मंगला गोखले
दामोदर मावजो यांचे लेखन म्हणजे गोव्याचा परिसर, लोकजीवन यांची चित्रकथा असते. गोव्यातील कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व्यवहारांवर विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून भाष्य येते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक मावजो यांच्या ‘जीवं दिवं की च्या मारू?’ या कोंकणी भाषेतील कादंबरीचा शैलजा मावजो यांनी केलेला मराठी अनुवाद ‘जीव द्यावा की चहा घ्यावा?’ नुकताच ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’ने प्रसिद्ध केला आहे.
घराला घरपण नसलेल्या, बालपण हरवलेल्या, एका कोवळय़ा जिवाची ही कथा. कोंडलेल्या कौटुंबिक वातावरणामुळे, विपिन ऊर्फ बाबूच्या आयुष्याची वाताहत झाली. त्याच्या डॅडी-माँचे फारसे पटत नाही. घरात खेळायला कोणी नाही. एकटय़ाने बाहेर जायची मुभा नाही. मित्रांना घरी आणलेले डॅडींना आवडत नाही. ना पाहुण्यांची, ना नातेवाईकांची ये-जा. डॅडी-माँ चहा प्यायचे पण मुलांना चहा द्यायचा नाही म्हणून त्याला कॉफीच मिळायची. एकदा माँने घावन केले होते. दुसरे घावन मागितल्यावर तिने उलथण्याचा चटका दिला होता. मिळेल तेवढंच घ्यायचं. त्याला काय हवं.. हे कधी कोणी जाणलंच नाही. कसलंही कौतुक नाही. शाळेत मुले बर्थ-डे साजरा करतात, चॉकलेट वाटतात, पण हे असं काहीही बाबूला डॅडी करू देत नाहीत. असा हा बालपण हरवलेला कोवळा जीव विपिन. त्याच्या आयुष्याची ही कहाणी. सनाथ असून पोरका असलेल्या जिवाची ही कथा.
शाळेमध्ये ‘माय होम’ या विषयावरचा त्याचा निबंध वाचून, बाबूच्या घरातील कोंडलेल्या वातावरणाचा अंदाज मार्टिनसरांना आला. एका तल्लख, हुशार जिवाचा कोंडमारा होतोय, आत्मविश्वास गमावलेल्या या मुलाला समजून घेऊन, त्याला आधार मिळाला तो मार्टिनसरांचा. सरांनी त्याला वेळोवेळी पुस्तके वाचायला दिली. एका वेगळय़ा विश्वाची त्याला ओळख झाली. मार्टिनसरांनी सतत विपिनची पाठराखण केली. अगदी डॅडी-माँच्या आजारपणात, त्यांच्या मृत्यूनंतरही त्याला आधार दिला. असे हे या कादंबरीतील एक जबरदस्त सकारात्मक व्यक्तिमत्त्व.
चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाल्यावर, सायन्सला की आर्ट्सला जायचं, हे डॅडींनी त्याला विचारलंच नाही. तेव्हाही आधार मार्टिनसरांचाच. तो कॉलेजमध्ये जाऊ लागला. मित्र, मैत्रिणी मिळाल्या. चित्रा आणि फातिमा या दोघी घट्ट मैत्रिणी. यांच्याशी विपिनची ओळख झाली. पण तसा तो अलिप्त असायचा. चित्राला वाचनाची, पेंटिंगची आवड तर फातिमा कवयित्री. शायरी, नृत्याची तिला आवड. अनेक भाषा ती छान बोलायची. दोघींना कॉफी आवडायची, पण आयुष्यात कधीही अटीतटीचे प्रसंग आले की तरतरी येण्यासाठी विपिनला चहाच घ्यावासा वाटायचा. चित्रा विपिनला म्हणायची, ‘तू ब्रिलियंट आहेस, पण तुझ्यातील पोटेन्शिअल तू ओळखत नाहीस. मागे-मागे राहू नकोस.’ तर फातिमा विपिनला म्हणते, ‘वागताना तू भिंती बांधतोस आपल्याभोवती.. पूल बांध.’
चित्रा आणि विपिन दोघांनाही वाचनाची आवड असल्याने अनेक पुस्तकांच्या संदर्भात चर्चा व्हायची. मार्टिनसरांमुळे अनेक लेखकांची. उदा. जुजे सारामागो, आल्बेर काम्यू, किपिलग, ऑस्कर वॉईल्ड, आभा देवरस इत्यादींच्या पुस्तकांच्या वाचनामुळे त्याचे विश्व आता थोडं विस्तारलं होतं. वाचनाच्या समान आवडीमुळे असेल, पण चित्रा त्याला आवडू लागली होती. पण ती तिच्या मैत्रिणीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगते. ‘मी तुझी फ्रेंड नेहमीच असणार आहे; पण फातिमा तुझ्यावर प्रेम करते. तिला प्रपोज कर.’ त्यावर तो म्हणतो, ‘त्या दृष्टीने मी फातिमाचा विचारही नाही केला. दोस्ती मी मान्य करतो. तेव्हा हे प्रपोजल माझ्यावर लादू नकोस. मला तू आवडतेस.’ यावर चित्रा म्हणते, ‘पण मी तुला मित्र मानते,’ हे ऐकून विपिनला वाटलं, सूर्य बुडाला. खूपशा व्यक्त-अव्यक्त विचारांचे गाठोडे घेऊन बुडाला.. मन भरकटायला लागलं की पुन्हा एकदा त्याला चहा घ्यावासा वाटतो.
माँच्या आजारपणामुळे कॉलेज बुडाले. विपिनला परीक्षेला बसता आले नाही. अशा रिकामपणात मन भरकटू नये म्हणून मार्टिनसरांनी त्याला रिसर्च कर, आवडीच्या पुस्तकांचे अनुवाद कर असं सांगितलं. तेव्हा त्याने अनेक मार्ग हाताळले. इंटरनेटवर माहिती काढून भाषाविषयक संशोधनाला सुरुवात केली. पण वरिष्ठांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने गोव्यातील रस्त्यांचा अभ्यास करून सरकार दरबारी अहवाल सादर केला; पण तिथेही कोणी दाद दिली नाही. वीजनिर्मितीच्या समस्येवर अभ्यास करून, रिपोर्ट सादर केला, पण त्याबाबत कोणतेही मूलभूत शिक्षण नसताना केलेल्या कामाला, ‘सो चाइल्डिश’ असे शेरे मिळाले. असे अनेक प्रयत्न केले, पण ‘यू आर ओव्हर कॉन्फिडण्ट’ म्हणून त्याचं हसं झालं.
जिद्द सोडू नकोस. ‘यू विल सक्सीड..’ असं म्हणून मार्टिनसरांनी पुन्हा त्याला सावरलं. त्याला आल्बेर काम्यूचं वाक्य आठवलं. Should I kill myself or cup of coffee? ? तसंच जेव्हा जेव्हा हताशपणा येतो, तेव्हा त्याला वाटत राहतं- ‘जीव द्यावा की चहा घ्यावा?’ एकूणच त्याच्या आयुष्याचा हा डळमळीत आलेख वाचल्यानंतर, या आगळय़ावेगळय़ा शीर्षकाचा समर्पकपणा जाणवतो.
चित्रा आणि फातिमाही त्याला धीर देतात. फातिमाचे लग्न झाले. चित्रा फाईन आर्ट्सच्या शिक्षणासाठी मुंबईला गेली. या एकाकीपणात चित्रा त्याला एकदा मुंबईला भेटायला बोलावते. फातिमा पण येणार असल्याचे ती सांगते. विमानाने मुंबईला चित्राच्या घरी जातो, तर फातिमा एकटीच त्याची वाट बघत असते. दोघे जण भेटतात. तृप्त होतात. ‘तुझी एका रात्रीची सोबत मला आयुष्यभर पुरेल’ असे म्हणून ती सकाळीच रेल्वेने गोव्याला जाण्यासाठी बाहेर पडते. विमानाने जायचं म्हणून विपिन दुपारी बाहेर पडतो. निघताना फातिमाला फोन करतो. पण ती उचलत नाही म्हणून चित्राला विचारतो.. तर त्याला कळते की गाडी पुलावरून जाताना, नदीच्या पात्रात तिने उडी मारली. तो सुन्न होतो. ‘रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा..’ हे तिने म्हटलं, पण आपण ते गांभीर्याने का नाही घेतलं! असे हताशपणे त्याला वाटू लागतं. माझ्या जगण्यात काय स्वारस्य राहिलंय? जगायलाही कारण लागतं. चित्रा आपल्या कलेसाठी जगते. मार्टिनसर वाचनातील आनंद घेण्यासाठी जगतात. ‘गंदा है पर धंदा है’- म्हणून कल्पेश (मामाचा मुलगा) जिगोलो होण्यासाठी जगतोय. जगायला बरं-वाईट कारण तर हवंच. जीवनाला अर्थ असण्याला तरी अर्थ असेल काय?.. आय मस्ट क्वीट.. सरळ स्टेशनवर जातो, चहाच्या स्टॉलवर जातो, पण गाडी यायची वेळ झाली होती. तोही गर्दीत शिरतो, तेवढय़ात अनाउन्समेंट ऐकली- ‘गाडी वीस मिनिटे उशिरा येणार आहे.’ तो गोंधळतो ‘जीव द्यावा की चहा घ्यावा?..’
जगणे आणि मरणे अशा प्रमेयामध्ये गुंफलेली ही विलक्षण वेगळी चित्रमयी शैलीतील कहाणी. सुरुवात आणि शेवट चहानेच होतो. चहा आणि जगणे. हताशपणा आला की, चहा आणि मरणं- चहा आणि प्रेमही. अशी संपूर्ण कथानकात चहाशी सांगड घातली आहे.सनाथ असून पोरका. मार्टिनसरांमुळे पुस्तकवाचनाचा आधार. रिकाम्या, हताश मनाला सावरण्यासाठी हाती घेतलेले प्रकल्प, चित्रा, फातिमा यांसारख्या वेगळय़ा व्यक्तिरेखांशी गोव्यातील मैत्र- अशा अनेक टप्प्यांतून जीवनदर्शन घडविणारी विपिन या तरुणाची ही कादंबरी म्हणजे पालक आणि तरुणाईसमोर सावरण्यासाठी धरलेला आरसा आहे. पण मनात आलं, रिकाम्या मनाने भरकटू नये म्हणून विपिनने अनेक प्रकल्प हाती घेतले- इतके पाठोपाठ दाखविण्याची गरज होती का? मार्टिनसरांनी विपिनला सावरण्यासाठी सुचवलेली पुस्तके, नावे वाचून लेखकाचेच वाचनवेड व्यक्त केले आहे की काय असे वाटत राहते. असो.
मूळ कोंकणी कादंबरीचा, ‘जीव द्यावा की चहा घ्यावा?’ हा मराठी अनुवाद शैलजा मावजो यांनी केला असून, हा अनुवाद आहे याचे भानही न राहता ही कादंबरी आपल्याला विविध व्यक्तिरेखा, घटनात्मक अनुभवासह बरोबर घेऊन जाते. आपण केवळ वाचन करीत नसून, त्या त्या व्यक्तिरेखांसह, त्यांच्या सांगाती राहून एखादा चित्रपटच पाहत आहोत असे वाटत राहते, हे या कादंबरीच्या लेखनशैलीचे ठळक वेगळेपण आहे.
‘जीव द्यावा की चहा घ्यावा?’ – मूळ लेखक- दामोदर मावजो, अनुवाद- शैलजा मावजो, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पाने-२७६, किंमत-३५०