आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ पालेभाजी मानली आहे. मोहरीची पालेभाजी सर्वात कनिष्ठ मानली आहे. पथ्यकर पालेभाज्या-
अळू: अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे ‘रक्त’ वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चोथा थापावा व पोटात रस घ्यावा. वेदना कमी होतात. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्याजागी बांधावी. गळू फुटतात.
अंबाडी: अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे. पण डोळ्याचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.
करडई : करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एकवेळ लघवी साफ होते. मात्र डोळ्यांचे व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी ‘सफोला’ या ब्रँडनावामुळे झाली आहे. त्यांत तुलनेने उष्मांक कमी असतात.
कुरडू: कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. तशीच त्याची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. कुरडूच्या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळ्या पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.
कोथिंबीर: कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा वापर हा प्रामुख्याने खाद्य पदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदा सर्वदा, सकाळ-सायंकाळी पोळी, भाकरी, भात सोडून सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी. तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रूची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये, याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअ‍ॅक्शन  येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो, त्यावेळेस कोथिंबीर स्वच्छ धुवून वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबीरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. कोथिंबिरीची भाजी ही पथ्यकर भाज्यांत अग्रस्थानी आहे.
घोळ: घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते. यकृताचे कार्य सुधारते. रक्ती मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीचे विकारांत उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारांत पाने वाटून त्याचा लेप लावावा.
चाकवत: चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यात आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात. पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारीत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.
चुका : बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता आळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.