आपले आयुष्य व्यापणाऱ्या दूरचित्रवाणीचा जनक जॉन लोगी बेअर्ड यांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त या अवलिया संशोधकाचे स्मरण..
आज घरबसल्या आपण पाच हजार मैलांवर चाललेली वेस्ट इंडीजविरुद्धची भारताची क्रिकेट मॅच त्याचक्षणी पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी अतिरेकी हल्ल्यात न्यूयॉर्क शहरातील जुळे टॉवर्स कोसळताना जगभरातील लोकांनी छोटय़ा पडद्यावर पाहिले. जगातल्या विशेष घटना बातम्यांच्या स्वरूपात आपण घरच्या दिवाणखान्यात बसून पाहतो. ही किमया होते कशी? ती केली कोणी? तो होता- जॉन लोगी बेअर्ड! टी. व्ही. ऊर्फ दूरचित्रवाणीचा जन्मदाता! या अवलिया शास्त्रज्ञाने प्रचंड कष्टाने व लोकांकडून अवहेलना सहन करूनही शोधून काढलेल्या ‘टी. व्ही.’च्या जादुई शोधासाठी १२५ व्या जयंतीदिनी त्याचे स्मरण करणे उचित ठरावे.
१३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंडमधील ग्लॅसगोजवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. त्याची आई श्रीमंत घराण्यातली होती. धार्मिक प्रवृत्तीची असल्याने धर्मोपदेशकाची कर्तबगार गृहिणी म्हणून ती ओळखली जाई. सतत नवीन काहीतरी करण्याची तिची धडपड जॉनमध्ये उतरली नसती तरच नवल. मूळच्या गुटगुटीत असलेल्या जॉनला वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच थंडीच्या आजाराने बेजार केले होते. पण शाप ठरण्याऐवजी हा आजार त्याला वरदानच ठरला. त्यामुळे ‘सैन्यामध्ये भरती होण्यास नालायक’ असा शिक्का त्याच्यावर बसला. जॉन ज्या शाळेत शिकला त्या कर्मठ शाळेत इंग्रजी आणि लॅटिन भाषांचे महत्त्व होते. पण विज्ञानाशी मात्र वाकडे होते. अशा घुसमटलेल्या वातावरणात काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले. फोटोग्राफी सोसायटीचा अध्यक्ष झाल्यानंतर जॉनच्या व्यासंगाला वेगळीच कलाटणी मिळाली. बी. एस्सी. झाला तरी चाकोरी सोडून त्याने एका कारखान्यात मेकॅनिकची नोकरी धरली. उद्देश इतकाच, की आपल्या संशोधनाला लागणारी अवजारे हाताळायला मिळतील. पाठीवर सॅक टाकून त्याने दुकाना-दुकानांतून त्यांची विक्री केली, ती केवळ त्या अवजारांची उपयुक्तता आजमावण्यासाठीच! यात धनसंचय होत नाही असे लक्षात आल्यावर त्याने एका मित्राच्या सल्ल्याने वेस्ट इंडीज बेटे गाठली आणि तेथे मुबलक पिकणाऱ्या फळांचा जॅम आणि लोणची बनवण्याचा उद्योग सुरू केला.
वैज्ञानिक वृत्तीचा जॉन असल्या उद्योगात थोडाच रमणार? तो इंग्लंडला परतला आणि त्याने वीज उत्पादक कंपनीत साहाय्यक इंजिनीअर म्हणून नोकरी धरली. तेथे त्याने समोरच्या टेकडीचे रमणीय दृश्य पाहिले आणि त्याच्या डोक्यात किडा वळवळला, हे दृश्य  ऑफिसमध्ये का आणता येऊ नये? १९२३ साली त्यादृष्टीने प्रयोग सुरू झाले आणि काही अवधीतच एका क्रॉसचे चित्र त्याच्या केबिनमधून शेजारच्या खोलीत दाखविण्यात तो यशस्वी झाला. कोणतेही चित्र ठिपक्या-ठिपक्यांचे बनलेले असते आणि ते विजेच्या वाहकावरून आपण पाठवू शकलो तर दुसऱ्या जागी साकारलेल्या त्या ठिपक्यांतून त्या चित्राचा आकृतिबंध तयार होईल, या कल्पनेवर त्याने जोरदार संशोधन सुरू केले. एका चकतीला शेकडो छिद्रे पाडून त्यामागे प्रखर प्रकाशझोत ठेवला आणि सेलेनियम सेलद्वारे ती प्रकाशित छिद्रे समोरच्या पडद्यावर एकत्रितपणे दाखविण्यात तो यशस्वी झाला. या ठिपक्यांतून अलगद एक चित्र दिसू लागले. अशा प्रकारे आपण मानवी आकृतीही प्रसारित करू शकू असा विश्वास  वाटला आणि रस्त्यावरून एक भटक्या माणसाला पकडून आणून त्याला आपल्या यंत्रासमोर बसवून  पडद्यावर दाखविण्यात जॉन यशस्वी झाला. पण भुताटकीच्या भीतीने घाबरून तो भटक्या एकदा पळूनसुद्धा गेला. पडद्यावर माणसाची प्रतिमा दिसू लागली तरी त्याकरता मॉडेलला स्थिर बसावे लागे. हा दोष टाळण्यासाठी जॉनने शेकडो बॅटरीज् एकत्र केल्या आणि निर्माण झालेल्या दोन हजार व्होल्टस्च्या विजेच्या साहाय्याने हा दोष दूर करण्यात तो यशस्वी झाला. पण या प्रयत्नांत त्याला विजेचा शॉक बसून तो लांबवर फेकला गेला व जबर जायबंदी झाला. एकदा प्रयोगाच्या खोलीत मोठा स्फोटही झाला. जागेच्या मालकाने त्याला हे नस्ते धंदे बंद करून आपली जागा सोडून जाण्यास सांगितले. तथापि पुढे ३० वर्षांनी हेस्टिंगच्या पालिकेने त्या जागेवर ‘टेलिव्हिजनचा जन्मदाता जॉन लोगी बेअर्डची प्रयोगशाळा’ असा फलक लावला तेव्हा हाच मालक मोहोरला होता.
विजेच्या धक्क्य़ाने जॉन काहीसा अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला संशोधनात साहाय्य केले. जॉनने यंत्रांची जुळणी सांगायची आणि पत्नीने ती साकारायची- अशी जिद्दीची वाटचाल सुरू झाली. या साठी ‘फिलिप्स’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने त्याला आवश्यक त्या बॅटऱ्या विनामूल्य दिल्या.
जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने ‘बेअर्ड टेलिव्हिजन’ नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली. नभोवाणी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘बी. बी. सी.’ने मात्र त्याला जवळजवळ झिडकारलेच. जॉन हा आपला व्यावसायिक स्पर्धक बनेल अशी त्यांना भीती वाटत असावी. नभोवाणी क्षेत्राचा जनक मार्कोनी याच्या वाटय़ालाही सुरुवातीला अशीच अवहेलना आली होती. सतत पाठपुरावा करीत राहिल्यानंतर अखेर बेअर्ड-हॅचिन्सन या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आणि दूरचित्रवाणीचे दर्शकांसाठीचे पहिले प्रक्षेपण ३० सप्टेंबर १९२९ रोजी दुपारी ११ वाजता करण्यात जॉन यशस्वी झाला. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी हे प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त १९ जणांनी! कारण त्यापेक्षा जास्त रिसिव्हरच तयार झाले नव्हते.
टी.व्ही.चे प्रक्षेपण सुधारण्यासाठी जॉनने संशोधन चालूच ठेवले. अमेरिकन व्यापारी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिराती चित्रांद्वारे घरोघरी पोहोचविण्यास टी. व्ही. प्रचंड उपयुक्त ठरेल, हा दूरदर्शी विचार करून जॉनला आवश्यक ते अर्थसाहाय्य दिले. जाहिरात कंपन्यांना एक प्रकारे ही सोन्याची खाणच सापडली.
दूरचित्रवाणी प्रसारणात भविष्यात अनेक सुधारणा झाल्या. त्याचा श्रीगणेशा झाला- जॉन इंग्लंडहून अमेरिकेपर्यंत ट्रान्स-अ‍ॅटलांटिक चित्रे दाखविण्यात यशस्वी झाला तेव्हा! चतुर अमेरिकन व्यापाऱ्यांनी मग बेअर्ड-हॅचिसन कंपनीचे शेअर घेण्याचा धडाका लावला. तरीही त्या संपत्तीच्या बिछायतीवर लोळत न बसता जॉनच्या संशोधनाने जोरदार धडक मारली. वायूवेगाने धावणाऱ्या डर्बी या घोडय़ांच्या शर्यतीचे प्रसारण झाले आणि जॉन हा कोणी वेडा नसून मानवाला नव्या जगात नेणारा एक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहे हे लोकांना पटले. प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉनचे फेब्रुवारी १९४६ मध्ये निधन झाले. आज दूरचित्रवाणीने आपले आयुष्य व्यापले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा