तब्बल पंधरा वर्षं संशोधन… मौखिक इतिहासाचे आणि दस्तावेजांचे उत्खनन करून सबा दीवान यांनी ‘तवायफनामा’ हा ग्रंथ साकारला. १८५७ पासून समकालापर्यंत एका समूहाच्या सांगीतिक संचिताचा तपशील असलेल्या या ग्रंथाचा मराठी अनुवाद नुकताच मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. अनुवादिका डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी मूळ ग्रंथाची करून दिलेली ओळख…

सबा दीवान लिखित ‘तवायफनामा’ माझ्याकडं अनुवादासाठी आलं. स्वीकारण्याआधी चाळलं. स्वीकारल्यानंतर पूर्ण वाचलं. व्यथा, भारावलेपण अशा संमिश्र भावना मनात उमटत राहिल्या. क्लिष्ट इंग्रजी भाषा, अत्यंत सघन आशय त्यामुळं काहीसं विद्वतजड असूनही हातातनं खाली ठेवता आलं नाही हे मात्र खरं! विषयही माझ्या जिव्हाळ्याचा. गायिकांवर संशोधन करताना कोठा परंपरा, तवायफ संगीताचा थोडाफार परिचय झाला होता. किती निर्घृणपणे तवायफ समूहाचं खच्चीकरण झालंय हे तेव्हाच उमगलं होतं आणि यात त्यांच्याइतकंच आपलंही नुकसान झालंय हे लक्षात येत गेलं. फार मोठं सांगीतिक संचित तर आपण गमावलंच आणि एका उत्तम परंपरेला, संस्कृतीला वाळीत टाकून ते पापही पदरात घेतलं आपण! मध्यमवर्गीय धर्मवेडा समाज हा या पापातला एक सहभागी. कुठेतरी हे पाप मीही शिरी घेतलं. नकळत का होईना माझा वाटा त्यात आहेच याची जाणीव झाली. तर या सगळ्याचा परिणाम असेल, अनुवादासाठी मी हा सहाशे पानी ग्रंथ हातात घेतला खरा आणि दीडेक वर्षं त्यात गुंगून गेले.

Loksatta lokrang Fragmented Bharat Unbroken Folk Caste Religon Election
विखंड भारत, अखंड लोक
documentary maker
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
loksatta editorial Akhilesh yadav samajwadi party grand victory in uttar Pradesh lok sabha election
अग्रलेख:  योगी आणि अखिलेश योग!
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  

ही पाच पिढ्यांची गाथा तुमच्यासोबत वाटून घ्यावीशी वाटली.

१८५७ च्या संग्रामात सहभागी झालेली तवायफ धरमनबीबी आणि तिचा सखा कुंवरसिंह यांच्या चित्तथरारक कथेपासून सुरू झालेली ही गाथा एकविसाव्या शतकातल्या बनारस, भभुआतल्या सद्याकालीन तवायफ समाजाची चित्तरकथा मांडते. विशेष म्हणजे लेखिका या तवायफसमवेत राहिलीय. त्यांचं जीवन जवळून निरखून त्यांच्याशी सविस्तर बोलत, त्यातून जवळजवळ पाच पिढ्यांचा इतिहास आणि सद्या:स्थिती, त्यांची जीवनशैली, प्रथा-परंपरा, रीतीरिवाज हे सर्व कथनातून मांडत गेलीय सबा, त्यामुळं क्वचित पाल्हाळिक वाटलं तरीही हे कथन काही वेळा रंजक, तर कधी भेदक असं वास्तव आपल्यापुढं ठेवतं.

तवायफ परंपरा नीट जाणून न घेतल्यानं, समाजाकडून सरसकट ‘वेश्या’ म्हणून गणल्या गेलेल्या या स्त्रिया प्रत्यक्षात कशा होत्या याची तपशीलवार गाथा वाचायला मिळते ‘तवायफनामा’मध्ये. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, समाज-मानसिकता, कायदाव्यवस्था, ब्रिटिश अंमल, धार्मिक तेढ, पितृसत्ताक पद्धती, तसंच तवायफ समाजातली रोचक मातृसत्ताक जीवनशैली आणि लिंगभेधारित समाजव्यवस्था आणि यातून बनलेली व्यामिश्र संस्कृती; अशा अनेक अंगांनी लेखिका या गाथेचा वेध घेत गेलीय. यामुळं ही गाथा केवळ तवायफांची न राहता, समाजसंस्कृतीचे अनेक व्यामिश्र पदर आपल्यापुढं उलगडत जाते. हा बहुपेडी गोफ विणणं अवघड आणि धाडसाचंही होतं, आहे. सद्याकालात तर अधिकच. ही गाथा वाचताना बऱ्याचदा आपण वर्तमानकालीन गोष्टी वाचतो आहोत का काय असं वाटून जातं. आपला भूतकाळ आपला भविष्यकाळ ठरवत असतो असं म्हणतात ते काही अंशी खरं असावं. या सगळ्यामुळं, या गाथेतून मानवी आयुष्याचा एक विराट पट आपल्यापुढं उलगडतो.

सबा एका अर्थानं तवायफ समूहाची प्रोटॅगोनिस्ट (नायिका) आहे हे मान्य केलं तरी ती सर्व गोष्टी पुराव्यानिशी सादर करते. काहींना ती मुस्लीम समाजाची समर्थकही वाटू शकते, पण मुस्लीम धर्मातला कडवेपणा आणि त्यातले दोष, हिंसा, वहाबी मुस्लीम यांविषयीही लेखिका परखडपणे लिहिते. मुख्य म्हणजे, ज्या काळाचा पट ती मांडतेय त्या काळात हिंदू-मुस्लीम समाज सुखेनैव एकत्र नांदत होता. तवायफ समाजाचा तर प्रश्नच नव्हता. हिंदू-मुस्लीम तवायफ एकत्र सण साजरे करत. म्हणूनच आज आपण ‘मेरा मुर्शिद खेले होरी…’ सारखं उत्कृष्ट सूफी गीत ऐकू शकतोय. तवायफ मुस्लीम असली तरी तिचा आश्रयदाता शेठ हिंदू असायचा, त्यात बरेच रजपूतही होते, तर काही धनाढ्य व्यापारीही होते. त्यांच्या मुलांना आई अथवा वडलांच्या धर्मानुसार अथवा दोन्ही धर्मांनुसार वाढवलं जायचं. त्यांची नावंही दोन असायची. उदा : ऐजाज ऊर्फ अजय सिंह.

या गाथेतलं कथन प्रत्यक्ष तवायफच्या तोंडून आल्यामुळं ते अस्सल आहे. सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला पटतील असंही नाही; पण त्या प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून आलेल्या आहेत आणि अत्यंत रंजकही आहेत. सबानं हे संशोधन अत्यंत खोलात जाऊन तर केलंच आहे, पण त्याचबरोबर तपशिलांतही शिरलीय ती. कधी कधी कायद्याविषयीचे तपशील किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांचे अहवाल, वृतांत कंटाळवाणे वाटूही शकतात, पण त्यामुळं सत्य परिस्थितीचं लखलखित आकलन होतं हेही खरं. या गाथेच्या गोष्टीरूपातही क्वचित ते व्यत्यय आणतात; परंतु ते अपरिहार्य आहे! सांगीतिक इतिहासातल्या आपल्याला ठाऊक असलेल्या अनेक गोष्टींना लेखिका पुराव्यासकट धक्का देते आणि चकित करून सोडते. उदाहरणार्थ, भारतात पहिलंवहिलं ध्वनिमुद्रण झालं ते गायिका गौहर जान हिचं असा सार्वत्रिक समज. हे खरं की ध्वनिमुद्रण देणारी ती पहिली प्रसिद्ध गायिका, पण त्याआधी कलकत्यातील क्लासिक थिएटरच्या दोन तरुण कलाकारांकडं हे श्रेय जातं. त्या म्हणजे चौदावर्षीय शशी (शोशी) मुखी आणि षोडशा फणी बाला! अशा अनेक बाबी लेखिकेनं प्रकाशात आणल्या आहेत. या गाथेत एकूण तीस प्रकरणं आहेत, म्हणजे तीस प्रदीर्घ कथा आहेत असं म्हणू या. कथेइतकीच त्याची शीर्षकंही रोचक आहेत.

आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात गूढवादाला स्थानच नसताना; मौखिक इतिहासातून आलेल्या गूढकथा सबानं धीटपणे मांडल्यात. शहाण्यासुरत्याला त्यातला मथितार्थ नक्कीच जाणवतो. क्वचित ठिकाणी तो मला पटलादेखील! पण हा ज्याचा त्याचा प्रश्न हेही तितकंच खरं. या गूढकथांतला एक मासला…

… नुसत्या आठवणीनंही शहारली बिंदो. आपण एखाद्या नीच आणि विकृत राजपुत्राच्या हातचं बाहुलं होऊ शकतो अशी कल्पनाही केली नव्हती तिनं कधी. गायिका म्हणून नाव कमवायच्या आपल्या भागध्येयापासून दूरवर येऊन ती कुठं पोचली होती हे समजून चुकलं होतं तिला. सर्वस्व गमावलेली बिंदो निराश मन:स्थितीतच हताश होऊन रडू लागली. या अनोळखी जंगलात एकाकी अवस्थेत आपला शेवट होणार या विचारांनी संतप्त होऊन पश्चात्तापदग्ध अवस्थेत ती अश्रू ढाळत होती.

अचानक एक स्त्री अत्यंत सुंदर सोहोनी आळवताना ऐकू आली तिला. पहाटपूर्व प्रहरातला सोहोनी राग : रंग ना डारो श्याम जी.

या दूरस्थ जंगलात कोण गात असेल हे भावविभोर गाणं? आपल्याला भ्रम झालाय असंच वाटलं बिंदोला; तिनं अंधारात निरखून पाहिलं तर समोरच्या मोकळ्या जागेत एक तेजस्वी आणि सुंदर मुलगी दिसली तिला. आश्चर्याचा धक्काच बसला होता तिला. उंच आणि चपळ होती ती आणि कमळाच्या पाकळ्यांसारखे मोठाले होते तिचे डोळे. पांढरी साडी नेसली होती तिनं. तिच्या अंगावरचा एकमेव दागिना म्हणजे तिच्या दोन्ही कानातले चाफ्याच्या फुलांचे घोस. स्वत:च्या गाण्यावरच नाचत होती ती. झुडुपांआडून आपल्याला दुसरं कोणी तरी निरखतंय याचा पत्ताही नसावा तिला.

यात पात्रांची रेलचेल आहे. ही गाथा वाचताना आपण इतके गुंगून जातो की ती सर्व पात्रं आपल्याशी संधान बांधतात. फेर धरून नाचतात. धरमनबीबी, दया सिंह, कुंवर सिंह, बुल्ला-सदुल्ला, प्यारी, तारा, सदाबहार, बिंदो, असघरी, चंदा, फूलमणी, राणी, रज्जो या सगळ्या आपल्याच होऊन जातात.

मातृसत्ताक व्यवस्थेतली शहाणीव, त्यातून बदलत्या काळाशी तवायफ समूहाचं जुळवून घेणं याचबरोबर मातृसत्ताक व्यवस्थेतली आधिसत्ता, त्यातील ताणेबाणे हेही सबानं प्रामाणिकपणे टिपलेत. परिवारातल्या स्त्रियांची आपसातली स्पर्धा, वर्चस्व, त्यातलं राजकारण हेही सूचक तरी सुस्पष्टपणे जाणवून दिलंय. पितृसत्ताक कुटुंबव्यवथेत स्त्रीला जे स्थान असतं, आहे त्याहूनही विचित्र आहे तवायफ परिवारतल्या पुरुषाचं स्थान. मुलगा जन्माला आला की शोकात बुडतं सगळं कुटुंब. मुलगी होईस्तोवर बाईला मुलं जन्माला घालतच राहावं लागतं. फार काय वेगळं आहे हे? असं वाटून गेलंच मला. या सगळ्या तपशिलांमुळं आपली व्यवस्थाविषयक जाण वाढते. लेखिका स्वत: जरी पांढरपेशा उच्चवर्गातली असली तरी याही समाजातला दुटप्पीपणा आपल्या स्वत:च्या कुटुंबातल्या उदाहरणांतून द्यायलाही ती कचरली नाहीये. ‘विषयप्रवेश’ या सुरुवातीच्या प्रकरणातच तिनं काही गोष्टी मोकळेपणानं सांगितल्यात आणि नायिकेच्यात आणि आपल्यात समान दुवे आहेत हे मान्य केलंय. त्यामुळं तवायफ समूहातील स्त्रिया तिच्याशी बोलताना अधिक खुलून बोलल्या असतील तर त्यात नवल नाही.

तत्कालीन संगीत क्षेत्रातले उस्ताद, गुरू, गुरू-शिष्याची निष्ठा, रियाज, अनेक प्रथा- परंपरा याविषयीचे तपशीलही रोचक आहेत. भुरे खाँसारख्या वृद्ध सारंगीनवजाचं आपल्या साजाशी असलेलं नातं, निष्ठा, रियाज, त्यांची झिललेली नखुर्डी, रस्त्यातून चालताचालता सारंगी वाजवत जाणं, निजताना आपल्याजवळ सारंगी ठेवणं ही सगळं वाचून आदर, कळवळा अशा भावनांची गर्दी होते मनात!

रानात गुरं राखताना सारंगी वाजवणारा अंध बुल्ला मियाँही आठवत रहातो. ‘वेश्या स्तोत्र’ हे काव्य आणि त्यातले तपशील वाचून तर अचंबित व्हायला होतं! मला तर ते मुळातून वाचायची इच्छा झालीय. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संग्रहात ते उपलब्धही आहे.

तवायफ समूहातील स्त्रियांशी बोलण्याखेरीज लेखिकेनं कागदपत्रांचीही पुरेपूर छाननी केलीय. त्यातून कितीतरी तपशील हाती लागलेत तिच्या. तत्कालीन प्रसारमाध्यमं, त्याचा वापर आणि त्यामुळं एकंदर संगीत संस्कृतीत आणि सामाजिकतेत घडलेला बदल अशा अनेक बाबींचा परामर्श घेत गेलीय सबा. लेखिका जवळपास पंधरा वर्षं संशोधन करत होती. मौखिक इतिहास (ओरल हिस्टरी) आणि दस्तावेजांची सखोल छाननी यातून ही गाथा साकार झालेय.

shubh.sangeet@gmail.com