भावगीतांच्या आरंभीच्या काळात गायक-संगीतकार गजानन वाटवे यांच्या विशिष्ट शैलीने प्रभावित झालेले अनेक गायक पुढे आले. ते  यशस्वीही झाले. वाटवे यांची गाणे म्हणण्याची, गाण्यासाठी बसण्याची, मधून मधून निवेदन करण्याची प्रभावी शैली अनेक गायकांनी अभ्यासली. दोन गीतांच्या सादरीकरणाच्या मधे गायक वाटवे काय बोलतात याकडे रसिकांचे लक्ष असे. तेही सर्वाना आवडे. ती गोष्टसुद्धा अनेक गायकांनी उचलली. पुण्याचे गायक बबनराव नावडीकर यांनी काही काळ गाजवला. त्यांचीही गायनाची ढब जवळजवळ तशीच होती. काही काळानंतर भावगीत गायनातून ते निवृत्त  झाले. त्याच काळातले आवर्जून घ्यावे असे दुसरे नाव म्हणजे गायक गोविंद कुरवाळीकर.

अनेक स्त्री व पुरुष गायकांनी त्याकाळी असंख्य ध्वनिमुद्रिकांतून विविध प्रकारची भावगीते जनमानसात लोकप्रिय केली. त्यामध्ये गायक गोविंद कुरवाळीकर यांच्या दोन गीतांचा उल्लेख होणे आवश्यक आहे. त्यातले पहिले गीत श्रीनिवास खारकर यांनी लिहिले असून संगीतकार वसंत प्रभू यांनी ते स्वरबद्ध केले आहे. ते गीत म्हणजे- ‘अगं, पाटलाच्या पोरी जरा जपून जपून..’ आणि दुसरे गीत ग. दि. माडगूळकरांचे. ते गजानन वाटवे यांनी स्वरबद्ध केले आहे. ते गीत म्हणजे- ‘नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू, लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू..’ ही दोन्ही गीते रसिकांना आवडली. त्याद्वारे गायकांमध्ये एक नवीन नाव लोकप्रिय झाले. स्पष्ट उच्चार, स्वरातून नेमके भावदर्शन यामुळे हा स्वर रसिकांनी आपलासा केला.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

श्रीनिवास खारकरांची काही अंगाईगीते तसेच ‘धाडू नको वनि राम, कैकयी’ किंवा ‘रामाला गं चंद्र हवा’ अशी काही गीते प्रसिद्ध होती. वाटवे यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. वसंत प्रभू या मंगळूरहून मुंबईस आलेल्या संगीतकाराने खारकरांचे एक वेगळे गीत स्वरबद्ध केले. लेखक मधू पोतदार त्या गीताची अप्रतिम आठवण सांगतात. आधी या गीताचे शब्द पाहू..

‘अगं, पाटलाच्या पोरी जरा जपून जपून

बिगीबिगी कुठं गं जाशी शेतामधून।

तुझ्या गालाची फुलली लाली गं

जनू डाळींब फुटलंया गाली

लई घुटमळतंय माझ्या मनांत

चल जाऊ दूर मळ्यांत

संग पिरतीचं गानं गाऊ दोगं मिळून।

आलं फूल गं भवती फुलूनी

कुठं जाशी तू गं फुलराणी

काटं गं बोचतील बाई

नाजूक तुज्या पायी

तुजं चंद्रावाणी मुख जाईल सुकून।

रानी वाऱ्याची ऐकून गाणी गं

नाचे झऱ्याचं झुळूझुळू पाणी

लई घुटमळतंय माझ्या मनांत

चल जाऊ दूर मळ्यांत

संग पिरतीचं गानं गाऊ दोगं मिळून।

अगं, पाटलाच्या पोरी जरा जपून जपून।’

ग्रामीण वातावरणातील ग्रामीण शब्द ही या गीतातील खास बात! सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातले ग्रामीण उच्चारणही गाताना तसेच व्हावे लागते. या गाण्यात भाषेचा ठसका आहे अन् गोडवाही. गाणे सुरू झाल्या झाल्या पहिल्या ओळीनंतर छोटा फिलर म्युझिक पीस आहे. आणि पहिला अंतरा सुरू होण्याआधी ‘सा नी धप म..’ अशा एकत्रित सुरांचा ‘अवरोही’ पीस अगदी कान देऊन ऐकण्यासारखा आहे. हार्मोनियम लाजवाब वाजली आहे. दुसरा अंतरा वेगळा ताल अन् वेगळी चाल घेऊन येतो. ‘काटं गं बोचतील बाई’ या शब्दांनंतर काटे बोचण्यासाठीचा व्हायोलिन पीस ऐकावाच लागेल. गाण्यातील भावना वसंत प्रभूंच्या चालीत व गायकाच्या आवाजात स्पष्ट दिसते. गायन, चाल व म्युझिक पीसेस हे सारेच आकर्षक झाले आहे. त्यामुळे ‘अगं, पाटलाच्या पोरी जरा जपून जपून’ हे गीत व गायक गोविंद कुरवाळीकर हे समीकरणच रूढ झाले.

लेखक मधु पोतदार यांनी या गीताची छान आठवण लिहिली आहे. ही आठवण संगीतकार बाळ चावरे यांनी मला फोनवरून सांगितली. ते म्हणाले, ‘ज्या अर्थी हे गीत मी वयाची एक्याऐंशी वर्षे पार केली तरी खडान्खडा लक्षात आहे, त्या अर्थी मला ते आवडलेलं गीत आहे.’

संगीतकार वसंत प्रभूंचे मित्र सुरेश मोरे हे संगीताचे जाणकार होते. १९४६ साली ‘सावळ्या तांडेल’ या ऐतिहासिक मराठी नाटकाला संगीत देण्याची संधी वसंत प्रभूंना मिळाली. त्या नाटकाचे काही कारणांमुळे फारसे प्रयोग झाले नाहीत. त्याचवेळी संगीतकार वसंत देसाई यांनी स्वत: गायलेल्या ‘पाटलाच्या पोरा जरा जपून’ या गीताची आठवण निघाली. प्रभूंचे मित्र सुरेश यांनी या गाण्याच्या शब्दांत थोडा बदल करून ‘अगं, पाटलाच्या पोरी जरा जपून’ असं गाणं केलं. प्रभूंनी या ओळी स्वरबद्ध केल्या. त्यावेळचे प्रथितयश कवी श्रीनिवास खारकर यांच्याकडून हे नवे गीत लिहवून पूर्ण करून घेतले. ध्वनिमुद्रिका निघाली. गोविंद कुरवाळीकरांनी ते गायले व ते लोकप्रिय झाले.

या गाण्यामुळे वसंत प्रभूंना हिंदी चित्रपटात संगीत देण्याची संधी चालून आली. पण तो चित्रपट पडद्यावर आलाच नाही. वसंत प्रभूंचे मित्र व साहाय्यक संगीतकार बाळ चावरे दादरला त्यांच्या घराजवळच राहत. ते म्हणाले, ‘वसंतरावांनी ‘कळा ज्या लागल्या जीवा’ या गीताची चाल माझ्या हार्मोनियमवर आणि माझ्या घरातच लावली आहे, हे मी विसरू शकत नाही.’

गोविंद कुरवाळीकर यांचे आणखी एक गीत रसिकप्रिय झाले. ते गीत लिहिले होते ग. दि. माडगूळकरांनी. आणि गीताची चाल गजानन वाटवे यांची होती. स्त्रीभावनेचे हे गीत आहे. शब्द, चाल, गायन यामुळे कुरवाळीकरांचे हे गीतसुद्धा लक्षात राहण्यासारखे झाले..

‘नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू

लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू।

घोटाळते पायामधे तुरुतुरु चाल

अडतात ओठावरी मनांतले बोल

नका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ

लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू।

पाहील ना कुणीतरी सोडा माझी वाट

मुलखाचे द्वाड तुम्ही निलाजरे धीट

इतुक्यावरी हासूनिया वेड नका लावू

लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू।

माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन

छंदीफंदी डोई याचे त्यात आगबाण

बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ

लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू।’

या गीताचे आरंभीचे म्युझिक फारच अप्रतिम केलंय. तिसरा अंतरा वरच्या सुरावर असल्याने तो म्युझिक पीस वेगळा आहे. गायक गोविंद कुरवाळीकरांच्या मधुर आवाजात हे गीत श्रवणीय झाले आहे. स्वरसंयोजनाबाबत बोलायचे तर छोटे म्युझिक पीसेस आणि कधी फॉलो म्युझिक- तेही मोजक्या वाद्यमेळात- असा तो काळ होता.

गायक-संगीतकार गजानन वाटवे आपल्या आत्मकथनात कुरवाळीकरांचे मुक्तपणे कौतुक करतात.. ‘गोविंद कुरवाळीकर हा उमदा तरुण गायक विठ्ठल नाशिककर नावाच्या माझ्या विद्यार्थ्यांबरोबर घरी आला. हैदराबाद संस्थानमधला हा तरुण केशवराव धायबरांच्या ‘नंदकुमार’ चित्रात कृष्णाची भूमिका करण्यासाठी आला आणि सिनेमा उद्योगातून बाहेर पडल्यावर काव्यगायक झाला. चांगला आवाज व पेटीवर सफाईदार हात हे त्याचे विशेष गुण होते. दहा-बारा चाली तो माझ्याकडून शिकला असेल. नंतर तो स्वत: स्वररचना करू लागला.’

गायक गोविंद कुरवाळीकरांची ही दोन गाणी लोकप्रिय झाली. पैकी एक गीत श्रीनिवास खारकर यांनी लिहिले, तर दुसरे गीत ग. दि. माडगूळकरांनी. एक चाल वाटवेंच्या लोकप्रियतेच्या काळातील, तर दुसरी वसंत प्रभूंच्या कारकीर्दीच्या आरंभीच्या काळातील आहे. असे गीतकार, असे संगीतकार मिळणं हे गायकाचे भाग्य. आणि अशी गाणी ऐकायला मिळणं हे आपलं भाग्य. म्हणूनच माझ्या मनाच्या ‘फोनो’मधील रेकॉर्ड त्या काळात फिरत राहते..

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

Story img Loader