‘धागा’ या शब्दातच संगीत दडलेले आहे. पहिल्या अक्षरात तबल्याचा ‘धा’ आहे आणि दुसरे अक्षर ‘गा’ असे सांगते. तबल्यातला ‘धा’सुद्धा डग्ग्यावर ‘ग’ आणि चाटीवर ‘ना’ वाजवल्यानंतरच मिळतो. आणि सप्तकातल्या ‘ग’ या गंधार स्वराला ‘काना’ दिला तर तो ‘गा’ होतो. म्हणजे एक अक्षर तालाचे व दुसरे अक्षर सुराचे. एक तबल्यातील ‘मात्रा’ होते व दुसरे क्रियापद होते. विख्यात तबलिये व त्यांचे शिष्यगण जेव्हा तबल्यातील कायदे-रेले आपल्या मुखातून एका विशिष्ट लयीत बोलतात तेव्हा ते उत्तम गाणे वाटते. कारण त्यात सूरही असतो आणि लयसुद्धा असते. ते ऐकत राहावेसे वाटते. नेमके सांगायचे म्हणजे हे सर्वजण तो ‘धा’ गातात. तालातील बोल-मात्रांची ती घट्ट अशी वीण असते. ताल कोणताही असो, तो थाट लाजवाब असा होतो. वाद्य आणि कलाकाराचा हात यांतून ही वीण निर्माण होते. आपण कलाकाराशी हस्तांदोलन करतो तेव्हा त्याच्या कलेला आणि त्याच्या गुरूला तो ‘नमस्कार’ असतो. कारण त्याच्या कारकीर्दीतला पहिला धागा हा त्याचा गुरू असतो. चित्रकाराची पहिली रेघ ही त्याची ओळख असते. गायक-गायिकासुद्धा शब्द-सुरांचा कॅनव्हास निर्माण करतात. मग त्यात आपल्या भावनेचे चित्र काढता येते. गीतकार व संगीतकारसुद्धा शब्द-सुरांचे धागे एकमेकांत गुंफत असतात. गाण्यामुळे गीतकार व वादक हे नाते निर्माण होते. तबल्यातील ‘धा’ हा सुरातील धैवताचा हात धरू शकतो. अशी विविधांगी वीण निर्माण करणारा विणकर कुठेतरी असतो. एका गीतामध्ये जनकवी पी. सावळाराम आपल्या मनातली ही भावना व्यक्त करतात. पंढरीचा विठ्ठल हाच तो विणकर आहे, असे ते सांगतात. म्हणूनच ते म्हणतात – ‘धागा धागा अखंड विणू या, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा