आकाशवाणीवर श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम लागला की, आता कोणतं गीत ऐकायला मिळणार, ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण होई. आकाशवाणी निवेदकाचा स्पष्ट आणि सुरेल आवाज कानावर पडला, की गाणे ऐकायला मन आतुर होई. आपल्या आवडीचे गाणे ऐकायला मिळाले की मनाचे आकाश म्हणजे चांदण्यांचा बहर जणू! अशी मनाची स्थिती एका गाण्यामुळे अनेकदा झाली. रेडिओ लावल्यावर लगेचच निवेदकाने सांगितले : गीत- राजा बढे, संगीत- पु. ल. देशपांडे, गायिका- माणिक वर्मा. आणि गीताचे शब्द आहेत- ‘हसले मनी चांदणे..’
हे ऐकताक्षणी मनभर चांदणे पसरले. मनभर.. आणि तेही मणभर! मनाच्या आकाशातले मळभ दूर सारणारे हे चांदणे. भावगीतातील शब्द आणि स्वरामुळे लखलखणारे हे चांदणे आहे. उत्कट भावदर्शन हे भावगीताचे शक्तिस्थान. भावगीत प्रवासातील हे गीत म्हणजे एक ठळक स्थानक होय. नशीब घेऊन जन्माला आलेलं हे गाणं आहे. मूळ गीत..
‘हसले मनी चांदणे
जपून टाक पाऊल साजणी नादतील पैंजणे।
बोचतील गं फुलं जाईची तुझी कोमला काय
चांदण्यांतही सौंदर्या रे पोळतील ना पाय।
पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे
सांग कुणाच्या भेटीसाठी, जीव सारखा उडे?।
कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको गं रुसू
लाजलाजऱ्या कळ्या-फुलांना खुदकन् आलं हसू
भिरभिरताना नयन पाखरें ये पंखांचा वारा
मृदू आघाते पहा छेडिल्या हृद्वीणेच्या तारा।
हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी
उमटु द्या वाणी
का आढेवेढे उगाच, सांगा काय लाभले राणी?
का गं अशा पाठीस लागता मिळूनी साऱ्याजणी?
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी।
किती किती गं भाग्याची
भलतीच ओढ ही कामसुंदराची
नव्हे गं श्यामसुंदराची।’
संगीतकार पु. ल. देशपांडे यांनी या भावगीतासाठी चंद्रकंस हा राग निवडला. मालकंस रागातील कोमल निषादाची जागा शुद्ध निषादाने घेतली. गाण्यामधील भावदर्शन अधिक प्रसन्न झाले. शुद्ध निषादाने भावनेतील उत्कटता ठळक केली. पंचम व रिषभ या स्वरांना स्थान नसताना चंद्रकंस रागातील ही स्वररचना लक्षवेधी ठरली. श्यामसुंदराच्या रूपात प्रियकर दिसण्याचा, भेटण्याचा आनंद सगळ्या शब्दांतून पसरला आहे. स्वरांमुळे तो आनंद आणखीनच बहरला आहे. माणिक वर्मा यांच्या गायनामुळे त्यातील सोज्वळता थेट जाणवते आणि हृदयाला भिडते. आरंभी वरच्या सप्तकाकडे झेप घेणारे हे गाणे (गाणे नव्हे चांदणे..) मनाची पकड घेते. मनाची आनंदी स्थिती कायम राहावी म्हणून कविराज सांगतात- ‘जपून टाक पाऊल साजणी.. बोचतील गं फुलं जाईची..’ किंवा ‘पोळतील ना पाय..’ तिथे मन स्वत:लाच विचारतंय, ‘सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे?’ अर्थात याचे उत्तर माहीत असतेच. पुढच्या अंतऱ्यामध्ये ‘का गं अशा पाठीस लागता मिळूनी साऱ्याजणी? ..आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी.. किती किती गं भाग्याची..’
हे सारे वाचताना माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा चाहता म्हणून मनात एक उत्सुकता निर्माण झाली, की या गीताच्या ध्वनिमुद्रणाचा काळ आणि माणिक वर्मा यांचा अमर वर्माशी झालेला विवाह (१९४७) हा काळ एकच होता का? आनंद आणि लज्जायुक्त संकोच या भावनेचे हे गीत गाण्यासाठी गायिकेची निवड अत्यंत उचित ठरली आहे. आयुष्यभर पसरलेली निरागसता हे त्यांच्या स्वरांचं वेगळेपण होय. म्हणूनच श्रोत्यांनी त्यांचं प्रत्येक गीत आपलंसं केलं. या गीतामध्ये ‘पानांच्या जाळीत’ या ओळीनंतरचा आलाप, ‘सांग कुणाच्या भेटीसाठी..?’ हा प्रश्न विचारणे आणि ‘किती गं भाग्याची’ हे आग्रहाने पाच ते सहा वेळा म्हणणे.. हे सारे ऐकणाऱ्याचे कान व मन तृप्त करणारे आहे. आणि त्यासाठी कविवर्य राजा बढे यांचे हे वीणाकाव्य.. अर्थात् नादमयी कविता. या काव्यात ध्वनिमुद्रणाच्या वेळेच्या मर्यादेत न बसलेला असा अंतरा आहे. त्यात ‘कुजबुजुनी कानात सांगतो मधुप..’ या ओळीतला मधुप म्हणजे भ्रमर होय. तो नेहमी गुणगुणतो, रुणझुणतो. या काव्यात तो भ्रमर तिला कानांत सांगतो- ‘नको गं रुसू..’ म्हणजे काही काळजी करू नकोस. हे ऐकताच कळ्या व फुलेही सजीव होऊन हसू लागली. नयनपाखरे, हृद्वीणेच्या तारा या प्रतिमा आकर्षक आहेत. या भावगीतातील तीनही घटकांनी या निर्मितीत आपला जीव ओतला आहे. गायिका, गीतकार, संगीतकार या तिघांची कामगिरी हेच सांगते.
राजा बढे नागपुरात असताना ज. के. उपाध्ये आणि श्री. रा. बोबडे हे दोन कवी त्यांना भेटले. राजाभाऊंवरील संस्काराचा भाग या भेटीत आहे. आनंदराव कृष्णाजी टेकाडे हे कवीसुद्धा नागपूरचेच. राजाभाऊंना गेय काव्याची प्रेरणा या मंडळींकडून मिळाली. त्यांच्या ‘त्या चित्तचोरटय़ाला का आपुले म्हणू मी’ या गीतात बोलका भावाशय व भावनांचा खेळ दिसतो. काही गीतांमध्ये राजाभाऊ दोन ओळींचे धृपद व सहा ओळींचा अंतरा लिहितात. ‘अजून तेच सूर घुमति..’ हे ते गीत. तसेच एका ओळीचे धृपद व चार ओळींचा अंतरा असाही घाट राजाभाऊंच्या गीतात दिसतो. ‘सुकले माझे फूल, कुणी ते खुडिले माझे फूल..’ हे ते गीत. बऱ्याच वेळा जास्त कडव्यांची गीते दिसतात. शब्दांची संख्या, अंतऱ्यांची संख्या हा विषय नसतोच. मूळ कल्पना धृपदात व पुढे कडव्यांमध्ये त्या कल्पनेचा विस्तार आढळतो. कवी गंगाधर महांबरे यांनी राजाभाऊंच्या गीतांतील ओळी-ओळीमध्ये हासू कसं फुटलंय ते छान टिपलंय. ‘रडायचे हासताना, हासताना ओठांतुनी, अगं हसू नको, दोघेही पाहुनिया हसली, ओठांमधुनी हळूच हासण्याची, हसून बोलशील का, रुसुनी हसणे हसुनी रडणे, लबाड हासतो गं, हासे चंद्रिका, हसुनि बोलले, रविकर धरूनी हासे खेळे, तिला पुसती हासून, हसतेस अशी का मनी..’ या राजाभाऊंच्या गीतांतील काही ओळी आहेत. ‘हसले मनी चांदणे’ हा रसिकप्रियतेचा कळस आहे. त्यातली ‘हसणारे चांदणे’ ही कल्पना अंतर्मन उजळणारी आहे.
त्यांच्या गीताच्या स्वररचनेमध्ये बालगंधर्वाच्या गायकीचा प्रभाव दिसतो. समेवर येण्याची पद्धत, स्वरांच्या लडी, ताना, बोलताना, तालातील मात्रेवर शब्द थांबणे, संपूर्ण गायनात रागाच्या छटा सांभाळणे, आरोही किंवा अवरोही पद्धतीने शब्दावर येणे.. हे सारे या गीतातील आनंद देणारे आहे. ‘तुझी कोमला काय’ या शब्दातील ‘काया’चे ‘काय’मध्ये केलेले रूपांतर व त्या जागेवर संगीतकाराने केलेली ‘हरकत’ दाद देण्याजोगी आहे. ‘गुणगुणता येते ती चाल’ या तत्त्वाचे पु. ल. हे संगीतकार होते. त्यांच्या दृष्टीने ेी’८ि महत्त्वाची. धून महत्त्वाची. परंपरा जपणारी चाल त्यांना सुचत असे. त्यातला प्रवाहीपणा टिकवणे ही पु. ल. संगीतातली खास गोष्ट आहे. विश्लेषण करावे, पण सर्जनाशी फारकत करू नये, हा त्यांचा विचार होता. ते उत्तम हार्मोनियम वाजवायचे. त्यांची बोटे पेटीवर कधी पडतायत अशी उत्सुकता ऐकणाऱ्यांमध्ये असे. त्यांनी शेकडो मैफली ऐकल्या. शेकडो मैफलींत हार्मोनियम साथ केली. आणि शेकडो मैफलींमधली पु. लं.ची दाद हा अपरिमित आनंदाचा विषय असे. पु. ल. बालगंधर्वाचे भक्त होते. त्यांच्या प्रत्येक चालीमध्ये त्यांचे प्रतिबिंब दिसते. जबरदस्त निरीक्षणशक्ती ही त्यांची खासियत. पु. ल. देशपांडे ‘मैत्र’मध्ये लिहितात, ‘अभिजात संगीतामध्ये गायिका म्हणून आदर आणि ललितसंगीताने मोहून टाकणारी कलावती म्हणून उदंड प्रेम माणिक वर्मा या गायिकेला मिळाले. गाण्याच्या क्षेत्रात गानदेवता असतात, पण माणिक महाराष्ट्राची गानदुहिता आहे.’
पु. लं.नी दिलेली चाल आणि माणिक वर्माचे गायन हा दुग्धशर्करा योग या गाण्याच्या निमित्ताने जुळून आला आहे. त्यातून जुळून आलेले शब्द, स्वररचना व गायन हा योग पिढय़ानुपिढय़ांना बांधणारा ठरला आहे. आज स्पर्धेकरिता गाणाऱ्या गायिकासुद्धा गाणे निवडताना ‘हसले मनी चांदणे’ हे गाणे अनेकदा निवडतात. हे गाणे विस्तार करून गाता येते असे आहे. ‘वन्स मोअर’ हा तर या गीताला कायमस्वरूपी प्रदान केलेला सन्मान आहे.
येत्या १६ मे रोजी माणिक वर्मा यांनी वयाच्या नव्वदीत प्रवेश केला असता. म्हणूनच भावगीताच्या नव्वदीच्या निमित्ताने त्यांचे हे स्मरण व्हायलाच हवे. म्हणूनच मी रेकॉर्डवर पिन ठेवली. रेकॉर्ड प्लेअरची यांत्रिक खरखर गेली आणि एक निखळ, नितळ, निकोप स्वर कानावर पडला.. ‘हसले मनी चांदणे..’ माझे डोळे आपोआप मिटले.. आणि समोर सोज्वळ माणिकताई दिसू लागल्या!
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com