ऐश्वर्य पाटेकर
बालसाहित्यावर मला लिहायचं आहे; मात्र तरीही बालसाहित्याची प्रस्तावना मी इथे करणार नाही. असं मी कितीही ठरवलं असलं तरी मला राहवत नाही. करणार काय, काळाने त्याचा असा काही स्वभाव आपल्या समोर उभा केला की बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. आजच्या मुलांचं मामाचं गाव हरवलं आहे. त्यांना गोष्टी सांगणारी आजी नाहीये. म्हणूनच चांदोबाला तूप-रोटी खाण्यासाठी आवतण देण्याइतपत औदार्य या मुलांमध्ये उरलेलं नाही. किंवा आपण ते उरू दिलं नाही. थोडक्यात सांगायचे तर त्यांच्या संस्काराचं आजोळ हरवलं आहे. किंवा वर्तमानाने ते त्यांच्या जवळून निर्दयपणे हिसकावून घेतलं आहे. साहजिकच त्यांच्यावर संस्कार होणं फार गरजेचं आहे. हे खरं की, आजच्या मुलांच्या मार्कशीटवरची टक्केवारी पैकीच्या पैकी मार्काची आहे. मात्र मूल्यांचे मार्कशीट धुंडाळले तर त्यात सपशेल नापासाचा शिक्का असेल. अशा मूल्य गमावलेल्या पिढीला जर का संस्कारशील घडवायचे असेल तर त्यासाठी निकड भासते ती बालसाहित्याची. मधल्या काळात बालसाहित्याचा प्रवाह क्षीण झाल्यासारखा वाटला. विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर यांच्या नंतर बालसाहित्यात समृद्ध भर घालण्यात आपण कुठेतरी कमी पडलो, हे आपण मान्य करत नसलो; तरी ते सत्य नाकारता येत नाही.
बालसाहित्य निर्मितीचे प्रयत्न झालेच नाही, असे नाही; मात्र फारसे सफल होताना दिसले नाही. याच्या अनेक कारणांपैकी एक कारण हेही आहे की, तुम्हाला बालसाहित्याची नस सापडली पाहिजे. त्यासाठी तुमच्या आत कोवळी संवेदनशीलता अपेक्षित आहे. ती नसेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला सकस बालसाहित्य लिहिता येऊ शकत नाही. कोवळी संवेदनशीलता तुमच्यात एक निरागस मूल सतत जागं ठेवते. तुमच्यात निरागस मूल असलं की तुम्ही त्याचं भावविश्व सहजी आपल्या शब्दांच्या बळावर पेलू शकतात. दुसरे कारण विंदा करंदीकर यांच्या माकडाच्या दुकानातून अन् जंगलातल्या प्राण्यांच्या शाळेतून आम्ही अजूनही बाहेर पडायला तयारच नव्हतो. गझल जशी सुरेश भटांच्या कचाटय़ातून सुटली नाही. तसेच बालसाहित्याचे झाले आहे की काय! म्हणजे विंदा करंदीकर यांनी बालसाहित्याला ज्या उंचीवर नेऊन ठेवले. त्या उंचीपर्यंत कुणासच पोचता येऊ नये असे वाटत असतानाच कवी दासू वैद्य यांचा बालसाहित्यात ‘क, कवितेचा’, ‘गोलमगोल’, ‘झुळझुळ झरा’ आणि ‘चष्मेवाली’ या बालकाव्यसंग्रहांच्या संचाच्या रूपाने मारलेला चौकार बालसाहित्याचं आख्खं स्टेडियम काबीज करून गेला आहे. नुसतेच बालसाहित्याचे स्टेडियमच नव्हे तर मोठय़ांच्या पीचवर आपल्या धावांचा डोंगर उभा करून कवी म्हणून ‘मॅन ऑफ दी मॅच’चा किताब पटकावला आहे. विंदा करंदीकर जर का या स्टेडियममध्ये उभे असते खेळाडू म्हणून तर ते निश्चितच म्हणाले असते, आता खरा डाव रंगणार!
दासू वैद्य यांची बालकविता गेली पंचविसेक वर्षे बालसाहित्याच्या मासिकांतून व दिवाळी अंकातून समोर येते आहे. एकेकटेपणातही तिने तिच्या वेगळेपणाचा ठसा बालरसिक मनावर उमटवला होता; मात्र साधना प्रकाशनाने या कवितेला एकत्रितरीत्या शिवाय संचाच्या रूपात समोर आणून एका परीने बालसाहित्यप्रवाहाचे भलेच केले आहे. असे म्हणण्यास कुठलीही शंका नसावी. कवी दासू वैद्य यांनी निर्मिलेली ‘चष्मेवाली’ टीव्हीचे दुष्परिणाम सांगत बालचमूत सामील झाली! त्यांची आवडती तर ती झालीच; शिवाय तिने अगदी खुसखुशीत शब्दांत वास्तवाचं अंजन मुलांच्या डोळय़ात घातलं अन् त्यांनी तिचं म्हणणं मन लावून ऐकलं. ती त्यांना आपलेच उदाहरण समोर ठेवत मोलाचं काही सांगून जाते-
नुसताच टीव्ही पाहणाऱ्याचा
तिला येतोय राग
आंधळं होण्याआधी
बरी आली जाग
झुपकेदार शेपटीची
चष्मेवाली बोले
जग आहे सुंदर
असतील खुशाल डोळे
लाजूबाई लाजरे, भागूबाई भित्रे, हसूबाई हसरे, झोपूबाई झोपरे, रडूबाई रडके, बोलूबाई बोलके, याही चष्मेवालीपाठोपाठ दाखल होतात. ‘भातखाऊ’ तरी मागे कशाला राहील! न सांगताच ‘भीतीची हुडहुडी भरण्यासाठी ‘बागुलबुवा’ येतो. ‘गंमतपूरचे गंमतयार’ येऊन पोरांचे मन रिझवून जातात. ‘दंतपुराण’ घेऊन येतो छोटूला गोंडस बुवा. पाऊस येऊन ‘गरगर गिरकी’ घ्यायला लावतो, ‘सुटय़ाबाई’ येऊन सुट्टीची धमाल करतात. शेवटी येतात ‘मराठीच्या बाई’ अन सुरू होते नवी प्रार्थना
कॉम कॉम डॉट काम
नेट नेट इंटरनेट
सेव्ह सेव्ह मॅटर सेव्ह
एंटर-एंटर डिलीट डिलीट
हरे डॉट हरे डॉट
डॉट डॉट हरे हरे
हरे कॉम हरे कॉम
कॉम कॉम हरे हरे
ईमेल करोती संवादम्
डॉट कॉमी मन रंगता
‘व्हायरस’ बुद्धी विनाशाय
ईमेल डॉटकॉम नमोस्तुते
कवी दासू वैद्य यांना बालकिशोरांची नेमकी भाषा गवसली आहे. त्यामुळे त्यांनी जो काही नादात्मक, लयात्मक उत्तम बालकाव्याचा आविष्कार मांडला त्याने बालकिशोरांना भुरळ पडणार नाही असे होणार नाही! आज ही कविता बालकिशोरांच्या जिव्हेवर सहज रुळू लागली. त्याची तोंडपाठ होऊ लागली अन् ते ती म्हणू लागली. यालाच कवितेचं पाझरणं म्हणत असाल तर दासू वैद्य यांची कविता नेमकी पाझरली असे म्हणता येईल. कविता मारून मटकून गळी उतरण्याची गोष्ट नाहीच, ती आपसूक आली पाहिजे. बालकवितेसाठी तरी हा अलिखित नियमच आहे; मात्र ती आपसूक येण्यासाठी कवीकडे सिद्धी असायलाच हवी. कवी दासू यांच्यातील बालक कमालीचा संवेदनशील आणि हवाहवासा खोडकरही आहे. लहान मुलांचं म्हणून असलेलं जग, त्यांचं कमालीचं कुतूहल, त्यांची जिज्ञासा, त्यांची कल्पकता, त्यांचा मूड हे सारं कवीने कसोशीने जपलं आहे. त्यामुळेच त्यांच्या हातून अजोड अशी बालकविता निर्माण झाली आहे. त्यांच्या या चारही संग्रहात आपल्याला अनेक उदाहरणे सापडतील. त्यासाठी त्यांना जास्तीचा प्रयास करावा लागला नाही. ओढून ताणून ही कविता लिहावी लागली नाही. चिमुकल्या भावविश्वाला ती असे काही समोर ठेवते की तिच्यापासून गोंडस निरागस जग बाजूला होऊच शकत नाही-
बकासुराला भात किती?
आजीबाईला दात किती?
कॉम्प्यूटरला हात किती?
असं भुरळ पाडणारं ‘बालप्रश्नोपनिषद’ उभं करून कवी त्यात त्यांना गुंगवून ठेवतो. मला इथे सगळय़ाच कविता नाही सांगता येणार! यासाठी आपल्याला हे चारही संग्रह वाचावे लागतील. दासू वैद्य यांनी तोचतोचपणा झुगारून देऊन बालसाहित्याचं आपलं म्हणून अवकाश उभं करून त्यात बालकिशोरांना सामील करून घेतलं आहे. त्यामुळेच ही बालकविता खूप महत्त्वाची आहे. बालांना रिझवता रिझवता तिने मोठय़ांना चिमटे काढले आहेत. कोपरखळय़ा दिल्या आहेत. त्यामुळेच या कवितेचे वजन आणखी वाढले आहे. ‘गोलमगोल’ बालकवितासंग्रहातील ‘गोलमगोल’ ही एवढी एकच कविता उदाहरणादाखल पुरेशी आहे. त्यात ते म्हणतात,
इकडून तिकडं. तिकडून इकडं
जाल कुठं? पृथ्वी गोल
गोलमगोल भई पृथ्वी गोल
दगडाखाली आहे ओल
थोडक्यात सांगायचे तर हा कवी जर का माणुसकीची कविता लिहितो आहे तर बालकिशोरावर संस्कार का होणार नाही. म्हणून बालांवर संस्कार अन् मोठय़ांना समज देणारी ही कविता बालसाहित्यविश्वात नीट रुजून आली आहे. बालगोपाळांना आपल्या कह्यात घेऊन त्यांच्या कानात गोष्ट सांगणारी, त्यांना ताल धरायला लावणारी, त्यांना नाचायला, बागडायला लावणारी ही कविता म्हणूनच बालकिशोरांच्या मनात खोपा करती तर झालीच. मात्र मोठय़ांच्याही मनात आपल्या घराच्या भिंती रोवून उभी राहते म्हणून मला या कवितेचं मोल जास्त वाटतं आहे. लहान मुलं आपल्या भावविश्वाला आपल्या बालसुलभ विचारांची चिमुकली मात्र त्यांची म्हणून भक्कम तटबंदी घालून जपत असतात. ते जराही त्यास वास्तवाच्या विरूपतेचा धक्का लागू देत नाही. दासू वैद्य यांनी त्यांचं मन जपत त्याची आब राखत त्या विश्वाला आपल्या कवितेतून उभं केलं आहे. ते भावविश्व कवीचं उरलंच नाही, ते मुलांचं झालं आहे. इथेच कवीचं यश आहे असे म्हणता येईल. मुळातच दासू वैद्य यांनी लहान मुलांची नजर, त्याची दृष्टी स्वत:त अजूनही जपली आहे. त्यामुळेच त्यांना हे शक्य झाले असावे असे म्हणता येईल. साधना प्रकाशनाने अतिशय आकर्षक आणि देखण्या रूपात या चार कवितासंग्रहांच्या संचाची निर्मिती केली आहे. चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे यांनी या कवितांना तंतोतंत चित्रांत पकडून या चौकाराच्या संचात आपल्या रंग-रेषांच्या रूपाने षटकार मारला आहे. ही कविता मुलांच्या हातात गेलीच पाहिजे.
गोलमगोल, क कवितेचा, चष्मेवाली, झुळझुळ झरा, – दासू वैद्य, साधना प्रकाशन, पाने- अनुक्रमे ३२, ३६, २४, ३६
किंमत- प्रत्येकी १०० रुपये.