सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास..

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

तुझं पत्र मिळालं. वाचून आनंद वाटण्यासारखं त्यात काही नव्हतं, पण खूप बरं वाटलं. न वाचता लाइक्स, अंगठे आणि कमेंट्स देणाऱ्या या आभासी जगात कुणीतरी आपलं पोस्टाने पाठवलेलं पत्र वाचून त्यावर लगोलग उत्तरही पाठवतं याचं अप्रूप वाटल्यावाचून राहत नाही. आपल्या फडणवीस सरकारने निकषांवर आधारित सरसकट दुष्काळ पडल्याचं तत्त्वत: मान्य केलं असतानाच्या या कोरडय़ाठाक काळातही तू हा भावनेचा ओलावा जपला आहेस हे महत्त्वाचं. त्याबद्दल लव्ह यू दादू.. लव्ह यू!

अरे, तुमच्या शेतमालाला मनाजोगता हमीभाव कधी मिळेल (आणि मुळात किती भाव मिळाल्यावर तुम्हाला तो मनाजोगता वाटेल?) याविषयी म्या पामराला काहीच सांगता येत नसलं, तरी जाणूनबुजून परस्परांच्या भावना न दुखावण्याची हमी आपल्याला देता येईल तो सुदिन!

दादू, तुझ्या पत्रात तू म्हणतोस, तुम्हा मुंबईच्या लोकांना पीकपाणी विचारून काय फायदा? अरे, तुम्हा खेडय़ातल्या लोकांसाठी शेतातलं पीक आणि वावर जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकाच आम्हा मुंबईच्या लोकांना ‘पीक अवर’ महत्त्वाचा असतो. ७ : ३२, ८ : ४९ अशा मुंबईबाहेरील लोकांना विचित्र वाटणाऱ्या वेळेची लोकल पकडण्यासाठी मुंबईकर धावत असतो. कधी एकदा ऑफिसच्या स्वाइप मशीनचरणी आपला अंगठा टेकवतो (आणि एक दिवसाच्या पगाराचे पुण्य गाठी मारतो.), या एका इच्छेने आणि ईष्र्येने माणसे स्वत:ला बसमध्ये कोंबून घेतात, लोकलला लटकतात वा आपली ऑफिसमधली ‘इमेज’ जपण्यासाठी गाडी घेऊन निघतात आणि ट्रॅफिकमध्ये तासन् तास अडकून पडतात. ब्रँडेड पेहरावावरून जेंटलमन वाटणारी ही साहेबलोकं ट्रॅफिकभरल्या रस्त्याने कार चालवत जाताना त्यांच्या जिभेवर सरस्वती जो नागीण डान्स करीत असते, त्या सोहळ्याची तुलना केवळ अनुराग कश्यपच्या ‘सेक्रेड गेम्स’शीच होऊ शकते. आपल्या कारपुढे सावकाश कार चालवणारे, आपल्या बाजूने ओव्हरटेक करणारे, आपल्या पाठून हॉर्न वाजवणारे, रस्ता क्रॉस करणारे.. इतकंच काय, रस्त्यावरचे निर्जीव सिग्नलदेखील त्यांच्या मौखिक प्रसादातून सुटत नाहीत. आणि अशात एखादा छोटा-मोठा अपघात होऊन त्या अपघाताला कारणीभूत असणारा इसम ताब्यात सापडला, की हे जेंटलमन लोक आपापल्या गाडीतून बाहेर येऊन त्याच्यावर झुंडीने तुटून पडतात. आपलं ऑफिसचं, घरचं, ट्रॅफिकचं, असलेलं, नसलेलं सगळं फ्रस्ट्रेशन त्या बिचाऱ्यावर काढलं जातं. तुला सांगतो दादू, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कितीही वरच्या पदावर असलेल्या व्यक्ती एकदा का ऑफिसच्या बाहेर येऊन झुंडीचा भाग झाल्या ना, की त्या एकाच पदावर येतात.. श्वापदं! दादू, व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीत अ‍ॅडमिशन घेतल्यामुळे हे असे

व. पु. काळेटाईप सुविचार सुचायला लागले असतील काय?

माझं हे असं होतं बघ. पत्राला उत्तर लिहायला बसलो की तुझ्याच पत्रातल्या मुद्दय़ांचा कीस काढत बसतो आणि मला जे काही सांगायचंय ते राहूनच जातं. ते काही नाही, आता मला जे सांगायचंय त्या मुद्दय़ांवर येतो. मित्रा दादू, सर्वात प्रथम येऊ घातलेल्या प्रजासत्ताक दिनासाठी तुला आणि समस्त महाराष्ट्राला या आगाऊ सदू धांदरफळेकडून आगाऊ हार्दिक शुभेच्छा!

दादू, अरे, प्रजासत्ताक दिन जवळ आला ना, की माझं मन नकळत भूतकाळात जातं. आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात. काय ते दिवस होते! ढगळ सदरा आणि मळखाऊ रंगाची अर्धी चड्डी असा शाळेचा एकमेव गणवेश आई आदल्या दिवशी धुऊन, सदऱ्याला नीळ देऊन ठेवायची. मग त्यावर तांब्यात निखारे ठेवून फिरवायचे, की झाली कपडय़ांची इस्त्री! सकाळी लवकर उठून घाण्यावरून आणलेलं खोबरेल तेल डोक्यावर थापलं जायचं. घरात टाल्कम पावडरचा डबा असेल तर आईच्या अंगात विक्रम गायकवाड संचारायचा आणि हातापायावरून आफ्रिकी दिसणारे आपण चेहऱ्याने युरोपीय दिसू लागायचो. चहासोबत चपाती खाऊन आपण चालत चालत शाळेत पोहचायचो. शाळेत कवायत करताना कमरेवरची चड्डी घसरू नये म्हणून एका हाताने त्यावर करगोटा चढवण्याची एक्स्ट्रा कवायतही करायला लागायची. ते शाळेच्या पटांगणातील सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक दाऽऽए मूड, बाऽऽए मूड, विऽऽश्राम, सावऽऽधान, एक साथ जयऽऽहिंद.. ती समूहगीते, ध्वजगीत, बेंबीच्या देठापासून केलेला भारतमातेचा जयघोष.. आणि शेवटी मिळणारा खाऊ.. या सगळ्याचेच एक भारी आकर्षण होतं. आताची मुलं शाळेत झेंडावंदनाला जाणं कम्पल्सरी नाही असं म्हणून घरात लोळत राहतात आणि सोसायटीच्या झेंडावंदनालाही खाली उतरत नाहीत. तेव्हा लवकरच आपल्या पिढीसोबत हे झेंडावंदनसुद्धा आउटडेटेड होईल की काय, अशी शंका येते.

तुला सांगतो दादू, रात्री नऊ वाजता पतंजलीचा करेला ज्यूस प्यायल्यासारख्या चेहऱ्यानं टीव्ही चॅनलवर चर्चा करणाऱ्या विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे की, आपल्या पिढीला हे स्वातंत्र्य फुकाफुकी मिळालेलं असल्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही. पटतं का तुला हे? मला बाबा हे काही पटत नाही. एकतर १९४७ साली जे मिळालं ते ‘स्वातंत्र्य’ नसून ‘स्वराज्य’ आहे असं माझं म्हणणं आहे. आपलं राज्य- जे तोवर इंग्रज चालवत होते- ते आपण स्वत: चालवायला लागलो, इतकंच. पण ते चालवण्यासाठी आपण स्वत:चं काही स्वदेशी तंत्र विकसित केलंय असं मला तरी दिसत नाही. १९४७ साली मिळालेलं स्वराज्य आपल्या पिढीला फुकाफुकी मिळालं असं मी एक वेळ मान्य करीन; पण स्वातंत्र्य? ते तर आपण स्वत: मेहनतीने मिळवलंय, मिळवतोय. उघडय़ावर थुंकण्या- हगण्या- मुतण्याचं स्वातंत्र्य, सिग्नल तोडण्याचं स्वातंत्र्य, कर्कश हॉर्न वाजवण्याचं स्वातंत्र्य, रात्रीबेरात्री डीजे आणि फटाके वाजवण्याचं स्वातंत्र्य, पेशंट मेल्यावर इस्पितळ फोडण्याचं स्वातंत्र्य, रस्तोरस्ती फ्लेक्स- बॅनर लावण्याचं स्वातंत्र्य, तलाव- नदी- समुद्रात भराव टाकण्याचं स्वातंत्र्य, दारू पिऊन लोकांच्या अंगावरून गाडय़ा चालवण्याचं स्वातंत्र्य, अनधिकृत बांधकामं करण्याचं स्वातंत्र्य,  पंतप्रधानांनाही शिव्या घालण्याचं स्वातंत्र्य, ‘इथं स्वातंत्र्याची गळचेपी होतेय’ असं म्हणायचंही स्वातंत्र्य.. अशी असंख्य स्वातंर्त्ये आपण आपल्या मेहनतीनं, कर्तृत्वानं आणि हिकमतीनं मिळवलेली आहेत. आणि त्याचं श्रेय आपण दुसऱ्या कुणाला घेऊ देता कामा नये!

इथे प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या स्वातंत्र्याची पडलीय. मग भले त्यापायी दुसऱ्या कुणाच्या स्वातंत्र्याचा बळी जात असेल तर जाऊ दे- अशी आपली मानसिकता झाली आहे. परवा आमचे बासुदा म्हणत होते ते मला पटलं. सगळ्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य असायला हवं. नयनतारा सहगलांना हवं ते बोलण्याचं, अरुणाताईंना संमेलनाआधी न बोलण्याचं, जोशींना राजीनामा देण्याचं, राजकारण्यांना राजकारणाचं आणि कुंडलकरांना यवतमाळ माहीतच नसण्याचंही स्वातंत्र्य असायला हवं. शेवटी काय, तर समर्थन ‘स्वातंत्र्या’चं व्हायला हवं. पटतंय ना?

दादुभाऊ, तुला म्हणून सांगतो, या भारत देशानं आणि इथल्या स्वातंत्र्यानं आपल्या शेजारील देशातील नागरिक कल्पनाही करू शकत नाहीत इतकं खूप काही आपल्याला दिलंय रे! तरीही बऱ्याचदा स्वातंत्र्याची परिभाषाच न कळलेल्या काही अतिउत्साही मंडळींकडून एका अदृश्य बंदुकीची नळी आपल्या कपाळावर रोखली जाते. आणि तुझ्या-माझ्यासारख्या हिंमतदृष्टय़ा मागासवर्गीय लोकांना आपण काय खावं, काय प्यावं, देवघरात काय करावं आणि बेडरूममध्ये काय करावं, काय लिहावं, काय वाचावं, कुठले नाटक-सिनेमे बनवावेत, पाहावेत.. हे सारं काही या अदृश्य बंदुकीच्या धाकाखाली ठरवावं लागतं. श्रीमंत असो की गरीब, शहरी असो की ग्रामीण, आरक्षणाचा लाभार्थी असो की आरक्षणापासून वंचित, राजकारणी असो की मतदार.. सगळेच कुठल्या ना कुठल्या अदृश्य बंदुकीच्या धाकाखाली वावरताना दिसतात. अरे दादू, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा कारभार या अदृश्य बंदुकीच्या तंत्रानेच चाललाय. म्हणूनच प्रजासत्ताकाला राष्ट्रभाषेत ‘गण (Gun) तंत्र’ म्हणत असतील काय? मला तर असं वाटतं की, यापुढे सरकारने सरकारसकट कुठल्याच व्यक्तीला, संस्थेला, पक्षाला कुणावरही कुठल्याच प्रकारची सक्ती करता येणार नाही, असा एक कायदा करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करायला हवी. कशी आहे आयडिया? कळावे.

तुझा स्वातंत्र्यप्रेमी मित्र,

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com