भावगीतांच्या वाटचालीमध्ये असंख्य गायक-गायिकांचं योगदान आहे. यातल्या कुणी पाच गाणी, कुणी आठ-दहा गाणी, तर कुणी १५ गाणी गायिली आहेत. काही गायक व गायकांनी ध्वनिमुद्रिकांचे शतकदेखील पार केले आहे. संख्येने कमी गाणी गायची संधी मिळालेल्या कलाकारांनीही भावगीतांच्या प्रवासात आपला ठसा उमटवला आहे. आवाज, गायनशैली, गायनाचा पक्का पाया, गायनामध्ये भावदर्शनाची हातोटी या गुणांमुळे त्यांची गाणी रसिकांना आवडलीही. या मालिकेत एका गायिकेचं नाव विसरून चालणार नाही.. गायिका सुमन माटे. त्यांचं वास्तव्य सध्या बदलापूरमध्ये आहे. आज त्यांचे वय ८८ वर्षे आहे. त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीमुळे असंख्य सुरेल आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्यासोबत गाण्यांच्या गोष्टी रंगवताना माझ्याबरोबर ठाण्याचे ध्वनिमुद्रिका संग्राहक गोविंद साठे होते. सुमन माटे यांची भावगीते व भक्तिगीते रसिकांच्या स्मरणात आजही आहेत. त्यापैकी योगेश्वर अभ्यंकर यांचे गीत व बाळ माटे यांचे संगीत असलेले एक भक्तिगीत विशेष लोकप्रिय झाले.. ‘जनी बोलली, भाग्य उजळले..’
‘गायन’ या विषयात सुमन माटे यांनी अगदी शाळेत असल्यापासून पारितोषिके मिळविली. आर्ट्स कॉलेजमध्ये असतानासुद्धा त्यांनी गायन केले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. कॉलेज सुरू असतानाच त्या संध्याकाळी आयुर्वेदाचा अभ्यास करायच्या. त्यांना या शाखेतील पदवीही मिळाली. आजोबा माटे वैद्य हे त्याकाळी प्रसिद्ध व लोकप्रिय होते. सुमन माटे यांना पं. जगन्नाथबुवा पुरोहितांकडे गायनाची तालीम मिळाली. तसंच पं. सी. आर. व्यास यांच्याकडेही शिकण्याची संधी मिळाली. शनिवार-रविवारी नाशिक-मुंबई असा प्रवास करून त्या गाणे शिकत असत. माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी यांचे गाणे ऐकणे ही सुमन माटे यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. केशवराव भोळे यांनी त्यांना गायनातला ‘विचार’ दिला. एकत्र कुटुंब असल्यामुळे चुलतभाऊ बाळ माटे यांच्याकडे त्यांचे गायन सुरू होतेच. हिराबाईंच्या मैफलीत तानपुराची साथ करायची संधी त्या आवडीने घेत. सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर यांच्या अजरामर ‘गीतरामायणा’तील मूळ कार्यक्रमात.. ‘राम जन्मला ग सखी..’, ‘आनंद सांगू किती..’, ‘नकोस नौके परत फिरू गं..’ या तीन गीतांमध्ये गायिका सुमन माटे यांचा गायन सहभाग आहे. त्यांच्या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये राम कदम (क्लॅरोनेट), ताटे (व्हायोलिन) आणि आचरेकर (तबला) यांचा प्रामुख्याने वादनात सहभाग असे. माणिक वर्माचे गाणे व त्यामागचा विचार ही सुमन माटे यांच्या विशेष आवडीची गोष्ट. सुमन माटे यांच्या असंख्य गीतांपैकी एका भक्तिगीताने विशेष दाद मिळवली..
‘जनी बोलली, भाग्य उजळले
विठूरायाचे दर्शन घडले।
पहाट समयी निवांत वेळी
शब्द शोधिते मूर्ती सावळी
भाव दर्शनी ओवी जुळली
क्षणभर माझे डोळे मिटले।
विठ्ठल पुढती उभा राहिला
जवळी येऊनी दळू लागला
लाज वाटे माझी मजला
असे कसे रे देवा घडले।
सांग आता मज माझ्या देवा
काय करू मी तुझीच सेवा
गीत बोलते तुझे माधवा
जीवन माझे त्याने तरले।’
संगीतकार बाळ माटे यांनी ‘मध्यम’ हा ‘सा’ धरून यमन कल्याण रागात ही स्वररचना केली आहे. त्यात शुद्ध मध्यमसुद्धा आहे आणि मंद्र सप्तकात कोमल निषादसुद्धा आहे. ‘मध्यमा’च्या वरच्या ‘सा’पर्यंत ही रचना जाते. बासरीचा सुयोग्य उपयोग व मध्य लयीतला ठेका यामुळे हे गीत अत्यंत प्रासादिक झाले आहे. या गीतामधील भावदर्शन उत्कट झाले आहे.
गायिका सुमन माटे यांनी गायलेली इतर भावगीते व भक्तिगीते आवर्जून आठवतात. संत सेना महाराजांचे एक गीत विशेष लोकप्रिय आहे.
‘घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे,
ऐसा नामाचा महिमा..’ हे ते गीत.
कवी राजा बढे यांनी लिहिलेले त्यांचे एक भावगीत रसिकांना आवडले..
‘हासे चंद्रिका, नील जली डोले नौका
जलवंतीची तरंग लीला, प्रतिबिंबाचा खेळ रंगला,
प्रेमी युगुलांचा हिंदोला,
झुलविती या झुळुका, हासे चंद्रिका।’
राजाभाऊंनी लिहिलेले व सुमन माटे यांनी गायलेले आणखी एक भावगीत आठवते..
‘सखये प्रेमपत्र पाहिले,
मखमाली गालावर लाजत अधारांनी लिहिले
अंगांगावरी रंग पसरला,
मणीबंधी फिरफिरूनी पुसला
उपाय माझा पुरता फसला, यौवन रसरसले।
वाचायाते नयने मिटली,
तरिही लाजरी हौस न फिटली
जाती न लिखिते पुसता पुसली, अंतरंग कळले।’
अशा भावगीतांसह वीणा भजनी मंडळातील गायिका म्हणून सुमन माटे प्रसिद्ध होत्या. या भजनी मंडळाने गायलेल्या रेकॉर्डमधील एक गीत रसिकांच्या पसंतीस उतरले..‘याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग, बाई घ्या ग, सखे घ्या ग..’ या गीताच्या पुढील ओळी खूप छान आहेत..
‘घरी करीत होते कामधंदा,
वेणु वाजविला नंदाचिया नंदा
तल्लीन झाले मुरलीच्या नादा..।’
कवी सूर्यकांत खांडेकर यांचे गीत व संगीतकार शंकर कुलकर्णी यांची संगीतरचना सुमन माटे यांनी गायली.
‘नाही माझ्या घरटय़ात, रास हिऱ्यामाणकांची
भावमय किमया ही, हृदयाच्या दौलतीची।’
‘जनी बोलली, भाग्य उजळले’ या एका गीताच्या आठवणींमध्ये गायिका सुमन माटे यांनी गायलेली अशी अनेक वेगवेगळी गीते आठवली. ‘जनी बोलली..’ हे गीत सच्च्या रसिकांनी ऐकायलाच हवे असे आहे.
गाण्याइतकेच नाटक व अभिनय हे त्यांचे खास आवडीचे विषय आहेत. नाशिकच्या वास्तव्यात त्यांनी पथनाटय़े केली. ‘अनामिका, नाशिक’ या संस्थेतर्फे ‘कौंतेय’ या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका केली. उपेंद्र दाते कर्णाच्या भूमिकेत होते. गडकरी जन्मशताब्दी वर्षांत गडकरी साहित्यावर आधारित चार तासांचा कार्यक्रम त्यांनी नाशिकमध्ये केला. वसंत कानेटकरांचे बिऱ्हाड फार पूर्वी त्यांच्या वाडय़ात होते. अरुण जोगळेकर हे सुमन माटे यांचे सख्खे मामेभाऊ. पुढच्या काळात ‘पीडीए’मध्ये सई परांजपेंसारखी बुद्धिमान मैत्रीण मिळाली. नाटकातली लांब, पल्लेदार वाक्ये हा प्राणायाम असतो, हे त्यांच्या नाटक आवडण्याचे एक कारण आहे. ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचे पहिले ऐंशी प्रयोग सुमन माटे यांच्या भूमिकेने व गायनाने गाजले. ‘अंग अंग तव अनंग’ व ‘ये मौसम है रंगीन’ या दोन गीतांची सुमन माटे यांच्या स्वरातील ध्वनिमुद्रिका आहे. मोहन वाघांच्या आग्रहाखातर हे शक्य झाले. या गीतांचे संगीत प्रभाकर भालेकर यांचे आहे. तालमीमध्ये ही पदे उत्तमरीत्या बसवून घेण्यात पं. राम मराठे यांचा सहभाग असे. सिनेमात काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. ‘नारद नारदी’ या सिनेमात नारदाच्या मुलीची भूमिका सुमन माटे यांनी केली. तर कुसुम देशपांडे यांनी ‘नारदी’ ही भूमिका केली होती. ह. ना. आपटे यांच्या ‘.. पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीवर आधारित आकाशवाणी श्रृतिकेत ‘यमू’ ही भूमिकाही त्यांनी केली. संगीतकार प्रभाकर जोग यांच्या एका संगीतिकेमध्ये त्यांचा गायन सहभाग होता. ‘दख्खन राणीच्या बसून कुशीत’ या कवितेवर आधारित मंचीय प्रयोग त्यांनी सादर केला. तात्यासाहेब शिरवाडकरांकडून ‘शिवसांबा देवा’ ही भैरवी त्यांनी लिहवून घेतली. सुमन माटे यांनी आद्य शंकराचार्यकृत ‘मधुराष्टकम्’ स्वरबद्ध केले. त्यातली एकूण आठ कडवी ही बिलासखानी तोडी, मालकंस, सालगवराळी व कौशीकानडा या चार रागांमध्ये स्वरबद्ध केलेली आहेत. त्यांच्या आवाजातील वेगळ्या चालीतले ‘दळीता कांडिता’ हे गीत आजही पुणे आकाशवाणीवर ऐकायला मिळते.
सुमन माटे यांच्या मते, गाणे जितके शिकाल तसे गायनाचे क्षितीज पुढे पुढे जाते. जशी शब्दांची असते तशीच स्वरांची Vocabulary वाढली पाहिजे. गायनातील ‘पलटे’ हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. गाणे हे चालीत वाचले जावे, तरच ते मनावर बिंबते. संगीताला संगती हवी, विसंगती नको.
गायिका सुमन माटे आजही शिष्यांना भावगीते व भक्तिगीते शिकवतात. त्या सांगतात.. ‘भावगीत ही प्रत्येकाच्या जीवनातील अनुभवाची गोष्ट आहे. ज्यात जास्तीत जास्त भावपूर्ण गाता येतं, विस्ताराने गाता येतं अशी भावगीते मला आवडतात..’
त्यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी त्या भावगीत- गायनावर बोलल्या. जणू आमचा ‘रियाज’ झाला..!
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com