त्या दिवशी फेसबुकवर कोणीतरी पाठविलेली तनिष्कची व्हिडीओ जाहिरात पाहिली आणि डोळे पाण्याने भरून आले. वास्तविक पाहता गुळगुळीत कागदावर आकर्षक रंगात छापलेली तनिष्कची प्रदर्शनीय जाहिरात
आली की मी मासिकाचे पान चटकन उलटतो. उगाच कशाला आपल्याला गम्य नसलेल्या आणि न पेलणाऱ्या गळ्याच्या हारात गुंतून पडायचे? असा माझा नेहमीचा खाक्या. पण फेसबुकवरची ही जाहिरात हलती-बोलती आणि हलवून टाकणारी होती हेच खरे.
.. प्रसंग लग्नाचा. वधूचा साजशृंगार सुरू आहे. वधूचे हे द्वितीय लग्न आहे. पहिल्या लग्नाची छान, ठमाकाकू चार-एक वर्षांची मुलगी तिच्याबरोबर बागडते आहे. घटिका भरत आल्यावर ती त्या मुलीसह विवाहवेदीजवळ येते. शालू-शेल्याची गाठ.. सप्तपदीचा प्रारंभ.. डोक्यावर मंदिल बांधून सजलेला नवरदेव.. फेरे सुरू होतात.. आणि त्या चार वर्षांच्या चिमुरडीचे औत्सुक्य जागृत होते.. क ं’२ ६ंल्ल३ ३ ॠ १४ल्ल िंल्ल ि१४ल्ल.ि. तिची मागणी.. सप्तपदीचा अर्थ कळण्याचे तिचे वय नाही.. तिला िरगणाचा मोह पडला आहे.. नववधू आई तिला दटावतेय.. पण क्षणभर थांबून तो नवरदेव म्हणतो.. ‘कम’.. आणि क्षणार्धात त्या चिमुरडीला उचलून कडेवर घेऊन सप्तपदी पुढे चालू होते. पुढच्या दृश्यात ती चिमुरडी त्या नवरदेवाला विचारतेय.. ‘‘आज से डॅडी बुलाऊं?’’..
.. पाहिलं तर अतिशय साधी, सरळ, सुंदर जाहिरात आहे. पण तिच्यात फार मोठा सामाजिक आशय दडला आहे. विधवा किंवा परित्यक्ता पुनर्वविाह म्हणजे ‘अब्राह्मण्यम् महापापम्’ या जोखडातून मुक्त झाल्याचा संदेश देणारी ही जाहिरात आहे. इथे फारसे शब्द नाहीत.. लफ्फेदार संवाद नाहीत.. आवेशपूर्ण हावभाव नाहीत.. ड्रामा, मेलोड्रामा काहीच नाही. आहेत फक्त अर्थपूर्ण भावना व्यक्त करणारे डोळे आणि कडेवर उचलून घेण्याची छोटीशी स्नेहाळ कृती. त्या पित्याने खऱ्या अर्थाने पती व्हायच्या आधी स्वीकारलेलं तिचं पितृत्व.. मोठय़ा मनाने स्वीकारलेला आपल्या नवपत्नीचा भूतकाळ.. एका स्त्रीचा केवळ पत्नी म्हणून नव्हे तर माता म्हणून केलेला स्वीकार. त्या एका छोटय़ा कृतीत दडलाय अनेक शतकांचा हुंकार.. त्या एका छोटय़ा कृतीने दिलाय काही स्वप्नांना आकार.. हा उपकार नाही.. हा उपचारही नाही, तर हा नव्या नात्याचा पूर्णाकार आहे.. ही दया नाही तर पोटची माया आहे.. हा उद्धारही नाही, तर हा आधार आहे, हे खऱ्या अर्थाने उघडलेलं पितृछत्र आहे..
आज अशा घटना समाजात प्रत्यक्षात घडत आहेत. ही जाणीव सुखदायी आहे. पहिल्या लग्नाच्या अपत्यांना विधिवत दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणारेही आहेत. तर काहींनी नात्यांना कायद्याच्या बंधनात न अडकवताही त्यांना आपलंसं केलं आहे.
पण एका बाजूला ही आश्वासक पहाट दिसत असताना दुसऱ्या बाजूला विधवेचे आणि घटस्फोटितांचे अश्रूही आहेत. ते समाजाच्या सर्व स्तरांत आहेत. त्याच्यात नागर/ ग्रामीण,सुशिक्षित/ अशिक्षित, उच्चविद्याविभूषित/ अंगठेबहाद्दर या सर्व श्रेणींचा समावेश आहे. समाज चार पावले पुढे आणि अडीच पावले मागे या न्यायानेच चालतो आहे. कधी ही चाल उंटाप्रमाणे तिरपी आहे, तर कधी दुडकी आहे. पण घोडदौड मात्र होताना दिसत नाही, हे सत्य आजही मान्य करावयास हवे.
एखाद्या वेळी संसाराचा सारिपाट उधळला गेला किंवा मोडला म्हणजे चूक स्त्रीचीच का? तशात तिला अपत्य असेल तर प्रश्न अधिकच बिकट. मग ती उपहासाची निर्भर्त्सनेची धनी.. मंगल प्रसंगात तिला मान नाही.. तिचे स्थान शेवटी.. कधी कधी तर तिला प्रयत्नपूर्वक टाळलेही जाते. कार्यालयात ती चेष्टेचा विषय आणि तिच्याविषयी खोटेनाटे प्रवाद पसरविण्यात अग्रेसर असे अनेक ‘पुरुषोत्तम’.
कोणतीही स्त्री.. मग ती सधवा, विधवा, स्वीकृता किंवा परित्यक्ता असो.. ती एक व्यक्ती आहे आणि तिचे जीवन सहर्ष, स्वाभिमानाने जगण्याचा तिला
पूर्ण अधिकार आहे हे जाणून घ्यायला समाज अजूनही र्सवकष प्रगल्भ व्हायला हवा आहे.
या जाहिरातीने कळत-नकळत एक छोटासा छान संदेश दिला आणि नव्या विचारांना चालना दिली. खूप दिवस ही जाहिरात माझ्या मनात रेंगाळली आणि एके दिवशी अचानक वेगळा विचार आला.. ‘जाहिरातीमधील ती चिमुरडी तिच्याऐवजी त्याच्या पहिल्या लग्नाची असती आणि हा त्याचा पुनर्वविाह असता तर..?’
.. मी स्वत:शीच हसलो आणि म्हणालो- ‘मग त्याची जाहिरात झाली नसती’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा