कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांसी,

दादासाहेब गावकरचा दंडवत..

काय भाऊसाहेब, कसा हाईसा? पॉलिटिक्स ज्वाइन करून ऱ्हायलाय की काय वं? मंजी सवाल ईचारतोय आमी. आन् तुमी आमास्नीच नवा क्वश्चनप्येपर देवून ऱ्हायले.

तुमी ममईची लोकं आक्शी त्या संतूरवाल्या आंटीसारकी हाईती बगा. उमर का पताच नई चलता. तुमी बी फोर्टीमदलं वाटत न्हाई बगा. लई इनोशंट फ्येसबुक हाये तुमचं. त्येवर ते गोल्डन फिरेमचं चश्मा. आता तुमास्नी लांबचं दिसंना आसं कसं हुईल? आमास्नी फक्त आजचा दिस दिसतुया. तो ढकलायचा कसातरी.

कश्याला उद्याची बात? आमास्नी वाटलं, तुमी तरी धा वर्सानंतरचं, भारी फ्युचर सांगशीला.

ऱ्हायलं. चाळिशी लागलीया जनू. चष्मा न्हाई, आपल्या समद्यांची नजरच बदलाया हवी. सप्पान सोडा वं, जागतेपनी सुदीक आपल्या नजरंला फक्त चांगलंच दिसाया हवं. वंगाळ दिसूच नय. टकुऱ्यातलं म्येमरी कार्ड आसं स्येट व्हायाला हवं, की समद्यांच्या चांगल्या गोस्टीच लक्ष्यात ऱ्हाव्यात. वाईट ईसरून जावं. थोबाड उचकटलं, की कवतिकच भाईर पडावं. शिव्या आठवूच नय. आसं अ‍ॅप आमच्या पाहन्यात हाई बरं का. तुमच्या-आमच्या आजीच्या बटुव्यातलं संस्काराचं अ‍ॅप. आमीबी कसं करंटं बगा. जिंदगीच्या शेलफूनात जागा न्हाई म्हून आमी ते डिलीट करून ऱ्हायलोय.

तुमाला आमी वळखून हाई बरं का सदाभौ. कच्च्या केळ्याचं सुदीक टेश्टी वेफर्स करून ऱ्हायलाय तुमी. पिकलेल्या केसान्ला काळा आईलपेन्ट मारून काळाला हरवता येत न्हाई. उद्याचा भरिवसा न्हाई म्हनायचं आन् पॉलिसीचं हफ्तं भरायचं. शेर मार्केटमंदी पसं गुंतवायचं. चालतंय की! उद्याची सोय करायलाच हवी भौ. कल भी, आज भी, और कल भी. दोन घास सुखाचं मिळालं, की द्य्ोव पावला. परित्येक मोमेन्ट हॅप्पीली जगायला भेटावी, येवढंच मागणं हाये विठुरायाकडं.

मानूस फ्युचरमंदी फकस्त पशाची भासा बोलंल, हे योकदम खरं बोल्लासा. आमी म्हन्तू, पाष्ट, करंट आन् फ्युचर कुटं बी जावा, फकस्त पसाच बोलतुया. आन् त्यो ज्याच्याकडं न्हाई तो टेन्समदी जातुया. पसा वाईट न्हाई बरं का. ज्या पशानं समाधान भेटत आसंल, तो घामाचा, कष्टाचा पसा खरा शिरमंत. जो रातची निंद हराम करंल, तो रूपाया घसरतच जानार बगा. तुमी येशीत झोपा, न्हाई तर वावरात कडुनिंबाखाली. बिनघोर झोपत आसशीला तर तुमचा शर्ट आमास्नी द्या देवा. सुखी, समाधानी मानसाचा सदरा म्हून आमी वापरू जिंदगीभर.

त्ये तीन डब्ल्यू तुमास ठावं आसनारच. यांच्या नादी लागलं, की जिंदगी बर्बाद हुती. त्यात योक ‘यम’ अ‍ॅड कराया हवा. ‘यम’ फॉर मोबिल. बाईलयेडा परवडला पर मोबील-येडा नगं! फ्युचरमंदी आशिक त्येच्या फियान्शीला वॉट्स्सप करंल, तू लई झ्याक दिसतीस. ती बी तिकडून लाजन्याचं ईमोजी टाकून रिप्लाय देईल. दोगंबी शेजारी शेजारी बसून आसं सोशल पिरेम करतील, तर झाडामांगं पळत गानी कुणी म्हनायची?

समदं जग खालमुंडी आन् पाताळधुंडी झालंया. या मोबिलमदनं लोक शेर मार्केटमंदी बी जातात, े ठावं नव्हतं आमास्नी.

आमाला त्ये येक ‘शेअर इट’ नावाचं अ‍ॅप ठावं हाय बरं का. आन् तो ‘चड्डी पहन के फूल खिला है’वाल्या मोगलीतला शेरखान. शेरचा आमच्या जिंदगीतला शेर येवढाच. बाकी शेरोशायरी आन् शेर मार्केट आमाला न्हाई जमत. कुनी शेर आसंल तरी आमी बी सव्वाशेर हाई. येस्. तुमची शेरवाली गंमत जड झाली की वो आमास्नी!

शंक्रांतीला लई पतंगबाजी केली, की वो आमी. आमी या पतंगबाजीच्याच भाशेमंदी तुमच्या शेर मार्केटचं अ‍ॅनालिशीश करनार. चालतंय न्हवं?

तुमच्या ग्लोबल घडामोडींसारक्या आमच्या लोकल घडामोडीभी इम्पोरटिंट हाईती.

सुभान्याचं पोर ममईला कालेजात हाई. त्यो शेरातल्या गर्लफ्रेन्डला घेऊन आलाहुता हिथं. ती दोगं गच्चीमंदी पतंग उडवीत हुती. ‘मी आन् तू’! दोगांचीबी नजर योकमेकांच्या डोळ्यांत हरिवल्येली. गावचं डोळं सुभान्याच्या गच्चीकडं. ह्य़े ‘मी टू’ प्रकरन लई फ्येमस झालं या शंक्रांतीला. पिरेमाचं मिठू मिठू समद्या गावानं ऐकलं की वो!

फारेनचा जावई ज्यान्ला हवा आसंल, त्यान्ला मिळू द्य्ोत. पर आमच्या गावाकडच्या शिंगल्या पोरान्ची हवा न्हाईच म्यारीज मार्कीटमंदी. इथल्या पोरीन्लाबी शेरातलं सासर हवं. गावाकडची ग्रॅज्युयेट शेतकरी पोरं नकोत त्यास्नी. आमच्या पोरान्च्या नशिबात ‘कटी पतंग’ हाई फकस्त!

विलेक्शनच्या टाइमाला पतंगबाजी लई जोरात चालत्ये. पतंग, चक्री मान्जा समद्याला स्पॉन्शर्स गावतात. पोरंबी वस्ताद. ज्या पार्टीची हवा जोरात, तिकडं पळायचं. पतंगबाजीनं जीव शिणला, की रातच्या दारूकामाचीबी सोय हुतीया. रात्रीबी ढगात पोचतुया गडी!

शेल्फ डिक्लेर्ड युवा न्येते लई हाईत आमच्याकडं. आदीच्या पिडीतलं शिनियर फकस्त फ्लेक्शमंदी गावतात. शिनीयर पतंगाचं ओझं झालंया मान्जाला आता. आभाळाकडं डोळं लावून पडून आसत्यात त्ये पतंगी जमिनीवरच.

आमचं शिरपा लई बिलंदर गडी. सरपंच, आमदार, खासदार समद्या विलेक्शनला दणकून आपटतंया. श्येजारी सोडा, घरचंबी कुनी मत देत न्हाई त्येला. योकटंच पतंगबाजी करतुया. दोन घरांपल्याड पतंग जात न्हाई त्येची. पर नाद काई सुटत न्हाई.

तुमाला ठाव नसंल, पन आमच्या गावातबी साहित्य मंडळ हाई. लाईब्री हाये. शंमेलन आसतंया. तिथंबी विलेक्शन होतीया. पर या टाइमाला गावकऱ्यांनी साफ सांगितलं.. साहित्यात पॉलिटिक्स नगं. आमच्याच गावचा योक गडी तिकडं प्रोफेसर हाई नगरला. झ्याक कविता लिवतो. पुस्तकंबी हाईती त्येच्या नावावर. तो आला आन् मस्त स्पीच दिलं की वं- ‘काय वाचावं आन् कसं जगावं?’ योकदम भारी! साहित्याचा पतंग लई उन्च उडाला या साली.

‘जे1 झालं का?’सारीक फेसबुकी साहित्याची हवा योकदम गायब!

प्रियांका, ईराटसारकं दोन-चार येळा गावजेवन आमास्नी न्हाई परवडत. लग्नाच्या खर्चापाई आमच्या गावाकडच्या बापाच्या पतंगीला धा ठिकानी ठिगळं लागत्यात. कर्जाच्या ओझ्याची कण्णी बांधाया लागतीया. लेकीसाटी तो कच्चा मांजा कसाबसा तग धरतुया आभाळामंदी.

‘अ‍ॅग्रो टुरीझम’ची पतंग रामरावान्नी भारी उडवली. शेरातून गाडय़ा भरून लोकं आल्ती. मस हुर्डा पाटर्य़ा झाल्या. रामरावानं भारी सर्विश दिली. कष्टमर खूश. पुढच्या वर्सी या ‘अ‍ॅग्रो टुरीझम’च्या पाच-दहा पतंगी उडनार गावात.

सदाभौ, आमच्या गावची ही पतंगबाजी देसभर चालंल आता. धा पाटर्य़ा आन् शंभर पतंगी. येगयेगळ्या रंगान्च्या आन् लेबलच्या. गोती होशीला, काटाकाटी हुईल. विलेक्शनी आश्वासनांची दे ढील हुईल. काय सुदरनार न्हाई.

कंचा मांजा, कंची पतंग घीवू हाती?

आमी फकस्त येकच करनार. सज्जन, निर्मळ पतंगीला सपोर्ट करनार. चांगल्या मजबूत मांज्यावाल्या तेवढय़ाच पतंगी शंशदेच्या आभाळामंदी पाठविनार.

आन् सौताला बदलनार. रिश्पॉन्शीबिलिटीनं वागनार. देशासाटी आमचा ‘शेर’ देनार. मंग बगा, ईस्वाच्या आकाशामंदी भारत देसाची पतंग कशी टॉपवर जातीया!

तोपतुर आपण आपलं आकाशाकडं डोळं लावून ‘दे ढील’ म्हनायचं.

काय सदाभौ, पटतंय ना?

मग ‘बेष्ट लक’ म्हना की!

तुमचा जिवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गावकर 

kaukenagarwala@gmail.com

Story img Loader