भावगीतांच्या दालनातील एका गायिकेची गाणी सहज आठवायला सुरुवात केली. या गायिकेने भावगीते व भक्तिगीते गायला प्रारंभ केला त्या काळापासून आठवू असे मनाशी ठरविले; पण ते जमले नाही. त्यांची एकामागून एक अशी अनेक उत्तमोत्तम गाणी मात्र सहज आठवत गेली. आणि अशा गीतांची मालिकाच मनात सुरू झाली. त्यांची एक-दोनच नाही, तर शंभराहून अधिक गाणी मनात चांगलीच ठसली होती. शास्त्रीय गायनातील हा सच्चा व सात्त्विक सूर त्या काळात शब्दप्रधान गायकीच्या प्रवाहालासुद्धा लाभला. त्यांच्या आवाजातील स्निग्धसा पोत रसिकांच्या मनाला भिडला. त्यांची गायकी तर विलक्षण ताकदीची होतीच. या गायिकेच्या भावगीत तसेच भक्तिगीतांतील आलाप, ताना, मुरक्या या मन मोहित करणाऱ्या होत्या. नेहमीप्रमाणे सवयीनुसार ‘आपल्याला ते जमते का पाहू’ असे प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. असंख्य वेळा प्रयत्न करूनही आपल्याला ते जमत नाहीए हे जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यांच्या गायनपद्धतीची झेप व आवाका कळून येतो. मग अशा साधकाची किंवा गायिकेची तपश्चर्या, मेहनत, शिक्षण, रियाज या गोष्टींवर रसिकांत चर्चा झडतात. आणि त्या गायिकेच्या स्वरातील भक्ती-भाव आपल्याला परमेश्वरभक्तीत अलगद नेऊन सोडतो. खरं म्हणजे या गायिकेच्या प्रत्येक गीतावर लिहावं असं मला माझं अंतर्मन सांगत राहतं. त्यांचं गाणं ऐकता ऐकता लिहिणं सुचत जाईल हेही लक्षात येते. त्यांनी घराणेदार गायकी व शब्दप्रधान गायकी या दोहोंचा उत्तम तोल साधलेला दिसून येतो. विचार करता करता चैत्र शुद्ध प्रारंभाचा गुढीपाडवा हा दिवस आठवला. ‘आपला सण आणि आपली गाणी’ हे समीकरण मनात तयार असते. (हे एखाद्या कार्यक्रमाचे शीर्षक वाटू शकते.) मुद्दा असा की, चैत्र शुद्ध प्रतिपदा येतेय म्हणून हे गीत आठवले. आणि हे गीत आठवले म्हणून चित्तवृत्ती प्रसन्न करणारा तो स्वरही आठवला.. माणिक वर्मा.
श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा हे नाव उच्चारताक्षणी एक उच्च प्रतीची भावना मनात निर्माण होते. अवघ्या संगीतविश्वाने प्रेम केलेला, ‘आपल्या घरातील आवाज’ ही ती भावना! समृद्ध गायकीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचलेला हा स्वर. कोणत्याही पुरस्काराच्या किंवा मानसन्मानाच्या ईष्र्येने केलेले हे गायन नव्हे. ‘मी आणि माझे गाणे’ या संकल्पनेवर निखळ भक्ती असलेला हा स्वर. यात ‘मी’पणाचा लवलेश नाही. म्हणूनच त्यांचे गाणे साऱ्या विश्वाचे गाणे झाले. देवळात गेल्यावर काही मागताना देवाच्या मूर्तीकडे आपण एकटक बघत असतो, तीच अवस्था माणिकबाईंचे गाणे ऐकताना होते. म्हणजे कान गाण्याकडे व आपली नजर समोर प्रत्यक्ष गायन करणाऱ्या त्यांच्या शांत, प्रसन्न मूर्तीकडे असते. प्राणांच्या शक्ती श्रवणाच्या ठायी एकवटून आपण ते गाणे ऐकत राहतो. मग ते शास्त्रीय गायन असो किंवा भावगीत असो.. त्यांचे गाणे आपले श्रद्धास्थान होते. गाण्याइतकेच त्यांचे बोलणेसुद्धा ऐकत राहावे असे. सोज्वळतेने भारलेले. माणिक वर्माचे गाणे ध्वनिमुद्रिकेवर ऐकताना असे भारलेले वातावरण आपोआपच तयार होते आणि नकळत आपण मान डोलावून आनंदाने त्यांच्या गाण्यास दाद देत राहतो. म्हणूनच गुढीपाडवा आला आणि या गीताने मनात जणू गुढी उभारली.
गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेले हे गीत संगीतकार बाळ माटे यांनी स्वरबद्ध केलेले आहे. संगीतकार बाळ माटे मूळचे पुण्याचे. लहानपणीच त्यांना भारत गायन समाजातील दातार मास्तरांकडे हार्मोनियम वाजवण्याचे शिक्षण मिळाले. पुण्यातच ते मॅट्रिक झाले. काही वर्षे त्यांना गोविंदराव टेंबे यांचाही सहवास लाभला. त्यांच्याकडे संगीत शिकणे झाले. त्यानंतर अनेक गीते माटे यांनी स्वरबद्ध केली. पुणे आकाशवाणीवर त्यांनी बालगीतांपासून असंख्य वेगवेगळ्या प्रकारची गीते संगीतबद्ध केली. त्यांच्या काही ‘गवळण’ रचना गाजल्या. माटे भावंडांनी ‘वीणा भक्तिगीत मंडळ’ सुरू केले. त्यात त्यांची चुलत बहीण व त्या काळातील भावगीत गायिका सुमन माटे (आज वय वर्षे ८८. मुक्काम : बदलापूर) यांचाही सहभाग असे. वीणा भक्तिगीत मंडळाचे पुण्यापासून ते राजधानी दिल्लीपर्यंत अनेक कार्यक्रम झाले. पुढे बाळ माटे यांचा तसा खूप आधीपासूनच असलेला डोळ्यांच्या त्रासाचा विकार बळावला. पण त्यांच्या संगीतरचनेच्या कामात खंड पडला नाही. त्यांच्या उत्तमोत्तम गीतांमध्ये ‘विजयपताका श्रीरामाची..’ हे गीत इतर गीतांइतकेच लोकप्रिय झाले..
‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी।
गुलाल उधळुनी नगर रंगले
भक्तगणांचे थवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे
गुढय़ा तोरणे घरोघरी ग घरोघरी।
आला राजा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी
आरती ओवाळीती नारी।
श्रीरामाचा गजर होऊनी
पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी
भक्तीयुगाची ललकारी ग ललकारी।’
या गाण्याची पहिली ओळ मूळ गीताच्या ताल- लयीत न घेता म्हटली आहे. त्यानंतर ‘नेमका हवा तेवढाच’ असा म्युझिक पीस व त्यानंतर पहिल्या ओळीपासून गीत सुरू झाले आहे. ‘सीतावर रामचंद्र की जय’ असा गजर होण्यासाठी गीतकाराचे शब्द आहेत. शब्दांतील आशय जोशपूर्ण आहे. प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी नगरजन सिद्ध आहेत. त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढय़ा उभारल्या गेल्या आहेत.
देसकार रागाच्या अंगाने जाणारी बाळ माटे यांची ही स्वररचना. उत्तम शब्द व तयारीचे गाणे यामुळे हे गीत श्रोत्यांच्या हृदयाला भिडले. रागामध्ये गंधार स्वराकडे रिषभावरून जाणे, ‘ग रे ग’ असे ठहराव, तर कधी निषादाचा कण घेऊन येणारा धैवत हे सारे या गीतामध्ये नेमकेपणाने सांभाळले आहे. या गाण्यात रागाच्या खुणा आहेतच; पण वेगळेपणासुद्धा आहे. दुसरा अंतरा पाहा- ‘आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा..’ या रचनेमध्ये ‘मध्यम’ स्वराने गीताची रंगत वाढली आहे. संगीतकाराचे हे कसब आहे. तिसरा अंतरा सुरू होण्याआधी देसकाराची आरोही तानेची जागा गायिकेने इतकी अप्रतिम गायली आहे, की मनात श्रीरामाचा गजर होतोच. संपूर्ण गाण्यामध्ये ‘अंबरी, घरोघरी, नारी, ललकारी’ या शब्दांचे उच्चारण विलोभनीय प्रकारे तालातल्या मात्रेवर थांबणारे आहे. आणि तेही शास्त्रीय गायनातील ‘जागा’ घेऊनच. एकूणच या गीताची सर्वागाने आनंद देणारी निर्मिती म्हणजे चेहऱ्यावर सदैव स्मित असणारी प्रभू रामचंद्रांची विजयी मुद्राच होय.
१९४३-४४ या काळात योगेश्वर अभ्यंकर यांची कविता रसिकांसमोर आली. ‘सामथ्र्य’ ही त्यांची पहिली कविता. पुढच्या काळात ध्वनिमुद्रित झालेल्या त्यांच्या गीतांमध्ये भक्तिगीते विशेष लोकप्रिय झाली. ‘माझ्या यशात संगीतकार व गायक-गायिकांचा सिंहाचा वाटा आहे,’ असे अभ्यंकर सांगत. त्यांच्या भक्तिगीतांमध्ये माणिक वर्मा यांनी गायलेली भक्तिगीते विशेष लोकप्रिय झाली. कोलंबिया ग्रामोफोन कंपनीत अभ्यंकरांची गीते रेकॉर्ड होण्यासाठी कवी ग. दि. माडगूळकरांनी शिफारसपत्र दिले होते. अभ्यंकरांनी अनेक गीतकारांचे ऋ ण मान्य केले आहे. ते म्हणतात, ‘ या क्षेत्रामध्ये माझ्यापुढे तिघेजण आदर्श होते. राजा बढे, शांताराम आठवले आणि ग. दि. माडगूळकर.’ ‘नंदाघरी नंदनवन फुलले’, ‘जनी बोलली भाग्य उजळले’, ‘रुसला मजवरती कान्हा’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘आठवणी दाटतात’, ‘श्रीरामाचे भजन करावे..’ अशी योगेश्वर अभ्यंकरांची अनेक लोकप्रिय गीते आहेत.
माणिक वर्मा यांची असंख्य गाणी महाराष्ट्रातील घराघरांत मुखोद्गत आहेत. एकूणच वर्मा कुटुंब हे संगीताशी संगत असलेले. माणिकबाईंच्या आणखी काही गीतांच्या निमित्ताने या सर्वाशी संवाद होईलच. त्या सर्वाचे बोलणे, आठवणी हासुद्धा अमर्याद आनंद असेल याची खात्री आहे. अगदी मैफलीतल्या आनंदासारखाच! आपल्या खानदानी गायकीने संपूर्ण विश्वाला आनंद देणाऱ्या या स्वराबद्दल काय बोलू आणि किती लिहू असे झाले आहे. अगदी अलीकडच्या एका चित्रपटगीताने व त्या गीतातील स्वर-शब्दांनी संगीतप्रेमींना भरभरून आनंद दिला. तोच धागा पकडून म्हणावेसे वाटते.. आजही माणिक वर्मा यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झालेले कोणतेही गाणे ऐका आणि ‘सूर निरागस’ अशा आनंदाचे धनी व्हा..
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com