भावगीतांमध्ये निरनिराळ्या विषयांवरची असंख्य गाणी आली. ही सर्व तऱ्हेची गाणी श्रोत्यांच्या मनाला आजदेखील भुरळ पाडतात. त्यात ‘चंद्र’ हा एक विषय आहे. चंद्र परिवारात ओघाने येणारी मंडळी म्हणजे चांदणे, पौर्णिमा, नक्षत्रे, आकाश, तारे, ग्रह, आकाशगंगा.. ही जीवलग मंडळीही हवीहवीशी वाटतात. चंद्रदेखील अनेक नावांनी काव्यात येतो. चंद्रमा, चांद, चंदामामा, चंद्रम, चंदाराजा, चंद्रकोर, चांदोबा, चांदोमामा अशी लडिवाळ नावे गाण्यांमध्ये आढळतात. यातून अशी चंद्राच्या नावांची कोणकोणती गाणी आहेत हे आठवण्याचा खेळ सुरू होतो. गाण्यांच्या भेंडय़ा नसल्या तरी ही गाणी आठवायची हा हट्ट सुरू होतो. या भावगीतांनी आपल्याला आयुष्यभर साथ दिलेली असते आणि आपणही तो हात कायम धरून ठेवलेला असतो. अर्थात याचे श्रेय गायक-गायिका, गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक, ध्वनिमुद्रिका कंपन्या, आकाशवाणी, दूरदर्शन अशा सर्वाना जाते. यशस्वी चंद्रगीतांमध्ये मनाच्या स्वरलिपीत कोरले गेलेले गाणे म्हणजे- ‘तोच चंद्रमा नभात..’ हा नभीचा चंद्र भूवरीचा आणि प्रत्येकाच्या मनातला केव्हा झाला, हे कळलेच नाही. मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात ‘वन्स मोअर’ संकल्पनेत ‘तोच चंद्रमा नभात..’ हे गीत कायम वरच्या क्रमांकावर राहील. हे गाणे ऐकणाऱ्याला आनंदाने वेड लावते अन् गाणाऱ्यालाही ओढ लावते. कवयित्री शान्ता शेळके आणि गायक-संगीतकार सुधीर फडके यांच्या रचनेतील हे अवीट गोडीचे गीत!
शीलाभट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून शान्ता शेळके यांनी हे गीत लिहिले. शान्ताबाईंनीदेखील हा उल्लेख केला आहे. मूळ श्लोकातील स्त्रीभावना त्यांनी प्रियकराच्या भावनेत रूपांतरित केली आहे. ध्वनिमुद्रिकेच्या कपलिंग गीताची मागणी पूर्ण करण्यासाठी हे गीत जन्माला आले. ज्या मूळ संस्कृत श्लोकावरून हे गीत लिहिले तो श्लोक असा आहे :
‘य: कौमारहर: स एव हि वर:
ता एत चैत्रक्षप:।
ने चोन्मीलितमालतीसुरभय:
प्रौढा: कदम्बानिला:।।
सा चैवास्मि तथापि तस्य
सुरतव्यापारलीलाविधौ।
रेवारोधसि वेतसि तरूतले
चेत: समुत्कंठते।।’
..ज्याने माझे कौमारहर: केले तो माझा प्रियकर आहे. तोच माझा पती आहे. चैत्रातील आल्हाददायक रात्र आहे. कदंबावरून वाहणारे वारे आणि फुललेल्या जाईचा गंध वातावरणात भर टाकतो आहे. मन आणि भावना गुंतलेल्या आहेत. मात्र त्यावेळच्या प्रेमाची आठवण जास्त दु:खी करते आहे. मी तीच आहे, मी तेव्हाचीच आहे, पण ही हुरहूर प्रेम हरवल्याचं सांगते. एकमेकांचे नाते आता ‘ते’ राहिले नाही, हा मनीचा विषाद आहे. या मन:स्थितीला इतर कोणीही जबाबदार नाही. एका विशिष्ट पातळीवर ही भावना अलगद नेऊन सोडली आहे. हा नेमका भाव प्रियकराच्या भावनेसाठी व तीन अंतऱ्याच्या गीतासाठी पुरेसा ठरला आहे.
‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!
नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!
सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे?
मीहि तोच तीच तूही प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतूनी
एकान्ती मजसमीप तीच तूहि कामिनी!’
या गाण्यात स्वरसौंदर्याने भारलेले बाबूजींचे गायन आहे. संगीत देताना अंतऱ्यामध्ये भावानुकूल स्वर देणे ही तर त्यांची हातोटीच. हे संपूर्ण गायन कान देऊन ऐकल्यावर गंधर्व गायनशैलीचं अनुसरण त्यात दिसतं. त्यांनी गायनात व संगीतरचनेत आदर्श घालून दिलाय.
अॅडलिब पद्धतीने गायन सुरू होते, त्याच क्षणी आपण गीताच्या भावनेत.. वर्णन केलेल्या वातावरणात शिरतो. याचं कारण गायनापूर्वी त्यावर सखोल विचार झालेला असतो. या गाण्यातील ‘चैत्र’ हा उच्चार तर सर्व गायकांनी अभ्यास करावा असाच आहे. पूर्ण गायनात ‘जसा शब्दाचा अर्थ, तसा त्या शब्दाचा उच्चार’ हे सूत्र कायम दिसते. तोच आहे, तीच आहे, तशीच आहे, असे खंत व खेद या भावनेतील शब्द या गाण्यात बरेच आहेत. पण हा ‘तोच’ असलेला भोवताल शान्ताबाईंच्या उत्कृष्ट शब्दांनी भरला आहे. ‘माझ्या जवळी’, ‘माझ्या आसपास’ असे न म्हणता ‘मजसमीप’ ही शब्दयोजना चित्तवेधक आहे. अगदी शेवटच्या अंतऱ्यात ‘गीत ये न ते जुळून’ ही भावना थेट उघड केली आहे. तेव्हा क्षणभर असे वाटते, की कलाकाराने स्व-प्रतिभेला उद्देशून तर हे लिहिले नसेल? हे सर्व मनात येते, कारण हे एक परिपूर्ण गीत आहे. ‘यमन-कल्याण’ या रागातील स्वरांचा नेमका उपयोग बाबूजींनी यात केला आहे. हाती हार्मोनियम घ्या आणि दोन्ही मध्यम कोठे कोठे कोणत्या भावनेसाठी दिसतात, ते आवर्जून पाहा. या गाण्याचा असा अभ्यास करताना विलक्षण आनंद मिळतो. श्रोत्यांना हे पूर्ण गाणे त्यातील म्युझिकसह पाठ असते. प्रत्येक गायक संधी मिळेल तिथे हे गीत सादर करत असतो. मात्र, आत्ता कुठे हे गाणं आपल्याला समजलंय, हा बोध जरा उशिरा होतो. साडेतीन-चार मिनिटांचे भावगीत गाताना इतक्या गोष्टी सांभाळायच्या हे एक आव्हान असते. याचे कारण म्हणजे गाण्याची चाल बांधताना बाबूजींचा त्यामागचा विचार. गाणे म्युझिकसह बारकाईने ऐकले तर संपूर्ण गायनामागे व म्युझिकमध्ये दादरा पॅटर्नचे गिटारचे कॉर्ड्स वाजलेले ऐकू येतात. ‘गिटार स्ट्रमिंग’ असे ते वादन आहे. गाण्याची लय हादेखील महत्त्वाचा भाग आहे. त्याच लयीमध्ये हे गीत सादर होणे आवश्यक आहे.
शान्ताबाईंनी कवितेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक आतून बाहेर जाणारी आणि दुसरी बाहेरून आत येणारी. त्या सांगतात : कवितेत व्यक्तिगत अनुभूती केंद्रस्थानी असते. गीताची प्रेरणा भिन्न, मागणी वेगळी व शब्दयोजनाही वेगळी असते. सहजता, सोपेपणा, चित्रमयता ही गीताची खास वैशिष्टय़े असतात. प्रतिभा म्हणजे सुचणे. त्यासाठी वाचन, व्यासंग, चौफेर काव्य पाहणे, भाषा अवगत असणे आणि स्मरणशक्ती तीव्र असणे आवश्यक आहे.
१९४७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘वर्षां’ या काव्यसंग्रहाद्वारे शान्ताबाई रसिकांना कवयित्री म्हणून परिचित झाल्या. एम. ए. (मराठी)पर्यंत शिक्षण झालेल्या, ‘नवयुग’ साप्ताहिकातील कामाचा व पदाचा घेतलेला अनुभव व प्राध्यापिकेचा पेशा यामुळे शान्ताबाई सतत कविता व गीतांमध्येच रमल्या. आकाशवाणीवरून त्यांची गीते सादर झालीच; शिवाय पुढे नाटक व चित्रपट या माध्यमांतूनही त्यांनी लिहिलेली गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. १९७३ साली त्यांच्या गीतांचा संग्रह प्रकाशित झाला. त्या संग्रहाला शान्ताबाईंनी ‘तोच चंद्रमा..’ हेच नाव दिले. ‘तोच चंद्रमा..’ हे त्यांचे विशेष आवडीचे गीत होते.
शान्ताबाईंचे लहानपण पुण्याजवळ मंचर येथील शेळकेवाडय़ात गेले. त्यांचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. नोकरीनिमित्ताने त्यांच्या सतत बदल्या होत असत. या बदल्यांमुळे पुढे चिखलदरा, नांदगांव, खर्डी येथे शेळके कुटुंबाचे वास्तव्य झाले. लहानपणीच सहज पुस्तके वाचायला मिळाल्यामुळे शान्ताबाईंना लहान वयातच वाचनाची गोडी लागली. पुणे जिल्ह्य़ातील खेड हे शान्ताबाईंचे आजोळ. खेड म्हणजे आताचे राजगुरूनगर. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना पुण्यात इंग्रजी शाळेसाठी यावे लागले. सेवासदन व हुजुरपागेतील शिक्षणाच्या शान्ताबाई खूप आठवणी सांगत. शाळेत बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तके ही पर्वणी असे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकताना वाचलेले ‘मेघदूता’तील श्लोक, बी. ए.ला असताना वाचलेले ‘हॅम्लेट’, ‘उत्तररामचरित’ आणि मम्मटाचे ‘काव्यप्रकाश’ यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपली काव्यविषयक जाण वाढणे, चांगली कविता वाचणे व अभिरुची घडणे याचे श्रेय त्या प्रा. रा. श्री. जोग यांना देतात. कविता कशी असावी, हे रविकिरण मंडळातल्या कवींच्या कवितेतून आपल्याला समजल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील काळात बरीच गाणी शान्ताबाईंकडून लिहिली गेली, याचे श्रेय त्या त्यांच्यावर विश्वास ठेवून गाणी लिहून घेणाऱ्यांनाच देतात.
गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक बांधिलकीही जपली. कट्टर हिंदुत्वनिष्ठ, सावरकरांचे परमभक्त, दादरा-नगर हवेली संग्रामात सक्रिय भाग घेणारा सच्चा देशसेवक ही धारणा त्यांनी आयुष्यभर जपली, जोपासली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ‘सावरकर’ हा चित्रपट त्यांनी पूर्ण केला. असा व्रतस्थ स्वरयात्री होणे नाही. त्यांच्या वृत्तीत नेता आणि स्वयंसेवक यांचे मिश्रण असे. जिद्द व महत्त्वाकांक्षा हे ठोस गुण त्यांच्यात होते. संगीत क्षेत्रात ते युगनिर्माता ठरले.
‘तोच चंद्रमा नभात..’ या अजर, अमर, अविनाशी गीतामुळे बाबूजींचे स्मरण घडले. २५ जुलै हा त्यांचा जन्मदिन, तर २९ जुलै हा स्मृतिदिन. या गाण्यामुळे शान्ताबाई व बाबूजी यांच्या आठवणी मनात दाटून आल्या.
नील आर्मस्ट्राँगने जरी चंद्रावर पाऊल ठेवून ‘तो’ प्रत्यक्षात कसा आहे हे स्वानुभवाने सांगितले असले तरीही आपल्याकडील अनेक गोड भावगीतांमधून आपल्याला भेटणारा नभातला चंद्रमा आपल्या मनात तोच व तसाच कायम राहणार आहे.
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com