‘मी माझ्यामधल्या मला एकदा भिडलो
मी माझ्यामधल्या माझ्यावरती भुललो
मी माझ्यामधल्या मलाच सांगत सुटलो
मी माझ्यामधल्या मला भेटूनी आलो..’
असे उत्तम काव्य लिहिणारे कवी सुधीर मोघे गीत-संगीताच्या दुनियेत आले आणि भावगीतामध्ये ‘शब्द’ हे माध्यम उजळून निघाले. शब्द, त्याला लावलेली चाल आणि गायन हे सारे प्रकाशमान झाले. शब्द हा मूळ गाभा उत्तम असला तर संगीतरचनेत त्याचा गाभारा व्हायला वेळ लागत नाही. भावगीतामध्ये हेच अपेक्षित आहे. त्याला ‘शब्दप्रधान गायकी’ असे म्हटले जाते. हे उत्तम जमले तर डॉ. प्रभा अत्रे यांच्या शब्दांत ‘एखादी मैफल अशी यावी, गाभाऱ्यागत पुनित व्हावी’ हे साध्य होते. कवी सुधीर मोघे लिहितात-
‘शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे-माझे असते’
नेमक्या याच कारणासाठी रसिकांनी भावगीत आपलेसे केले. प्रत्येकाला आपापल्या मनातील भावना भावगीतातील शब्दांत सापडल्या. एकच भावगीत हजारो रसिकांच्या हृदयात पोचते, हेच त्याचे यश आहे. हृदयाचे दार कुलूपबंद असले तर भावगीतातील शब्दांच्या किल्ल्यांनी ते उघडता येते. आत शिरताक्षणी संगीत व आवाज या दोन माध्यमांची भेट होते आणि भावगीत मनात ‘घर’ करते. या घराला शब्द-स्वरांच्या भिंती असतात आणि त्या भिंतींना भावनेचा गिलावा.. खरं म्हणजे भावनेचा ओलावा असतो. अशा घराला टॉवर, गार्डन, पार्किंग स्पेस या गोष्टींची गरज नसते. उजळलेले अंतर्मन हीच त्याची समृद्धी असते. मनात घर केलेल्या अशा गीतांपैकी आवर्जून लक्षात राहिलेले गाणे म्हणजे- ‘सखि, मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?’
गीतकार सुधीर मोघे, संगीतकार राम फाटक आणि गायक सुधीर फडके या त्रयीचे हे गीत. या गीताला अफाट लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीकरिता पं. भीमसेन जोशी यांनी, तर पुढे ध्वनिमुद्रिकेसाठी सुधीर फडके यांनी हे गीत गायले. दोन दिग्गजांचा स्वर वेगवेगळ्या काळात या गीतासाठी लाभावा हा श्रोत्यांच्या कुंडलीतला भाग्ययोग आहे. हे संपूर्ण गीत असे आहे..
‘सखि, मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का?
हृदयात आहे प्रीत अन् ओठात आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशील का?
जे-जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे, तू पूर्तता होशील का?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का?
सखि, मंद झाल्या तारका, सखि मंद झाल्या तारका!’
बासरी आणि व्हायब्रोफोनच्या स्वरांनी हे गीत सुरू होते. बासरी, सतार, ऑर्गन या वाद्यांमुळे हे गीत उत्तम सजले आहे. या गीतातील ‘येशील का?’ याप्रश्नामधील बाबूजींचा.. सुधीर फडके यांचा आर्जवी स्वर पुन:पुन्हा ऐकावा असा आहे. ‘येशील का?’ या प्रश्नामध्ये ‘तू येच’ हा आग्रह आहे. ‘सखि, मंद..’मधील ‘मंद’ हा उच्चार कान देऊन ऐकावा. ‘तारका’ या शब्दातील स्वरांचा ठहराव आपल्याला गाण्यामध्ये बांधून ठेवतो. गीत पूर्णतेकडे येताना ‘सखि’ ही स्वरांची खास जागा केवळ लाजवाब! बाबूजींच्या चित्तेवधक आवाजाने आणि शब्दांच्या उच्चाराने रसिकांना मोहित केले. हे गीत कार्यक्रमात सादर करण्याची संधी मिळते तेव्हा ते लक्ष देऊन बारकाईने ऐकावे लागते.
संगीतकार राम फाटक हे उत्तम गायक होते. त्यांनी गायलेली दोन गाणी विशेष गाजली. एक होते-‘उर्मिले, त्रिवार वंदन तुला’ आणि दुसरे- ‘सखि, तू दिव्यरूप मैथिली’! राजा मंगळवेढेकरलिखित ही दोन्ही गाणी संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केली. सुधीर फडके यांच्या आकाशवाणीवरील ‘गीतरामायण’ या कार्यक्रमातही राम फाटक यांनी दोन गीते गायली. ‘अडवीता खलासी पडलो, पळविली रावणे सीता’ आणि ‘जोड झणि कार्मुका। सोड रे सायका। मार ही त्राटिका। रामचंद्रा।।’ ही ती दोन गाणी. राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली ‘प्रभू या हो, प्रभू या हो’ (गायिका : कुमुद कुलकर्णी) आणि ‘प्रिय सखी, दारी याचक उभा’ (गायक : गोपाळ कौशिक) ही दोन गाणी आकाशवाणीवरून प्रसारित झाली. पुढील काळात एचएमव्ही कंपनीकरिता रामभाऊंनी स्वरबद्ध केलेली दोन गीते सुधीर फडके यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. ती गाणी म्हणजे- ‘डाव मांडून भांडून..’ आणि ‘अंतरीच्या गूढगर्भी..’
‘आभाळ निळे हे तुझे रूप आहे..’ हे विठ्ठल शिंदे यांच्या आवाजातील कवी सुधीर मोघे यांचे गीत आकाशवाणीसाठी राम फाटक यांच्या उपस्थितीत ध्वनिमुद्रित झाले. पुणे आकाशवाणीच्या भेटीमध्ये रामभाऊंनी मोघेंना सांगितले, ‘भीमसेन जोशींकडून एक भावगीत गाऊन घ्यायचे आहे. मुखडय़ाची चाल तयार आहे.’ अतिशय अप्रतिम चालीतला तो मुखडा होता. मुखडा संपताना एक हलकासा, तरीही लक्षवेधी असा ‘खटका’ होता. रामभाऊ चाल सांगताना ‘डमी’ शब्द म्हणत होते. ‘सखी.. मौंद..’ असे काहीसे ते डमी शब्द होते. त्यावरूनच सुधीर मोघेंनी गीताचा मुखडा रचला.. ‘सखि, मंद झाल्या तारका.. आता तरी येशील का?’ १९७२ सालच्या मे महिन्यातील पाचही रविवारी ‘स्वरचित्र’ या पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रमात हे गीत प्रसारित झाले. पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले हे गीत आजही उपलब्ध आहे. १९९७ मध्ये आकाशवाणीने या गीताचा रौप्यमहोत्सव साजरा केला, ही महत्त्वाची सांगीतिक घटना आहे. हे गीत ऐकल्यानंतर संगीतकार सी. रामचंद्र यांनी गीतलेखनाला मनापासून दाद दिली. काही वर्षांनंतर एचएमव्हीसाठी हे गीत सुधीर फडके यांच्या स्वरांत ध्वनिमुद्रित झाले. त्या आनंदाच्या घटनेआधी मुंबई दूरदर्शनचे निर्माते अरुण काकतकर यांनी ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी राम फाटक यांची दोन गीते घेण्याचे ठरविले. ही दोन्ही गीते सुधीर मोघे यांनी लिहिली आणि ती गायली सुधीर फडके यांनीच. त्यातील एक गीत होते- ‘दिसलीस तू फुलले ऋ तु’ आणि दुसरे- ‘सखि, मंद झाल्या तारका..’
सुधीर मोघे हे मूळचे सांगली जिल्ह्यतील किलरेस्करवाडीचे. वडील कीर्तनकार. श्रीकांत मोघे, हेमा श्रीखंडे ही भावंडं कलाक्षेत्रात कार्यरत. आरंभीच्या काळात पुस्तके, ध्वनिमुद्रिका आणि आकाशवाणी या माध्यमांनी सुधीर मोघे यांचं आयुष्य व्यापून टाकलं होतं. पुणे आकाशवाणीतील ‘गीतरामायणा’चे पहिले प्रक्षेपण साक्षात् शालेय वयात ऐकलेले ते एक भाग्यवान श्रोते. त्यांची आणि सुधीर फडके यांची पहिली भेट राम फाटक यांच्यामुळे घडली. राम फाटक तेव्हा एक नवी गीतमालिका सादर करीत होते. तुलसीदासविरचित रामकथेचा ते मराठी भावनुवाद करत होते. त्यातील एक गीत बाबूजी गाणार असे ठरले. त्यानिमित्ताने त्यांची बाबूजींशी भेट झाली.
१९७१ मध्ये पुण्याच्या ‘स्वरानंद’ संस्थेतर्फे सादर झालेल्या ‘आपली आवड’ या कार्यक्रमाचे निवेदन सुधीर मोघे यांनी केले होते. ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या कार्यक्रमाची संहिताही मोघेंचीच! त्याच्या काही प्रयोगांत निवेदनही केलं त्यांनी. जागतिक मराठी परिषदेतील ‘स्मरणयात्रा’ या कार्यक्रमाची संकल्पना आणि त्यासाठीचे संशोधन हे मोघे यांचेच. निवेदक अरुण नूलकर सांगतात : ‘‘प्रतिभावंत कवी सुधीर मोघे प्रथम माझा जवळचा मित्र होता. तो किती उदार मनाचा होता हे या मैत्रीतून जाणवायचं. अडचणीच्या काळातही तो आनंदी असायचा. त्याची कलंदर वृत्ती दिलदार वागण्यातून अनुभवायला यायची. ‘मित्रा, एका जागी नाही असे थांबायचे, नाही गुंतून जायचे..’ असं म्हणणारा तो मात्र मैत्रीत गुंतायचा.’’ ‘स्वरानंद’ या संस्थेचे प्रकाश भोंडे सांगतात, ‘‘सुधीर मोघे हे चतुरस्र, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मंचीय गीत-संगीत कार्यक्रमात दृक्श्राव्य ही संकल्पना मोघे यांनी सुरू केली. संगीतविषयक व्हिडीओ फिल्म्स् निर्मितीमध्येही त्यांचा सक्रीय सहभाग असे.’’
कवी असल्याचा सुधीर मोघेंना सार्थ अभिमान होता. कविवर्य बा. भ. बोरकरांप्रमाणे ते स्वत:ला ‘पोएट सुधीर’ म्हणायचे. ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्दधून’ हे त्यांचे काव्यसंग्रह. मोघे कविता लिहू लागले त्याही आधी ते कवितांना चाली देत असत. १९८७ साली ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. पं. जितेंद्र अभिषेकींबरोबर एका संध्याकाळपासून पहाटेपर्यंत ‘मुलतानी ते भैरवी’ असा शब्दसंगीताचा प्रवास त्यांनी केला. संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी मोघे यांची चांगलीच वेव्हलेंग्थ जुळली होती. ‘सखि, मंद झाल्या तारका..’ या गीताच्या निमित्ताने कवी सुधीर मोघे, गायक भीमसेन जोशी, सुधीर फडके आणि संगीतकार राम फाटक असे स्वरमैत्रीचे सहजयोग जुळून आले. सुधीर मोघेंबद्दल ‘गदिमा विद्यापीठातील सृजनशील माणूस’ असेही म्हटले जाते. सुधीर मोघे यांनी लिहिले आहे-
‘जेव्हा तो कविता लिहीत नव्हता
तेव्हाही तो कवीच होता
आणि जेव्हा तो कविता लिहिणं थांबवेल
त्यानंतरही तो कवीच असेल.’
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com