त्याच काळ्या चेहऱ्यांच्या बकाल वस्तीत केव्हिन नावाचा पोरगा राहत होता. आपल्या पानशेत पुनर्वसन वस्त्यांसारखीच ती ब्राँक्स रिव्हर साइड प्रोजेक्टची वसाहत. तिथलं दारिद्रय़ आणि गुंडगिरी. केव्हिनही एका गँगचा हिस्सा होताच. पण वाढण्याच्या एका टप्प्यावर त्याला झणझणून जाणीव झाली असावी- काळय़ा माणसाच्या समृद्ध आफ्रिकन वारशाची. सामाजिक कार्यकर्ती असणाऱ्या त्याच्या आईपासून त्यानं स्फूर्ती घेतली असणार. कारण त्यानं आफ्रिका बंबाता (Africa Bambaata) हे नाव धारण केलं आणि हिपहॉपद्वारे चुकलेल्या पोरटय़ांना सरळ रस्त्यावर आणण्याचा विडा उचलला! ‘झुलू नेशन’ नावाची चळवळच त्यानं मग चालवली.. आपल्या विजया मेहतांच्या ‘रंगायन’सारखी. पण ‘झुलू नेशन’ ही चळवळ ज्या वस्त्यांमध्ये कार्यरत होती, तिथे ‘रंगायन’सारखं पांढरपेशं आणि ‘एलिट’ असं काही चाललं नसतंच. मग बंबाताने हातात रंगांचे स्प्रे घेतले. भिंतींवर सामाजिक संदेश चितारले. आपल्या साथीदारांनिशी तो काळय़ा माणसांना त्यांचं गतकालीन वैभव दाखवू लागला. त्यांचा स्वाभिमान जागृत करू लागला. एक नवं सकारात्मक, आशावादी हिपहॉप त्यानं साकारलं. म्हणूनच कदाचित आफ्रिका बंबाताला ‘हिपहॉपचा गॉडफादर’ असं विशेषण मिळालं असावं. आपल्या जाडजूड देहावर झुलू वेश पांघरत तो गाऊ लागला..
And we are on this musical message
To help the others listen
Improve moment and
Seek the electronic chancel
यामधली शेवटची ओळ मला द्रष्टी वाटते. ‘इलेक्ट्रॉनिक चान्स’ हा आफ्रिका बंबातानंच नव्हे, तर एकूणच जगभरच्या संगीतानं घेतला होता. इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या शक्यता पुरेशा न पडताळताही घेतलेला तो ‘चान्स’ पुढे संगीताच्या इतिहासाला कायमस्वरूपी निर्णायक वळण लावून गेलेला आहे.
बघता बघता हिपहॉप त्या इलेक्ट्रॉनिक काळामध्ये बहरत गेलं. अनेक फाटे त्याला पडले. जे गाणं काळय़ांच्या वस्तीमध्ये काळय़ांसाठी गायलं जात होतं, ते हळूहळू गोऱ्यांच्या पुढय़ात येऊ लागलं. गोऱ्यांनाही रुचू लागलं. १९७७ ला न्यूयॉर्कच्या भिंती, बसेस, सबवे स्टेशन्स, मैदानं ही हिपहॉप ग्राफितीनं भरून गेली. १९७९ साली कर्तिस ब्लोनं मक्र्युरी रेकॉर्डसोबत करार केला. हिपहॉपचा हा पहिला सौदा! लवकरच जॅझसारख्या अभिजात संगीतामध्ये रॅप आणण्याचा प्रयोग हर्नी हॅनकॉकसारख्या जाणकारानं केला. १९८९ साली ग्रॅमी पुरस्कारांमध्ये हिपहॉपचं स्वतंत्र नामांकन होऊ लागलं. मग पुरुषप्रधान हिपहॉपमध्ये काही स्त्रियांनीही चंचुप्रवेश केला. (आणि तो हिपहॉपच्या सणसणीत पुरुषी जगात चालवून घेतला गेला.) मग २००३-०४ सालच्या आसपास हिपहॉप हे श्रीमंतच गाणं झालं! रसेल सिमन्स, जे. झी.सारखे रॅपर्स करोडोंची कमाई करू लागले. नाईके- रिबॉकसारख्या कंपन्या या रॅपर्सची ब्रँड अँम्बेसिडर म्हणून नियुक्ती करू लागल्या.
रॅपच्या काव्यामध्येही आनुषंगिक बदल झाला. त्या काळय़ा वस्त्या, तिथलं दैन्य मागे पडलं. कोऱ्या करकरीत नोटांचे नाद रॅपर्स तालासाठी रेकॉर्ड करू लागले! गोऱ्या किशोरवयीन मुलांनी ते गाणं डोक्यावरच घेतलं. काळय़ा-गोऱ्यांमधल्या ‘लव्ह-हेट रिलेशन’चं ते सांगीतिक प्रत्यंतर होतं. थोडक्यात काय, हिपहॉप नावाच्या गरीब पोराचा हिपहॉप साहेब झाला! आणि मग साहेबीची सारी लक्षणंही जे. झी. (Jay-z) सारखा रॅपर त्याच्या गाण्यातून मांडू लागला. जे. झी. (किंवा जे. झेड.) आणि बियॉन्से हे अमेरिकेमधलं प्रसिद्ध जोडपं आहे. ती आहे आपल्या गळय़ावर संपूर्ण हुकूमत असलेली गायिका आणि तो आहे रांगडा, पौरुषानं काठोकाठ भरलेला रॅपर. त्याचं ‘टॉम फोर्ड’ हे गाणं ऐकताना मला वाटलं की, याची गाडी कुठून कुठे आली? ‘टॉम फोर्ड’ हा अमेरिकेमधला प्रख्यात वस्त्रतज्ज्ञ. त्याच्या डिझायनर कपडय़ांचं कौतुक करणारं गाणं जे. झी. गातो, हीच एक महत्त्वाची सामाजिक घटना आहे. जे. झी.चं बालपणही गरीब, काळय़ा वस्त्यांमधलंच. गुंडगिरी त्याला नवीन नाहीच. एकदा ड्रग्जचा व्यापार करता करता त्याच्यावर जवळून गोळीबार झाला होता. (त्यात तो वाचला.) आणि एकदा त्यानंच एका संगीत कंपनीच्या अधिकाऱ्याच्या पोटात छोटं ब्लेड खुपसलं होतं. (हिपहॉपच्या जगात हे बहुधा फारच सौम्य मानलं जात असावं.) आणि आता नवी श्रीमंती आल्यावरचं हे टॉम फोर्ड गाणं! पण त्या दोन जगांमध्ये झालेल्या भ्रमंतीचा ताण त्याला जाणवत असावाच. ‘होली ग्रेल’ या सुंदर गाण्यात तो म्हणतो-
‘माझ्या अंगभर टॅटू आहेत..
पापाराझी माझ्या मागे लागले आहेत..
लॉबीमध्ये चिकण्या पोरी (मूळ शब्द- सायको बीचेस!)
माझ्या मागे लागल्या आहेत..
पण असं असलं तरी
किती कोपऱ्यात पडल्यासारखं वाटतं आहे!’
kEnough is Enough
I’m calling this off
You are still alive
Still that niggal
(‘बास! आता बास!
थांबवू दे मला माझा ऱ्हास!
..तू अजूनही आत आत जिवंत आहेस
तोच काळाकभिन्न निग्रो आहेस!’)
वा! त्या ‘स्टील दॅट निग्गा’मध्ये सगळा काळय़ांचा इतिहास कसा ताठ मानेनं उभा आहे! आणि पुष्कळांना अजून पटत नाही, की हिपहॉपसारखं ‘पॉप्युलर’ संगीतही अभिजात संगीताइतक्याच ताकदीनं आत्मसाक्षात्काराचा प्रत्यय देतील.
हिपहॉप-पठण!
वेद हे जगातलं पहिलं साहित्य आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. पण वेदपठण हे बहुधा पहिलं हिपहॉप असावं! हिपहॉप रॅपमध्ये आणि वेदपठणात सांगीतिक शैलीदृष्टय़ा फारसं अंतर नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talk about hip hop music