‘भावगीत पुढे नेले’ या विधानात संगीतशैली, कामाच्या जबाबदारीचे भान, श्रोत्यांची अभिरुची घडणे, कानसेनांची दाद मिळणे, कवितेमधील प्रगल्भता, वाद्यमेळ संयोजन, गायनातील स्वरभाव सांभाळणे आणि या सगळ्यात वर्षांनुवर्षे राहील असा आदर्श निर्माण करणे ही सारी अवधाने असतात. हा विचार जपलेले एखादे गाणे समोर येते तेव्हा काही वेगळे गवसल्याचा आनंद होतो. अशा गीतात पंडित आणि अपंडित या दोघांना ‘हलवण्याचे’ सामर्थ्य असते. अशी गाणी रसिकांच्या स्वीकृतीची मोहोर घेऊनच जन्माला येतात. असे गीत जन्माला येणे हा आपल्या सर्वाच्या कुंडलीतला भाग्ययोग असतो. आपल्यामधील रसिकता अशा गाण्यामुळे प्रगल्भ होते. कवी, गायक, संगीतकार, वाद्यमेळातील वादक या सर्वाच्या प्राणशक्ती भावगीताच्या ठायी एकवटलेल्या दिसतात. भावगीतातील अचूक भावना मिळते व एखादी शास्त्रशुद्ध मैफल ऐकण्यासारखा आनंद मिळतो. गाणे शास्त्रकाटय़ाच्या कसोटीला न्याय देते व गाण्यातला शब्द मोहात पाडतो. त्या गीताच्या म्युझिक अरेंजमेंटमधील संगीत हेसुद्धा आदर्श आणि परिपूर्णतेचा आनंद देणारे ठरते. असे गाणे गाण्याचा व वाजविण्याचा मोह होतोच, पण हे सारे बिनचूक होण्याचे दडपण असते. तसे पाहिले तर कोणत्याही आदर्शवत कामाचा पुन:प्रत्यय देताना ही अवस्था येतेच. किंबहुना ही अवस्था आली तरच हातून चांगले काम घडते. त्यासाठी मूळ गीत वारंवार ऐकणे आवश्यक बनते, तरच त्यातील ‘खोली’ सर्वार्थाने समजते. ती समजली, की आनंद गगनात मावेनासा होतो. नादाच्या अलौकिक पातळीवर आपण तल्लीन होतो आणि आपण त्या विश्वात थांबणे पसंत करतो. तो नादब्रह्म हाच परब्रह्म आहे याची जाणीव होते. त्या भावगीताने निर्माण केलेल्या समाधी अवस्थेतच राहावेसे वाटते. अशी अनुभूती देणारे ‘माईलस्टोन’ भावगीत म्हणजे – ‘श्रावणात घननिळा बरसला..’
कविवर्य मंगेश पाडगांवकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे या त्रयीचे हे भावगीत अनेक पिढय़ा बांधून ठेवणारे झाले. कलाकाराच्या हातून ‘असे काही झाले पाहिजे’ अशी भावना निर्माण करणारे हे गीत आहे. या गीताच्या चालीमधला, शब्दांमधला, गायनामधला व वाद्यांमधला ‘नाद’ हा या गीताचा आकर्षणबिंदू आहे. गीतातील सारे वातावरण बुद्धिप्रधान आहे. गाणे सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत त्यातील माधुर्य भरून राहिले आहे. हे गाणे शांतपणे संपूर्ण ऐका आणि समाधिवस्था येते की नाही ते सांगा. हीच या गाण्याची विलक्षण ताकद आहे. हेच या भावगीताच्या यशाचे ‘गमक’ आहे.
‘श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा।
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता शाम मुरारी
माझ्याही ओठावर आले नांव तुझेच उदारा।
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा।
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फूलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा।
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा।’
या गीतातले वातावरण ‘एव्हरग्रीन’ आहे. त्याचे कारण या गीताचे शब्द, चाल, गायन आणि म्युझिक अरेंजमेंट हे होय. गीताची चाल ही संगीतकार श्रीनिवास खळे यांची, तर अरेंजमेंट ही सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक व अरेंजर अनिल मोहिले यांची आहे. स्वरमंडळ, सतार, बासरी, गिटार, तबला या वाद्यांचा प्रामुख्याने अंतर्भाव दिसतो. यातील सतार ही ज्येष्ठ सतारवादक अरविंद मयेकर यांनी उत्तमरीत्या वाजवली आहे. मयेकरांनी शेकडो हिंदी चित्रगीतांमध्ये सतारवादन केले. या वाद्यमेळातील आणखी एक लक्षणीय सहभाग म्हणजे बासरी. ते काम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकप्रिय बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी केले आहे. मयेकरांची सतार ही तर गाण्याची सुरुवात आहे. अरविंद मयेकर हे गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांचे पती. या गाण्याची म्युझिक अरेंजमेंट हेसुद्धा एक ‘कम्पोझिशन’ आहे. शब्द, गायन, चाल ही बलस्थाने आहेतच; त्याचबरोबर अरेंजमेंटमुळे हे गीत आणखी वरच्या स्तरावर पोहोचले. अरेंजर अनिल मोहिले यांचे कौतुक करताना शब्द कमी पडतील. ते म्युझिक पीसेस काढण्यामध्ये एकटाकी होते. एकदा लिहिलेलेच फायनल असे. कुठेही खोडाखोड नाही. पक्का विचार आणि दांडगा आत्मविश्वास हे त्यांचे विशेष गुण. ‘अचूक’ हा त्यांच्या कामाचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द आहे.
कधी कधी ऋ तूसुद्धा माहेरपणाला येतो, असे शब्द व संगीत या गीतामध्ये आहे. श्रावण ऋ तूला झालेला आनंद पाडगांवकरांच्या शब्दांतून व्यक्त झाला आहे. जणू तो ऋ तू आपल्याशी बोलतोय असे जाणवते. पाऊसभरले वातावरण आहेच. त्यात राधा-कृष्णाच्या प्रीतीची भावना अलगद मिळून आली आहे. ‘थेंबबावरी नक्षी’मध्ये सलज्ज गूज दिसते. राधेला श्याम भेटतो ही भावना जळी-स्थळी आहे. हिरवा मोरपिसारा उलगडला आहे. त्यातील ‘अवचित’ या शब्दाने आनंद अधिक गहिरा केला आहे. ‘गंधित वारा’ हा केवळ झुळूक म्हणून येत नाही; तो गतजन्मीची ओळख.. खरे म्हणजे निरोप वा संदेश घेऊनच येतो. एरवी निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींमध्येही श्रावणामुळे ‘जान’ ओतली आहे. ‘पाचूच्या हिरव्या माहेरी’मध्ये हिरवा चुडा किणकिणतो आणि ‘हळदीचे ऊन’ हे शकुन घेऊन येते. यापुढे माझ्या भाळावर पडलेला कोणताही थेंब हा फुलपाखरूच होणार, हे जणू विधिलिखित दिसते. ‘गगनाच्या गाभाऱ्या’मध्ये चराचरात दिसणाऱ्या ईश्वराची पूजा ही आज मृदगंध लावूनच होणार. मृदगंधाचे रूपांतर कपाळी लावण्याच्या गंधात होणार. त्याशिवाय मृदगंध हे ‘त्या’ घराण्याचे अत्तर आहेच. पानावरील रेषा म्हणजे शब्दावाचून भाषा आहे. अशा वातावरणात हवाहवासा वाटणारा ‘अनाहत’ नाद निर्माण होणारच. हा संगीतातला नाद आपल्याला गाण्यामध्ये बांधून ठेवतो. ईश्वराने श्रावण चितारण्यासाठी कॅनव्हास उपलब्ध केला, कवी मंगेश पाडगांवकरांनी तो शब्दात मांडला व संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्यात स्वरांचे रंग भरले आणि गायिका लता मंगेशकर यांच्या सुस्वर आवाजाने श्रावण थेट आपल्या मनामनांत पोहोचला.
गाणे ऐकताना जाणवते, की त्यातला स्थायिभाव संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वररचनेतून व्यक्त केला आहे. प्रत्येक कडव्याच्या स्वरात ‘मृदुता’ पसरलेली दिसते. गाण्यात सांगीतिक जागा दिसतात. या जागा, हरकती अतिशय मृदू व तरल आहेत. काही ओळींमध्ये स्वररचना करताना ‘तीव्र’ मध्यम या स्वराचा केलेला उपयोग म्हणजे रिमझिम धारा सुरू असताना कोवळ्या उन्हाची हळूच पसरण दिसावी, असे वाटते. सृष्टीतील असा चमत्कार ‘इथे पाहू की तिथे पाहू’ अशी मनाची अवस्था होते. अचानक सप्तसूर सात रंगही धारण करतात व आभाळभर उमटतात. चारही अंतऱ्यांची चाल वेगवेगळी आहे. संगीतकाराला हे सुचते कसे, या प्रश्नाचे उत्तर सापडण्यासाठी संगीतकाराच्या प्रतिभेचा शोध व वेध घ्यावा लागतो. खळे हे ‘खळे दिसतात’ ते अशा गाण्यांमध्ये. या गाण्यामध्ये अनेक शब्द हे शास्त्रीय जागा व हरकती घेऊन आलेले आहेत. रेशीमधारा आणि मोरपिसारा या मुखडय़ातील शब्दांसारख्या जागा ठायी ठायी दिसतात. त्यात पुन्हा चालीचे कुळशीळ जपलेले आहेच. गाणे हे तालाशी नजाकतीने खेळते असेच दिसते. हे खूप कठीण आहे हे गाणे गाताना व वाजवताना समजते. पण कधी तरी या आनंदाच्या ‘समे’वर यावे, असे प्रत्येक कलाकाराला वाटते. ॠतूच्या व संगीतकाराच्या नावात ‘श्र’ हे अक्षर आहे म्हणून गाण्यात ‘श्रीरंग’ आहे!
खळेसाहेब सांगायचे, ‘‘कवितेला किंवा गीताला चाल लावताना मी कवीला काय म्हणायचं आहे, याचा विचार करतो. कवीचं काव्यच माझ्याशी बोलू लागतं. त्यातल्या शब्दांना संगीत देण्यापेक्षा त्या गीतातल्या भावनांना सूर देण्याचा मी प्रयत्न करतो. शब्दांमधील लय आणि त्यावर आंदोलित होणाऱ्या स्वरांकित भावना यांचा खेळ मी स्वत: अनुभवतो. त्यातूनच माझी चाल तयार होते.’’
मंगेश पाडगांवकर एका कवितेत सांगतात :
‘नाद शब्दांचा वाहतो कवितेच्या ओळीतून
फुलपाखरू हे फिरे तसे फुलाफुलातून
गुणगुणत ठुमरी वाट तांबडी निघाली
जशी रेशमाची लड उलगडत चालली’
हे गाणे पुन्हा पुन्हा ऐका. पाडगांकरांचे शब्द पुन्हा पुन्हा वाचा. प्रत्येक ओळीतले संगीत ऐका. वाद्यांमधील नादमय चित्र पाहा. वाद्यांच्या स्वररचनेतील ठहराव ऐका, तोसुद्धा अर्थपूर्ण आहे हे समजते. ताल आणि लय या गोष्टी तर कान देऊन ऐका. आजच्या भाषेत ‘गाण्याचा टेम्पो’ मनात भरून घ्या. शास्त्रीय जागांचा भक्कम आधार घेऊन केलेले, श्रेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे, प्रत्येक शब्दाचे मृदू-मधूर उच्चारण ऐका. सारे काही विलक्षण आहे. दाद कवीला, संगीतकाराला, संगीत संयोजकाला, सर्व वादकांना आणि गायनाला द्यावीच लागेल.
या सर्व कलाकारांना ‘अंतर्यामी सूर गवसला’ हेच खरे आहे!
विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com