २६ ऑक्टोबरला ते वयाच्या ८१ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. आपल्या सर्वासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
‘चांदणे शिंपीत जाशी..’ या एका गाण्याच्या निमित्ताने पं. हृदयनाथांच्या संगीत कारकीर्दीतील सर्व गाणी आठवून म्हणणे हा आपल्यासाठी भाग्ययोग आहे. ‘पं. हृदयनाथ मंगेशकर’ हे शब्द आहेत की सूर? कवी सुधीर मोघेंच्या शब्दांत सांगायचे तर..
‘हा सूर जणू शब्दांचे हृद्गत आहे..!’
vinayakpjoshi@yahoo.com