‘द मदर’ ही ‘पर्ल एस. बक’ या पुलित्झर पारितोषिक विजेत्या महान लेखिकेची कादंबरी. भारती पांडे या प्रसिद्ध लेखिकेने या कादंबरीचा अतिशय उत्तम रीतीने अनुवाद केला आहे आणि एक उत्तम कलाकृती वाचण्याची संधी मराठी वाचकांना लाभली आहे. चीनमधील ग्रामीण जीवनावर आधारित असलेली ही कौटुंबिक कादंबरी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आई’ या एका शब्दात अवघं जग सामावले आहे आणि या आईची हळुवारपणे उलगडत जाणारी गोष्ट लेखिकेने आपल्यासमोर मांडली आहे. आलेल्या प्रसंगाला सामोरी जाण्याची एका खेडवळ बाईची ही लढाऊ वृत्ती आपल्याला अचंबित करते.

या कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे यात आई, म्हातारी, चुलत जाऊ, मुलगा, आंधळी मुलगी अशीच पात्रांची नावे आहेत. फक्त नवऱ्याचं नाव एकदाच केव्हा तरी समोर येतं. प्रत्येक पात्राच्या मनोवृत्तीचे, भावभावनांचे वर्णन लेखिकेने अशा प्रकारे केले आहे की, आपण त्यात गुंतत जातो. ती पात्रं आपल्याला जवळची वाटायला लागतात आणि नकळतपणे आपण त्या पात्रांचे गुण-दोषही शोधायला लागतो.

स्त्रीकेंद्रित असलेली ही कादंबरी एका स्त्रीची विविध रूपं आपल्यासमोर आणते. प्रेमळ आई, वेळप्रसंगी कठोरपणाचा बुरखा ओढणारी बायको, तर नेहमीच कर्तव्यदक्ष असणारी सून आपल्यासमोर येते. प्रत्येकच रूप ओळखीचे आहे; परंतु प्रत्येक रूपात तिची भूमिका कशी बदलत जाते याचे चित्रण लेखिकेने केले आहे.

सून ते आजी हे स्त्रीच्या जीवनातले संक्रमण खूप छान रंगवले आहे. किंबहुना हे संक्रमणच तिच्या आयुष्याला गती देतं आणि सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर तिला झुलवत ठेवतं.

‘द मदर’, मूळ लेखिका- पर्ल एस. बक, अनुवाद – भारती पांडे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने- २०४, किंमत – ३०० रुपये.

पहिल्या शिकारकथेची कहाणी

शिकार कथा या नेहमीच वाचकांच्या आवडीच्या असतात. त्याचे कारण त्यातील गूढता, थरारकता, उत्कंठा आणि कथेतील ओघवतेपणा. जिम कार्बेट यांनी केलेल्या विविध शिकारकथा वाचणाऱ्यांना जॉन पिटरसन यांनी सिंहांच्या केलेल्या शिकारकथा वाचतानाही तितकाच थरार जाणवेल.

आफ्रिकेमध्ये केनियातील मोंबासा ते युगांडामधील कंपाला या शहारापर्यंत रेल्वेमार्ग उभारण्याचे काम १८९६ ते १९०३ दरम्यान करण्यात येत होते. भारतीय वंशाचे मजूर हे काम करत होते. त्यांच्या वस्त्यांवर तेथील जंगलातील सिंहाचे आक्रमण ही नित्याची गोष्ट झाली होती. त्या सिंहांपैकी दोन सिंह हे नरभक्षक होते आणि त्यांनी सर्वांना सळो की पळो करून सोडले होते. लेफ्टनंट कर्नल जॉन पिटरसन यांना या मार्गावरील त्सावो नदीवर असलेल्या पुलाच्या उभारणीसाठी प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी या नरभक्षक सिंहांची शिकार कशा पद्धतीने केली आणि त्यावेळी त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कसे संकट आले याची ओघवती कहाणी म्हणजे ‘त्सावोचे नरभक्षक’ हे पुस्तक. जॉन पिटरसन यांचे हे पुस्तक शिकारकथा मालिकांमधील पहिले किंवा पहिल्या काही पुस्तकांमधील एक अशी नोंद आहे. या कथांची सत्यकथा नाटय़पूर्ण असून त्यावर अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्माण झाले आहेत.

मूळ लेखक- जॉन हेन्री पॅटरसन; अनुवाद- विनय वसंत देशपांडे, ग्रंथाली प्रकाशन, पान- २५२; किंमत- ३०० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mother novel revolves around women tsavoche narbhakshak book on hunting dvr