डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांचे भवतालातील घटितांची दखल घेणारे ललित सदर..
१४ जुलचा दिवस मोठा विलक्षण होता.  १४ जुल २०१३ ला रात्री नऊ वाजल्यापासून तार पाठवून संदेशवहन करणे कायमचे बंद झाले. दूरचित्रवाणीवर ही बातमी ऐकल्यावर आत काहीतरी हलले, हेच खरे! वास्तविक पाहता गेल्या कित्येक वर्षांत मी कुणाला तार केली नव्हती किंवा स्वीकारलीही नव्हती. पण तरीही पोस्टाच्या या सेवेशी आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी जोडल्या होत्या. या दिवशी त्या कायमच्या तुटल्या. मन मागे गेले..
१९८२ साल. मे महिना. फायनल एम. बी. बी. एस.चा रिझल्ट आला होता. मिरजेच्या मार्केटमध्ये एक छोटेसे कौलारू पोस्ट ऑफिस होते. पुण्यात घरी टेलिफोन नव्हताच. त्यामुळे विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये आल्याची वार्ता आईला तारेनेच कळवली होती. त्या रात्रीच्या अंधाऱ्या शांततेत घुमणारा तारयंत्राचा तो ‘कडकट्ट.. कडकट्ट’ आवाज मला अजूनही ऐकू येतोय..
डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया
खुशी का पगाम कही, कही दर्दसा छाया..
म्हणत येणाऱ्या खाकी कपडय़ातल्या सायकलवरच्या पोस्टमनचे स्वागत करणारे आम्ही- ‘तारवाला..’ अशी हाक ऐकली की थरकापायचो. तार म्हणजे कोणीतरी दूरस्थ आप्तस्वकीय कायमचे दुरावल्याची वार्ता.. पण हीच तार कधी कधी एम्लॉयमेंट एक्स्चेंजचा कॉल कळवायची, कधी इंटरव्ह्य़ूची तारीख, तर कधी ती मुलाखतीच्या बदललेल्या नियोजित स्थळ-काळ-वेळेची साक्षीदार व्हायची. तार हा खरे तर इंग्रजांचा आपल्यावर कुशलतेने राज्य करण्यासाठी एतद्देशीयांत राबविलेला प्रशासकीय निर्णय होता. पण त्याचे सामाजिक प्रायोजन दूरच्या लोकांना तात्काळ जोडते झाले. तेव्हा आजच्यासारखे फेसबुक नव्हते. ट्वीट नव्हती. व्हॉटस् अ‍ॅपचा सवालच नव्हता. पण जोडलेल्या तारयंत्राचा यांत्रिक कडकडाट हा मानवी भावनांचा सजीव आविष्कार होता. कुठे हासू, तर कुठे आसू असे क्षणात वातावरण बदलण्याची अद्भुत शक्ती तारेत होती.
तारेने संवादातले अंतर कमी केले.. तारेने वेळेशी सोयरीक जुळवून दिली.  घडी घातलेल्या त्या पांढऱ्याशुभ्र चौकोनी कागदाने अनेकांच्या आयुष्यांचे परिमाण बदलले.. कुठे माणसे उन्मळली, तर कुठे तिने त्यांना उभारी दिली.  तारेमागून संदेशवहनाचे अनेक मार्ग माणसाने शोधले. त्यात इंटरनेट आले. टेलिफोनच्या आवृत्त्या आल्या. मोबाइलचे शेंडेफळ आले. पण तारेचा तोरा कशामुळेही कमी झाला नाही. टेलििपट्ररच्या धडधडाटातही ती वर-खाली हलणारी काळी बटणे.. आणि तो नादमधुर कडकडाट आपली पावले चालतच राहिला.
१४ जुल २०१३ पासून ते सारं संपलं.. तारा तुटल्या.. कडकडाट शांत झाला. आता ही यंत्रे आपल्याला पोस्टाच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतील.  ती काचेच्या पेटीत कुलुपबंद असतील. टेलिग्राफ हाऊसचे फलकही आता म्युझियममध्ये अँटिक्स म्हणून वर्गीकृत होतील. हाताच्या मुठीत सामावणारा मोबाइल घेऊन अनिमिष नेत्रांनी उद्याचा जॉन आपल्या ग्रेट ग्रँड पाच्या काळातलं तारयंत्र बघेल आणि ग्रेट ग्रँड पा किती प्रीमिटीव्ह होते असं म्हणेल, तेव्हा काचेचं तावदान खळ्ळकन् फुटेल.. काळी बटणे कडकडायला लागतील.. आणि तारयंत्र म्हणेल.. ‘‘नाही रे बाळा, माझ्या पोटात नुसता आवाजच नाही रे, तर एका अख्ख्या पिढीचा सांस्कृतिक वारसा सामावला आहे रे.. मी तो सांगेन.. तुला ऐकायला वेळ आहे का बाळा?’’

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
BEST employees and passengers protest
बेस्ट कर्मचारी, प्रवाशांचे निषेध आंदोलन
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Story img Loader