सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास,

तुझ्या पत्राच्या शेवटी तू लिहिलंयस की, दहा वर्षांनंतर आपल्या देशाचा चेहरा कसा असेल सांग. हे बघ दादू, मी जरी अजून चाळिशीत असलो तरी हल्ली मला फार दूरचं दिसत नाही रे. माझ्या या डोळ्यांचा काहीतरी कायमस्वरूपी इलाज करावा लागणार. तुला सांगतो- अरे, मी झोपताना मुद्दाम चष्मा लावून झोपतो तरी आताशा स्वप्नंही पहिल्यासारखी स्पष्ट दिसत नाहीत. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर फोटो डकवताना त्याला विविध प्रकारचे फिल्टर लावून ते अधिक प्रेक्षणीय केले जातात, तसं एखादं सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅप स्वप्नांची क्लॅरिटी वाढविण्यासाठी मिळते काय हे बघायला पाहिजे. असो. तर सांगायचा मुद्दा हा, की इथे आपलाच उद्याचा भरवसा नाही (म्हणून मी फळवाल्याकडून उद्या, परवा पिकतील अशी कच्ची केळीही घेत नाही.), तिथे दहा वर्षांनंतर आपल्या देशाचा चेहरा कसा असेल, हे सांगायला मी काय नॉस्ट्राडेमस किंवा गेलाबाजार बेजान दारूवाला आहे काय?

अरे दादू, तू गावात राहून भविष्यातल्या संपूर्ण देशाचा विचार करतोस आणि मी इथे शहरात राहून भविष्यातल्या केवळ आपल्या भाषेचा विचार करतोय. आपल्या दोघांचाही दृष्टिकोन सारखाच व्यापक असला तरी आमचा शहरी दृष्टिकोन सुपर बिल्टअप् असल्यामुळे आमच्या दृष्टिकोनाचं काप्रेट क्षेत्रफळ अर्ध्यावर येते.  आपल्या भाषेच्या इतिहासाचा जुजबी अभ्यास आणि तिच्या भविष्याचा प्रचंड विचार केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले आहे की, मध्ययुगीन पश्चिम भारतात मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, पशाची अशा विविध भाषा अस्तित्वात होत्या. परंतु आजघडीला जी टिकून आहे आणि भविष्यातही टिकेल अशी एकमेव भाषा म्हणजे.. पशाची. तसेच आज जगात हजारो लिपी प्रचलित असल्या तरी संपूर्ण जगाची भाषा एकच आहे, ती म्हणजे- पशाची भाषा!

पशाच्या भाषेचा विषय निघाला की शेअर मार्केटचा विषय आपसूक येतोच. अरे दादू, हल्ली जिथे जावे तिथे लोक आपापल्या मोबाइलमध्ये घुसलेले असतात. यातले बरेचसे लोक सोशल मीडियावर परक्यांना पटवण्याचे आणि आपल्यांना चकवण्याचे गेम्स खेळत असले तरी काही लोक मोबाइलवर शेअर मार्केटमध्ये खेळत असतात. त्यांचे बोलणे ऐकून, मराठी वृत्तपत्रांच्या अर्थविषयक पुरवण्या वाचून आणि वृत्तवाहिन्यांवरील शेअर बाजाराचे वार्ताकन ऐकून ऐकून माझाही कान शेअर मार्केटमधल्या भाषेला बऱ्यापैकी सरावला आहे. एक गंमत म्हणून इकडच्या काही घडामोडी मी तुला त्याच भाषेत कळवायचे ठरवले आहे. चालेल ना तुला? न चालवून जातोस कुठे! ऐक तर..

मागच्या तिमाहीत ‘मी टू’ मोहिमेमुळे सोशल मीडिया शेअर मार्केटचा सोशेक्स आणि त्यांच्या क्षेत्रीय निर्देशांकांनी (उदा. फेबुकॅप, व्हाट्सकॅप, इन्स्टाकॅप) उच्चांक प्रस्थापित केला.

अमेरिकेत होऊ घातलेल्या व्हिसासंबंधीच्या बदलांमुळे बऱ्याच ऌ1इ व्हिसाधारकांना मायदेशी परतावे लागण्याची आवई उठली होती. या बातमीमुळे परदेशस्थ लग्नाळू मंडळींचे शेअर्स गडगडले असून, या घसरणीचा फटका भारतभरातील इंजिनीअिरग आणि मेडिकल कॉलेजच्या शेअर्सनाही बसला आहे.

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल, राफेलचा बागुलबुवा आणि नोटाबंदीचे भूत यामुळे सोशल मीडियावरील चळवळ्या नेतेमंडळींचा शेअर वधारला असून दोन्ही बाजूंच्या ‘ट्रोल’ कंपनीने आपला प्रत्येक पोस्टसाठीचा भाव चाळीस पशांवरून एक रुपयावर नेला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर नेत्यांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या शेअर्समध्ये करेक्शन येण्याची संभावना आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून झीरो ट्रेडिंग असलेल्या दिग्विजय एलएलपी तसेच जोशी अ‍ॅण्ड अडवाणी कन्सल्टंट्स लिमिटेडचे शेअर्स अखेर सोशल मीडिया शेअर मार्केटमधून डिलिस्ट करण्यात आले.

मार्केटमध्ये आधीच विनाकारण हाईप असलेला ‘रागा’चा शेअर तीन राज्यांतील विजयामुळे अधिकच वधारला असून मागील काही दिवस त्याला सातत्याने अप्पर सर्किट लागलेले आहे. मात्र, अतिशय बेभरवशाचा असलेला हा शेअर कधी आणि कसा गडगडेल सांगता येत नाही. नुकत्याच या कंपनीने देऊ केलेल्या प्रियांका नामक १:१ बोनस शेअरला मार्केट कसा प्रतिसाद देते ते लवकरच कळेल.

राज्यस्तरीय म्हणून नोंदणी असलेल्या आणि राष्ट्रस्तरीय महत्त्वाकांक्षा असलेल्या राणे एन्टरप्राइज या कंपनीचे कार्यक्षेत्र आता कणकवलीपुरते मर्यादित झाले असून मर्जर, अ‍ॅक्विझिशनचे सगळे ऑप्शन्स संपल्यामुळे या कंपनीच्या प्रवर्तकांना आपले भागभांडवल विकून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. मध्यंतरी राणे एन्टरप्राइज बारामतीच्या एका कंपनीबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुरू करीत असल्याची हूल मार्केटमध्ये उठली होती. पण बारामतीकर कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा फटका गुंतवणूकदारांना याआधी खूप वेळा बसला असल्याने मार्केटने या हालचालीकडे सावधपणे पाहणेच पसंत केले.

फेसबुकच्या मेसेंजर या उपकंपनीच्या ‘ख1 झालं का?’ या गुप्त प्रोजेक्टमुळे आणि त्यात गुंतलेल्या भागधारकांचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यामुळे या कंपनीचे शेअर गडगडले असून, फीमेल इरिटेटेड इन्व्हेस्टर्सचा (ाकक) नाराजीचा सूर पाहता त्यांनी आपले शेअर्स विकायला काढल्यास या कंपनीच्या शेअर्सची घसरण रोखणे कठीण होईल.

दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शेअर्स ढिसाळ आयोजनामुळे, साहित्यबा गोष्टींमुळे तसेच समाजमाध्यमांवरील लेखापरीक्षकांनी मारलेल्या प्रतिकूल शेऱ्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मागील कित्येक तिमाहीत या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. परंतु यावेळी प्रथमच एकमताने अध्यक्षांची निवड झाल्याने आणि संमेलनाध्यक्ष अरुणाताईंच्या विचारप्रवर्तक भाषणामुळे वायदा बाजाराने या घडामोडीचे उत्साहाने स्वागत केले आहे.

रणवीर-दीपिका आणि प्रियांका-निक

यांच्या चार-चार रिसेप्शन्सच्या प्रभावामुळे मध्यमवर्गीय लोकही आता गावी एक आणि मुंबई-पुण्याला दुसरे अशी दोन-दोन रिसेप्शन्स आयोजित करू लागले आहेत. त्यामुळे हॉलमालक, मंडप डेकोरेटर्स आणि केटर्स या इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असून भविष्यातही हा ट्रेंड सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या अलिबाग, मढ, मनोरी, गोराई, वसई, विरार येथील समुद्रकिनाऱ्यांवरील आणि कर्जत, लोणावळा, नेरळ, माथेरानसारख्या ठिकाणी तासाच्या हिशेबाने मिळणाऱ्या रिसॉर्टस्च्या व्यवसायात सध्या तेजी असल्यामुळे अल्पकालीन फायद्यासाठी गुंतवणूकदारांचा अशा रिसॉर्टचे शेअर्स घेण्याकडे ओढा दिसून येतो. मात्र, हे रिसॉर्टस् कायद्याच्या कचाटय़ात सापडल्यास आपल्या गुंतवणुकीचे लाखाचे बारा हजार होण्यास वेळ लागणार नाही, हे लक्षात असू द्यावे.

जानेवारीच्या सुरुवातीला आलेल्या थंडीच्या लाटेमुळे चिकन, मटन आणि दारूच्या व्यवसायात असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत तुफानी वाढ झाली होती. हे शेअर आता पडू लागले आहेत. मागणी वाढेल या अपेक्षेने हिवाळ्याआधी ज्या ट्रेडर्सनी शेअर्सची खरेदी केली होती ते संक्रांतीनंतर मागणी कमी होईल म्हणून या शेअर्सची विक्री करून शेअर्स ‘शॉर्ट’ करत आहेत. आता पडत्या किमतीला हे शेअर्स उचलले तर नंतर येणाऱ्या लग्नसराईच्या तेजीचा लाभ घेता येईल.

लग्नाच्या मार्केटमध्ये उतरू इच्छिणाऱ्या सिंगल्या लग्नाळू गुंतवणूकदारांसाठी आजचे व्होलाटाइल मार्केट एन्ट्री बॅरियर बनू शकते. त्यामुळे त्यांना सातत्याने सेक्टरमध्ये शेअर्सचे रोटेशन करावे लागेल. पॅसिव्ह इन्व्हेस्टर राहून चालणार नाही. आपल्या पोर्टफोलिओचे सतत परीक्षण आणि निरीक्षण करून त्याची मार्केटच्या चालीबरोबर सांगड घालता आली पाहिजे. सध्या फेबुकॅपमध्ये फारशी हालचाल नसून तो डॉक्टर, इंजिनीअर, टीचर अशा एका छोटय़ाशा रेंजमध्ये फिरत आहे. मार्केट लहरी सुलतानाप्रमाणे वागत आहे. वायदेबाजार विश्वासार्ह राहिलेला नाही. सकाळची मार्केटची भूमिका वेगळी असते, तर दुपारची भूमिका वेगळी असते. पण टिंडरकॅप आणि इन्स्टाकॅपमध्ये हालचाल आहे. चांगले टिंडरकॅप किंवा इन्स्टाकॅप शोधा. पण सावधगिरी बाळगा. कारण या शेअर्सना एकदा लोअर सर्किट लागायला लागली की त्याची घसरण रोखता येत नाही.

धार्मिक श्रद्धा आणि प्रादेशिक अस्मिता या नेहमीच चलनात असणाऱ्या दोन कंपन्यांच्या समभागात प्रस्तुत लेखकाचे नकारात्मक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आम्हाला त्यावर टिप्पणी करता येत नाही. कळावे.

आमच्यावर लोभ असावा. मात्र, अफवांवर चढणाऱ्या आणि बातमीवर पडणाऱ्या मार्केटवर लोभ नसावा.

तुझा सुपर सर्किट मित्र..

सदू धांदरफळे

टीप : उपरोक्त शेअर समालोचन हे उपलब्ध माहितीवर आधारित लेखकाचे अंदाज असून येथे लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी लेखक स्वत:सुद्धा सहमत असतीलच असे नाही.

sabypereira@gmail.com

Story img Loader