शतकाची चोवीस वर्षे गरागर फिरत संपली.. या पाव शतकामध्ये आपल्या जगण्यात गेल्या शतकात नसेल झाला इतका बदल झाला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने साऱ्या माध्यमांवर ताबा घेतला. त्यामुळे सततचे दृश्यप्रदूषण, वेळेचा अपव्यय, सारासार विचार करण्याची हरवत चाललेली क्षमता, अति-आत्मकेंद्रित वृत्तीची साथ हे सहज लक्षात न येणारे अवगुण आपल्यात शिरत चालले आहेत. नक्की काय घडले, याचा शोध भाषाअभ्यासक आणि अर्थसल्लागाराच्या नजरेतून..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रपंच भोवरा, भोवरा, फिरतसे गरगरा

हल्ली सकाळी आरशात स्वत:ला बघून गमतीशीर धक्के बसतात. केसांदाढीतली रुपेरी छटा लपत नाही. आपण स्वत:ला ‘फँटास्टिक बीस्ट्स’ सिनेमातला रुबाबदार ज्यूड लॉ समजलो तरी प्रत्यक्षात क्रूरसिंगाचे तिसरे केसाळ सहाय्यक दिसत असणार हे सत्य हळूच डोकं काढतं. चेहऱ्यावर मीठ-मिरपुडीचा देखावा साजरा करणारे ते वेगळे लोक, आपण नव्हे. अशा घातवेळी वाढत्या वयाच्या लोकांना पडणारा प्रश्न मलाही पडला- आपण चार दशकं या जगात गडबड केली, पण जगाला कणभर तरी फरक पडला का? आपली ‘लीगसी’ काय? नव्या पिढीसाठी आपण काय वारसा मागे ठेवून जातो आहोत? दंतघर्षण थांबवून यावर गंभीर विचार केला आणि शेवटी काही नाही तर ‘आपण जगलेला काळ नव्या पिढीला दाखवावा’ अशा निर्णयाप्रत आलो. हा मानस जघनफळासमोर ( fruit of the loins) जाहीर केला. सिनेमा हे माध्यम योग्य वाटलं, पण सुरुवात ‘राजाबाबू’, ‘धडाकेबाज’ किंवा तत्सम कलाकृतींनी करणं बरोबर नव्हतं. शेवटी ‘मेट्रिक्स’वर तडजोड झाली. कमरेत उलटा वाकून गोळ्या चुकवणारा कियानू रीव्ह्ज आमचा थोर नेता होता.
सिनेमा सुरू झाला. अंदाजे पाऊण तासांनी मी एक वाक्य ऐकलं. एजंट स्मिथ हा खलनायक निओ या नायकाला मेट्रिक्स हे मायाजाल १९९९ सालामध्ये अडकवून ठेवायचं कारण सांगतो : ‘‘हा मानवी संस्कृतीचा सर्वोच्च बिंदू होता.’’

हेही वाचा – लोभस आणि रसाळ!

माझं सिनेमातलं लक्ष उडालं. म्हणजे १९९९ सालानंतर मानवी संस्कृती उतरणीला लागली असं दिग्दर्शक वाचोस्की भावंडांना(तंत्रकृपेने आता भाऊ-बहीण) म्हणायचं असेल? मी १९९९ साल आठवून पाहिलं- तेव्हा जगासमोर ‘वाय टू के’ हा प्रश्न अकराळ- विकराळ स्वरूप घेऊन उभा होता. आज तो प्रकार किंचित हास्यास्पद वाटतो. घाईची प्रगती लागली असताना मानवाने गडबडीत चार आकडी सनांऐवजी दोन आकडी सन संगणकात सारले आणि (१९)९९ नंतर आलेला ०० कॉम्प्युटरला २००० ऐवजी १९०० वाटू लागला. म्हणजे मुळात हा मानवनिर्मित प्रश्न. मानवाने सोडवला. पण पुढच्या २५ वर्षांत घडलेल्या मोठ्ठ्या घटना इतक्या हास्यास्पद नव्हत्या. २००१चा ९/११ दहशतवादी हल्ला, २००४ची सुनामी, २००८ची मंदी, वेगवेगळ्या सनांत आणि ठिकाणी उद्भवलेली युद्धं, २०२०ची करोना महासाथ, २०२३ची कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती. गेल्या २५ वर्षांतली तंत्रज्ञानाची झेप तर काहीच्या काही आहे. २०००चा विशिष्ट घर्षणयुक्त संगीत वाजवणारा डायल-अप मोडेम ते २०२५मधला आकाराने वीतभर, पण द्रुतगती ५-जी इंटरनेट असणारा स्मार्टफोन. समाजमाध्यमं ते कृत्रिम बुद्धिमत्ता. राजकीय, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय – कोणत्याही कोनातून पाहिलं तरी गेल्या पंचवीस वर्षांत झालेले बदल ‘मोठे होते आणि हास्यास्पद नव्हते’ या लसाविवर एकमत व्हावं.

आपल्याला १९९९ साली सरावाचं असलेलं जग पाहता पाहता बदललं, ओळखू न येईलसं झालं. फौंटन पेनाने खऱ्याखुऱ्या कागदावर ‘सुढाळ ढाळाचे मोती’ टाइप हस्ताक्षरात टिपणं काढणाऱ्या माझ्याकडे हल्ली लोक दयाबुद्धीने बघतात. हळूहळू तापणाऱ्या आधणात बसलेल्या बेडकाला वाढतं तापमान जाणवत नाही म्हणतात. तसं काहीसं घडतं आहे.

माणसं मात्र राहिली. अर्थात, तीही बदलत गेली. म्हणजे बाह्यबदल याअर्थी नव्हे, पण माणसांच्या मानसिक पोतात काही मूलभूत बदल झाला आहे का, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. बेडूक-आधण-दृष्टांत इथे खरा सयुक्तिक आहे – हा बदल होताना तो फारसा जाणवला नाही. अर्थात माझ्या निरीक्षणांना प्रातिनिधिक म्हणता येणार नाही- कारण माझंही जग माझ्या डोक्याएवढं आहे.

सहस्राकाच्या उंबरठ्यावर, पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या आसपास असलेले लोक साधारणपणे ‘उदारमतवादी’ या लेबलात मोडणारे होते. त्यांना टोकदार मतं नव्हती असं नाही, पण इतरांना तितकीच टोकदार मतं असायला त्यांची काहीच हरकत नव्हती. धारणा बळकट नव्हत्या असं नाही, पण त्या योग्य ‘ट्रिगर’ मिळताच त्या बदलायला, किंवा त्यांना चक्क मुरड घालायला त्यांची हरकत नसायची. ‘जियो और जीने दो’ असा खाक्या होता. म्हणून कट्टर संघी घरातल्या तरुणीचं लग्न कट्टर समाजवादी घरातल्या तरुणाशी होऊ शके. त्यांच्या लहान मुलाला ‘आपल्या विचारसरणीने प्रभावित करून त्याचा स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता करू’ असा विचार दोन्ही आजी-आजोबा करत नसत. सभ्य, सुसंस्कृत आयुष्य जगण्याच्या कल्पनांमध्ये कोणाचा घाऊक, निर्बुद्ध द्वेष करणं हा भाग सहसा येत नसे. हे सगळं कधी बदललं कळलंच नाही. आता द्वेषाची शिकवण बऱ्याच तरुण वयापासून मिळत असावी. माझ्या एक परिचित बाई समाजमाध्यमांवर एका विशिष्ट विचारसरणीच्या झिलकरी म्हणून बऱ्याच सक्रिय (आणि तोंडाळ) आहेत. त्यांचे समर्थक आणि विरोधक भरपूर आहेत, आणि त्यांच्या आपसांत चकमकीही चालू असतात. माझ्या एका भाच्याने मला एक दिवस अचानक मेसेज केला. हा भाचा – वय विशीचे – अत्यंत गुणी आहे – चांगला गायक आहे आणि एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत आहे. त्याच्याबरोबर झालेला संवाद नावं, शिव्या वगैरे स्फोटक माल वगळून येणेप्रमाणे.

हेही वाचा – भारतीय वास्तव; वैश्विक दृष्टी…

भाचा : मामा, तुला ती xxx माहीत आहे का?
मी : वास्तवात आणि माध्यमात फ्रेण्ड आहे ती का रे?
भाचा : नाही फक्त विचारले… खूप घाण बोलते ती बाई. कधीतरी तिला मुस्काटात मारायची इच्छा आहे.
मी : ओह. तू प्रत्यक्ष ओळखतोस का त्यांना?
भाचा : नाही रे.
मी फार विषय वाढवला नाही. समाजमाध्यमांवरच्या पोस्टी वाचून पित्त खवळवून घेणाऱ्यांसाठी माझ्याकडे कोणतीच दवा नाही. थोड्या संवादानंतर त्याने मला ‘‘तू पुरोगामी आहेस वाटतं?’’ असा खोचक प्रश्न विचारलाच. मी होकार भरताच ‘किप इट अप’ असा उपरोध फेकून मारला.
प्रत्यक्षात कधीच ना भेटलेल्या व्यक्तीच्या काही शब्दांमुळे या इसमाच्या अस्मितांचं गळू का ठसठसावं हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे. आपल्याला राग आणवणाऱ्या व्यक्ती/ गोष्टीला ‘मूर्ख आहे लेकाचा’ म्हणून कानाआड करणे हा अहिंसक उपाय गेल्या पंचवीस वर्षांत कधीतरी फॅशनबाह्य झालेला दिसतो. सतत कोणावर तरी संतापून असणे, वसकावणे आणि आपल्यावर अन्याय झाल्याचा आवेश धरून बसणे ही गोष्ट आपण या पाव शतकात नीटच शिकलो आहोत.

गेल्या पंचवीस वर्षांत ‘देवभोळेपणा’ ही गोष्टही अशीच एकाएकी वाढलेली जाणवते. मज बापड्याला वाटत होतं की, नव्वदीच्या दशकातली संतोषीमातेची साखळीपत्रे हा देवभोळेपणाचा परमोच्च बिंदू होता. पण पोळ्यांच्या डागांमध्ये दिसणारे प्रेषित/ स्वामी, ‘‘मोकळ्या टाकीत एकाएकी पेट्रोल आलं!’’ टाईप चमत्कारांची वर्णनं कमी होती म्हणून की काय ‘‘दोन मिनिटं असतील तर जै स्वामी म्हणा.’’ अशा धमकीवजा पोस्टी चोहीकडे दिसू लागल्या. वास्तुशास्त्र, तोडगे, उपासतापास, काळी- गोरी -हिरवी-निळी जादू या प्रकारांना आणि त्या करवून देणाऱ्या बाबाबुवांना आता समाजाच्या मनात वैधता प्राप्त झाली आहे. एका लोकप्रिय उपग्रह वाहिनीवर हल्ली एक दाढीदीक्षित ज्योतिषीबुवा प्रेक्षकांच्या प्रश्नांना-अंधश्रद्धांना उघड खतपाणी घालणारी उत्तरं देतात आणि त्यात कोणाला काहीही गैर वाटत नाही. बेसिकली ‘श्यानपना’ शिकवणारे (इथे वेगळं क्रियापद शोभून दिसलं असतं, पण जाऊ दे) लोक वाढलेत हे खरं.

‘क्षणविध्वंसी’ असा एक शब्द एकेकाळी मराठीत होता. (पाहा : मोल्स्वर्थ कोश.) म्हणजे इतकी नाजूक किंवा कमजोर वस्तू की जिचा क्षणात नाश होऊ शकेल. गेल्या पंचवीस वर्षांत मानवी अस्तित्वाला ही क्षणविध्वंसी आली आहे की काय, नकळे. याने दोन गोष्टी होत असाव्यात- पहिली म्हणजे हातात आहे तो क्षण शक्य तितका ‘ओरपून’ घेऊ अशी तीव्र इच्छा. याचं दृश्य रूप तलवारीने केक कापण्यापासून ते दोंद हलवत रीळ करण्यापर्यंत सगळीकडे पाहायला मिळेल. दुसरं म्हणजे- आपल्या आयुष्याचा किंवा त्यातल्या श्रेयस-प्रेयस गोष्टींचा अंत आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टीमुळे क्षणात होऊ शकेल अशी भीती हे त्या वाढत्या देवभोळेपणाचं कारण असावं. आपल्या ताब्याबाहेर असलेली गोष्ट ‘कंट्रोल’ करणारा कोणी जगन्नियंताछाप इसम आहे, आणि त्या ‘भाई’ला आपल्या साईडला वळवून घेतलं की डर कशाचा?

एकेकाळी सरकारकडून अपेक्षा ठेवल्या जात, पण त्यांचा पोतही वेगळा होता. सरकार या संस्थेकडून नागरिक या समूहाचा भाग म्हणून काही मिळावं अशी ती अपेक्षा असे. हळूहळू आपण सरकारकडे संस्था म्हणून न पाहता व्यक्तींचा समूह म्हणून पाहायला शिकलो. आता अपेक्षा ठेवल्या जातात त्या व्यक्तीकडून, संस्थेकडून नव्हे. हा हारून-अल-रशीद या अरबी कहाण्यांतल्या राजाच्या राज्यकारभारासारखा प्रकार आहे. त्यात राजा ही व्यक्ती दयाळू असते, सरकार ही संस्था नव्हे. रेल्वेप्रवासात गैरसोय झाली तर रेल्वेमंत्र्याला ट्विट करून कळवा, प्रॉब्लेम सुटेल. बँकेने त्रास दिला तर सीईओला ईमेल करा. खासदार, आमदार, नगरसेवक यांना साकडं घाला, ते तुमचं वैयक्तिक कल्याण करतील. बाकी भगवान मालिक है. (त्याला खूश करायला एखादा होम किंवा पठण करायला विसरू नका!)

जगन्नियंताछाप इसमावर विश्वास ठेवण्यात एक समस्या अशी आहे की, तो नक्की कशाकशाचा नियंता आहे हे नेमकं सांगता येत नाही. हे बेसिकली कशावरही विश्वास ठेवायला मोकळं रान दिल्यासारखं आहे. ‘कॉन्स्पिरसी थियरीज’ आधीपासूनच होत्या, पण गेल्या पाव शतकात त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही वाढते आहे, आणि या थियरीजही जास्त यंग्राट होत चालल्या आहेत. माझ्या एका परिचितांनी ‘अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचं कारण म्हणजे तिथल्या एका गुहेत सापडलेलं वैदिक तंत्रज्ञानावर चालणारं विमान अमेरिकेला हवं होतं’ हे एका युट्युब व्हिडीयोच्या हवाल्याने छातीठोकपणे सांगितलं. त्यांना घरी आणलेल्या पातळ पोह्यांत कीड सापडल्यावर त्यात ‘सारस’चा हात जाणवत असेल.

पुढच्या पंचवीस वर्षांत काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे. आमच्या आदली पिढी जाऊन समाजाचं सुकाणू हळूहळू आमच्या पिढीच्या हाती येत आहे. पुढच्या पंचवीस वर्षांत ते आमच्या पुढच्या पिढीच्या हाती जाईल. ‘या पोरट्यांना काय अक्कल आहे’ म्हणून आम्हीही कुरकुर करू, पण पुढची पिढी आमच्यापेक्षा ‘सॉर्टेड’ असेल अशी आशा करायला जागा आहे. ते कदाचित खात्री न करता दणादण मेसेज फॉरवर्ड करणार नाहीत, तोडगे-गंडे-माळा घालणार नाहीत; आणि घाऊक द्वेष करणार नाहीत. कदाचित. कदाचित.

सिनेमा संपल्यावर जघनफळाला विचारलं, ‘‘काय मत?’’

‘‘ठीक होता. मधूनच फिलॉसॉफी झाडतात, मग मारामारी करतात. पण परत फिलॉसॉफी, मग परत… असे किती सिनेमे आहेत?’’ त्याने घाबरून विचारलं.

‘‘चार. पण बघितलेच पाहिजेत असं काही नाही…’’

adityapanse@gmail.com

(लेखक ब्रिटनमध्ये करसल्लागार म्हणून काम करतात.)