कवी सूक्ष्म अशा व्यक्तिशोधातून समोर येतो तेव्हा त्याची कविता आपल्याला जवळची वाटते. या कवितेतील शब्द सहज-सोपे असतील तर ते लगेच आपलेसे होतात. पण प्रथमदर्शनी जर कविता दुबरेध वाटली तर..? तर ती आधी समजून घ्यावी लागते. तिच्या अधिक खोलात शिरत आपण प्रथम त्यातील शब्दकळेच्या प्रेमात पडतो. मग हळूहळू कविता समजायला लागते. ती पूर्णपणे समजावी असा आपला आग्रह नसतो. तिच्यातला आपल्याला भावलेला अर्थ आपण घेतो. कवीच्या अनुभवांची खोली प्रतिमा-प्रतीकांच्या रूपात कवितेत उतरते. त्या आगळ्या शब्दांत दडलेल्या नाद-लयीने आपण भारावून जातो. त्यात दडलेल्या संगीताकडे आपण ओढले जातो. याचे मूळ केशवसुतांच्या ‘झपुर्झा’मध्ये असावे असे वाटते. अशी भावना पुढच्या काळात एका विलक्षण ताकदीच्या कवीच्या शब्दकळेत दिसू लागली. त्यांची कविता आरंभी न समजूनसुद्धा भावली. हळूहळू काव्यप्रेमींना आकृष्ट करीत राहिली. संगीतरचनाकारांना या शब्दांचा मोह पडला आणि त्यांना भावगीतांच्या प्रवासात आशयाच्या आणि अर्थाच्या वेगवेगळ्या वाटा निर्माण करणारे ‘जंक्शन’ सापडले. हे असे स्टेशन आहे- जिथे आपण थबकतोच. या विलक्षण वेगळ्या प्रदेशाचे नाव आहे- माणिक गोडघाटे. त्यांची जनमानसात ओळखीचे असलेले नाव.. कवी ग्रेस!

वडील गायक-संगीतकार. तेही युग निर्माण करणारे! आणि सुपुत्रसुद्धा त्यांचा हा वारसा पुढे नेणारा गायक-संगीतकार. असे भावगीतांच्या प्रवासात क्वचितच घडते. ही घराणेदार गाण्याची संस्कृती जपणारे गायक-संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. तर मूळचे कोल्हापूरचे आणि मुंबईत आचार्य जियालाल वसंत यांच्याकडे गायनाची शास्त्रशुद्ध तालीम घेतलेले आणि सुगम गायनात नाव कमावलेले गायक म्हणजे सुरेश वाडकर.

prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

कवी ग्रेस, संगीतकार श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांच्या एकत्रित सुरेल कामगिरीमुळे तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वाच्या मनात ठसलेले हे भावगीत..

‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुझे केस पाठीवरी मोकळे

इथे दाट छायांतुनी रंग गळतात

या वृक्षमाळेतले सावळे।

तुझी पावले गे धुक्याच्या महालात

ना वाजली ना कधी नादली

निळागर्द भासे नभाचा किनारा

न माझी तुला अन् मला सावली।

मनावेगळी लाट व्यापे मनाला

जसा डोंगरी चंद्र हा मावळे

पुढे का उभी तू, तुझे दु:ख झरते

जसे संचितांचे ऋ तु कोवळे।

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून

आकांत माझ्या उरी केवढा

तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे

दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा।’

ग्रेस यांच्या या कवितेला स्वरबद्ध करण्याचे विलक्षण ताकदीचे काम संगीतकार श्रीधर फडके यांनी केले आहे. साऱ्या विश्वाच्या अंतर्मनाचे ते कवी आहेत हे संगीतकाराने ओळखले आहे. श्रीधर फडके यांनी या गीतनिर्मितीसंदर्भात असंख्य आठवणी सांगितल्या. १९८५ मधील ही गोष्ट. श्रीधरजींनी त्यांच्या अजित सोमण या मित्राकडे काही नवीन कविता मागितल्या. अजित सोमण उत्तम बासरीवादक होते. त्यांचा काव्याचा अभ्यास होता. त्यांनी कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा काव्यसंग्रह त्यांना दिला. त्यात ‘तुला पाहिले मी..’ ही कविता त्यांच्या हाती लागली. अर्थ पटकन् नाही कळला, पण कविता मात्र भावली. श्रीधरजी सांगतात.. ‘ग्रेस यांच्या कवितेत वेगवेगळ्या छटा मिळतात. कविता छंदोबद्ध असते. तिचे अंतरे वाचताना वेगळी भावना समजते. कवी ग्रेस यांना त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ही प्रेमकविता आहे हे लक्षात ठेवा.’ या कवितेला चाल लावता  आलीच पाहिजे ही श्रीधरजींच्या मनातील भावना. त्यांच्या मते, हे गीत झपतालातसुद्धा करता येईल. पण त्यांनी ‘दीपचंदी’ तालात चाल बांधणे पसंत केले. ‘ज्या चालीमध्ये शब्द हे स्वरांच्या साहाय्याने रसिकांपर्यंत पोहोचतात ती खरी चाल!’ असे श्रीधरजी मानतात. गाणी थोडी केली तरी चालतील, पण ती ‘लाँग लास्टिंग’ असावीत ही त्यांची संगीतकार म्हणून भूमिका असते. एका प्रवासात मुंबईला परत येताना ही चाल सुचली. लक्षात राहावी म्हणून त्यांनी ती पाठ केली. दादरला घरी येईतो मुखडय़ाची चाल तयार झाली होती. ती चाल त्यांनी लगेच टेप करून ठेवली. गाण्याच्या अंतऱ्यामध्ये- ‘धुक्याच्या महालात’ यामध्ये ‘महालात’ या शब्दासाठी पहिल्यांदा गाताना ‘ग’ हा स्वर ठेवावा की ‘रे’ हा विचार त्यांच्या मनात आला. दहा मिनिटांत सर्व अंतऱ्यांची चाल तयार झाली. ‘अशी ओल जाता..’ हा पहिला भाग खालच्या स्वरात ठेवला आणि पुढे ‘आकांत माझा..’  हे वरच्या स्वरात ठेवले. जणू शब्दच ती चाल घेऊन आले. ही चाल बाबूजींना ऐकवली तेव्हा त्यांनी मनापासून दाद दिली. पुढे श्रीधरजींनी एक कॅसेट केली. त्यात एक गाणे हवे होते. त्यामुळे कॅसेटसाठी हे गीत स्वत: श्रीधरजींनी गायले. गायक सुरेश वाडकर यांना हे गीत अत्यंत आवडले. पुढे ‘तेजोमय नादब्रह्म’ या अल्बममध्ये ते सुरेश वाडकर यांनी गायले. वेस्टर्न आऊटडोअर स्टुडिओमधील कॅसेट गीतामध्ये सुराज साठे आणि आप्पा वढावकर यांचा अ‍ॅरेंजमेंटमध्ये प्रमुख सहभाग होता. तबल्यासाठी केदार पंडित, इतर तालवाद्यांकरता दीपक बोरकर, स्पॅनिश गिटारसाठी ज्ञानेश देव आणि ढोलकसाठी विजय जाधव  ही वादक मंडळी होती. पुढे सुरेश वाडकर यांनीही हे गीत अप्रतिम गायले. ते लोकप्रिय झाले. या अल्बममधील म्युझिक अ‍ॅरेंजमेंट अरविंद हसबनीस यांनी केली आहे. ‘मात्र तुला पाहिले..’ या गीतासाठी आधी केलेले म्युझिक तेच ठेवले. त्यात सुराज साठे यांनी कॉर्ड्स, पियानो, कॉन्ट्रा यांची आकर्षक भर घातली.

श्रीधर फडके सांगतात.. ‘सुरेश वाडकर नेहमी कार्यक्रमांतून हे गीत गातात. वाडकरांचा आवाज हा सुरेल, अभ्यासाचा पाया असलेला, गळ्यावर संस्कार झालेला रियाजी आवाज आहे. त्यांचा गाता गळा अतिशय गोडवा असलेला आहे. त्या आवाजात विलक्षण मधुर नाद आहे.’

श्रीधर फडके यांनी अभंगांना चाली देताना तालांचे अनेक प्रयोग केले. ‘ओंकार स्वरूपा..’ एकताल, ‘रूपे सुंदर..’ खेमटा, ‘देवाचिये द्वारी..’ भजनी ठेका, ‘माझ्या मना..’ दादरा, वगैरे. हे सारे प्रयोग कमालीचे यशस्वी झाले. ‘देवाचिये द्वारी’ हे गीत अमेरिकेत १९७५ साली त्यांनी स्वरबद्ध केले. त्यावेळी बाबूजी तिथे आले होते. त्यांनी कार्यक्रमात हे गीत गायले. त्यांचे आशीर्वाद मिळाले. श्रीधरजींनी त्यांच्या आजवरच्या संगीतप्रवासात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, बा. भ. बोरकर, सुधीर मोघे, प्रवीण दवणे, अनिल कांबळे, नितीन आखवे, वा. रा. कांत, कुसुमाग्रज, शिरीष गोपाळ देशपांडे, विमल लिमये, समर्थ रामदास आदींच्या रचना स्वरबद्ध केलेल्या आहेत. ‘भावधारा’ ही त्यांची पहिली कॅसेट. ‘स्वरवेल’ कॅसेटसाठी शांताबाईचे कोकणी गीत त्यांनी स्वरबद्ध केले. श्रीधरजींच्या अ‍ॅरेंजर्समध्ये बाळ पार्टे, शामराव कांबळी, आप्पा वढावकर, सुराज साठे, अरविंद हसबनीस, तुषार पार्टे, श्रीकांत नेवासकर हे कुशल वादक प्रामुख्याने दिसतात. स्वत: श्रीधर फडके अतिशय भावपूर्ण गातात. त्यांच्या रचना सुधीर फडके, आशा भोसले, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, जयतीर्थ मेवुंडी, उपेंद्र भट, देवकी पंडित, आरती अंकलीकर, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी, हेमा सरदेसाई, अजय गोगावले, सुखविंदर सिंग, रिचा शर्मा, शाल्मली खोलगडे, शिल्पा पुणतांबेकर, रंजना जोगळेकर, उत्तरा केळकर या गायक-गायिकांनी गायल्या आहेत. श्रीधरजींच्या काही गीतांमध्ये कोरसचा विचारपूर्वक वापर केलेला दिसतो. ते सांगतात.. ‘मी मुद्दाम चाली कठीण करीत नाही. मुळात उत्तम चाल सुचावी लागते. तीत गोडवा असावा. गाणे सर्वदृष्टय़ा उत्तम व्हावे यासाठी मी आग्रही असतो.’

‘तुला पाहिले मी..’ या गीतामध्ये प्रणयाची वेगळी लाट, वेगळे वातावरण आणि गूढता आहे. त्यात ‘धुक्याचा महाल’ ही अंतर्मनाला दिलेली उपमा आहे असे वाटते. त्या महालात असंख्य कल्पना, प्रतीके वस्ती करून आहेत. काव्यप्रतिभेला हे उद्देशून आहे का, असेही आपल्या मनात येते. ग्रेस नेहमीच सांकेतिक भाषेत बोलत. त्यातला अर्थ समजण्यासाठी शब्दांच्या पलीकडे जावे लागते. त्यांची कविता कधी कधी नाही कळली तरी वाचकाला आवडते, आकृष्ट करते. ‘माझी सारी मूक सत्ये आणि चंदनाचा साग’ हा त्यांच्या कवितेतील अभिमान आहे. नांदेडचे डॉ. नंदू मुलमुले यांनी ‘रचनेच्या खोल तळाशी’मध्ये ग्रेस यांच्या कवितेचा अभ्यास केला आहे. मनोवैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास आहे.

सुरेश वाडकर यांचे गायन हाही स्वतंत्र अभ्यासाचा आणि आनंदाचा विषय आहे. गायन आणि तबदलावादन या दोन्ही गोष्टींवर त्यांचे प्रभुत्व आहे. रूपेरी दुनियेत वावरताना सुरेशजींनी स्वभावातला साधेपणा जाणीवपूर्वक टिकवला आहे. संगीतसाधना हा त्यांचा ध्यास आहे. ‘आचार्य जियालाल वसंत गुरुकुला’मध्ये गायक कलाकार  घडवण्याचे काम ते करतात. सुरेशजींनी गायलेल्या हिंदी-मराठी गाण्यांनी गायनातील आदर्श निर्माण केला आहे.

‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी..’ या गाण्याच्या निमित्ताने कवी ग्रेस, गायक सुरेश वाडकर आणि संगीतकार श्रीधर फडके एकत्र आले आणि एका अलौकिक भावगीताची निर्मिती झाली.  आजच्या पिढीसाठी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘थँक गॉड.. इट्स फ्रायडे’ हे पार्टी साँग लवकरच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. श्रीधर फडके यांचे संगीत असल्याने पाश्चात्त्य बाजातील या गीतात ‘ग्रेसफुल’ मेलडी आहेच..

vinayakpjoshi@yahoo.com

Story img Loader