भावगीतांच्या वाटचालीमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने वेगवेगळे आवाज मिळाले, संगीतकारांच्या वैविध्यपूर्ण रचनांनी आनंद दिला, वादकांची कला ठळकपणे नजरेसमोर आली. आवाजांत वेगळेपण मिळाला तसेच साधर्म्यसुद्धा मिळाले. गायिकांमध्ये असा एक सुमधुर आवाज मिळाला, की त्या स्वराने संगीत क्षेत्रात चाळीसहून अधिक वर्षे कारकीर्द गाजवली. त्या काळात अनेक गायक-गायिकांची गाणी गाजत होती. तीव्र स्पर्धा होती. तरीही अत्यंत लोभस व गोड आवाजामुळे एका गायिकेने आपले स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धा आणि संघर्षांला सामोरे जाताना या गायिकेने आपला सूर हरवला नाही, गाता गळा कायम राखला आणि यशाची शिखरे काबीज केली. आज वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा हा गाता गळा आपल्याला कार्यक्रमांतून भेटतो, हे आपले भाग्य. आपल्या सुमधुर स्वराने जमाना गाजवणाऱ्या या गायिका आहेत.. सुमन कल्याणपूर.

अनेक देशांमध्ये गायन कार्यक्रमांचे दौरे, दिग्गज संगीतकारांकडे गायलेली गाणी, प्रथितयश गायकांसह युगुलगीते, बारा-तेरा भाषांमध्ये गायलेली गाणी.. अशी सुमन कल्याणपूर यांची गायन कारकीर्द  थक्क करणारी आहे. जाणकारांनी या आवाजाची अमर्याद  क्षमता आणि बलस्थाने ओळखली आणि आपल्याला असंख्य उत्तमोत्तम गीते ऐकावयास मिळाली. सुमन कल्याणपूर यांची  भावगीते हा मनातला आनंदाचा ठेवा ठरला. या गायिकेची गाणी आठवा असे म्हटले तर पारिजातकाचे झाड हलवावे आणि टपटप फुलांचा सडा  पडावा तशी अनेक गाणी लगेचच आठवतात. त्या फुलांचा दरवळ काना-मनात साठवताना आपण फुलांची परडी भरून घेण्यात हरवून जातो. या स्वरप्राजक्ताचे एखादे फूलसुद्धा वातावरण पवित्र करते.  मनाच्या गाभाऱ्यात हा स्वर एकतानता निर्माण करतो आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज मनभर पसरतो.

ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती

गायिका सुमन कल्याणपूर, संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार अशोकजी परांजपे या त्रयीची अनेक भावगीते आपल्यासमोर आली. ही सर्वच गोड भावगीते आहेत. त्यापैकी एक तुफान लोकप्रिय झालेले गीत.. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..’!

‘केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर

गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर।

पापणीत साचले अंतरात रंगले

प्रेमगीत माझिया मनामनांत धुंदले

ओठांवरी भिजला गं आसावला सूर।

भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले

धुक्यातूनी कुणी आज भावगीत बोलले

डोळीयात पाहिले, कौमुदीत नाचले

स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले

झाडावरी दिसला गं भारला चकोर।’

संगीतकार अशोक पत्की त्यांच्या संगीतातील सहप्रवासाबद्दल सांगतात, ‘सुमनताईंबरोबर मला जे काम करायला मिळालं, त्यातूनच माझी स्वतंत्र संगीतकार म्हणून ओळख झाली. माझ्या आयुष्यात हे पर्व फार महत्त्वाचं ठरलं.’

अशोक पत्कींनी या गीताची चाल करताना ‘संचारी’ या बंगाल संगीतप्रकाराचा उपयोग केलाय. या गीताचा दुसरा अंतरा संचारी प्रकारातील आहे. ‘भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले’ हा अंतरा ऐका. या प्रकारात मुखडा व अंतरा यांची लय न धरता वेगळ्याच लयीत, छंदात बांधलेल्या ओळी असतात. संपूर्ण गाण्यात त्या दोन ओळी वेगळ्या वाटतात आणि भावना अधिक परिणामकारक होते. हिंदी चित्रगीतांमध्ये संचारी प्रकाराचा उपयोग एस. डी. बर्मन, सलील चौधरी यांनी केला आहे. ‘केतकीच्या बनी तिथे..’ हे गाणे बांधताना अशोक पत्की यांनी तबलावादक अण्णा जोशींना सांगितले की, या गीतात ‘परख’ चित्रपटातील ‘ओ सजना बरखा बहार आई’ या गाण्यातील ठेका असावा. केरवा तालातील सुंदर ठेका या गीतात दिसतो.. ‘धा ती् ऽ क् , ता धी्ं ऽ न..’ असा हा मधुर ठेका श्रवणीय झाला आहे. पुढे साइन लाइनवर येताना लग्गीचा उपयोग दिसतो. हा ‘लग्गी’चा उपयोग दाद द्यावी असाच आहे. आरंभी संतूर व स्वरमंडळ आपल्या मनात गाण्याचे वातावरण तयार करतात. या गीताची पूर्ण म्युझिक अ‍ॅरेंजमेंटही संगीतकार अशोक पत्की यांचीच आहे. म्युझिकमध्ये बासरी विख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी वाजविली आहे. व्हायब्रोफोन सलीम या वादकाने वाजवला आहे. मोजकी वाद्ये व परिणामकारक संगीत ही या गीताची खास बात आहे. ‘गहिवरला मेघ नभी..’ या शब्दांच्या चालीत संगीतकार दिसतो. या सांगीतिक जागांमध्ये गोडवा भरून राहिला आहे. एकूणच चालीमध्ये मेलडी आहे. अर्थात् अशोक पत्कींची ती खासीयतच आहे. त्यांनी भावगीतामधील अभिजात सांस्कृतिकता जोपासली. वादक ते संगीतकार असा त्यांचा चाळीसहून अधिक वर्षांचा प्रवास आहे. कष्टपूर्वक केलेली ही वाटचाल अनेक अनुभवांतून समृद्ध झाली आहे. या वाटचालीत त्यांनी भावगीते, नाटक, चित्रपट, जिंगल्स, मालिकांची शीर्षकगीते हे सगळे संगीतप्रकार यशस्वीपणे हाताळले. ‘पूरब से सूर्य उगा फैला उजियारा’ किंवा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या पत्कींच्या चालींनी श्रोत्यांना विश्वव्यापी आनंद दिला आहे. संगीताच्या आठवणींमध्ये  रंग भरताना पत्की सांगत होते.. ‘‘गायिका सुमन कल्याणपूर यांच्या ‘आनंद’ इमारतीतल्या फ्लॅटमध्येच कितीतरी गाण्यांच्या चाली तयार झाल्या आहेत. पं. हरिप्रसाद चौरसिया त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहत होते. चाल सुचली की गाण्यासाठी आवश्यक मंडळी तिथेच असायची.  मग कुणीतरी म्हणे, ‘‘हरीलाही बोलवा. चाली ऐकवू या.’’ ते लगेच खाली यायचे व चाल ऐकून पत्नीला बोलवायचे.. ‘‘जल्दी नीचे आना. देखो अशोकने क्या गाना बनाया है!’’

अशोक पत्कींच्या संगीतसेवेला मानसन्मान व राष्ट्रीय पुरस्काराची दादही मिळाली. गीतकार अशोकजी परांजपे, संगीतकार अशोक पत्की व गायिका सुमन कल्याणपूर या त्रयीने असंख्य गाणी ध्वनिमुद्रिकांसाठी  केली. त्यातली ‘दारी पाऊस पडतो’, ‘एकदाच यावे सखया’, ‘नाविका रे’, ‘पाखरा जा दूर देशी’, ‘पैलतीरी रानामाजी’, ‘वाट इथे स्वप्नातील’, ‘सहज तुला गुपित एक’, ‘सोनसकाळ झाली’, ‘मी नाही तू, तू नाही मी..’ अशी अनेक गीते सहजच आठवतात.

‘केतकीच्या बनी..’ या गीतामध्ये ‘भावगीत’ हा शब्द आहे. ‘भावगीत’ हा शब्द म्हणून कुठल्याही भावगीतात क्वचितच आलेला आहे.

गीतकार अशोकजी परांजपे यांची भाची आणि मराठी चित्रपट, मालिका, नाटय़ अभिनेत्री आराधना देशपांडे यांनी अशोकजींबद्दल काही आठवणी सांगितल्या. सांगलीजवळचे हरीपूर हे गीतकार अशोकजींचे जन्मगाव. त्यांचे वडील ग. पा. परांजपे हे आयुर्वेदाचार्य होते. अशोकजींची हुशारी शालेय जीवनापासूनच दिसून येत होती. त्यांनी बालपणी डोळ्यासमोर कोरी पाटी ठेवून वर्गात वाचलेला निबंध सर्वोत्तम ठरला. हरीपूर गावी लहानपणापासून अनुभवलेला निसर्ग मोठेपणी त्यांच्या कविता व गीतांमध्ये अवतरला. त्यांच्या घरातील मोफत वाचनालयाच्या निमित्ताने मान्यवरांच्या भेटीगाठी होत असत. कवितेशी मैत्री होण्याचे बीज तिथेच रुजले. १९५९ साली त्यांनी हरीपूर सोडले आणि मुंबई गाठली. गीतलेखनातील कारकीर्द हा उद्देश त्यामागे होताच. चित्रकलेच्या आवडीमुळे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथेच शिल्पकला आत्मसात केली. त्या काळात आकाशवाणीमुळे उत्तमोत्तम गाणी कानावर पडत असत. अशोकजींनी आकाशवाणीसाठी गीते लिहिली. त्याकाळी गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात त्यांचे एक गीत ध्वनिमुद्रित झाले आणि ते लोकप्रियही झाले. ‘समाधी घेऊन जाई ज्ञानदेव..’ हे ते गीत. पुढील काळात ख्यातकीर्त चित्रकार दीनानाथ दलालांची भेट, कुसुमाग्रज- पाडगांवकर- पं. जितेंद्र अभिषेकीबुवा यांच्या भेटीमुळे अशोकजींच्या गीतलेखनाला बहर आला. लोककलांच्या संशोधनासाठी केलेल्या राजस्थान भ्रमंतीमध्ये एका लग्नघरातील घटनेचे पडसाद पुढे काव्यरूपात उमटले. तेथे दिसलेला मोर, लग्नातील वधू व होणारा वर यांच्यातल्या प्रेमभावनेचे अतक्र्य घटनेत झालेले रूपांतर ही ‘केतकीच्या बनी..’ या गीताची जन्मकथा आहे. लोणावळ्यातील खोल खोल दरीमध्ये चमचमणाऱ्या काजव्यांनी चांदण्यांचा आनंद दिला आणि अशोकजींना ‘वाट इथे स्वप्नातील’ हे शब्द सुचले. लोककलांचा दांडगा अभ्यास, त्यावरील व्याख्याने यामुळे त्यातील आकलन, संशोधन, दस्तावेज नोंद या कार्यासाठी त्यांची निवड झाली. या संशोधनाच्या कामानिमित्ताने आय. एन. टी.चा लोककला विभाग गीतकार अशोकजींनी सांभाळला. या संस्थेसाठी  ‘संत गोरा कुंभार’ हे नाटक त्यांनी लिहिले. भारुडाच्या अंगाने जाणारे ‘अभक, दुभक, त्रिभक’ हे त्यांनी लिहिलेले नाटकही गाजले. ‘खंडोबाचं लगीन’ हे मुक्तनाटय़ अशोकजींच्या लेखणीतून उतरलेले. अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली काही नाटके मराठवाडा विद्यापीठात नाटय़शास्त्राच्या अभ्यासक्रमात घेतली गेली. त्यांचे ‘आतून कीर्तन, वरून तमाशा’ हे नाटक खूप गाजले.

‘केतकीच्या बनी तिथे..’ या गीतातील ‘संचारी’ प्रकाराला ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांनी आवर्जून शाबासकी दिली होती. त्याबद्दल अशोक पत्की सांगतात.. ‘त्या काळात संगीत क्षेत्रात वातावरण फार वेगळं, निर्मळ होतं. एकमेकांच्या कामात, निर्मितीत संगीतकार रस घ्यायचे. मनापासून दाद द्यायचे. अत्यंत निकोप वृत्तीच्या अनेक संगीतकारांकडून बऱ्याच गोष्टी त्यामुळे शिकता आल्या. गाणी उत्तम व्हायला हवीत या हेतूने सगळे काम करायचे. आजच्या कॉपी-पेस्ट ध्वनिमुद्रणाच्या जमान्यात खूप धावपळीत कामे होतात. आजही उत्तम मंडळी आहेतच.’

पत्कींनी अनेक होतकरूंना या क्षेत्रात प्रकाशात आणले. उत्तम मंडळींना काम मिळावे यासाठी प्रयत्न करणे हा त्यांचा स्वभाव आहे. ते आजही हे आनंदाने करतात. नुकतेच २५ ऑगस्ट रोजी त्यांनी ७७ व्या वर्षांत पदार्पण केले. ते आजही संगीतकामात तितकेच व्यस्त आहेत. कलाकारांमध्ये ते लोकप्रिय आहेत. याचे कारण त्यांचा स्वभाव.. परोपकारी, मनमिळाऊ आणि दिलखुलास!

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

Story img Loader