१९७७ च्या उत्तरार्धात कधीतरी खास थिएटर अकॅडमीकरिता लिहिलेल्या ‘तीन पैशाचा तमाशा’ या नव्या नाटकाचं वाचन दस्तुरखुद्द भाई करणार होते. त्या वाचनसोहळ्याचं आमंत्रण संगीतकार भास्कर चंदावरकर, दिग्दर्शक जब्बार पटेलांसह थिएटर अकॅडमीतल्या सर्व रंगकर्मीना होतं. फक्त मी वगळता! बहुधा कार्यक्रमाच्या आयोजकांना मी तेवढा महत्त्वाचा वाटलो नसावा. त्यामुळे मी त्या वाचनाला अनुपस्थित होतो. नंतर मला त्याविषयी कळल्यावर मी आतून खूप दुखावलो गेलो.
.. आणि १९७८ च्या फेब्रुवारी महिन्यात डॉ. जब्बार पटेलांचा निरोप आला. सोबत नाटकाच्या टंकलिखित संहितेची प्रतही.
‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक पु. लं.नी विसाव्या शतकातला श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक बटरेल्ट ब्रेश्ट याच्या ‘द थ्री पेनी ऑपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं केलेलं स्वैर रूपांतर आहे. मुळात ब्रेश्टसाहेबांनी १९२८ साली लिहून मंचस्थ केलेलं हे नाटक १७२८ साली जॉन गे या नाटककारानं सादर केलेल्या ‘बेगर्स ऑपेरा’ या नाटकावर आधारीत होतं. फक्त दोनशे वर्षांनंतर ब्रेश्टनं त्याला कुर्त वेईल या प्रतिभावंत संगीतकाराच्या मदतीनं तेव्हा नुकत्याच उदयाला आलेल्या ‘जाझ’ या अत्यंत लोकप्रिय आणि उत्स्फूर्त संगीतशैलीचा प्रभावी प्रयोग करून खास ब्रेश्तियन स्टाईलनं हसवता हसवता भेदक थट्टा करत नव्या परिमाणांसह (आणि परिणामांसहही!) सादर केलं आणि या नाटकानं नवा इतिहास लिहिला.
कुठल्याही काळातल्या समाजव्यवस्थेमध्ये अपरिहार्य असलेल्या शोषित आणि शोषक या घटकांची ही गोष्ट. भिकारी, वेश्या या तळागाळातल्या शोषित घटकांचं शोषण करणारे प्रस्थापित भांडवलशाहीचे प्रतिनिधी आणि या शोषणव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारताना पुन्हा तसेच शोषक होऊ पाहणारे गुन्हेगारी जगताचे म्होरके यांनी मिळून चालवलेली अभागी, उपेक्षित शोषितांच्या दु:खाची गोष्ट सांगणारं हे नाटक खरं तर सार्वकालिक सत्यच सांगतं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना त्यांना अंतर्मुख करतं.
पाश्चात्य देशांत ‘ऑपेरा’ या संगीत नाटकाच्या प्रयोगाचे दर खूप महागडे असल्याने ‘ऑपेरा’ ही केवळ उच्चभ्रू समाजाची करमणूकच नव्हे, तर प्रतिष्ठेचा मापदंडही मानला जाई. त्यामुळे तळागाळातल्या लोकांना त्यापासून सदैव वंचित राहावे लागे. मार्क्सवादाच्या तत्त्वज्ञानानं प्रेरित ब्रेश्टनं सामान्यांचं मनोरंजन करताना संगीत, नृत्य, विनोद अशा रंजक घटकांचा वापर करत मनोरंजन आणि बोध देणारी स्वत:ची अशी नवी रंगभूमी निर्माण केली. म्हणून त्याच्या नाटकाचं नावदेखील ‘थ्री पेनी ऑपेरा’- म्हणजेच ‘तीन पैशाचा तमाशा.’
पु. लं.नी मराठीमध्ये त्याचं सुंदर रूपांतर करताना अस्सल मऱ्हाटी मातीतल्या ‘तमाशा’ या लोककलाप्रकाराचा आधार घेतला. नेत्रदीपक नेपथ्य, भरजरी वेशभूषा यांच्याविना एखाद्या पिंपळाच्या पारावर अगर तात्पुरत्या उभारलेल्या मंचावर अतिशय लवचिक शैलीत अद्भुत नाटय़ानुभव देणाऱ्या अस्सल तमाशाशैलीत मूळ नाटकातल्या घटना, स्थळे आणि संदर्भ हे सारं अस्सल मऱ्हाटी मातीत प्रत्ययकारीपणे आणताना त्याला नवे प्रसंग आणि संदर्भाची जोड देत आजच्या समाजव्यवस्थेतल्या विसंगतींवर हसत, हसवत बोट ठेवणाऱ्या पु. लं.च्या अद्भुत प्रतिभेला सलाम करावासा वाटतो.
‘घाशीराम’नंतर हे नवं संगीतप्रधान नाटक करताना दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलांना नाटकातल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या सांगीतिक अभिव्यक्तीकरिता विविध संगीतशैलींचा नाटय़पूर्ण वापर करायचा होता. नाटकातले सर्व नाटय़पूर्ण क्षण त्यांना संगीतातून मांडावेसे वाटत होते. पु. लं.नी मुंबईमध्ये भिक्षेकरी प्रशिक्षण केंद्राद्वारे भिकारी निर्माण करत, त्यांना रोजगार देण्याच्या नावाखाली त्यांचं पद्धतशीर शोषण करणाऱ्या श्री. आणि सौ. पंचपात्रे या भांडवलशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा पूर्वी नाटक कंपनीत असल्याचे दाखवून त्यांच्याकरता नाटय़संगीतशैलीची सोय केलीच होती. तसेच रंगू तळेगावकर या वेश्येला लावणीशैली, तर मालन या पंचपात्रेकन्येकरता मराठी भावसंगीताची शैली असं सूचनही त्यांनी संहितेत केलेलं होतं. गुन्हेगारी जगतातल्या अंकुश नागावकर नामक दादाच्या टोळीतल्या गुंडांकरिता गोविंदागीत, कोळीगीत वगैरे लोकसंगीताचीही सोय करून ठेवली होती. संहितेनुसार नाटय़संगीत, लावणी, भावगीत आणि माफक कोळीगीत, शेडा, कटाव इत्यादी लोकगीतं एवढाच संगीताचा अवकाश दर्शविला गेला होता. पण डॉ. पटेलांच्या मनात त्याहून अधिक समृद्ध संकल्पना होत्या; ज्या तालमींतून उलगडताना सर्व सहभागी अभिनेते, गायक कलावंत आणि वादक मंडळीसुद्धा त्या अनुभूतीनं सुखावत गेली.. तिचा आनंद घेत राहिली. रंगू तळेगावकर या वेश्येचं झीनत तळेगावकर असं धर्मातर पटेलांनी भाईंच्या संमतीनं केल्यामुळे गझल, ठुमरी, कव्वाली अशा गायनप्रकारांचे तिच्या गायनाविष्कारात उपयोजन करण्याची सोय झाली. तर सूत्रधाराबरोबर (संहितेत नसलेल्या) दोन परिपाश्र्वकांच्या योजनेमुळे सूत्रधारासह परिपाश्र्वक रवींद्र साठे आणि अन्वर कुरेशी यांचं वैविध्यपूर्ण संगीतमय निवेदन आणि नाटकातल्या इतर पात्रांच्या शैलीदार गाण्यांतील रवी-अन्वर यांच्या रसानुकुल सहगायनाने नाटकाच्या वैविध्यपूर्ण संगीतात मस्त रंग भरले गेले. पाश्चिमात्य संगीतात अत्यंत लोकप्रिय ‘पॉप’ (‘पॉप्युलर’चे लघुरूप) संगीतशैलीचा वापर अंकुश नागावकर या गुन्हेगारी जगतातल्या (आजच्या भाषेत) डॉनच्या भावाविष्काराकरिता करावा, ही (मुळात पु. लं.ना अभिप्रेत नसलेली) भन्नाट संकल्पना सर्वस्वी दिग्दर्शक जब्बार पटेलांचीच.
मी ‘तीन पैशाचा तमाशा’करिता संगीतकार भास्कर चंदावरकरांचा सहाय्यक म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशी डॉक्टरांची इच्छा होती. त्यानुसार मी अगदी गायकनटांच्या ऑडिशन्सपासून नाटकाच्या तालमींमध्ये सहभागी झालो. चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, माधुरी पुरंदरे, वंदना पंडित, रमेश टिळेकर, रजनी चव्हाण, उदय लागू, प्रवीण गोखले, सुरेश बसाळे, देवेंद्र साठे, श्रीकांत गद्रे, मकरंद ब्रrो, प्रकाश अर्जुनवाडकर, अनिल भागवत या संस्थेतल्या रंगकर्मीना काही नवे चेहरेही येऊन मिळाले. ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते आत्माराम भेंडे यांचा मुलगा नंदू भेंडे हा मुंबईतल्या आंग्ल रंगभूमीवरील ‘जिझस ख्राईस्ट सुपरस्टार’ या संगीत नाटकातला प्रमुख गायकनट. हा ‘तीन पैशा..’तली महत्त्वाची भूमिका करायला मोठय़ा आनंदानं पुण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. शामला वनारसे, प्रा. हेमा लेले, गायिका मीरा पुंड, ‘पुरुषोत्तम’ स्पर्धा गाजवलेला उमेश देशपांडे, भारत सरकारच्या गीत आणि नाटय़ विभागातले विजय जोशी, शरद चितळे, तर पुढे दलित रंगभूमी गाजवणारे टेक्सास गायकवाड, अविनाश आंबेडकर आणि नवे उत्साही उमेश बेलसरे, अशोक स्वामी, उल्हास मुळे, सतीश अग्रवाल अशा नव्या-जुन्या कलावंतांचा सुंदर मेळा जमला. अन्वर कुरेशी हा उत्तम व्हायोलिन वाजवणारा गायकही ‘तीन पैशा..’च्या टीममध्ये सामील झाला. सतीश पंडित (ड्रम्स), अशोक गायकवाड (तबला/ ढोलकी), लतीफ अहमद (सारंगी), बाळासाहेब साळोखे (क्लॅरिओनेट/ सेक्सोफोन), विवेक परांजपे (हार्मोनियम/ सिंथेसायझर), विलास आडकर (पियानो /अॅकॉर्डियन), मुकेश देढिया (इलेक्ट्रिक लीड गिटार), दीपक बारावकर (इलेक्ट्रिक बेस गिटार), जयवंत तिवारी (कोंगो व इतर तालवाद्ये) अशी वादक मंडळी मी व्यक्तिगत संपर्कातून या नाटकाकरिता जमवली.
गझल, ठुमरी, कव्वाली या शैलीतल्या गाण्यांकरिता सारंगी, हार्मोनियम, तबला, तर गण, गौळण, लावणी, कटाव या तमाशाशैलीच्या गाण्याकरिता ढोलकी, क्लॅरिओनेट, हार्मोनियम, भावसंगीत, लोकगीत (अंकुश आला रे आला, डोंगराशेजारी डोंगर), पॉपशैलीची गाण्यासाठी पियानो, अॅकॉर्डियन, सेक्सोफोन, व्हायोलिन, इलेक्ट्रिक गिटार्स, सिंथेसायझर, कोंगो, ड्रम, तबला, ढोलकी या वाद्यमेळाचा बहुआयामी असा समृद्ध प्रयोग हे मराठी रंगभूमीवर.. खरं तर भारतीय रंगभूमीवर पहिल्यांदाच घडत होतं. ( त्यापूर्वी अगर त्यानंतर आजवर कधीही, कुठेही हे घडल्याचं ऐकिवात नाही.)
लोकप्रिय चित्रपटगीतांच्या वाद्यवृंदात तीच ती गाणी वाजवून (खरं तर) कंटाळलेली ही सगळी स्वरलोभी मंडळी नव्या संगीतनिर्मितीच्या अनोख्या आनंदाच्या शोधात आमच्याबरोबर सामील झाली. पहिल्या दिवशी चंदावरकर सरांनी संहितेतल्या पहिल्या गाण्याची- ज्याला पाश्चिमात्य ऑपेरामध्ये प्रील्युड (आपण ‘पूर्वरंग’ म्हणूयात-) असे संबोधले जाते- चाल उपस्थित गायक, अभिनेते, वादकांना ऐकवली, शिकवली.
‘तीन पैशाचा तमाशा..
आणलाय आपल्या भेटीला
इकडून तिकडून करून गोळा
नट अन् नटी धरून वेठीला
आणलाय आपल्या आपल्या
आपल्या आपल्या.. भेटीला
तीन पैशाचा तमाशा..
आणलाय आपल्या भेटीला..’
(पूर्वार्ध)
‘तीन पैशा’चं संगीत
१९७५ च्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या ‘घाशीराम कोतवाल’च्या एका प्रयोगाला साक्षात पु. ल. देशपांडे येणार असल्याचं कळलं तेव्हा आम्ही सर्व रंगकर्मी खूप आनंदित झालो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen paishacha tamasha by p l deshpande