मराठी भावगीतांच्या नव्वद वर्षांच्या प्रवासातील गाजलेली गाणी, त्यांचे कर्तेधर्ते, त्या गाण्यांची वैशिष्टय़े, त्यावरील पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव, आकाशवाणीचा त्यांच्या प्रसारातील मोलाचा वाटा अशा दिलचस्प गोष्टींबद्दलचे रसीले सदर..
काव्यगायक गजानन वाटवेंचा कार्यक्रम म्हणजे अमर्याद गर्दी हे ठरूनच गेलं होतं. गायनासाठी कवितेची चोखंदळ निवड हा उत्तम गुण त्यांच्यापाशी होता. कविता निवडल्याक्षणी त्यांना चाल सुचत असे. ती चाल रसिक कान देऊन ऐकत तेव्हा त्यांना त्या काव्याचा अर्थ आपसूक उमजे. त्यांच्या गायनातून त्यातला आशय आणि अर्थ अलवारपणे उलगडे. ती आपल्याही मनातली भावना आहे असं त्यांना वाटे. कवितांचे वेगवेगळे विषय त्या गायनातून आकळायचे. मुळात भावगीतांचं बलस्थान म्हणजे गीत ऐकल्यावर श्रोत्याच्या मनात उभं राहणारं चित्र. एकाच भावगीताने गर्दीतल्या मनामनांत अशी शेकडो चित्रं तयार होत. पुन्हा त्या गीताशी निगडित प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अमुक एक गीत मला का आवडते, याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. भावगीतात चित्रपटातील वा नाटय़पदातील नायक नजरेसमोर नसतो. ऐकणारा प्रत्येक जण त्यातला नायक असतो. गजाननराव वाटवेंच्या गायनातून हे अनुभवास येई. त्यांचे गायन थेट श्रोत्यांच्या हृदयात पोहोचत असे. मुंबईत वाटवेंचं गायन असलं की प्रचंड गर्दीमुळे ट्रॅम बंद पडत असत.
लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू यांची अशीच एक कविता वाटवेंच्या हाती आली. त्याकाळी ‘तेज’ या वृत्तपत्रात मनमोहन कविता लिहीत असत. ‘कसा ग गडे झाला..’ ही कविता त्यांनी लिहिली, आणि त्यांनाच पसंत पडली नाही म्हणून त्यांनी ती बाजूला ठेवून दिली. ‘वाङ्मयशोभा’ अंकाचे संपादक मनोहर केळकर यांनी ती शोधली आणि १९४८ साली अंकात प्रसिद्ध केली. वाटवेंनी ती स्वरबद्ध केली आणि या गीताने इतिहास रचला.
कविवर्य मनमोहन यांच्या कवितेला ‘बंडखोर कवीची कविता’ म्हणतात. ‘तोंडे फोडाया शतकांची सरकवली मी वरती बाही’ या ओळी त्यांच्या या वृत्तीची साक्ष होय. कवीला स्वत:ची जी कविता आवडली नव्हती, ती कविता गायक-संगीतकार वाटवेंच्या हाती लागली. वैविध्यपूर्ण उपमा ही या कवितेतली महत्त्वाची गोष्ट.
‘कसा ग गडे झाला, कुणी ग बाई केला
राधे तुझा सैल अंबाडा..
पृथ्वीच्या पेल्यात गाळिली
रजनीच्या बागेतील द्राक्षे
भुलवूनी तुजला वनात नेली
रसरसलेली रात्र रंगली
वाजविता बासरी
कचपाशाचा नाग उल्गडी फणा!
पहिल्या चंचल भेटीमधली
बाल्याची कबुतरे पळाली
वेणि तिपेडी कुरळी मृदुला सुटली घालित गंधसडा!
भ्रमर रंगि हा शाम सापडे
नील कमल कचपाशि तव गडे
अरुणोदय होताचि उल्गडे
पाकळी पाकळी होई मोकळी
या कोडय़ाचा झाला उल्गडा!’
यात कल्पनांतून कल्पना, शब्दांचे लोट येताहेत, ही या कवीची खासियत. त्यांना कोणी कवितेमध्ये फेरविचार करण्याचा सल्ला दिला तर ‘तुम्ही हिमालयाला आईस्फ्रूट देता आहात,’ असे ते म्हणत. याच कवितेत पाहा.. पृथ्वीच्या पेल्यात, रजनीच्या बागेत, कचपाशाचा नाग, बाल्याची कबुतरे या त्यांच्या उपमांचा वाचणाऱ्याला मोह पडतो. गजानन वाटवेंनी ही कविता स्वरबद्ध केली आणि कार्यक्रमातून गायला सुरुवात केली. आणि हे गीत रसिकांना आवडू लागले. यश हे शब्द व स्वर या दोहोंचे असते, हे या गायक- संगीतकाराने सिद्ध केले. तितकेच यश गायकाच्या गायनशैलीचेही आहे. मैफलीतून वाटवे जेव्हा हे गीत गाऊ लागले तेव्हा त्यांना त्याकरता वन्समोअर मिळू लागले. त्या काळात जे सामान्य, गरीब, पण बुद्धिमान रसिक पैसे खर्च करून नाटक-सिनेमा पाहू शकत नव्हते असे जाणते श्रोते या कार्यक्रमांना गर्दी करायचे. लोकांच्या हाती पैसा खेळण्याचे ते दिवस नव्हते. पण साहित्य, काव्य याचा त्यांचा अभ्यास असे. पोती, चटया अंथरून ते चार-चार तास काव्यगायनाच्या मैफली ऐकत. अशा श्रोत्यांची भावना या भावगीतातून प्रकट झाली. वाटवे स्वत: लिहितात.. ‘भावगीत गायनाला बहर येत गेला तो या रसिकांमुळेच.’
मैफलींतून जेव्हा ‘राधे तुझा सैल अंबाडा’ गायले जाऊ लागले तेव्हा काही मंडळींच्या ते नजरेत आले. त्यातूनच संस्कृती रक्षण मंडळाने आरोप केला की, हे गीत सद्भिरुचीला सोडून आहे. खरं म्हणजे यात अश्लील काही नव्हते. फक्त ते शृंगारिक होते, इतकेच. रेडिओवर ही रेकॉर्ड लावली जाऊ नये असेही प्रयत्न झाले. विरोध, चर्चा यामुळे या गाण्याची लोकप्रियता आणखीनच वाढू लागली. त्याचा गाजावाजा झाला. हे गीत गायल्यावर वाटवेंच्या गळ्यांत नोटांचे हार पडायचे. या रेकॉर्डचा विक्रमी खप झाला. मुळात या गीतात कवीच्या वेधक, तीव्र अशा कल्पना त्याने मांडल्या होत्या. सामान्य माणसाला त्या चटकन् समजत नसल्याने चकित करतात. कवीला जे जाणवले ते जगावेगळे आहे. नवनवीन व अगदी ताज्या प्रतिमा त्यात आढळतात. सौंदर्याच्या काय काय कल्पना असू शकतात, याचे वैभव त्यांच्या गीतात दिसते. एका कवितेत मनमोहन म्हणतात..
‘रसिका! ही ‘कविता’ म्हणजे
खुद्द कवीलाच एक कोडे असते
रसिका! पुष्कळ वेळा
ही ‘कविता’ अशी येते
आणि डोळ्यांतल्या पाण्यावर
रेघ मारून जाते.’
यावरून कवीला काय काय सुचू शकते आणि आपल्याला त्याचे कितपत आकलन होते, असा प्रश्न पडतो. गायक गजानन वाटवेंना कवीचे शब्द मिळाले आणि त्यांनी ते स्वरबद्ध करून रसिकांच्या मनांत पोहोचवले. ‘कसा ग गडे झाला, कुणी ग बाई केला’ हा प्रश्न गीताच्या चालीतही दिसतो. या प्रश्नाचे कारण लगेचच दुसऱ्या ओळीत समजते. अंतऱ्यामध्ये ‘पृथ्वीच्या पेल्यात, रजनीच्या बागेतील, रसरसलेली रात्र, कचपाशाचा नाग, बाल्याची कबुतरे, गंधसडा, पाकळी पाकळी होई मोकळी’ या शृंगारकल्पनांना बहर आला आहे. स्वररचनेतील मधुरतेमुळे लगेचच हे गीत गाण्याचा मोह होतो. याचा ढोलक अंगाने जाणारा तालही पकड घेणारा आहे. दुसऱ्या अंतऱ्यात ‘वेणि तिपेडी कुरळी मृदुला सुटली घालित गंधसडा’ ही ओळ तालासह किंवा ताल मनात ठेवून पुन्हा पुन्हा म्हणावीशी वाटते. ‘वाजविता बासरी’ या शब्दानंतर बासरीचा छोटासा म्युझिक पीस ही विश्रांती नसून तो अर्थपूर्ण आहे हे लक्षात येते. पुढच्या ओळीमधील भावना अधिक ठसविण्यासाठी तीनही अंतरे संपताना मुखडय़ावर येण्याची गंमत काही औरच. पुन्हा मुखडा गाताना ‘झाला’ व ‘केला’ या शब्दांची स्वररचना करताना इतका अप्रतिम विचार झालाय, की ज्यातून त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी आहेत हे समजते. ‘रसरसलेली’ या शब्दाच्या उच्चारात वाढविलेला ‘इकार’ भावना गडद करते. आकार, अनुस्वार, प्रश्न अशा कितीतरी गोष्टींचा विचार या चालीमध्ये केलेला आहे, हे निश्चित.
संपूर्ण गीतात दहा वेळा ‘ड’ हे अक्षर, पाच वेळा ‘ळ’ हे अक्षर व काही जोडाक्षरे आणि हे सारे तालात, स्वरात असणे हे संगीतकाराच्या प्रतिभेला आव्हान ठरू शकते. पण शब्द मिळाल्यावर लगेचच त्याची चाल सुचण्याच्या वाटवेंच्या प्रतिभेबद्दल मी नव्याने काय बोलू? त्यांचे गाणे ऐकल्यानंतर लगेच आपणही हे गीत म्हणून बघू या असे वाटते हेच त्यांचे सामथ्र्य आहे. त्यांचा मधुर स्वर कानांत साठवावा असे वाटते. ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’ किंवा ‘कुणीही पाय नका वाजवू’ ही स्त्रीभावनेची गाणी किंवा ‘मोहुनिया तुज संगे’ हे शिवरंजनी रागात स्वरबद्ध केलेलं गीत.. अशी शेकडो गाणी आठवतात. मला खात्री आहे- एव्हाना त्यांची आणखीनही काही गाणी मनातल्या मनात आठवायला तुम्ही सुरुवात केलेली आहे.
रसिकाग्रणी शशी मेहतांनी एके ठिकाणी लिहिलंय.. ‘गजानन वाटवे यांनी त्यांच्या गायनातून भरभरून दिलेल्या आनंदाचे सारखे रवंथ करीत बसावेसे वाटते.’
काळ बदलला, लोकप्रियतेची वळणे बदलली, तरी हा ‘सायंतारा’ अखंड प्रकाशमान आहे.
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com