मराठी भावगीतांच्या दुनियेतील योगदानात शंभरहून अधिक कलाकारांची कामगिरी ठळकपणे दिसून येते. गीतलेखन, संगीत दिग्दर्शन आणि गायनाच्या माध्यमातून ही मंडळी श्रोत्यांना भेटत राहिली. ध्वनिमुद्रिका कंपन्यांची निर्मिती व वितरण, आकाशवाणीसारखे सशक्त माध्यम, गायन मैफली, संगीत संयोजनाचे योगदान, ध्वनिमुद्रणशास्त्र अशा अनेक गोष्टींमुळे भावगीत बहरले. प्रत्यक्ष गायनाच्या कार्यक्रमांतून वाद्यमेळ वाढला. अनेक तरुण मंडळी भावगीतगायनाचे कार्यक्रम करू लागली. स्वत: गायलेली नसली तरी मनात ठसलेली, रसिकप्रिय झालेली गाणी वाद्यवृंदांतून गाणे ही गोष्ट रूढ झाली. गायन कारकीर्दीसाठी हा मार्ग शिडी ठरू लागला. अशा कार्यक्रमांना लोकाश्रय मिळू लागला. भावगीतगायन म्हणजे शब्दप्रधान गायकी हे मनावर ठसले. अशा प्रकारच्या सुगम गायनासाठी फक्त मधुर आवाज असून चालत नाही, तर असे गायन हा वेगळा व पद्धतशीर अभ्यास आहे हे समजले. या विषयाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे झाले. या क्षेत्रातील पुरेसा अभ्यास व अनुभव असणाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे नीटपणे समजावून सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली. या क्षेत्रातील चौफेर निरीक्षण व सूक्ष्म दृष्टी म्हणजे काय, हे समजणे गरजेचे झाले. श्रोत्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या गायकांमध्ये कोणते गुण असतात? गाण्याची चाल आवडते त्याचे नेमके कारण काय? गाण्यामधील म्युझिक पीसेस पूरक वाटतात म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींच्या मागे शास्त्र आहे हे हळूहळू जाणवू  लागले. रेडिओवर किंवा रेकॉर्डवर गाणे ऐकले आणि कार्यक्रमात सादर केले, इतके हे सोपे नसते, तर त्यामागे विचार, चिंतन आणि व्याकरण आहे हे सिद्ध होऊ लागले. भावगीतांच्या प्रवासात हे शास्त्र अधिकारवाणीने सांगणारा व शिकवणारा असा एक बुद्धिमान गुरू भेटला- ज्याच्यामुळे शब्दप्रधान गायकीला शिस्त आहे हे कळले. असा गुरू भेटणे महत्त्वाचे असते. यातले ठळकपणे सांगता येईल असे नाव म्हणजे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली भावगीते हा एक अनमोल ठेवा आहे. गीतकार मंगेश पाडगांवकर, गायक सुधीर फडके आणि संगीतकार यशवंत देव या त्रयीचे वर्षांनुवर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले एक गीत म्हणजे.. ‘तुझे गीत गाण्यासाठी..’

‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे।

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा

रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा

या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे।

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी

झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी

सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे।

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे

तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे

चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे।

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना

आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना

पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’

कविवर्य मंगेश पाडगांवकरांचे हे गीत म्हणजे परब्रह्माची आळवणी नादब्रह्मातून करण्याची थेट व्यक्त केलेली इच्छा आहे. हा इच्छेचा सूर लावण्यासाठी निसर्गात भरून राहिलेल्या अनादि-अनंताने चित्तवेधक वाद्यमेळ उभा केला आहे. या चित्ररूपी आनंदाला कुठलीच बंदिस्त चौकट नाही. खुल्या मनाने हा आनंदाचा सूर लावण्यासाठी केलेली ही योजना आहे. परमेश्वरभेटीची आर्जवी शब्द-स्वरांतील ही याचना तिन्ही लोकांत भरून राहण्यासाठी आहे. यासाठी मी लावलेला ‘सा’ हा तुझे गीत गाण्यासाठी आहे. ईश्वरा, तुझ्या कवेतील आकाशाचा निळा रंग सागराच्या लाटांमध्ये उतरला आहे. त्या फेसाळ लाटा जणू शुभ्र तुरे लेऊन आल्या आहेत. रानफुले लेऊन सजणाऱ्या हिरव्या वाटा जणू मातीचे गायन गात आहेत. अशी रंगसंगती निर्मिलेल्या यात्रेत मला जाऊ दे. दारी केशराचे मोर झुलत आहेत. अखंड वाहत्या झऱ्याचा खळाळ हा सतार या वाद्यातून येणारा ‘दिडदा दिडदा’ असा नाद निर्माण करतो आहे. सौंदर्याने नटलेल्या या सोहळ्यात तूच व्यापून राहिला आहेस. उत्तररात्रीच्या मंद मंद ताऱ्यांत ब्रह्मानंदी अवस्थेतील शांतता आहे. तुझे प्रेम घेऊन येणारे वारे हे ‘गंधधुंद’ आहेत. त्यात भक्तिरसाचे अत्तर दरवळते आहे. प्रकाशमान नक्षत्रे म्हणजे अंत:करण उजळणारे दिवे आहेत. फुलांत रूपांतर होण्यासाठी कळ्या हलकेच हालचाल करीत आहेत. कळ्यांचे ‘जागणे’ हेच त्यांचे ‘जगणे’ आहे. कळीचे फूल होणे म्हणजे अवघ्या भक्तिमय विश्वाला जाग येणे. हा आनंदाचा प्रवास तू अवघ्या विश्वासाठी करतोस. म्हणून मला माझ्या स्वरांची पौर्णिमा तुला वाहू दे. माझ्या स्वरचंद्राचे पूर्णबिंब म्हणजे तिन्ही लोकांत भरून राहिलेला आनंद आहे. हा सुरांचा चंद्र ही तुझीच निर्मिती आहे. तुझी प्रार्थना करण्यासाठीचे ते गाणे आहे. म्हणूनच ‘सूर लावू दे’ हा माझा आनंदाचा हट्ट आहे.

संगीतकार यशवंत देव यांची ही रचना काव्याचा आशय व अर्थ उलगडणारी आहे. आरंभीचा अ‍ॅडलीब पद्धतीचा म्युझिक पीस पूर्णपणे सतारीवर वाजला आहे. हा पीस म्हणजे गाण्यातले अर्थवाही वाक्य वाटते. त्यातही प्रश्न, स्वल्पविराम, उद्गारचिन्हे दिसतात. मुखडय़ाचे शब्द उलगडणारा हा म्युझिक पीस आहे. फूल उमलावे तसे शब्द कंठातून बाहेर येतात. अंतऱ्यातील म्युझिक हे सतार व व्हायोलिन्सने सजले आहे. चौथ्या अंतऱ्याचा पीस त्या अंतऱ्याप्रमाणे वरच्या सप्तकाकडे जाणारा आहे. शब्दांना पूरक संगीत असा हा सुरेल योग आहे. गायक सुधीर फडके यांनी शब्दांमध्ये आपल्या स्वरांचा प्राण ओतला आहे. आरंभालाच ‘आनंदाने’ या भावनेतील स्वरांचा विस्तार लक्षात घ्या. ‘भरून’ हा उच्चार शब्दार्थाला पूर्णत्व देणारा आहे. ‘सूर लावू दे’ या शब्दातील भावनांचे आर्जव ऐका. पहिल्या अंतऱ्यात ‘माळून’ या उच्चारातील आनंद पाहा. ‘सुंदर यात्रेसाठी’मधला ‘सुंदर’ हा उच्चार शब्दाचा अर्थ सांगतो. दुसऱ्या अंतऱ्यात ‘दाटी’ या शब्दातील स्वरयोजना आवर्जून ऐकण्यासारखी आहे. ‘दिडदा दिडदा’ हा उच्चार त्या वाद्यांतून येणाऱ्या नादासारखा आहे. अनेक सतारी एकाच वेळेस नादनिर्मिती करत आहेत. तिसऱ्या व चौथ्या अंतऱ्यातील आनंदाची छटा दाखवणारे आलाप हे लक्षवेधी आहेत. ‘कळ्या जागताना’मध्ये ‘जागताना’ हा भाव अधोरेखित आहे. संगीतकाराची स्वररचना बाबूजींच्या भावपूर्ण गायनात पूर्णपणे व्यक्त होते. शब्द-संगीत-स्वर असा त्रिवेणी संगमाचा चिरंतन आनंद देणारे हे गीत आहे.

कवी पाडगांवकर हे ‘शब्द शब्द’ बकुळीच्या फुलापरी जपत. ‘एक जिप्सी आहे माझ्या मनांत खोल दडून’ या भावनेचे हे कवी. स्वत:ला ‘आनंदयात्री’ म्हणत म्हणत स्वत:ची जीवनमैफल रंगवणारे हे कवी. ज्येष्ठ विचारवंत व लेखिका प्रा. विजया राजाध्यक्ष लिहितात : ‘पाडगांवकरांमधील कवी व गीतकार हे एकमेकांपासून विभक्त करता येत नाहीत. ते एकरूप आहेत. त्यांच्या कवितेत संगीत आहे.’

२००७ साली कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या उपस्थितीत मला त्यांची गाणी गाण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमानंतर त्यांचे मला आलेले पत्र मी ‘जपून ठेव’ या भावनेने ठेवले आहे. ते पत्रात म्हणतात : ‘तुमचे गाणे मला आवडले. कवितेला केवळ शब्दांचे शरीर नसते. कवितेला तिचा आत्मा असतो! तुमचे सूर या आत्म्याला स्पर्श करतात. एखादे गाणे कार्यक्रमात दहा वेळा म्हटले तरी प्रत्येक वेळी गाताना त्यातले नवेपण जाणवले पाहिजे. हा आंतरिक शोध संपला की गाणे यांत्रिक होते. या नवेपणाचा शोध घेत तुम्ही गाता याचा आनंद वाटतो. हा शोध संपू देऊ नका.’

बरेच काही सांगणारा हा संदेश गाणाऱ्या सर्वासाठीच महत्त्वाचा आहे.

संगीतकार यशवंत देव यांनी लिहिलेले ‘शब्दप्रधान गायकी’ हे पुस्तक संगीत क्षेत्रातील सर्वानी वाचावे असे आहे. चांगली पुस्तके ही पुन: पुन्हा वाचायची असतात. अशा पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे. भावगीत गायकांसाठी किंवा भावगीत पुढे नेणाऱ्या सर्वासाठी यशवंत देवांनी कार्यशाळा घेतल्या. त्यातून ज्ञान घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी हा सुगम संगीताकडे आवश्यक अशा वेगळ्या दृष्टीने पाहतो. ‘अरेच्चा! एवढा सगळा विचार करायचा असतो?’ असे प्रत्येक विद्यार्थी म्हणतो व पुढे आचरणात आणतो.

असे ज्ञानाचे भांडार आपल्या शिष्यांसाठी खुले करणारा हा गुरू आहे. ज्या क्षणी त्यांच्यासमोर आपण गायला बसतो त्या क्षणी आपले शिक्षण सुरू होते. ज्यांनी हे शिक्षण घेतले ते शिष्य भाग्यवान होत. संगीतकाराने केलेली चाल त्याच संगीतकाराकडून समजून घेणे यासारखा आनंद नाही. त्यात यशवंत देवांची संगीतरचना आपल्याला समजली व गाता आली, हा तर आनंदाचा कळस आहे. त्यामागचा विचार आणि अभ्यास समजला तरच आपले गाणे बऱ्याच अंशी परिपूर्ण होऊ शकेल. सुगम संगीत कार्यशाळेमधील त्यांचे गाणे व बोलणे हे कान देऊन ऐकण्यासारखे असते. काही वर्षांपूर्वी त्यांनी सादर केलेले ‘आनंद यशवंत’ हे प्रयोग ऐकण्याची संधी मला मिळाली होती. त्यांचे गाणे ऐकता ऐकता त्यातले संदेश थेट भिडायचे. शब्दांत वर्णन करता येणार नाही असा त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे.

आज वयाच्या नव्वदीत असलेल्या संगीतकार यशवंत देवांनी मराठी भावगीतांची अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. एखादी सहज सुचलेली कवितेची ओळ त्यांच्यासमोर ठेवा, त्या शब्दांना ते क्षणात चाल देतील. तुमच्या-आमच्या जगण्यामध्ये ‘गाणे’ निर्माण करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. हे फक्त शब्दप्रधान गायकीच्या या सम्राटालाच शक्य आहे.

भावगीतांचे सम्राट आणि खरे म्हणजे उत्तम संशोधक आणि असंख्य शिष्यांचे आदर्श गुरू असणाऱ्या यशवंत देवांना आपण सारे चाहते हक्काने सांगू शकतो.. ‘शतायुषी व्हा!’

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

मराठीतील सर्व स्वरभावयात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi bhavgeet music composer yashwant deo singer sudhir phadke poet mangesh padgaonkar