अरुंधती देवस्थळे
लंडनला जाणाऱ्या इंग्लिश साहित्याच्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या तीर्थाबरोबर शेक्सपिअरचं कॉव्हेंटरीचं घर, डी. एच. लॉरेन्सचं ईस्टवूडचं घर, वर्डस्वर्थचं सुप्रसिद्ध लेक डिस्ट्रिक्टमधलं घर वगैरे बघणं आवश्यकच असतं. इतर काही नाही पाहिलं तरी चालतं. तसं न करणं म्हणजे बेवफाई मानली जाते! व्हर्जिनिया वूल्फचं घर आदरमिश्रित कुतूहलाने बघायला जाणं फक्त भारतीय अभ्यासकांच्याच बाबतीतच घडतं असं नव्हे, तर अमेरिकन्सही इथे अशाच भावनेने येतात हे पाहिलं/ ऐकलं आहे. ‘टू द लाइटहाऊस’ अभ्यासल्यावर, ‘अ रूम ऑफ हर ओन’, ‘मिसेस डॅलोवे’, ‘दी वेव्ह’सारख्या तिच्या कादंबऱ्या वाचणं सहजच घडलं. ब्रॉन्टे भगिनी, जॉर्ज इलियट आणि जेन ऑस्टेन वगैरेही याच काळात भेटलेल्या. पण त्यांच्या कादंबऱ्यांत लक्षात ठेवण्यासारखं काही वाटलं नव्हतं. व्हर्जिनियाच्या ३०० वर्षांच्या पटावर वेगवेगळ्या कायाप्रवेशांतून हिंडणारा ‘जेंडर-बेन्डर’, ‘ओरलँडो’ (१९२८) म्हणजे व्हिक्टोरियन काळात केवळ मुलगी म्हणून शाळा-कॉलेजमध्ये जाऊ न शकलेल्या लेखिकेने केलेली कमालच वाटलेली.. आजही वाटते! इंटेरिअर मोनोलॉगमधून एका दिवसाची कादंबरी करणारी, एकांतप्रिय व्हर्जिनिया वूल्फ (१८८२-१९४१) आणि तिने केलेल्या ‘स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस’च्या सहज वापराचं गारूड मनावर टिकणारं ठरलं. त्या वयातही एलिझाबेथ आणि डार्सीच्या रोमान्सपेक्षा ‘ woman must have money, and a room of her own, if she is to write fiction…’ म्हणणारी व्हर्जिनिया आणि तिच्या लेओनार्डचं बौद्धिक साहचर्याचं व समजुतीचं खरंखुरं नातं कुतूहलाचा विषय होतं.
हे सतराव्या शतकातलं दुमजली दगडी घर ईस्ट ससेक्समधल्या रॉडमेल नावाच्या शांत खेडय़ात ‘दी मंक्स हाऊस’ म्हणून ओळखलं जातं. व्हर्जिनिया वूल्फचं असावं तसंच शांत, साधं. १९१९ पासून व्हर्जिनियाच्या आणि नंतर तिच्या लेखक-प्रकाशक नवऱ्याच्या- लेओनार्डच्या मृत्यूपर्यंत हे त्यांचं घर होतं. या घराला त्या दोघांचं असं एक कॅरेक्टर आहे. कसं, ते नाही सांगता येत; पण हे असं घर इतर कुणाचं असूच शकत नाही. हे घर नक्की करण्याआधी दोघांनी अनेक घरं पाहिलेली; पण हे घर बघताच कुठेतरी अंतरीची खूण पटल्यासारखं झालं. वीज, गॅस, पाण्याचं कनेक्शन नव्हतं, तरीही दोघांना दाट माळरान असलेल्या या शांत जागेचा मोह पडला. नंतर लेओनार्डनी आवश्यक सोयी करून घेतल्या. पण घराचं गावरानपण आणि आजूबाजूची घनदाट वनराई जशीच्या तशी ठेवली होती. आधीपासून घराला ‘दी मंक्स हाऊस’ हे रूढ झालेलं नाव वूल्फ मंडळींनी बदलण्याचा काही प्रयत्न केला नसावा. व्हर्जिनियाचे वडील लेस्ली स्टीफन एक लेखक व समीक्षक. तिची चित्रकार व लेखिका बहीण वानेसा आणि भाऊ थोबी हे सगळेच गाढे वाचक, अभ्यासक. या सगळ्यांनी मिळून स्थापन केलेल्या साहित्यिक वाचन आणि कला चर्चा मंडळाचं नाव होतं ‘ब्लूम्सबरी ग्रुप’! त्यांच्या बैठका अनेकदा या घरात होत. विवादमूर्ती लिटन स्ट्राची, लेखक ई. एम. फॉस्र्टर, अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्झ, रॉजर फ्रेय व डंकन ग्रॅण्टसारखे चित्रकार या मंडळाचे नवे-जुने सदस्य होते. स्वत:ला काही फारसं बनवता येत नसलं तरी हे मित्रमंडळ चवीने खाणारं होतं. विशेषत: फ्रेंच सॅलड्स आणि चिकन लिव्हर पातेसारख्या नजाकतीने बनवलेल्या पदार्थाची सोय बाहेरून केली जाई. टी. एस. इलिएट किंवा सिग्मंड फ्रॉइड आले की मध्यरात्रीपलीकडे चर्चा रंगत. दोघांनी मिळून सुरू केलेल्या हॉगर्थ प्रेसतर्फेच व्हर्जिनियाच्या सगळ्या कादंबऱ्या, ब्लूम्सबरीमधल्या इतर चिंतक लेखकांची पुस्तकंही प्रकाशित होत. लेओनार्डच्या बऱ्याच नंतर आलेल्या आत्मवृत्तात व्हर्जिनियाने लिहिलेल्या प्रत्येक कादंबरीच्या घडवणुकीची कहाणी आहे.
या घराभोवतीची सगळ्यात आधी नजरेत भरते ती लेओनार्डने टप्प्याटप्प्याने करवून घेतलेली विस्तीर्ण बाग आणि तिच्यातून जाणाऱ्या अरुंद दगडी पायवाटा. हिवाळ्याचे दोन-तीन महिने सोडून बागेत नेहमी रंगीबेरंगी फुलं असावीत असं माळीकाम. व्हर्जिनियाच्या लिहिण्याच्या खोलीतून ही ‘लाखात अशी देखणी’ बाग दिसते! वेली आणि झाडांनी निर्माण केलेलं छोटंसं हिरवंकंच विश्व. बागेत आता एक सुंदरसं ग्रीनहाऊसही आहे. एक छोटंसं तळं. आसपास फुलझाडांच्या रांगा, नक्षीदार कुंडय़ा. त्यात फळझाडं आणि भाजीपाल्यांचे लांब-रुंद वाफे. जागोजागी पत्थरातली शिल्पं ठेवलेली. झाडाखालच्या व्हर्जिनियाच्या शिल्पावरही आयव्हीच्या वेलीचं साम्राज्य आहे. तिचा फक्त चेहरा दिसतो.. बाकी अंगावर वेलींची झूल. आता या वास्तूची देखभाल नॅशनल ट्रस्टकडे सोपवण्यात आली आहे.
संपूर्ण घर सुंदर कलाकृतींनी भरलेलं. जागोजागी बसायला आरामशीर खुच्र्या आणि शेजारी उंच दिवे. प्रत्येक खोलीत िभतींवर सुंदर चित्रं. त्यापैकी टर्नर आणि पिकासो ओळखीचे. प्रत्येक खोलीत जाणवणारा पुस्तकांचा वावर. वरच्या मजल्यावर नेणाऱ्या पायऱ्यांवरही कोपऱ्यात पुस्तकं आहेत. अक्षरश: पावलोपावली. अगदी साधीशी बैठकीची खोली. फार उंच नसलेलं लाकडी छत. फरशांचा फ्लोअर. आणि आणि मध्ये दोन लाकडी खांब. अगदी आटोपशीर. मित्रपरिवाराचा आकार बघता वूल्फ पती-पत्नींनी जेवण, लिखाण आणि बैठकीच्या खोलीमधील भिंती पाडून टाकल्या आणि त्यात हे वेगवेगळे भाग मात्र ठेवले. अनौपचारिक झालेल्या या बैठकीचा आकार लहान-मोठा होई. सधनता असूनही अत्यावश्यक तेवढंच फर्निचर. मधल्या पुरातन टेबलावर पुस्तकं रचून ठेवलेली. भिंतींवर चित्रं. आणि फुलदाणीत कदाचित तिच्याच बागेतली ताजी पिवळी आणि जांभळी फुलं. खोलीत छान नैसर्गिक प्रकाश. बागेत उघडणाऱ्या खिडक्या. बैठकीत व्हर्जिनियासाठी खास बनवून घेऊन वानेसा आणि तिचा नवरा डंकन ग्रांट यांनी रंगवलेल्या लाकडी खुच्र्या. टेबलाच्या टाईल्सवरही डंकन आणि वानेसाचं पेंटिंग. खुच्र्यासुद्धा पाच-सहाच. पण वाचता यावं यासाठी दिवे योग्य उंचीचे. दोघी बहिणींचं एकमेकींवर खूप प्रेम. म्हणून वडील वारल्यावर दोघींनी रोज पायी येता-जाता यावं अशा अंतरावर घरं घेतलेली. शिल्पकार स्टीफन टॉम्लिनने केलेला तिचा बस्ट तिच्या लाडक्या खिडकीत ठेवलाय. पत्रकार व लेखक लेओनार्डचं लिहिण्याचं डेस्कही काही कागदपत्रांसह तसंच ठेवलेलं आहे. समाजवादी विचारसरणीची राजकीय मतं बेडरपणे मांडणारे, फॅसिझमविरोधी व्हर्जिनिया आणि ज्यूवंशीय लेओनार्ड नाझींच्या ‘ब्लॅक बुक’मध्ये असल्याचं त्यांना माहीत होतं.
सगळ्यात सुंदर आहे ती व्हर्जिनियाची बेडरूम! तिच्या गरजा लक्षात घेऊन वेगळ्याने बांधून घेतलेली. प्रवेश फक्त बागेतून! पांढऱ्या रंगाचं साम्राज्य. पुस्तकांची शेल्फज्. फायरप्लेसच्या दोन्ही बाजूंना मालकिणीच्या नाजूक चणीला पुरेसा एकेरी पलंग. उशाशी वाचायला बेडलॅम्प. एकच खुर्ची. बागेकडे बघत राहणाऱ्या प्रशस्त खिडक्या. तिच्या छोटेखानी ‘राइटिंग लॉज’मध्ये अजून तिचं टेबल चष्म्यासकट तसंच पसारा मांडून ठेवलेलं- स्टेशनरीसकट पत्रव्यवहार, तिचं आधंअधुरं लिखाण इथे पाहता येतं. I can only note that the past is beautiful, because one never realizes an emotion at the time. It expands later, and thus we don’ t have complete emotions about the present, only about the past… हे तिच्या हस्ताक्षरात पाहायला मिळालं. घरात अनेक फोटो आल्बम्स मिळाले होते, ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडे सोपवण्यात आले.
घर कमालीचं प्यारं असलं तरी ती गृहकृत्यदक्ष गृहिणी नव्हती. सगळी कामं लेओनार्डची किंवा माणसं शोधून करून घ्यायची. दोघांनाही स्वयंपाकाचा कंटाळा म्हणून घरात मदतनीस ठेवलेले. व्हर्जिनियाला लहानपणापासून गोष्टी सांगायची आवड. रात्री कित्येकदा आई-वडिलांऐवजी भावंडांना गोष्ट सांगून झोपवायचं काम तिचं असायचं. लिखाणाच्या बाबतीत मात्र ती स्वत:च्या तन-मनाची अतोनात गांजवणूक करत असे. कधी कधी वैतागून ‘असली काहीतरी पुस्तकं लिहिण्यापेक्षा बेकिंग तरी बरं!’ असंही म्हणे. ‘चर्चा रंगायला पोटात सुग्रास अन्न जाणं आवश्यक असतं,’असं ती म्हणत असली तरी अशा गडद निराशेच्या काळात तिला खायला अगदी नको असायचं. ते बळेच तिच्या गळी न उतरल्यास ती उपाशीच राहायची. जेवणघरात व्हर्जिनियाचं चित्र आहे- वानेसाने काढलेलं. आणि लेओनार्डचं काहीतरी शिजवताना- दुसऱ्या एकानं काढलेलं. व्हिक्टोरियन मूल्यांच्या प्रभावाखाली वाढलेल्या व्हर्जिनियाला स्वामित्व आणि नोकरवर्ग यामधील फरक ठळकपणे पाळणं आवश्यक वाटायचं.. ती त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असूनही! शेजारपाजारच्यांसाठी कायम हरवल्यासारखी दिसणारी ती एक कुतूहलाचा विषय असे.
तेराव्या वर्षी आईच्या मरणाचं अस दु:ख वाटय़ाला आल्याने नाजूक मन आणि शरीराची व्हर्जिनिया स्वत:चा मानसिक तोल हरवून बसली आयुष्यभरासाठी. तिला तीव्र नैराश्याचे झटके येत. आई वारल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं. तिच्या नाजूक वयात घरात आलेल्या सावत्र भावंडांनी तिच्याशी गैरवर्तन केल्यानेही पोरकेपण आणि नैराश्याची भावना वेळोवेळी उफाळून येई. पुस्तक लिहिताना मात्र ती शांत, एकाग्रचित्ताने लिहीत असे. अखेरीस तिने जवळच्या नदीत उतरून आत्महत्या केली. आत्महत्येआधी लेओनार्डला लिहिलेल्या पत्रातही ‘वेडेपणाबरोबरचा सतत चाललेला झगडा मी संपवत आहे..’ असं तिनं लिहिलं होतं. लेओनार्डच्या व्यवस्थितपणामुळे मुक्त शैलीत लिहिलेली, संपादनाचे संस्कार न झालेली व्हर्जिनियाची दैनंदिनी पाच खंडांत प्रकाशित झाली आहे; आणि दोघांचा वेगवेगळा पत्रव्यवहारही!
पुनर्मूल्यांकनाच्या या जमान्यात एकीकडे स्वत:ला स्त्रीवादी म्हणत कल्पित विश्वात स्त्रियांच्या मनाच्या कप्प्यांमध्ये स्वत:ला आणि वाचकांना बुडवून टाकणं.. आणि दुसरीकडे घरात काम करणाऱ्या स्त्रियांना जाणता-अजाणता बोचरी वागणूक किंवा ब्रिटनच्या वर्चस्वाखाली असलेल्या गरीब देशांतील स्त्रियांबद्दल दाखवलेला कोरडेपणा- या विरोधाभासाने व्हर्जिनियाची प्रतिमा झाकोळली गेली आहे. पण तिच्या कादंबऱ्यांचं वेगळेपण आणि मागाहून येणाऱ्या लेखिकांसाठी तिने स्वत: एक दीपस्तंभ (light house) बनून जाणं, हे अतिशय महत्त्वाचं!!
arundhati.deosthale@gmail.com