सुनील सुकथनकर

‘भारतीय फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’मधून पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक नाटके आणि पथनाटयांचे दिग्दर्शन. सुमित्रा भावे यांच्यासह पन्नासहून अधिक लघुपट, सतरा चित्रपट आणि चार टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन. ‘दोघी’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘अस्तु’, ‘कासव’ हे महत्त्वाचे चित्रपट.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Loksatta Online organizes Fact Checking workshop Mumbai news
‘फेक न्यूज’ हा साऱ्या विश्वाचाच प्रश्न! लोकसत्ता ‘फॅक्ट चेक’ कार्यशाळेतील तज्ज्ञांचा सूर
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune Railway Station in 1965
१९६५ मध्ये पुणे स्टेशन कसं होतं? VIDEO एकदा पाहाच

कथानकाच्या गुटीमधून पलायनवादी करमणूक आणि त्यातून कधी हिंसाचारी नशा तर कधी अतिनाटयपूर्ण खोटा संघर्ष दाखवत प्रेक्षकाला झुलवत आपल्या आहारी नेण्याचं कसब व्यावसायिक चित्रपटकर्त्यांकडे नेहमीच असतं. आम्हाला कथानक ही गोष्ट वेगळया कारणासाठी वापरायची होती. गोष्टीच्या ‘गोड’ किंवा ‘ओळखीच्या’ आवरणाऐवजी किंचित अप्रिय असणारं असं वास्तव आम्हाला प्रेक्षकांच्या गळी उतरवायचं होतं..

१८९७ मध्ये लुमिएर बंधूंनी पहिली चित्रफीत पॅरिसमधल्या एका कॅफेमध्ये दाखवली तेव्हा कोणाला कल्पना होती की एक ‘अनुभव-क्रांती’ जन्माला येते आहे! काही कामगार एक भिंत पाडताहेत, एक ट्रेन फलाटावर येत आहे-अशी ती जेमतेम काही सेकंदांची दृश्यं होती. पण असं म्हणतात की ती पडद्यावरची ट्रेन अंगावर येते की काय असं वाटून काहीजण बेशुद्ध वगैरे पडले! याचं कारण अनुभवाचा हा चालता, जिवंत अनुभव माणसाला नवीनच होता. फोटोग्राफीचा उदय झाला होता; पण ती अगदी हुबेहूब असली तरी स्थिरचित्रं होती. अशी स्थिरचित्रं वेगाने पळवून पडद्यावर प्रत्यक्ष आयुष्यच प्रकट करता येणं म्हणजे कमालच!

आणखी वाचा-हिंदूंच्या ‘राजकीय पर्यटना’चा आरंभ 

आजही आपण ‘त्याच’ कामगारांनी पाडलेली ‘तीच’ भिंत पडताना पाहू शकतो. आजही ‘तीच’ ट्रेन फलाटावर येताना आपण पाहू शकतो. हा चमत्कार नाही तर काय? आपण मनुष्यप्राण्यांनी काळाला हरवण्याचाच हा प्रकार नाही का? काळाच्या काही थेंबांना आपण चित्रपट नावाच्या कुपीत कायमचं बंदिस्त करून टाकलं. अगदी हुबेहूब. डॉक्युमेंटरी किंवा (थोडासा अपुरा वाटणारा प्रतिशब्द) वृत्तचित्र याचा जन्म हाच नव्हे काय? किंबहुना कोणताही चित्रपट हा या अर्थाने ‘डॉक्युमेंटरी’च तर असतो. तेव्हा जसं कॅमेऱ्यासमोर घडलं ते चित्रित करणं (आणि त्याला ध्वनीची जोड देऊन जिवंत करणं) हे प्रत्येक चित्रपट करतच राहतो. अगदी देव आनंदचा एखादा कृष्णधवल चित्रपट पाहताना वरळीच्या सुनसान रस्त्यांवर समुद्रकाठी धावणाऱ्या गाडीचा पाठलाग पाहताना ‘त्या’ क्षणी ‘त्या’ वेळच्या मुंबईमधला ‘तो’ रस्ता कसा होता हे ‘तंतोतंत’ आपल्याला आजही दिसतं. आपण ज्या कथानकात गुंतलो होतो, ते क्षणभर विसरू या. तर तेव्हाची मुंबई हुबेहूब दाखवणारा हा ‘डॉक्युमेंटरी आनंद’ आपल्यापासून कोण हिरावून घेणार?

१९८५ मध्ये सुमित्रा भावे या चाळिशीतल्या सामाजिक संशोधन करणाऱ्या प्राध्यापिकेने आपल्या अभ्यासातले निष्कर्ष निरक्षर स्त्रियांपर्यंत पोचवायचा ध्यास घेतला; तेव्हा तिच्याबरोबर आम्हा काही उत्साही तरुणांचा माध्यमप्रवास सुरू झाला. पथनाटय ते चित्रप्रदर्शन-स्लाइड शो असं करत करत आम्ही चित्रपट माध्यमाकडेच येऊन पोचलो. त्याचं कारण जीवनाचा हुबेहूब तुकडा मांडता येण्याची ताकद त्यात होती. ती ताकद तेव्हा जी उमजली ती आजतागायत सोबत आहे. ज्या दलित स्त्रियांचा अभ्यास सुरू होता त्यांचे चेहरे, आवाज, त्याच वस्त्यांमधली घरं, तो सारा भवताल हे सगळं विश्व ‘आहे तसं’ टिपत जायचं काम आम्ही करणार होतो. मात्र आम्ही वेगळया आकृतिबंधाची- शैलीची निवड केली. त्या काळात डॉक्युमेंटरी म्हणताच एकच नमुना डोळयांसमोर येई- तो म्हणजे ‘फिल्म्स डिव्हिजन की भेट’.. देश-परदेशात चालणाऱ्या घडामोडींचा आढावा घेणारं चित्रण आणि त्याबरोबर एक त्रयस्थ-किंचित नाटकी असं निवेदन असा हा ढांचा होता. यातून प्रेक्षक दुरावत असे. सुमित्राला प्रेक्षकांच्या मनात प्रवेश करण्याची इच्छा होती. आपला प्रेक्षक गोष्टीत रमतो- असं तिच्या लक्षात आलं. याच ‘गोष्टी’च्या आवडीचं व्यसनात रूपांतर आपला व्यावसायिक चित्रपट हुशारीने करतो. कथानकाच्या गुटीमधून पलायनवादी करमणूक आणि त्यातून कधी हिंसाचारी नशा तर कधी अतिनाटयपूर्ण खोटा संघर्ष दाखवत प्रेक्षकाला झुलवत आपल्या आहारी नेण्याचं कसब या व्यावसायिक चित्रपटकर्त्यांकडे नेहमीच असतं. आम्हाला कथानक ही गोष्ट वेगळया कारणासाठी वापरायची होती. गोष्टीच्या ‘गोड’ किंवा ‘ओळखीच्या’ आवरणातून आम्हाला प्रेक्षकांना किंचित अप्रिय असणारं असं वास्तव त्यांच्या गळी उतरवायचं होतं. म्हणून त्या बाईच्या हालअपेष्टा आणि त्यातून येणाऱ्या ताकदीचं ‘खरं’ चित्रण तर करायचं, पण त्याला एका कथानकाची जोड द्यायची असं ठरलं. पुढे मी भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेत शिकायला लागल्यावर मला या शैलीला नाव सापडलं. डॉक्यु-ड्रामा. पण तेव्हा आम्ही नकळत ही शैली निवडली. परिस्थिती किंवा समस्यांचा अभ्यास, त्यातून कथानकाची निर्मिती (ज्यात पात्रे, त्यांच्या भावभावना, प्रसंग असतील) आणि त्या कथानकाचं वास्तववादी चित्रण ही दिशा आम्हाला पहिल्या डॉक्युमेंटरीमध्ये सापडली ती अशा डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवताना तर कायम राहिलीच, पण आमचे पूर्ण लांबीचे चित्रपट-फीचर फिल्म्स- याही मला याच दृष्टिकोनाचं विस्तारीत रूप वाटतात.

आणखी वाचा-आदले । आत्ताचे : टोचणारी गोधडी

चित्रपट माध्यमाचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. लुमिएर बंधूंनी पडद्यावर ‘हुबेहूब’ ट्रेन चालवून दाखवली त्याच काळात जॉर्ज मेलीए नावाचा व्यावसायिक जादूगार फ्रान्समध्येच या माध्यमातून जादुई करामती करू लागला होता. म्हणजे एकाच वेळी हे माध्यम एकीकडे वास्तव मांडणारं आणि दुसरीकडे स्वप्नरंजनाच्या अमर्याद शक्यता अजमावणारं म्हणून उदयाला येत होतं. पुढे रॉबर्ट फ्लाहर्टी या दिग्दर्शकाने ‘नानुक ऑफ द नॉर्थ पोल’ हा माहितीपट बनवला. उत्तर ध्रुवावरच्या एस्किमोचं आयुष्य त्या काळातले अवाढव्य आणि जड कॅमेरे घेऊन प्रतिकूल परिस्थितीत चित्रण करून जगासमोर आणलं. चित्रपटमाध्यमाच्या ताकदीचा तो एक मोठाच आविष्कार होता. तर रशियामध्ये झिगा व्हरतोव्ह याने हातात कॅमेरा घेऊन आजूबाजूचा भवताल फक्त नेमकेपणे टिपत राहणं किती उद्बोधक आणि नाटयपूर्ण आहे हे ‘मॅन विथ द मूव्ही कॅमेरा’ ही डॉक्युमेंटरी बनवून सिद्ध केलं. तर काही वर्षांनी जॉन ग्रिअरसन या ब्रिटिश चित्रपटकर्त्यांने ब्रिटिश पोस्ट खात्याचा कारभार कसा चालतो हे अत्यंत तपशिलात चित्रित करत ‘नाइटमेल’ या त्याच्या डॉक्युमेंटरीमधून या आकृतिबंधाचा खऱ्या अर्थाने शोध पुढे नेला. याच ग्रिअरसनने पुढे भारतात ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावली. डच दिग्दर्शक बर्ट हॅन्सट्रा याने त्याच्या ‘झू’ या डॉक्युमेंटरीमधून प्राणी आणि माणूस मनोरंजकपणे एकमेकांसमोर उभे केले, तर त्याच्या ‘ग्लास’ या डॉक्युमेंटरीमधून काच बनवण्याचा कारखाना आणि त्यातल्या प्रक्रिया पाहात राहणं किती लोभस आहे, हे सिद्ध केलं.

हे सारं शिक्षणाचा भाग म्हणून शिकत असताना हेही जाणवत होतं की डॉक्युमेंटरी हे माध्यम काही काळ तरी वसाहतवादी दृष्टिकोनाचा एक उद्गार होतं की काय? म्हणजे ‘आहे रे’ गटातल्या लोकांनी ‘नाही रे’ गटातल्या लोकांचं चित्रण करून जगाला त्यांचं ‘बिचारेपण’ दाखवायचं! यातून अनेक उत्तम कलाकृती निर्माण झाल्या असतील, पण त्यांच्या मागे हाच दृष्टिकोन होता की काय? आजही आपल्या देशात तयार होणाऱ्या सरकारी प्रचारकी डॉक्युमेंटरी पटांमध्ये हाच आविर्भाव असतो की काय, अशी शंका येते. पण याला अपवाद म्हणून समोर आला तो अर्जेटिनाचा सोलानास हा डाव्या विचारसरणीचा दिग्दर्शक. त्याच्या ‘आवर्स ऑफ फरनेसेस’ या डॉक्युमेंटरीमध्ये त्याने उच्चभ्रू आत्ममग्न चंगळवादी समाज आणि वंचित बहुजन यांची प्रत्यक्ष चित्रं अशा हुशारीने एकमेकांसमोर मांडली की पाहणाऱ्या प्रेक्षकाला आपोआपच खजील व्हायला होईल. आणि यासाठी कोणत्याही ‘समजावणाऱ्या’ निवेदनाची गरजही भासू नये! आपल्याकडे आनंद पटवर्धन या सर्वात महत्त्वाच्या डॉक्युमेंटरी दिग्दर्शकांनी हा वारसा चालवला आहे, असं मला वाटतं. उदाहरणार्थ : त्यांच्या ‘राम के नाम’ या डॉक्युमेंटरीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा चित्रित करताना कॅमेरा सजवलेल्या रथाच्या मखरावरून खाली सजावटीच्या आतल्या मर्सिडिज गाडीवर येतो, तेव्हा आपोआपच एक विरोधाभास सांगणारी प्रतिमा तयार होते आणि अधिक काही ‘सांगण्याची’ गरजच उरत नाही! अशा असंख्य प्रतिमा त्यांच्या डॉक्युमेंटरी फिल्म्समध्ये पाहायला मिळतात.

आणखी वाचा-आदले । आत्ताचे: एकांताचा निर्भय एल्गार

भारतात ‘फिल्म्स डिव्हिजन’मधूनही अनेक समर्थ दिग्दर्शक तयार होत गेले. आम्ही ‘बाई’ चित्रपट बनवण्यापूर्वी अभ्यास म्हणून पाहिलेल्या काही डॉक्युमेंटरी फिल्म्समध्ये महत्त्वाचे होते सुखदेव. बांगलादेश मुक्तीवरचा ‘नाइन मन्थ्स ऑफ फ्रीडम’ असो, की संपूर्ण भारत एका आगळया नजरेने दाखवणारा ‘इंडिया १९६७’ असो. सुखदेवजी किंवा अशा अनेकांना डॉक्युमेंटरी हा कलाप्रकार कधी रूक्ष वाटला नाही. त्यांनी त्यात भावना ओतल्या. त्यांचं सादरीकरण त्या अर्थानं अनेकदा कथात्मक शैलीशी नातं सांगू लागतं. म्हणूनच कदाचित चंबळच्या डाकूंच्या (किंवा खरं तर ‘बागी’ लोकांच्या) पुनर्वसनावर डॉक्युमेंटरी करणारे सुखदेवजी पुढे ‘रेशमा और शेरा’ या सुनील दत्त यांच्या त्याच विषयावरच्या फीचर फिल्ममध्ये सहभागी झालेले दिसतात. मला सुमित्रा भावे आणि मी- आमच्या डॉक्युमेंटरी आणि कथात्मक चित्रपट (फीचर फिल्म्स) यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची बीजं या विचारात दिसतात.

फ्रेंच तत्त्वज्ञ समीक्षक आंद्रे बाझां म्हणतो, ‘‘कॅमेरा किंवा चित्रपटमाध्यम ही एक खिडकी आहे.’’ म्हणजे खिडकीतून जसं दिसलं तसं चित्रित करणं ही या माध्यमाची ‘खरी’ ताकद. डॉक्युमेंटरी फिल्म्स हे माध्यम या अर्थाने वापरतात. पण अनेकांनी याला प्रतिवादही केले. ‘‘फक्त आहे ते दाखवून काय उपयोग? मग बदलाची बीजं निर्माण कशी होणार?’’ असे अनेक प्रश्न उभे केले गेले. मला या दोन्ही विचारांचा समन्वय कायम भुरळ घालत आला आहे. आहे ते दर्शवण्याच्या सामर्थ्यांचा वापर करत, त्यामध्ये आपण आपल्या दृष्टिकोनाची भर घालत, कधी त्याला कथात्मक जोड देऊन भावनानिर्मिती करत आपलं ईप्सित साध्य करायला हवं. आम्ही तेच करत राहिलो.

आम्ही ‘बाई’ या डॉक्युमेंटरीनंतर आजवर अठरा फीचर फिल्म्स केल्या तरी जवळजवळ सत्तर-ऐंशी डॉक्युमेंटरी फिल्म्सही केल्या. गावच्या बायांनी पिण्याच्या पाण्यासाठी दिलेला लढा मांडणारी ‘पाणी’ असो किंवा नवऱ्याने ‘टाकून’ दिलेल्या एका तरुण मुलीने सायकल शिकून मिळवलेली स्वयंपूर्णता दाखवणारी ‘चाकोरी’ असो- हे कदाचित ‘लघुपट’ होते-शॉर्ट फिक्शन म्हणता येतील असे. पण त्यातही गावखेडयातल्या वास्तवाचा भाग अत्यंत महत्त्वाचा होता. काही वेळा अनेक सामाजिक संस्था आमच्याकडे त्यांच्या ‘कामावर आधारित डॉक्युमेंटरी बनवा’ अशी मागणी घेऊन येत. अशा वेळी त्यांच्या कामाचा आवाका तर मांडता येईल आणि प्रेक्षकाला बांधूनही ठेवता येईल अशी कथावस्तू आम्ही निर्माण करत असू. दिल्लीच्या वस्तीतल्या आरोग्य कर्मचारी महिला असोत की दृष्टी नसलेले किंवा ऐकण्याची क्षमता नसलेले किंवा गतिमंद मानले गेलेले विद्यार्थी असोत- यांच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स आम्ही अशा कथेत बांधून केल्या. यांत प्रत्यक्ष चित्रण संपूर्ण यथार्थ आणि त्याला जोड एका कथानकाच्या धाग्याची असा मार्ग निवडलेला होता. मात्र बालकामगारांचा प्रश्न किंवा ‘कास्प’ या संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या कार्याचा आढावा- अशा काही विषयांवर आम्ही ‘शुद्ध’ डॉक्युमेंटरी फिल्म्सही केल्या. नर्मदा बचाओ आंदोलनाबद्दलच्या ‘लाहा’ या आमच्या डॉक्युमेंटरीमध्ये एका आदिवासी जोडप्याची पुनर्वसनाच्या खोटया आश्वासनांमुळे होणारी वाताहत तर कथानकातून दिसतेच, पण आज प्रचंड जलाशयाखाली गेलेली गावेच्या गावे तेव्हा नांदती-जागती त्या डॉक्युमेंटरीमध्ये आजही पाहायला मिळतात.

आणखी वाचा-गोष्ट ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्यालढय़ाची!

आज या माध्यमात अनेक वर्ष काम केल्यावर मला वाटतं की, डॉक्युमेंटरी आणि फिक्शन यांतली सीमारेषा पुसट व्हायला हवी. त्यातच खरी या माध्यमाची गंमत आहे. म्हणून ‘सत्या’ किंवा ‘ रामन राघव’ अशा फीचर फिल्म्समध्ये किंवा आमच्या ‘ज़िंदगी ज़िन्दाबाद’ किंवा ‘बेवक्त बरिश’ या एड्सबद्दलच्या कथात्मक चित्रपटांत अनेक दृश्यं ही त्यातला डॉक्युमेंटरी एलिमेंट अधोरेखित करणारी आढळतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. आमच्या ‘वास्तुपुरुष’मध्ये जरी संपूर्ण कथानक कल्पित असलं तरी त्यातले अनेक जगण्याचे तपशील स्वतंत्रपणे एक सांस्कृतिक इतिहास म्हणून अभ्यासता येतील असं आम्ही मानत राहिलो. जगातल्या अनेक फीचर फिल्म्स बघताना त्यांतला हा छुपा डॉक्युमेंटरी एलिमेंट मला आकर्षक वाटतो. ते ते देश, त्यातली माणसं, त्यांचं सामाजिक-सांस्कृतिक विश्व आपल्याला त्यांच्या चित्रपटांतून उमजतात. म्हणूनच त्या त्या देशांतले ‘खोटे’ चित्रपट ‘खोटी’ प्रतिमाही निर्माण करत राहतात! तर दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाचा डेनिस ओ’रूर्क, अमेरिकेचा ‘मायकेल मूर’ किंवा ब्रिटिश डेव्हिड अॅतटनबरो यांच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स पाहताना अनेकदा आपण ‘भावनिक प्रतिक्रिया’ देत राहतो. आपल्याला कधी संताप येतो, कधी हसू फुटतं तर कधी डोळे पाणावतात. कथा नसली तरीही..! या अर्थाने मला ही सीमारेषा पुसट झालेली आवडते.

आज चित्रपट व्यवसाय पुन्हा स्टुडिओकडे वळतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘व्हीएफएक्स’ यांचं प्राबल्य वाढतं आहे. त्यामुळे त्या त्या काळात जग नेमकं कसं होतं हा एक दृक् – श्राव्य इतिहास चित्रपटांतून व्यक्त होणं त्यामुळे संपणार की काय अशी चिंता वाटते. डॉक्युमेंटरी फिल्म्समधून प्रखर किंवा नाजूक पण परिणामकारक संवाद होत राहो आणि कथात्मक फीचर फिल्म्समध्ये जगातल्या विविध वास्तवांचं यथार्थ दर्शन घडत राहो! दोन्ही चित्रपट प्रकारांवर प्रेम करणारा प्रेक्षक म्हणून इतकंच माझं मागणं..!!!

sunilsukthankar@gmail.com

Story img Loader