कोणत्याही क्षेत्रात अशीही काही माणसे असतात- जी यशाची, प्रसिद्धीची पर्वा न करता आपले काम वर्षांनुवर्षे करतात. ते काम करण्यामागे कोणतीही ईष्र्या नसते. आपल्यापुढे आलेले काम करायचे अशा प्रकारच्या प्रवासात ते रमतात. आपण अमुक एक काम केले त्याचे पुढे काय झाले, या विचारात ते अडकत नाहीत. उद्या येणाऱ्या नव्या कामाची तयारी त्यांच्या मनात सुरू असते. संगीत क्षेत्रातसुद्धा असे कलाकार भेटतात. असे गुरू-शिष्य भेटतात. आपल्या निर्मितीवर, कलाकृतीवर आपल्या गुरूची छाप दिसते, या अभिप्रायाने त्या कलाकाराचा आनंद शतगुणित होतो. त्यात अभिमानाची भावना दडलेली असते. मराठी भावगीतांच्या प्रांतामध्ये अशी मनोभूमिका असलेले एक संगीतकार आहेत, ते म्हणजे संगीतकार बाळ चावरे. आज वयाच्या ८८ व्या वर्षी स्वत: संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आणि त्यांचे या क्षेत्रातले मित्र व गुरू संगीतकार वसंत प्रभू यांच्यावर ते भरभरून बोलतात. संगीतकार बाळ चावरे यांनी ध्वनिमुद्रिकांसाठी मोजकी भावगीते केली. त्यातले सर्वात लोकप्रिय गीत म्हणजे- ‘पत्र तुझे ते येता अवचित..’ या गीताचे गीतकार- रमेश अणावकर आणि गायिका आहेत- कृष्णा कल्ले.

इतर संगीतकारांनीही रमेश अणावकर यांची गीते स्वरबद्ध केली आणि कृष्णा कल्ले यांनी अन्य संगीतकारांकडेसुद्धा गीते गायली. पण या दोघांचे व संगीतकार बाळ चावरे यांचे एकत्र योगदान असलेले हे गीत हमखास दाद घेणारे ठरले.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

बऱ्याच वेळा आपल्या मनातील योजना प्रत्यक्षात येतातच असे नाही. वेगळीच कलाटणी मिळते व त्यातून वेगळे व चांगलेही काही घडते. संगीत क्षेत्र याला अपवाद नाही. संगीतकार बाळ चावरे यांना आयुष्यात असंख्य स्थित्यंतरांना सामोरे जावे लागले. या धावपळीत त्यांची संगीतावरील निष्ठा मात्र कमी झाली नाही. आजही त्यांची खास अशी हार्मोनियम समोर ठेवली तर त्यावर अलगद बोटे फिरवून सुरावट तयार होईल. ती त्यांची आवडती हार्मोनियम आहे; कारण जवळचे मित्र व गुरू, संगीतकार वसंत प्रभूंनी त्या हार्मोनियमवर अनेक चाली बांधल्या आहेत. स्वत: बाळ चावरेंच्या संगीतरचनांना त्यांच्या गुरूने दिलखुलास दाद दिली. तसेच योग्य वेळी त्यांची शिफारसदेखील केली.

‘पत्र तुझे ते येता अवचित

लाली गाली खुलते नकळत।

साधे सोपे पत्र सुनेरी

न कळे क्षणभर ठेवू कुठे मी?

शब्दोशब्दी प्रीत लाजरी

लाज मनाला मी शरणांगत।

आजवरी जे बोलू न शकले

शब्दावाचून तू ओळखिले

गीत लाजरे ओठावरले

गुणगुणते मी नयनी गिरवीत।

वेळी अवेळी झोपेमधुनी

जागी होते मी बावरुनी

खुळय़ा मनीचा भाव जाणुनी

गूज मनीचे हृदयी लपवीत।’

या गाण्यातील शब्दांत नेऊन सोडणारा आरंभीचा छोटा म्युझिक पीस अतिशय मधुर आहे. पहिल्या व तिसऱ्या अंतऱ्यापूर्वीचे म्युझिक सारखे आहे. दुसऱ्या किंवा मधल्या अंतऱ्याची चाल वेगळी आहे. त्याआधीचा म्युझिक पीस वेगळा बांधला आहे. ‘लाली गाली खुलते..’ या ओळीतील ‘गाली’ हा शब्द मुद्दाम ऐकावा असा आहे. ‘गा’ व ‘ली’ या दोन अक्षरांमध्ये सांगीतिक जागा निर्माण करून ‘गाली’ म्हणजे गालावर हा अर्थ विस्तृत केला आहे. कारण ती लाली गालावर नकळत खुलली आहे. आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘अवचित तुझे आलेले पत्र’ हे आहे. त्या अवचित आलेल्या पत्रामुळे शब्द सुचले, सूर सुचले आणि हमखास गुणगुणता येईल असे गीत तयार झाले.

प्रत्यक्ष भेटीतल्या गप्पांमध्ये संगीतकार बाळ चावरे यांनी अनेक आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या. ‘पत्र तुझे..’ हे गीत साधारण १९६६ या वर्षांतील आहे. नवीन संगीतकाराने एखादी चाल बांधली की त्यावेळी संगीत अभ्यासक व संगीतकार केशवराव भोळे ते गीत ऐकायचे आणि त्यानंतर संगीतकाराला काम मिळत असे. त्यानंतर काही काळाने म्युझिक कंपोजरची ‘ऑडिशन’ घेण्याची पद्धत सुरू झाली. यात गाणे ऐकणारी कमिटी नवीन संगीतकाराला तीन गीते द्यायची. एक लोकगीत, दुसरे शास्त्रीय रागावर आधारित आणि तिसरे गीत हे भावगीत/ भक्तिगीत असे. संगीतकार बाळ चावरे यांनाही तीन गीते दिली गेली. योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेले एक गीत होते.. ‘चंद्र हासतो जटेत ज्यांच्या त्यांची मी दासी.. मन माझे रमले कैलासी..’ हे ते गीत. दुसरे गीत-  ‘बोलू कशी तुझ्याशी मी वेल लाजरी ती..’ असे होते, तर तिसरे गीत वसंत बापट यांनी लिहिलेले.. ‘चल चल माझ्या रे शेतकरी राजा रे..’ हे होते. ही गीते गाण्यासाठी मधुबाला चावला ही गायिका ऑडिशन कमिटीनेच नक्की केली. संगीतकार बाळ चावरे यांनी आव्हान स्वीकारले. गाणी ऐकल्यानंतर त्यावेळचे अधिकारी अजित र्मचट आणि संगीतकार यशवंत देव यांनी निर्णय जाहीर केला. ज्या काही दहा-बारा संगीतकारांनी ऑडिशन दिली त्यामधून एकाच नावाची निवड झाली. ते म्हणजे संगीतकार बाळ चावरे! त्यामुळे लगेच आकाशवाणीचे पहिले रेकॉर्डिग मिळाले. वसंत निनावेंचे ते गीत- ‘अंगणातली तुळस मंजिरी तुजविण कोठे जाते, सख्या मी दिवस-रात मोजते..’ गायिका प्रमिला दातार यांनी हे गीत गायले. पुढील काळात बाळ चावरे यांनी ‘भावसरगम’ या आकाशवाणीच्या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमात दोन गाणी केली. ‘आळविता सूर मनीचा का मनी मी लाजले..’ हे गीत डॉ. अपर्णा मयेकर यांनी, तर ‘मुक्त धुंद मी मीरा, त्रिभुवनी या भरले, मी माझी कवणाची, मुळी न आता उरले..’ हे गीत गायिका कृष्णा कल्ले यांनी गायले.

फॉरेन पोस्टात नोकरी करून बाळ चावरेंनी हा छंद जोपासला. त्यात ते यशस्वी झाले. त्यांची गाणी मोजकीच, पण लोकप्रिय झाली. एच. एम. व्ही. कंपनीच्या ऑफिसमध्ये त्यांची कामेरकरांशी भेट झाली. कामेरकरांनी त्यांना कवी रमेश अणावकर यांची दोन गीते दिली. त्यातील ‘नावापरी गं रूप तिकडचे, सासर माहेर गोकुळ हरीचे..’ हे पहिले गीत, तर ‘बघशील तू म्हणुनी तुज साद घातली मी, गेलास तू निघोनी जणू मी तुझी न कोणी..’ हे दुसरे. ही गाणी गायिका मधुबाला चावला यांनी गायली. पण कंपनीच्या टीमने रेकॉर्डिगसाठी ही गाणी मान्य केली नाहीत. त्यानंतर गायिका कृष्णा कल्ले यांनी दोन गाणी गायली. त्या गीतांची ध्वनिमुद्रिका निघाली. त्यातील पहिले गीत ‘पत्र तुझे येता अवचित..’ हे होते. यातील दुसरे गीतही गाजले. ते गीत म्हणजे-

‘कुणीतरी मजला जागे केले

जागेपणी मी मला विसरले।

कुठे तरी मी पाहिल्यापरी

मूर्त सावळी नजर हासरी।

ओळख नसता हसुनी विचारी

ओळखिले का सांग श्यामले।’

ही दोन्ही गीते सोलापूरचे ध्वनिमुद्रिका संग्राहक जयंत राळेरासकर यांनी उपलब्ध करून दिली.

संगीतकार वसंत प्रभूंनी या दोन्ही गीतांना मनापासून दाद दिली. ते म्हणाले : ‘या दोन्ही गाण्यांमध्ये तीन शिष्यांनी कमाल केली आहे. पी. सावळरामांना गुरुस्थानी मानणारे रमेश अणावकर, प्रभूंचे स्नेही व शिष्य बाळ चावरे आणि मारुती कीर यांचे शिष्य तबलावादक अमृत काटकर.’ या गीतांचे संगीत संयोजन अनिल मोहिले यांनी केले.

संगीत संयोजनातील समृद्ध अनुभव घेतलेले विलास जोगळेकर यांनी संगीतकार बाळ चावरे यांच्या सत्तर टक्के गीतांचे संगीत संयोजन केले. ते सांगतात : ‘बाळ चावरे यांच्या गीतांवर वसंत प्रभूंच्या संगीताची छाप असे. अर्थात प्रभू त्यांचे गुरू होते. म्हणूनच चावरेंच्या चाली मधुर असत. त्यांच्या भक्तिगीतांमध्ये सतार, बासरी या वाद्यांचा उपयोग केला आहे, तर भावगीतांमध्ये मेंडोलीन, सॅक्सोफोन या वाद्यांचा उपयोग केला आहे. पण चावरेंचे संपूर्ण संगीतकार्य रसिकांसमोर आले नाही याची खंत वाटते. बऱ्याच गीतांच्या वाद्यमेळात ‘अनिल मोहिले- व्हायोलिन, अमृत काटकर- तबला, केर्सी मिस्त्री- पियानो, मा. इब्राहिम- क्लॅरोनेट, केंकरे- बासरी’ असा वाद्यवृंद असायचा. काही गीते भूमानंद बोगम, शशांक कट्टी, श्यामराव कांबळे यांच्या संगीत संयोजनाने सजली.’

गीतकार रमेश अणावकर यांना पी. सावळाराम यांनी मनापासून दाद दिली. ‘येऊनी चोराच्या पाऊले, समजले नयन कुणी झाकले’ हे भावगीत वाचून पी. सावळाराम म्हणाले, ‘पोरा, तुझ्या लेखणीत वाहती गंगा आहे. गंगा वाहते गावागावांतून; पण अमृत देऊन जाते मनामनांतून. तू भावगीते लिहीत जा. माझा हात आहेच तुझ्या पाठीशी.’

संख्याशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आणि लेखिका वसुधा कुलकर्णी यांनी अगदी ध्यास घेतल्याप्रमाणे गायिका कृष्णा कल्ले यांची भेट घेतली. कृष्णाताईंची कला, गाणी, संगीतविश्वातील आठवणी सांगणारे ‘कृष्णसुधा’ हे चरित्र त्यांनी लिहिले. त्यांची भेट व लेखन यामुळे रसिकांपासून दूर गेलेल्या कृष्णा कल्ले रसिकांसमोर आल्या. हिंदी व मराठी मिळून ज्यांची जवळपास पाचशे गाणी ध्वनिमुद्रित आहेत अशा गायिका कृष्णा कल्ले एका भेटीत अशा व्यक्त झाल्या : ‘एक बात मुझे अच्छी तरह मालूम है, हमारी झोली में भगवान ने जितना दाना डाला है उसी में हमें खूश रहना है.. मेरी झोली तो भरी हुई है!!’

मराठी भावगीत-प्रवासात कृष्णा कल्ले या अमराठी गायिकेचे योगदान निश्चितच दाद देण्यासारखे आहे. यानिमित्ताने त्यांचे स्मरण होणे उचित आहे. गोविंद बापूराव चावरे अर्थात संगीतकार बाळ चावरे आजही भावगीतांच्या गप्पांमध्ये आनंद घेतात.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

Story img Loader