मेदस्वी माणसाने गोवारीच्या शेंगा नुसत्या वाफारून घेऊन खाव्यात. गोवारीची कडू जात म्हणजे बावची होय.
श्रावण घेवडा: श्रावणघेवडा ही थंड गुणाची, वातवर्धक व पित्तशामक भाजी आहे. मलमूत्र साफ होत नसेल तर ताज्या व कोवळ्या घेवडय़ाची एक वेळ भरपूर भाजी खावी. एक टाइम पोट साफ होते. लघवी सुटते.
घोसाळी : घोसाळी भज्यांकरिता प्रसिद्ध आहेत. याशिवाय घोसाळ्याची कडू चवीची जात जास्त उपयुक्त असते. घोसाळ्याची भाजी खाऊन लघवी साफ होते. छातीत खूप कफ झाल्यास उलटी करविण्याकरिता घोसाळ्यांचा रस प्यावा. त्रास न होता उलटी होते. पोट साफ होत नसल्यास घोसाळ्याची भाजी रात्री खावी. पोट साफ होते. जीर्ण जुनाट, चिघळलेल्या जखमा असणाऱ्या रुग्णांनी घोसाळ्याची भाजी खावी. जखमा लवकर भरून येतात. यकृत किंवा प्लीहा हे अवयव वाढल्यामुळे पोट मोठे झाल्यास घोसाळ्याची शिजवून बिनतेलातुपाची भाजी किंवा नुसता रस प्यावा. पोटाची सूज कमी होते.
वजन कमी करण्याकरिता घोसाळी उकडून त्याचे तुकडे मोठय़ा प्रमाणावर खावे. पोट फुगणे, खडा होणे, स्वप्नदोष, लघवी अडखळत किंवा तिडीक मारून होणे, उष्णतेच्या कामामुळे थकवा येणे या तक्रारीत घोसाळी ही पथ्यकर भाजी आहे.
टिंडा : ही एक पथ्यकर भाजी आहे. टिंडय़ाची भाजी घेवडय़ाप्रमाणेच पित्तशामक, शीत गुणाची, रुची उत्पन्न करणारी आहे. आजारी माणसांनी टिंडा भाजी खावी. टिंडा भाजीसोबतची पोळी अंगी लागते. आहार वाढतो. क्षुब्दोध उत्पन्न होतो.
टोमॅटो : टोमॅटोला फार पूर्वी कोणी बेलवांगे म्हणत. का? त्याचा कार्यकारणभाव लागत नाही, पण शरीराच्या सार्वत्रिक वाढीकरिताच वांग्यासारखा टोमॅटोचा उपयोग होतो, याबद्दल दुमत नाही. टोमॅटोमुळे रुची उत्पन्न होते. अग्निवर्धन होते. शरीर सुकले असताना टोमॅटोचा रस हा एक सहारा आहे. ज्यांना कोणत्याच पदार्थावर वासना नाही, पांडुता आहे, त्यांना टोमॅटोचा रस उत्तम काम देतो. रक्त बिघडणे, दातातून रक्त येणे, हिरडय़ा झिजणे, रक्त येणे या तक्रारीत टोमॅटो द्यावा. सोबत आल्याचा तुकडा द्यावा. तापामध्ये टोमॅटोचे ‘औषधी सार’ द्यावे. दोन मोठे टोमॅटो व दोन कप पाणी कल्हईच्या पातेल्यात मंद आचेवर उकळत ठेवावे. शिजवून नरम झाल्यावर त्याच पाण्यात एकजीव झाल्यावर कोळावे. चवीपुरते कोथिंबीर, जिरे, आले व साखर मिसळावी, तूप, जिरे, हिंगाची फोडणी द्यावी. पंडू व अशक्तपणात हे सार उत्तम काम देते.
मांसाहार करणाऱ्यांकरिता टोमॅटो फार उपयुक्त आहे, नव्हे आवश्यक आहे. मांसाहारामुळे होणारी जळजळ, लागणारी खूप तहान, पोट जड होणे; याकरिता जोडीला टोमॅटो ‘माफक’ प्रमाणात हवा. सुका खोकला, मेदस्वी शरीर यावर रस धातू वाढविण्याकरिता टोमॅटो खावा. गर्भवती स्त्रीने १०० ते २०० ग्रॅम टोमॅटो नियमित खावा. गर्भाचे उत्तम पोषण होते. मानसिक श्रम, अशांत झोप असणाऱ्यांनी टोमॅटोच्या फोडी नियमितपणे खाव्यात. पोटात वायू धरण्याची खोड ज्यांना आहे, मुतखडा असणाऱ्यांनी टोमॅटो वज्र्य करावा. टोमॅटोसोबत हिंगपूड व मीठ वापरावे. टोमॅटो बाधत नाही. आंबट टोमॅटो पूर्णपणे वज्र्य करावा.
तोंडली : तोंडली या वेलाची फळे, पाने व मूळ औषधी उपयोगाची आहेत. तोंडल्याच्या मुळांचा रस सैंधव चूर्ण मिसळून घ्यावा. मधुमेहावर उपयुक्त आहे. मधुमेही रोग्यांकरिता भाजी उपयुक्त आहे. पोटभर खावी. गरोदर स्त्रियांना क्वचित विटाळ दिसल्यासारखे वाटले तर लगेच तोंडल्याची भाजी खावी. विटाळ थांबतो. जिभेला कात्रे पडले असल्यास पानांचा रस जिभेला लावावा. पानांचा रस व्रणरोपणाचे काम करतो. पाने वाटून जखमेवर बांधावी, पोटात रस घ्यावा. बाळंतिणीला भरपूर दूध येण्याकरिता तोंडल्याची भाजी उपयोगी पडते. पातळ जुलाब होत असल्यास, तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठ पाणी घ्यावे. काविळीत तोंडल्याची भाजी पथ्यकर आहे. मधुमेहात पायांची आग होते. ती थांबवण्याकरिता तोंडल्याची भाजी खावी. मार, मुरगळा, सूज याकरिता तोंडल्याचे वाटून शिजवून पोटीस करून बांधणे. तोंडली खाल्ली तर बुद्धी कमी होते हा समज चुकीचा आहे. स्त्रियांच्या धुपणी या विकारात तोंडल्याच्या मुळांचा काढा घ्यावा. मूत्रेंद्रिय, जननेंद्रियांच्या विकारात व्रणरोपण, रक्तसंग्रहणाच्या कार्यात तोंडल्याची भाजी उपयुक्त आहे.
तांबडा भोपळा : तांबडा भोपळा बालकांकरिता टॉनिक आहे. पचावयास हलका, शिजवायला सोपा, सोबत कोथिंबीर, मिरची, मीठ एवढी तोंडीलावणी पुरतात. तांबडय़ा भोपळ्याची भाजी खाल्ली की तोंडाला रुची येते. रसधातू कमी झाला असता ही भाजी आवश्य खावी. भोपळा शुक्रवर्धक आहे. नेहमी उकडून खावा. एकदम खूप खाऊ नये. भस्मकाग्नी किंवा ज्यांना कितीही खाल्ले तरी भूक असते, त्यांनी तांबडा भोपळा खावा. तांबडा भोपळा उकडून कणकेत मिसळून केलेल्या दशम्या लांबच्या प्रवासात फार उपयुक्त आहेत. त्या बरेच दिवस टिकतात. बियांतील मगज पौष्टिक व चविष्ट आहे. जंत झाल्यास या बिया खाव्या, नंतर एखादे रेचक घ्यावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा