सुरेश भट यांनी लिहिलेली गझल वाचली किंवा ऐकली नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. भावगीतांमध्ये सुरेश भटांच्या गझला हे स्वतंत्र विश्व आहे. त्यांनी लिहिलेल्या असंख्य गीतांपैकी शब्द, संगीत आणि गायन यामुळे एक गीत अनोखे ठरले आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांची लक्षवेधी संगीतरचना आणि लता मंगेशकर यांचा स्वर यामुळे भटांची ही गझल श्रोत्यांशी बोलू लागते. हे गाणे ऐकल्यावर सुरेश भटांच्या आणखीन गझला त्यांच्या पुस्तकांतून वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. लखलखत्या विजेसारखे त्यांचे कमालीचे शब्दसामर्थ्य हे त्यांच्या गझला वाचायला भाग पाडते. या गीतातील शब्द, भावना, संगीत हे वरचा ‘सा’ या स्तराचा आनंद देते. हे गीत आहे-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!
त्या तिथे फुलाफुलांत
पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस एवढय़ात स्वप्नभंग!
गार गार या हवेत
घेऊनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग!
दूर दूर तारकांत
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग!
हे तुला कसे कळेल
कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग!
काय हा तुझाच श्वास
दरवळे इथे सुवास
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग!’
पाच अंतऱ्यांचे हे गीत तानपुरा साथीतल्या आलापाने सुरू होते. तो आलाप षड्जावर स्थिर होतो. गाण्यासह दादरा ताल सुरू होतो. गाण्यातले कोणते अक्षर कोणत्या मात्रेवर येते, हा अभ्यासाचा भाग मनात सुरू होतो. आणि या अभ्यासात विलक्षण आनंद मिळतो! ‘मालवून’ हा शब्द उच्चारताना ती अक्षरे सरधोपटपणे न उच्चारता गोलाईयुक्त आणि बंदिशीतला शब्द उच्चारल्यासारखी आहेत. तिथेच गाण्यातील भावना मनभर पसरायला सुरुवात होते. ‘चेतवून’ या शब्दातील ‘वू’ या अक्षरावरील स्वरसमूह हा भावना ठळक करतो. ‘राजसा’ या शब्दातील आर्जव आणि अपेक्षा लगेचच त्यापुढील शब्दात व्यक्त होते. ‘पेंगते अजून रात..’ या शब्दांमधील ‘पेंगते’ या शब्दासाठी योजलेली शास्त्रीय संगीतातील जागा दाद देण्यासारखी आहे. दुसऱ्या अंतऱ्याआधीचे संगीत संपताना वाद्याचा स्वर खर्जाकडे येतो आणि अचानक गायिकेचा स्वर वरच्या सप्तकाकडे जाऊन अंतरा सुरू करतो. चकित करणारी ही स्वरयोजना म्हणजे संगीतकाराची अफाट प्रतिभा आहे. ‘गार गार’ या शब्दांच्या उच्चारणातील ‘खटका’ आणि ‘घेऊनी’ या शब्दातील स्वर हे भावनेचे अत्युच्च स्तर आहेत. ‘दूर दूर तारकांत..’ हा अंतरा आपल्याला आभाळाच्या उंचीवर आणि दूरवर घेऊन जातो. अंतऱ्यामध्ये वाजलेले वाद्य- विचित्रवीणा- हे गाण्यातील भावना चक्क बोलते आहे असे सतत वाटते. वाद्य वाजताना त्याआधीच्या शब्दांमध्ये दडलेल्या हालचाली दृश्यरूप घेतात. ‘बोल रे हळू..’ या शब्दांमध्ये गायिका लता मंगेशकर यांनी ‘हळू’ हा उच्चार वारंवार ऐकावा असा केला आहे. भावनेने भरलेला आवाज चित्तवेधक होतो. ‘अंग, संग, स्वप्नभंग, अंतरंग, रूपरंग, पतंग, तरंग’ या शब्दांतील अनुस्वार हे स्पष्ट आणि नादमयी ऐकू येतात. संपूर्ण गझलभर पसरलेली उत्कट शृंगाराची भावना ही एका उच्चतम स्तरावरील भावनेची पूर्णपणे सरळ अशी क्षितीजरेषा आहे. त्यात बीभत्सता कुठेही डोकावलेली नाही. त्यासाठी गायिका, संगीतकार, गझलकार या तिघांना सलाम करावाच लागेल.
गायिका आणि संगीत अभ्यासक शैला दातार यांनी एक आठवण सांगितली.. ‘पं. हृदयनाथ मंगेशकरांनी अनेक गवयांच्या मैफली ऐकलेल्या होत्या. ते स्वत: एकदा पं. दिलीपचंद्र वेदी यांच्या मैफलीत तानपुरा साथीला होते. पं. वेदीजी हे पं. भास्करबुवांचे शिष्य. त्या मैफलीत वेदीजी भूपश्री राग गात होते. त्या रागाचा प्रभाव हृदयनाथ मंगेशकरांच्या मनावर होताच. त्यातला आवडलेला स्वरसमूह घेऊन त्यांनी सुरेश भटांचे ‘मालवून टाक दीप’ हे गीत स्वरबद्ध केले.’
अमरावतीत जन्मलेले कवी सुरेश भट हे तिथल्या न्यू हायस्कूलचे विद्यार्थी. पुढे तळेगाव-दाभाडे येथील समर्थ विद्यालयात आणि त्यानंतर पुन्हा अमरावतीमध्ये मणिभाई गुजराथी हायस्कूलमध्ये ते शिकले. १९४४ साली भटांनी ‘वर्गशिक्षकांची आरती’ ही पहिली कविता लिहिली. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले. त्यावेळी के. ज. पुरोहित, भवानीशंकर पंडित, डॉ. रा. भा. पाटणकर ही प्राध्यापक मंडळी तिथे होती. प्रा. राम शेवाळकर हे भटांचे महाविद्यालयातील मित्र. १९५५ मध्ये भट बी. ए. झाले. १९६१ साली त्यांचा ‘रूपगंधा’ हा काव्यसंग्रह पुस्तकरूपात आला. एच. एम. व्ही. कंपनीचे तत्कालीन अधिकारी आणि गायक-संगीतकार जी. एन. जोशी यांच्याकडे भटांच्या कविता आल्या. जोशींनी त्या कविता संगीतकार दशरथ पुजारींकडे दिल्या. पुजारींनी स्वरबद्ध केलेले ‘चल ऊठ रे मुकुंदा..’ हे भटांचे पहिले ध्वनिमुद्रित गीत. १९७४ साली त्यांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. बऱ्याच कार्यक्रमांतून भट स्वत: कविता गाऊन- म्हणजे ‘तरन्नुम’ पद्धतीमध्ये पेश करायचे. ते सादरीकरण अत्यंत प्रभावी असायचे.
सुरेश भट यांचे शिष्योत्तम व गझलकार प्रदीप निफाडकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत भट सांगतात : ‘कविता हा संवाद असतो. कवी स्वत:च्या संवेदना रसिकांपर्यंत पोहोचवतो. त्यात कविता वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला बरोबरीने भागीदार करून घ्यायचे असते. मी फक्त गझलचे तंत्र घेतले आहे, मंत्र मराठीचा आहे. उर्दू गझलांच्या वाचनामुळे, श्रवणामुळे गझलचे शरीरशास्त्र मला समजले. पण मी मराठी खानदान कायम राखले. कारण मी ज्ञानेश्वर आणि तुकारामही वाचले. कविता ही एक सलग ‘थीम’ असते. गझलमध्ये प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो. गझलचे गमक हेच आहे, की प्रत्येक सुटा शेर एक स्वतंत्र कविता असते.’
‘माझ्या कवितेचा प्रवास’ या लेखात भट सांगतात, ‘वयाचा आणि कवितेच्या मोठेपणाचा काहीच संबंध नसतो. जसा लिहिणारा माणूस- तशी त्याची कविता. केवळ नक्षीदार, सुबक आणि गोंडस शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते. आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते तो कवी आपोआप महान बनतो.’
‘मी तुला सूर कसा मागू?’ या गद्य प्रश्नातील क्रियापद आणि सर्वनामाच्या जागा भटांनी बदलल्या आणि एक उत्कृष्ट भावगीत निर्माण झाले- ‘सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा, मी असा..’
पु. ल. देशपांडे भटांच्या गीताविषयी म्हणतात : ‘भटांच्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले, असे नव्हते.’
मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या मार्चिग साँगनिमित्ताने संगीतकार सुधीर फडके आणि सुरेश भट एकत्र आले. ते गीत होते-
‘मर्द मराठी आम्ही खरे!
दुष्मनाला भरे कापरे,
देश रक्षावया, धर्म तारावया,
कोण झुंजीत मागे सरे?’
गेली २७ वर्षे शायरी आणि जवळपास चारशे उर्दू गझला लिहिणारे आणि डॉ. बशीर बद्र यांना आदर्श मानणारे डोंबिवलीकर संदीप गुप्ते हे सुरेश भटांविषयी भरभरून बोलतात. ते सांगतात, ‘सुरेश भट हे तंत्रशुद्ध मराठी गझलचे जनक आहेत. उर्दू गझलचे तंत्र, शास्त्र त्यांनी मराठी गझलमध्ये प्रभावीपणे आणले. रुमानी शायरी किंवा सूफी शायरी हे उर्दू शायरीचे विशेष आहेत. पण मराठी गझल ही सामाजिक आशयाने भरलेली असते याचे श्रेय सुरेश भटांकडे जाते. त्यांची गझल फक्त वाचून चालत नाही; त्यांची शैली, लहेजा या आत्मसात करायच्या गोष्टी आहेत. गझलचा आकृतिबंध सांभाळता येतो; पण प्रभावी अभिव्यक्ती हा त्याचा विशेष असावा. ही गोष्ट भटांच्या गझलेत दिसते. तो भटांचा ‘अंदाजे बयाँ’ हा दाद देण्यासारखा आहे.’
गायिका लता मंगेशकरांनी लिहिले आहे- ‘‘मालवून टाक दीप..’ हे सुरेश भटांचे गीत काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. ‘बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग..’ ही गीतामधील नाजूक आणि रम्य कल्पना गीत गाऊन झाल्यानंतरही दीर्घकाळ मनात तरळत राहिली. त्यांच्या कवितेत भावनेचा जिवंत जिव्हाळा आहे आणि त्याचे मोल फार मोठे आहे.’
डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनासाठी प्रभाकर पणशीकरांनी सुरेश भटांना काव्य लिहिण्याची विनंती केली. ती गझल अलीकडे संगीतकार उदय चितळे यांनी स्वरबद्ध केली आहे. एका अल्बमसाठी ती गझल गायची संधी मला मिळाली. त्याचे शब्द आहेत-
‘जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही..’
‘मालवून टाक दीप..’ या गीताने भावगीतांचा खजिना श्रीमंत केला आहे. अर्थात् त्याचे श्रेय गीतकार, संगीतकार, गायिका या तिघांना आहे.
सुरेश भटांनी लिहिले आहे-
‘‘मी बोललो जरा अन् जो तो मला म्हणाला
‘माझीच ही कहाणी! माझीच ही कहाणी’!’’
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com