– सई हलदुले बोंवां
स्वित्झर्लंड हा मध्य युरोपमधला जागोजागी दृश्यश्रीमंतीच असलेला देश नाही, तर जगभरातील विकसित देशांपैकी एक. आर्थिक सुबत्तेबरोबर राहणीमानातही तो अग्रेसर का, याची शोधली तर अनेक उत्तरे मिळतील. छोटासा मासला म्हणून तिथल्या विद्यामान खासदाराच्या मराठी पत्नीने मांडलेल्या जगण्याच्या नोंदी. त्याचबरोबर इतरत्रही सत्तेच्या धुंद-मंद अवस्थेत न जगता कपडे वाळत घालणारे पंतप्रधान, बससाठी रांगेत उभे राहणारे मंत्री, सायकलवरून कामावर जाणारे आमदार असे चित्र दिसते. बदल घडविण्याच्या आणाभाकाच वाटत फिरणाऱ्या गल्लीतल्या नगरसेवकांचे सुमारस्तोम आणि पुष्पवृष्टींचे बेगडी सोहळे पाहण्यास सरावलेल्या आपल्या नजरांसाठी ‘दिव्या’ला लांबून नमस्कार करणाऱ्यांचे जग…
व्हिन्सेंटशी ओळख झाली तेव्हा स्वित्झर्लंडच्या एका राजकीय घराण्यातल्या तिसऱ्या पिढीशी आपण बोलतो आहोत याचा मागमूसही मला नव्हता. त्याचे आजोबा पूर्वी स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती होऊन गेले याची काहीच कल्पना नव्हती.
दहावीनंतर म्हणजे साधारण सोळा-सतरा वर्षांची असल्यापासून कळत-नकळत निवड केलेल्या माझ्या भटक्या जीवनशैलीमुळे मी खूप फिरले – अभ्यास, संशोधन आणि कामासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्यही केलं. व्हिन्सेंटला भेटले तेव्हा म्हणजे साधारण दहा वर्षांपूर्वी मी जिनिव्हालगत असलेल्या फ्रान्सच्या ‘फेरनी – वोलतेर’ नावाच्या टुमदार गावामध्ये एका स्विस-फ्रें च दाम्पत्याच्या घराची एक खोली भाड्याने घेऊन राहात होते. जिनिव्हामधल्या युनाइटेड नेशन्सच्या मुख्यालयामध्ये जर्मन विद्यापीठाच्या वतीने मी माझा प्रोजेक्ट करत होते. यासाठी मी रोज फ्रान्सची हद्द पार करून स्वित्झर्लंडमध्ये जात असे. व्हिसा प्राप्त करण्याची नुसती गरज नाही असं नसून, राष्ट्रीय सीमेच्या माझ्या डोक्यात असलेल्या कल्पनाच या रोजच्या अर्ध्या तासाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाने पूर्णत: बदलून गेल्या होत्या. व्हिन्सेंटशी ओळख झाल्यावर या आणि अशा माणसामाणसांमधल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक सीमा किती फोल असतात याचाही मला प्रत्यय आला.
सांस्कृतिक धक्का
माझ्या तेव्हाच्या शेजारणीशी बोलताबोलता व्हिन्सेंटचं आडनाव तिला कळताच ती मला म्हणाली, ‘‘अगं, हा बहुतेक स्वित्झर्लंडचे माजी राष्ट्रपती रॉजर बोंवां यांचा नातू दिसतो!’’ अनेक वर्षं परदेशात राहूनसुद्धा मी मूळची भारतीय असल्यामुळे मला धक्का बसला. कारण त्याच्या आदल्याच दिवशी व्हिन्सेंटनी मला लग्नाची मागणी घातली होती आणि ती मी मान्यही केली होती. दुसऱ्या दिवशी त्याला त्याबद्दल विचारलं तर, ‘‘हो, पण त्यात काय विशेष आहे?’’ असं त्यानं मला सांगितलं. स्विस राजकारणी आणि स्विस माणूस यांच्या मितभाषी आणि काहीशा भिडस्त स्वभावाशी ही माझी पहिली खरी ओळख.
याच काळात जिनिव्हामधल्या एका गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेले असता माझं पाकीट चोरीला गेलं. दुर्दैवानं त्या वेळेस त्यात माझं जर्मनीचं ‘रेसिडेन्स परमिट’ही होतं. व्हिसाच्या इंटरव्ह्यूसाठी मला स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे बोलावलं होतं. बर्नमध्ये ट्रामवर चढताच व्हिन्सेंटनी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका स्मार्ट, ब्रीफकेसधारी, उभ्याउभ्या वर्तमानपत्र वाचनात मग्न असलेल्या मध्यमवयीन गृहस्थाला डोळ्यानं खुणावलं. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं, पण नक्की काही आठवेना. काही वेळानंतर ते पेपरची घडी करत शांतपणे खाली उतरले. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘हे आमचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष.’’ हा इथल्या राजकारणसंस्कृतीचा बसलेला दुसरा आश्चर्याचा धक्का आणि ती स्वित्झर्लंडच्या राजकारणाशी झालेली दुसरी ओळख.
स्वित्झर्लंडचं ‘पॉलिटिकल कल्चर’ मला परिचित असलेल्या भारतीय तसेच माझी ओळख असलेल्या जपानी, जर्मन, ब्रिटिश किंवा फ्रेंच राजकीय संस्कृतींपेक्षा खूपच वेगळं आहे. स्विस संस्कृतीत तिथल्या लोकांचा सामान्यत: नम्र आणि भिडस्त स्वभाव असला, तरीही वैयक्तिक आणि प्रादेशिक स्वयंनिर्णयाची अतिशय तीव्र भावना दिसून येते. सर्व बाजूंनी खेटून उभ्या असलेल्या देशांच्या तुलनेमध्ये लहानसे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या असूनसुद्धा स्विस लोकांची त्यांच्या जन्मभूमीशी आणि चारही भाषांशी (स्विस-जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमांश) अतिशय सखोल अशी वैयक्तिक बांधिलकी आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाची पाळंमुळं या संपूर्ण राष्ट्रामध्ये अतिशय खोल रुजलेली आहेत.
आजपर्यंत फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ऑस्ट्रिया या युरोपीय महासत्तांनी वेढलेल्या या छोट्या जमीनबंद देशानं फार कष्टानं आणि चातुर्यानं आपली लोकशाही टिकवून ठेवली आणि विकसित केली. फार कमी देशांमध्ये अस्तित्वात असलेली ‘डायरेक्ट डेमोक्रसी’ येथील स्थायी व्यवस्था आहे. स्विस जनता लोकशाही मताचं महत्त्व जाणतेही आणि आणि मतपेटीमधून आपण दृश्य बदल घडवून आणू शकू याची खात्रीही बाळगते. कदाचित याच कारणामुळे राजकारण हासुद्धा अन्य व्यवसायांसारखाच मानला जातो. दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणणं हे स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय संसदेच्या निवडून आलेल्या सदस्यांची पक्षीय जबाबदारी आणि नैतिक कर्तव्यं म्हणून स्वीकारलं जातं.
असं म्हटलं जातं की, फ्रेंच राजकारणाच्या आकर्षकपणाशी, इटालियन राजकारणाच्या देखण्या शैलीशी आणि जर्मन राजकारणाच्या कार्यक्षम तर्कशक्तीच्या तुलनेत स्विस राजकारण नीरस वाटतं. याचं फारसं प्रसिद्ध नसलेलं आणि थोडंफार धक्कादायक कारण म्हणजे स्विस लोकशाही ही कदाचित जगातील एकमेव लोकशाही असेल जिथे लोक मतदान करतात ते फक्त काहीही बदलू नये म्हणून. कारण यापूर्वी आखून दिलेली व्यवस्था ही जवळपास घड्याळासारखी काम करते. २०२१/२२ पर्यंत, आर्थिक यश, तांत्रिक विकास आणि सामाजिक सुरक्षेची थोडीफार बदलणारी राजकीय आश्वासनं या गोष्टी स्विस जनतेसाठी पुरेशा वाटत होत्या. कारण त्यामुळे त्यांना निरोगी आणि शांत भविष्याची हमी मिळत होती. स्विस राजकारणी आणि स्विस जनता या यथास्थितीत समाधानी दिसत होते. तथापि आल्प्समध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा सततचा खळखळाट, हे त्यांच्यासाठी चिंतेचे एक गंभीर कारण बनत होतं.
झाकळुनी जळ गोड काळिमा
‘फे ग्लेशियर’ही स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठ्या हिमनद्यांपैकी एक. या हिमनदीच्या कुशीत असलेल्या व्हिन्सेंटच्या वडिलोपार्जित घराला भेट देणं हा आमच्या लग्नानंतर पार पडलेला मोठा सोहळा. ‘सासेर-विस्पा’ नदीच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या शांत घरात, त्याच्या आजीबरोबर झालेल्या संभाषणामध्ये अनेकदा बर्फाच्छादित शुभ्र पर्वत शिखरे आता अधिकाधिक काळासाठी बर्फहीन आणि तपकिरी होत चालल्याबद्दलची खंत प्रत्येकजण व्यक्त करीत असे. त्या वेळी नव्वदीच्या घरात असलेल्या व्हिन्सेंटच्या आजीला ‘फे’ हिमनदीतून उगम पावलेल्या ‘सासेर विस्पा’चा खळखळाट कर्कश आणि कान बधिर करणारा वाटत होता. ‘पाणी’ या शब्दाला दुसरा समानार्थी शब्द ‘जीवन’ हा आहे. कडेकपारीतून, काळ्या कातळाला मिठ्या मारत कायम पुढे धाव घेण्याऱ्या पाण्याचा प्रवाही खळखळाट ऐकत ऐकतच मी मोठी झाले. या खळखळाटातून उडणारे तुषार आणि त्यातूनच तयार होणारं इंद्रधनुष्य याचं वर्णन करण्यासाठी कुठल्याही भाषेत योग्य शब्द सापडत नाहीत. पण हाच खळखळाटी आवाज म्हणजे काळोख्या, थंड निसर्ग मृत्यूची पहिली चाहूल असते हा भयाण सत्यस्पर्श मला प्रथम जाणवला तेव्हा माझ्या संवेदना बधिर झाल्या. नदीच्या खळाळत्या पाण्यानं दर्शविलेल्या बदलाचा अर्थ असा होता की, मनुष्यनिर्मित हवामान बदल आता अक्षरश: आमच्या पायरीवर येऊन ठेपला आहे. हा प्रचंड बदल कदाचित माझ्या आजेसासूबाईंच्या पिढीला सर्वात जास्त जाणवत होता, कारण सरलेला काळ त्यांनी फक्त पडद्यावर किंवा पुस्तकातून अनुभवला नव्हता तर तो खुद्द जगला होता.
याच सुमारास ग्रेटा थनबर्ग या तरुण, सुप्रसिद्ध पर्यावरण लढवय्यीने ‘फ्रायडेझ फॉर फ्युचर’ नावाचे मोर्चे जगभरामध्ये काढले. या तरुणीच्या धैर्यानं स्वित्झर्लंडमधील वेगवेगळ्या वयोगटांतील, सामाजिक स्तरांतील आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या असलेल्या महिलांना प्रभावित केलं. या महिलांशी साधलेल्या संवादातून मला जाणवलं की, थनबर्गच्या चळवळीला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याला दोन महत्त्वाची कारणं होती. एकीकडे हा शाश्वत विकासासाठीचा तीव्र लढा होता, तर दुसरीकडे हा पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्धचा महिलांचा एकत्रित आवाज होता.
परिणामी, या दोन्ही प्रवृत्ती एकवटल्यानं हवामान बदलाची जाणीव झालेल्या ज्येष्ठांनी आणि एकत्रित आवाज उठवणाऱ्या महिलांनी आपल्या मताधिकाराचा अधिक जागरूकपणे वापर केला आणि त्यातून स्वित्झर्लंडमधील राजकारणात लक्षणीय बदल घडू लागले. स्वित्झर्लंडसारख्या वृद्ध होत असलेल्या ‘स्थिर’ समाजात राजकीय बदल अवघड असला तरीही, हवामान बदलामुळे दैनंदिन जीवनावर झालेले दृश्य परिणाम आणि निसर्गाचे स्पष्टपणे बदलणारे रूप या दोन्ही गोष्टींनी जुन्या पिढीच्या दृष्टिकोनात जाणवेल इतका बदल घडवून आणला. या बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाला प्राधान्य देणारी ‘ग्रीन पार्टी’ राष्ट्रीय राजकारणाच्या रचनेमध्ये आणखी ठळकपणे दाखल झाली.
अनपेक्षित राजकीय बदल
प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा २०२१-२२ मध्ये व्हिन्सेंटनं आमच्या राज्याच्या निवडणुकीसाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला; तेव्हा त्याच्या विजयाची शक्यता खूपच कमी वाटत होती. व्हिन्सेंटच्या कुटुंबाची मोठी राजकीय पार्श्वभूमी असूनसुद्धा ‘ग्रीन पार्टी’च्या सदस्यानं कार्यकारी सत्तेवर निवडून येण्याची कल्पनादेखील अविश्वसनीय वाटत होती. प्रचार मोहीम दीर्घ असून, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा कठीण होती. राजकीय डावपेचही खूपच गुंतागुंतीचे होते. आम्ही सगळ्यांनीच जणू एका नवीन आणि पूर्णत: अनोळखी प्रदेशामध्ये पाऊल टाकले होते. त्यामुळेच एक उमलतं कुटुंब आणि दोन करियरचा सांभाळ करत असताना, काही महिन्यांच्या संघर्षानंतर मी माझ्या करिअरला काही काळापुरता विराम देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, पण आम्हाला आमच्या दोन्ही कुटुंबांचा ठाम पाठिंबा मिळाला. आणि राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून अधिक शाश्वत भविष्य घडवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी व्हिन्सेंटनी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला.
२०२१ आणि २०२२ या स्थानिक आणि राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये राजकारण पंडितांचे सगळे हिशेब आणि अंदाज उधळून लावून व्हिन्सेंटनं दोन्ही निवडणुका जिंकल्या आणि ग्रीन पार्टीनं प्रचंड मुसंडी मारली. ती लाट इतकी अजस्रा होती की, स्वित्झर्लंडमधल्या माध्यमांनी त्याला ‘सुनामी’ची उपमा दिली. या लाटेचा एक सूत्रधार व्हिन्सेंटही होता. निवडून आलेल्या त्याच्या इतर अनेक सहकाऱ्यांबरोबर ‘एक, दोन, साडे-माडे… शंभर!’ अशी मोठी झेप घेऊन तो एकदम ‘एक्झिक्युटिव्ह पॉवर’चा खुर्चीपर्यंत जाऊन पोहोचला.
शुभ्र दिव्याची सायकल
भारतातील मित्र आणि नातेवाईक अनेकदा आम्हाला विचारतात की, इतकी सोशल आणि प्रोफेशनल रिस्क पत्करून काय मिळवणार आहात? खरं सांगायचं झालं तर याचं तर्कशुद्ध उत्तर माझ्याकडे आजही नाही. सामाजिक कृतज्ञता आणि नैतिकतेनं परिपूर्ण कर्तव्यनिष्ठ मार्गावरून व्हिन्सेंट आणि त्याचे सहकारी चालत आहेत. या सगळ्यांनी शाश्वत विकासाचं क्षितिज वेधून टाकणारं स्वप्न बघितलं आहे. त्यामुळे मग ‘‘आता लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार का?’’ या आणि अशा प्रश्नांचं उत्तर मी कधीच देऊ शकले नाही. व्हिन्सेंटच्या या राजकीय भरारीचं रूपांतर लाल दिव्याची गाडी, सोन्याची पेढी किंवा छोटीशी गढी यात होण्याची शक्यताही नाही आणि तशी अपेक्षाही नाही. एखाद्या सरकारी गाडीच्या सायरनपेक्षा कामाच्या कडकडाटाची सवय आणि अपेक्षा आहे. छोट्याशा शुभ्र दिव्याची सायकल घेऊन जग बदलायला निघालेल्या व्हिन्सेंटकडून स्वित्झर्लंडमध्ये मला एक नवीन, आश्वासक राजकीय अनुभव मिळतो आहे. शाश्वत विकासाच्या अशाच शुभ्र दिव्याच्या सायकली जगभर हळूहळू पसराव्यात आणि एका सुवर्ण भविष्याकडे जाणाऱ्या वाटेला हरित कंदील मिळावा हीच या चराचर सृष्टीकडे माझी प्रार्थना!
saee.officiel@gmail.com