स्नेहा अवसरीकर

गणेश मतकरी हे आजच्या काळात सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकांमधील महत्त्वाचं नाव. अलीकडेच प्रकाशित झालेला ‘तडा’ हा त्यांचा सहावा कथासंग्रह. या संग्रहात सुरुवातीला एक कोट दिलाय, त्याकडे लक्ष वेधलं जातं. ‘देअर इज अ क्रॅक, अ क्रॅक इन एव्हरीथिंग. दॅट्स हाऊ द लाइट गेट्स इन’ (लेनर्ड कोएन, अँथम). या पुस्तकातल्या कथेत असा क्रॅक आहे, तडा आहे, तो लेखकाला दिसला आहे आणि त्यातून त्याची कथा थेट समोर आलीय. ‘तडा’, ‘थाप’, ‘जॉब’, ‘ओळख’, ‘हद्द’, ‘सीक्रेट’, ‘फ्रेश स्टार्ट’, ‘नाउ यू सी मी’ या पुस्तकातल्या आठ कथा अशा रोजच्या जगण्यात नकळत तडा गेलेल्या घटनांच्या आहेत. या सगळ्याच कथा लेखकाचे या अगोदरचे लेखन विशेष अधोरेखित करणाऱ्या आहेतच, शिवाय या कथांमधून त्याची शैली, भाषा आणि लेखन विषय, कथन अधिक सराईत, उत्तम रीतीने समोर आले आहे. एकाच वेळी समकालीन भासणाऱ्या या कथा लिहीत असताना लेखक भूतकाळातल्या अनेक घटना, गोष्टी ज्या पद्धतीने लिहितो, मांडतो आहे, त्यावरून त्याचे कथालेखनावरचे प्रभुत्व जाणवते आहे.

‘तडा’ ही या संग्रहातली पहिली कथा. या कथेला हल्ली आपल्या आसपास नेहमी होत जाणाऱ्या रियुनियनची पार्श्वभूमी आहे. रियुनियनसाठी भेटणारे मित्र गावात पोचत असतानाच एका मित्राचा अपघात होतो. अर्थातच ठरलेला कार्यक्रम होतच नाही. कथेचा नायक अन् त्या सोबतचा मित्र, मित्राच्या अपघाताच्या निमित्ताने गावातल्या जुन्या ठिकाणी पोचतात. ओघाओघानेच गावातल्या कब्रस्तानातल्या अफवा आणि घटनांभोवती गप्पा सुरू असताना नायकाच्या आयुष्यातल्या जुन्या घटनेचा संदर्भ लागतो. काळ निघून गेल्यावर हाती लागलेल्या या नव्या सत्यानेच नायकाच्या जगण्याला तडा गेलेला दिसतो, अशी ही कथा. पण वाचकांना मात्र कथेतल्या घटितांचा शेवटपर्यंत थांग लागत नाही. सर्व काही सामसूम, शांततेत आणि सुरळीत घडत असताना नकळत त्या शांत वातावरणाला तडा जाणारी ही घटना नुसती समजते आणि आपल्या समोर लेखकाने न लिहिलेलं वेगळं नाट्य उभं राहतं. या नाट्यात लेखक फार सामील होताना दिसत नाहीच. केवळ काही दृश्यं वाचकांच्या कल्पनेतून साकार होतात. अन् एका वेगळ्या कथेचा अनुभव घेता येतो.

भूतकाळातल्या जुन्या घटना वर्तमानकाळात आणण्यासाठी लेखकाची लिहिण्याची जी रीत आहे ती फार रोचक आहे. कारण पात्र, भाषा, परिसर, वातावरण यात कुठलाही बदल न करता लेखक केवळ मानसिक आंदोलनातून या नव्या-जुन्या काळात सहज वावरतो. हे लेखकाचे विशेष कौशल्य म्हणावे लागेल. हीच नव्हे इतरही कथा समकालीन वातावरणात घडत असल्या तरी त्याला जुन्या स्मरणातल्या काळाचे, घटनांचे, पात्रांचे संदर्भ आणि सहभाग लेखक कुशलतेने रेखाटतो. लेखकाचे अनुभव, त्या अनुभवाला असणारा काळाचा बांध, स्मृती आणि आठवणी, भूतकाळात साठलेल्या गोष्टी वर्तमानात अचानक आठवणीत येत असताना त्याच वर्तमानात असणारं कनेक्शन… या सगळ्यांचा लेखक म्हणून केलेला विचार अत्यंत कुशलतेने केलेला दिसतो.

अत्यंत तटस्थतेने परिस्थिती चित्रित करणारी लेखकाची वृत्ती जेव्हा कथा विषयाच्या गरजेनुसार संवेदनशील, हळव्या जागा निर्माण करते तेव्हा फार प्रभावी ठरते. गणेश एकूणच कथा लेखनात अचूक कथा विषय मांडताना मधूनच एखाद्या वाक्यातून, पात्राच्या कृतीतून अशी वाचकांच्या मनाला स्पर्शून जाणारी जागा तयार करतात. आणि त्यातून कथेचा परिणाम साधला जातो.

याच संग्रहातली ‘फ्रेश स्टार्ट’ ही कथाही उल्लेखनीय. कथा विषय, आशय हा विषय काही वेळा बाजूला ठेवत कथेची हाताळणी लेखक किती प्रगल्भतेने करतो, याचं उदाहरण म्हणून या कथेकडे पाहता येईल. शिवाजी पार्कवर फिरणारा नायक त्याच्या आयुष्याकडे बघत असतो. शिक्षण, कॉलेज, आर्थिक परिस्थिती, स्वप्न, भविष्य, मित्र, घरातली ज्येष्ठ माणसं आणि या सगळ्यासह जगत असताना येणारे यश, अपयश याकडे नायक पाहत असतो. आपलीच जवळची मैत्रीण जवळच्या यशस्वी मित्राबरोबर लग्न करते, त्यामुळे तडा तर येतोच, पण नायक म्हणतो, सगळंच संपलं की नवी सुरुवात करता येते. फ्रेश स्टार्ट. तडा पडला की नवा प्रकाशही दिसतो.

गणेश चित्रपटांचे समीक्षक, अभ्यासक असल्याने असावे, त्यांची कथा अतिशय धिमेपणाने समोर येते- तीही अतिशय सिनेमॅटिक पद्धतीने. कथेच्या फ्रेम सलग समोर येतात, काहीही घडत नसताना एकदम नायकासह वाचकही एखाद्या गोष्टीला, घटनेला सामोरे जातात. अन् मग सगळी कथा प्रभावीपणे एकत्रित समोर येते. हे विशेष सांगावेसे वाटते.

बाकी गणेश यांची कथा वाचणं म्हणजे खरं तर ड्रायव्हरशेजारी बसून त्याचं सफाईदार ड्रायव्हिंग अनुभवत राहणं. ते फार सरप्राइज देत नाहीत. पण तरी शेवट कुठे घेऊन जातील, याचा अगोदर अंदाज लागत नाही. ते आडवळणाने कथा पुढे नेत गुंते तयार करत नाहीत. तरीही अतिशय उत्सुकतेने आपण त्यांच्या कथेमागे जात राहतो.

लेखक म्हणून अगदी सहज नोंदी करायच्या तर त्यांच्या लेखनात स्त्री पात्र फार उठून दिसत नाहीत. ती असतात, जाणवतात, त्यांचा रोलही महत्त्वाचा; पण गणेश ती फार नेटकेपणाने पुढे आणतात. त्यांच्या सगळ्या कथा प्रथम पुरुषी निवेदनात येतात, त्यामुळे त्यांना कथानायक नेमकेपणाने, नेटकेपणाने रेखाटता येतात. नायक अतिशय बुद्धिमान, संयमी, तटस्थ वृत्तीचे; आणि ते अतिशय संवेदनशील वृत्तीने समोर येतात. त्यांच्या कथांमधून कधीही फार आक्रस्ताळी, भडक वर्णने येत नाहीत. त्यांनी रेखाटलेली पात्रंही भाषेचा वापर फार नेमका करतात. त्यांच्या अलीकडच्या कथांत मधून मधून गूढ एलिमेंट असतो, पण तो तितकाच. त्यात कुठल्या अमानवी, अदृश्य किंवा अतार्किक घटना, दृश्य असत नाहीत. त्यांनी तार्किकतेचा नीट वापर जवळपास सगळ्या कथासूत्रात केलेला आहेच. अमुक एक विषय हाताळायचा म्हणून त्यांची कथा लिहिली जात नाही.

नवीन प्रयोग, वेगळे विषय अशा कशाचा आवेश, अभिनिवेश त्यांच्या कथेत असत नाही. ती अतिशय सहज, स्वाभाविकपणे समोर येते. रंजक आणि अचूक, वाचनीय कथा लिहिण्याच्या तंत्रावर लेखक म्हणून त्यांची मजबूत पकड असल्याने वाचकांनाही कथा वाचताना ती कायम गुंतवून ठेवते.

कमीत कमी पात्रं, कमीत कमी शब्दांत पात्रांची व्यक्तिमत्त्वं, फारशी गुंतागुंत नसतानाही नात्यातला वाढता ताण दाखवणारी दृश्यात्मकता आणि कुठल्याही जात धर्माची पार्श्वभूमी नसलेली निखळ पात्ररचना, आशय, कथेचा अवकाश अशा आणखीही काही नोंदी त्यांच्या कथेविषयी करता येतील. सहज सोपी साधी आणि अत्यंत आटोपशीर वाटणारी त्यांची कथा तितकी सोपी नाही हेही आवर्जून सांगायला हवं. दिवसेंदिवस गणेश मतकरी यांचं लेखन हे कथा साहित्यातले नवे आयाम शोधत रचना आणि आशयाच्या बाजूने आधिक व्यापक होत असलेलं दिसत आहेत.

‘तडा’ हा त्यांचा कथासंग्रह ही सगळी बलस्थानं अधोरेखित करणारा, मराठी कथा साहित्यात महत्त्वाचा ठरणारा आहे.

‘तडा’- गणेश मतकरी, रोहन प्रकाशन,

पाने-१८४, किंमत- ३७० रुपये.