उदंड लोकप्रियता मिळालेल्या ‘चाफा बोलेना’ या अवीट गोडीच्या गीताकडे येताना एक वेगळी कविता आठवते. ही कविता पाठय़पुस्तकात आपल्या अभ्यासक्रमात होती. त्यावेळी प्रथमच आपण या कवीचे नाव ऐकले.. वाचले. पुस्तकातील कविता वाचण्याआधी आपले लक्ष त्या पानाच्या वरच्या भागात दिलेल्या कवीबद्दलच्या माहितीकडे जायचे. जे मोजके कवी त्याकाळी टोपणनावाने कविता करायचे, अशांपैकी हे एक कवी.. ‘बी’! हे टोपणनाव तेव्हा वेगळेच वाटायचे. मग कंसातील त्यांच्या पूर्ण नावाकडे लक्ष जायचे. ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी लिहिलेली एक वेगळीच कविता तेव्हा आपल्याला अभ्यासाला होती..
‘गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?’
मूळ कवितेत अशा चार-चार ओळींची पंचवीस कडवी आहेत. त्यावेळच्या आपल्या मराठीच्या पुस्तकात त्यातील सात-आठ कडव्यांचाच अंतर्भाव होता. या कवीचे नाव तेव्हापासूनच आपल्या मनात रुजले आहे. याच कवी ‘बीं’चे ‘चाफा बोलेना’ हे गीत थेट रसिकांच्या हृदयात पोहोचले. त्याकाळी आकाशवाणीवर हे भावगीत नेहमी हमखास ऐकायला मिळे. मराठी गीतांच्या वाद्यवृंदात या गीताचा समावेश सहसा असतोच असतो. किंबहुना, सुगम गायन क्षेत्रात अशी एकही गायिका नसेल- जिने कार्यक्रमात ‘चाफा बोलेना’ हे गीत गायले नाही. सुगम गायनाच्या क्षेत्रात करीअर करू पाहणाऱ्या प्रत्येक गायिकेने हे गीत गायले आहे. कवी बी, गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या त्रयीचे हे गीत लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले. एखाद्या वादकाने हे गीत कधीही वाजवले नाही असा वादक सापडणे मुश्कील. अहो, संपूर्ण श्रोतृवर्ग कार्यक्रमात हे गीत बसल्या जागी अगदी म्युझिक पीसेससह गातो. इतकेच काय, हे गीत कार्यक्रमात नसेल तर तो मराठी गाण्यांचा कार्यक्रमच नाही असेही म्हटले जाते. ‘चाफा बोलेना’ या गीताची प्रचंड लोकप्रियता हे यामागचे कारण आहे.
‘चांफा बोलेना, चांफा चालेना
चांफा खंत करी कांही केल्या फुलेना।
गेले आंब्याच्या बनी
म्हटली मैनांसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून..
गेले केतकीच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवे गळाले देहभान..
चल ये रे ये रे गडय़ा!
नाचुं उडुं घालुं फुगडय़ा
खेळुं झिम्मा, झिम-पोरी झिम-पोरी झिम्!..
हे विश्वाचे आंगण
आम्हां दिले आहे आंदण
उणें करू आपण दोघेजण..
जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्यकडे
आपण करू शुद्ध रसपान..
चाफा फुली आला फुलुन
तेजीं दिशा गेल्या आटुन
कोण मी- चांफा? कोठे दोघे जण!..’
साधे, सोपे शब्द, मन खेचून घेणारी चाल, लतादीदींचा मधुर आवाज, व्हायोलिन- क्लॅरोनेट- मेंडोलिन- पियानो- बासरी असा वाद्यमेळ, तबला- ढोलक यांचा ताल असे सारेच रसायन या गाण्यात उत्कृष्ट जमून आले आहे. आपण ही फक्त कविताच वाचली तर रूढार्थाने ‘मीटर’मध्ये नसलेले हे काव्य आहे. संगीतकार वसंत प्रभूंसारखा ‘मेलडी किंग’ हा सारा मामला जणू मधाळ करतो. आरंभीच्या म्युझिक पीसपासूनच ही रचना आपल्या मनाची पकड घेते. त्यानंतर येणारा आलाप गीताच्या आरंभाकडे अलगद नेऊन सोडतो. ‘चाफा बोलेना’ व ‘चालेना’ या शब्दानंतरचा पियानोवरील आरपीजीओ (ब्रोकन कॉर्ड) कान देऊन ऐकावा असा आहे. वाद्यमेळात ‘टूटी’चा नेमका उपयोग दिसतो. अंतऱ्यामध्ये शेवटच्या ओळीनंतर पुन्हा साइन लाइनवर येताना छोटय़ा आलापाची जागा एकदम ‘खास’ अशीच आहे.
मैत्रिणीने आपल्या जिवलग मित्राला ‘चाफा’ म्हटले आहे. तो रुसलाय. त्याला खुलविण्यासाठी हे प्रयत्न आहेत. त्याच्याशी खेळलेला हा प्रेमाचा झिम्मा आहे. प्रेयसीच्या मनातील निर्मळ भावनेचे हे खेळणे ‘चाफा फुली आला फुलुन’ या क्षणाची वाट पाहते.. आणि तसेच घडते. तिच्या मनातील उत्कट भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो. या अपूर्व मीलनाचे वर्णन कवीने उत्तम शब्दांत केले आहे. मूळ कवितेमध्ये असलेले, पण ध्वनिमुद्रिकेवरील गीतरूपात न आलेले काही ‘अंतरे’ असे आहेत..
‘आलें माळ सारा हिंडुन, हुंबर पशूंसवे घालुन
कोलाहलाने गलबले रान..
कडा धिप्पाड वेढी, घाली उडय़ांवर उडी
नदी गर्जुन करी विहरण..
मेघ धरूं धावे, वीज लटकन् लवे
गडगडाट करी दारुण..
लागुन कळिकेच्या अंगा, वायु घाली धांगडधिंगा
विसरूनी जगाचें जगपण..
सृष्टी सांगे खुणा, आम्हा मुखस्तंभ राणा
मुळीं आवडेना! रे आवडेना!!..
दिठीं दीठ जाता मिळुन, गात्रे गेली पांगळुन
अंगी रोमांच आले थरथरून..’
आपण ऐकतो त्या गीतामध्ये अंतऱ्यात कुठे कुठे ‘रे’ हे संबोधनार्थी अव्यय सहा वेळा आले आहे. मूळ कवितेत ते नाहीए. गाणे ‘मीटर’मध्ये येण्यासाठी या ‘रे’चा उपयोग केला असावा का, असा सहजच प्रश्न पडतो. शिवाय अंतरा संपतानाचा ‘रे’मधला ‘ए’कार व त्यानंतरचा ‘आ’कारातला आलाप हे विस्मयचकित करतात. आणि संगीतकाराची प्रतिभा व रचनेमागचा विचार या दोन्ही गोष्टींना ‘सलाम’ करावासा वाटतो.
वसंत प्रभूंना काव्याची उत्तम जाण होती. गायनासाठी योग्य असे अंतरे त्यांनी निवडले. त्यांनी प्रत्येक अंतऱ्याला दिलेली वेगळी चाल हा तर चमत्कारच आहे. अक्षरगण व मात्रागणापासून दूर असलेल्या काव्याला चालीत बांधणे हे मोठेच आव्हान होते. ते आव्हान पेलायला वसंत प्रभूंसारखे समर्थ संगीतकारच हवेत.
कवी ‘बी’ हे मूळचे बुलढाणा जिल्ह्य़ातले. मलकापूर हे त्यांचे जन्मस्थान. १८७२ साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या अठराव्या वर्षांपासून ते कविता करू लागले. १८९१ मध्ये हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ या पत्रात छापून आलेली ‘प्रणयपत्रिका’ ही कवी ‘बी’ यांची पहिली कविता. त्यानंतर काही वर्षे त्यांनी वर्तमानपत्रांतून लेखनही केले. या कवीचे मित्र शंकर विठ्ठल दीक्षित यांनी त्यांना इी हे टोपणनाव सुचविले. कवींना ते आवडले व त्यांनी ते स्वीकारले. ‘नावात काय आहे?’ या कवितेत कवी म्हणतात..
‘कां आग्रह? रसिका! नांव सांग मज म्हणसी
नांवांत मोहनी भासो सामान्यासी!’
कवी पुढे म्हणतात..
‘काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नादमधुर मेळ
अर्थचमत्कृतिचाही नोहे डोंबारी खेळ।’
‘कविवंदन’ या कवितेत ते म्हणतात..
‘ऱ्हस्वदीर्घवेलांटीमात्रा शास्त्रीजीं घेती
जुनी मापकोष्टके जराशीं बाजुस सारा ती।’
‘बी’ यांच्याकडे आंग्ल भाषेतील काव्ये भाषांतरित करण्याची उत्तम प्रतिभा होती. अशा त्यांच्या चार भाषांतरित कविता आहेत. हा त्यांचा वेगळा गुणविशेष. ‘गाविलगड’ हे त्यांचे खंडकाव्य. ते दोन हजार ओळींचे रचण्याचा त्यांचा मानस होता. ते पूर्ण झाले असते तर मराठी भाषेत या खंडकाव्याने विक्रम केला असता. कवी ‘बी’ यांच्या कवितांमध्ये ‘अंतरे’ संख्येने जास्त आहेत. कविवंदन- ३९ अंतरे, प्रमिला- ४-४ ओळींचे पाच अंतरे, पिंगा- २१ अंतरे, माझी कन्या- २५ अंतरे, भगवा झेंडा- ११ अंतरे, कमळा- दोन ओळींचे ६७ अंतरे, बुलबुल- १७ अंतरे.. ‘वेडगाणे’ ही त्यांची कविताही लोकप्रिय झाली..
‘टला- ट, रीला- री
जन म्हणे काव्य करणारी..’
हा कवितेतला त्यांचा वेगळा सूर दाद मिळविणारा ठरला. त्यांच्या काही कवितांचे अंतरे संख्येने जास्त असले तरीही आपण ती कविता संपूर्ण वाचतो. कवीची झेप, कल्पनाशक्ती आपल्याला वाचता वाचता पुढे नेते. म्हणूनच पाठय़पुस्तकात अभ्यासलेली त्यांची कविता आजही आठवते. कवी ‘बी’ हे नाव तेव्हाच मनात ठसले होते. पुढे गाण्यामधून दरवळलेला त्यांचा ‘चाफा’ तर पिढय़ान् पिढय़ा संगत करणारा आहे. कवी ‘बी’ यांचा चाफा वसंत प्रभूंच्या सुरातून बोलका झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरातून गाऊ लागला. त्याच क्षणी तो ‘चाफा’ तुमचा-आमचा झाला. शब्दांच्या पलीकडले काय असते, हे त्यातून आकळले. आणि ‘चाफा बोलेना’ हे अनेक पिढय़ांचे गाणे झाले. या कवीबद्दल बोलताना आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटलंय.. ‘ते नावाने जरी ‘B’ असले तरी त्यांचे कर्तृत्व ‘ A 1’ दर्जाचे आहे.’
vinayakpjoshi@yahoo.com