मराठी भावगीतांच्या नव्वद वर्षांच्या प्रवासातील गाजलेली गाणी, त्यांचे कर्तेधर्ते, त्या गाण्यांची वैशिष्टय़े आदींबद्दल.. 

एखाद्याचे आपण शिष्य असावे असे वाटण्यातली निर्मळ ओढ फार महत्त्वाची आहे. हाच आपला गुरू आहे हे पक्के ओळखण्यासाठी काही काळ जातो. पण तो जाऊ देण्यात काहीएक विचार असतो. मला कोठे जायचे आहे आणि त्याकरता कोण वाट दाखवेल, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ हा लागतोच. आपली क्षमता व आत्मविश्वास या जोरावर ‘जे हवे होते ते मिळाले’ हे प्रत्यक्षात येऊ शकते. त्या वाटेवर इच्छाशक्ती आपल्याला पुढे पुढे नेतेच. गुरूकडे गेल्यानंतर आपली क्षमता वाढते, दृष्टिकोन मिळतो, हे निश्चित. ‘गुरुबिन कैसे ज्ञान’ हे ज्याला समजते तोच पुढे उत्तम गुरू होऊ शकतो. कऱ्हाड या गावातून पुण्यात आलेल्या श्रीधर यशवंत नावडीकर या तरुणाची मन:स्थिती अशीच होती. उत्तम गाणे शिकायच्या ध्यासाने श्रीधर यशवंत- म्हणजेच पुढे नावारूपाला आलेले गायक बबनराव नावडीकर हे पुण्यात आले आणि त्यांनी गुरूचा शोध सुरू केला.

बबनराव नावडीकर यांना गजानन वाटवे यांच्या गायनाचे फार आकर्षण होते. त्यांना भेटण्याची अनावर इच्छा होती. घर सोडून आलेले नावडीकर एकदा पुण्यात हुजूरपागेवरील फुटपाथवर बसले होते. बाजूला कंपाऊंडची भिंत होती. बबनराव येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे बघत बसले होते. त्यांच्या वडिलांचे- यशवंत नावडीकर यांचे एक मित्र त्या रस्त्याने जात होते. त्यांनी बबनरावांना ओळखले व चौकशी केली. बबनराव म्हणाले, ‘मी घरातून निघून आलो आहे. मला गाणं शिकायचंय.’ त्यांनी बबनरावांना चार-पाच दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. पुण्यामध्ये हिंडताना एके दिवशी टिळक रोडवरील गोखले बिल्डिंगमध्ये त्यांना गायक गजाननबुवा जोशी हे गुरू भेटले. त्यांच्याकडे नावडीकरांचे संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांची गजाननराव वाटवे यांना भेटण्याची इच्छा मात्र अजून पूर्ण झाली नव्हती. ते गुरूंकडेच राहत होते. तिथे असताना एकदा गजाननराव वाटवे सायकलीवरून जाताना त्यांना दिसले. या भेटीनंतर त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचाही योग आला. आपले गुरूस्थान हेच आहे हे नावडीकरांना तेव्हा समजून चुकले.

नावडीकरांचे घराणे कीर्तनकारांचे. बबनरावांचे वडील यशवंतबुवा नावडीकर हे प्रख्यात कीर्तनकार. बबनराव कीर्तनात त्यांना साथ करायचे व गायचेसुद्धा. शिवाय बबनराव शाळेत संगीत व मराठी या विषयांचे शिक्षक होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. पुढे पुण्यातील ‘श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा’ या संस्थेचे कार्याध्यक्षपदही त्यांनी भूषविले. वाटवेंकडे शिकता शिकता ते भावगीतांचे कार्यक्रम करू लागले. वाटवेंचा मोठेपणा असा, की त्यांनी बबनरावांच्या आवाजात एक गीतही ध्वनिमुद्रित केले. वाटवेंची चाल व बबनरावांचा स्वर या संयोगामुळे हे गीत खूपच लोकप्रिय झाले. तेच हे गीत..

‘रानात सांग कानात आपुले नाते

मी भल्या पहाटे येते

पाण्यात निळ्या गाण्यात भावना हलते

हळूहळू कमलिनी फुलते

आभाळ जगाचे भाळ मळवटी नटते

उगवतीस हासू फुटते, हासू फुटते

ज्या क्षणी विरही पक्षिणी सख्याला मिळते

मी भल्या पहाटे येते

हरभरा जिथे ये भरा शाळू सळसळते

वाऱ्यात शीळ भिरभिरते

त्या तिथं तुला सांगते, हरळी मी देते

बोलावून तुजसी घेते, हां घेते, हां घेते

आनंद पुढे पाणंद सभोवती शेते

पूर्वेस बिंब ते फुटते, हां फुटते, हां फुटते

त्या तिथं तुला सांगते, हरळी मी देते

बोलावून तुजसी घेते..’

वाटवे सांगत.. ‘खरं म्हणजे ही ग. दि. माडगूळकरांची लावणी. परंतु लावणी हा प्रकार मला विशेष आवडत नसल्याने मी त्याला भावगीताच्या स्वररचनेचा थाट चढविला. वास्तविक हे स्त्रीगीत आहे. पण त्याकाळी आम्ही सर्व गायक ही गाणी गात होतो व ती लोकप्रिय होत होती.’

या गीताचा प्रारंभीचा म्युझिक पीस आपल्याला थेट गाण्यातील शब्दांत नेतो. गीताचे शब्द वरकरणी धिटाईचे वाटतात. ‘मी भल्या पहाटे येते’ हे त्या काळाला अनुसरून नव्हते. ‘निळ्या गाण्यात’ या शब्दातील स्वरयोजना आपल्या मनाची पकड घेते व गाणे कमलिनीच्या फुलण्याप्रमाणे हळूहळू मनात शिरते. ‘आभाळ जगाचे भाळ’ व ‘उगवतीस हासू फुटते’ या ग. दि. माडगूळकरांच्या विलक्षण कल्पनांना दाद द्यावीशी वाटते. दुसऱ्या व तिसऱ्या अंतऱ्याची चाल सारखी आहे. गायक नावडीकरांच्या धारदार आवाजातसुद्धा स्त्रीभावना उत्तम व्यक्त झाली आहे. उत्तम गीताला उत्तम चाल देताना एका गायक- संगीतकाराने दुसऱ्या गायकाचा स्वर माध्यम म्हणून घेतला आणि या गीताने रसिकमनाला भुरळ घातली. गजाननराव वाटवे यांची स्वररचना थेट भिडणारी होती. माफक संख्येत वाद्यांचा उपयोग करून ताकदीची रचना करणे, ही संगीतकार वाटवे यांची खासियत. शिवाय त्यांची गायनशैलीही रसिकांना आवडेल अशीच होती. केरवा तालातील ‘पॅटर्न’चा उपयोग ढोलक या वाद्याच्या साहाय्याने केला आहे तो अगदी प्रारंभीच्या म्युझिक पीसपासूनच. अंतऱ्यामध्ये ‘हां घेते’ हा पुनरुच्चार ही संगीतकाराची प्रतिभा आहे. शिवाय म्युझिक पीसने गीताचा शेवट करणे हीसुद्धा दाद द्यावी अशीच गोष्ट आहे. या गाण्यात गीत, संगीत, गायन या सगळ्यालाच एक उच्च स्तर प्राप्त झाला आहे. पुरुषस्वरातील ही स्त्रीभावना सगळ्याच रसिकांनी स्वीकारली आणि उचलून धरली.

एखादी गोष्ट रानात जाऊन कानात सांगायची ती का? आणि त्यासाठी भल्या पहाटे का यायचे? कारण ती गोष्टच अशी आहे, की रानातील झाडे-वेली-फुलांनासुद्धा ती ऐकू गेली तर..? हे या गीतामागचे मर्म सर्वज्ञात आहे. ‘चतुरंग’ संस्थेच्या डोंबिवलीमधील एका कार्यक्रमात याचे गायक व संगीतकार एकत्र मंचावर होते. वाटवे म्हणाले, ही माझी चाल म्हणून ती लोकप्रिय झाली. नावडीकर लगेच म्हणाले, ती मी गायली म्हणून अधिक लोकप्रिय झाली. या दोघांच्या या मिश्कील गप्पांना रसिकांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला. गुरू-शिष्य व उत्तम मैत्र या दोन्ही गोष्टी इथे दिसल्या. बबनरावही तीन-तीन तासांच्या भावगीत मैफली करत असत. रसिकांचे ‘वन्समोअर’ घेत असत.

बबनरावांचे सुपुत्र अरविंद नावडीकर यांनी एक चित्तवेधक आठवण सांगितली. डॉक्टरांनी बबनरावांना उतारवयात मैफली कमी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी या गायकमहाशयांनी लग्नकार्यामध्ये जाऊन मंगलाष्टके म्हणण्यास सुरुवात केली. मंगलाष्टके रचणे व चाल देऊन ती गाणे, ही त्यांची कल्पना सर्वानाच आवडली. इतकी, की लग्नाकरता मंगल कार्यालय नक्की केल्या केल्या लगेचच नावडीकरांकडे जायचं आणि त्यांना मंगलाष्टकांसाठी बुक करायचं हे तेव्हा ठरूनच गेलं. काही वेळा दिवसाला चार ते पाच ठिकाणी मंगलाष्टके म्हणण्याची आमंत्रणे त्यांना येऊ लागली. या गायकाचा असा हा नवा व्यवसाय सुरू झाला.

गदिमांच्या लेखणीतून उतरलेले ‘रानात सांग कानात’ हे गीत सर्वदूर गेले. पु. ल. देशपांडे लिहितात, त्याकाळी कधी एकदा हा मेळ्याचा कवी भेटतो असे झाले होते. पुरुषोत्तम सोळंकुरकर या दोस्ताने १९३८ की १९३९ साली हे नाव सांगितले. माडगूळकर नावाचे आमच्या कोल्हापूरच्या मेळ्यातले कवी उत्तम पदे करतात, असे त्यांनी सांगितले.

या कवीच्या ग्रामीण विषयावरील गाण्यांचा स्वादच निराळा होता. आणि गाणाऱ्याच्या भाषेत सांगायचे म्हणजे- अक्षरे विलक्षण बोलकी होती. ग्रामीण बोलीचे मला हुरडय़ाइतके आकर्षण आहे. माझे भाषेपेक्षाही बोलीवर अधिक प्रेम आहे. मग ती सातारी असो, वऱ्हाडी असो की कोकणी असो.

बबनराव नावडीकर यांनी गायलेले ‘रानात सांग कानात’ हे गीत आजही नव्या कलाकारांकडून गायले जाते. त्यांनी गायलेल्या आणखी एका गीताची आठवण आज होते..

‘बघू नकोस येडय़ावानी रं

तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी रं

तुझ्या डोळ्याचा कळला भाव

माझ्या जिव्हारी बसला घाव

नगं झुरूस मोरावानी रं’

धारदार, गोड आणि निर्मळ आवाजामुळे या गायकाने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. काही काळाने सिनेसंगीताने भावगीतांवर परिणाम केला. नावडीकर स्वत:च सांगत की, ‘अंदाज’ चित्रपटातील ‘गाओ खुशी के गीत रे’ या चालीचा उपयोग माझ्या एका गीतात मी केलाय. ‘जा रे चंद्रा, क्षणभर जा ना, मेघांच्या पडद्यात रे’ यातील ‘मेघांच्या पडद्यात रे’ यासाठी मला आवडलेल्या हिंदी गीतातील चालीचा वापर मी केला. कारण मूळ चाल मला खूप आवडली होती. ते माझ्या आवडीचे गीत होते.

इतक्या मनमोकळ्या, प्रांजळ स्वभावाच्या गायकाला सच्चे भावगीतरसिक कधीच विसरू शकणार नाहीत.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

Story img Loader